एफ एम रेडिओवर एकदा सहज "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" या गण्याचं रिमेक गाणं माझ्या ऐकण्यात आलं. त्यात "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" यानंतर पुढे कोणती शब्दरचना ऐकायला मिळेल याबद्दल मी उत्सुक होतो. पूर्वीच्या शब्दांपेक्षा आणखी चांगलं काहीतरी असेल का किंवा त्या तोडीचं असेल असं वाटून पुढे ऐकल्यावर मला आत्यंतिक घोर निराशा झाली कारण "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" नंतर अचानक, "तेणू साडे गल्ली विच्च, मेणू किंदा, तेरे नाल, चालिया बलिया, किंदा, कुडी नचंदी" असले शब्द ऐकायला मिळाले आणि दुधाची घट्ट बासुंदी पिता पिता अचानक कुणीतरी त्या बासुंदीत मोठमोठे मिठाचे पर्वत टाकून मला जबरदस्तीने प्यायला लावतोय असे वाटले. अचानक गाण्याची चव बिघडली. नुसतं जुन्या गाण्याचं कडवं वापरलं आहे, बाकी काही नाही. जुन्यात नवीन शब्द टाका रे बाबांनो पण त्यात काहीतरी थोडातरी कॉमन सेन्स असला पाहिजे ना?

मी गाणे किंवा चित्रपटांच्या रिमेकच्या विरोधात नाही, मात्र रिमेक करतांना सुद्धा थोडी तरी बुद्धी आणि सृजनशीलता वापरावी लागते, हे काही रिमेक वाल्यांना आजकाल कळत नाही. बरेचदा काही गाण्यांचे रिमेक हे ओरिजिनल गाण्यांइतकेच चांगले झाले आहेत किंवा त्याहीपेक्षा अधिक श्रवणीय झाल्याची उदाहरणी आहेत.

मला "आशिक बनाया आपने",  "आज फिर तुम पे प्यार आया है", "आंख मारे लडका", "दिलबर दिलबर", "जाब कोई बात बिगड", "राबता", "हर किसीको नही मिलता", या सर्व गाण्याचं ओरिजिनल इतकंच रिमेक आवडलं आहे. मी फक्त ऑडिओबद्दल बोलतोय, व्हीडिओबद्दल बोलायचं तर तो संपूर्ण वेगळा विषय होईल. "दम मारो दम" चं रिमेक गाणं असंच फसलं होतं त्यावर ओरिजिनल वाली झीनत अमान चिडली होती. मात्र चित्रपटाची प्रसिद्धी मिळावी म्हणून काहीच बुद्धी न वापरता रिमेक गाणे बनवण्यात काहीच अर्थ नाही. रिमेक ऐकल्यावर ओरिजिनल गाण्यांचे कॉपीराईट वाले मालक रिमेकच्या सीडी वर दणादण डोके आपटून स्वतःची सृजनशीलता डोक्यातून घालवून बसत असतील.

अमिताभच्या डॉन चित्रपटाचा रिमेक करताना फरहान अख्तरने शेवट इतका बदलला आहे की डॉन चित्रपटाच्या मूळ कथानकाच्या उद्देशालाच सुरुंग लावला जातो पण त्यांनी तशी ट्विस्ट घेतली कारण त्यांना डॉन पार्ट 2 काढायचा होता. पण हा जो डॉन पार्ट २ होता, तो तर पार्ट 1 मधील फक्त काही व्यक्तिरेखा घेऊन एक स्वतंत्र कथा असलेला "चोरी वाला" चित्रपट होता ज्याचा तसा डॉन 1 शी डायरेक्ट संबंध नव्हता. डॉन 1 मधले सगळ्यात फसलेले रिमेक गाणे आहे, "खैके पान बनारस वाला". हे गाणे शाहरुखच्या डॉन मध्ये थायलंड मध्ये घडते. थायलंड मध्ये बनारसचं पान आणि त्यात प्रियंकाचा अति विचित्र डान्स! काय तो गाण्याचा रिमेक! मात्र इतर रिमेक गाणी चांगली झाली आहेत.

"चोरी वाला" चित्रपट म्हणजे "फास्ट अँड फ्युरियस 5" या चित्रपटासारखा ज्यात एखाद्या ठिकाणची कडक बंदोबस्तातली तिजोरी किंवा सोने किंवा हिरे एखादी चोर टोळी मिळून सुरक्षा भेदून चोरतात, जसा अभिषेक बच्चनचा "प्लेयर्स" होता. प्लेयर्स हा चित्रपट "द इटालियन जॉब" चा रिमेक होता ज्यात ते एका रेल्वेतील सोने त्या रेल्वेला आणखी एक समांतर रेल्वे चालवून लुटतात, तसेच आणखी चोरी वाला चित्रपट म्हणजे धूम2 ज्यात आपला हृतिक जेम्स बॉण्ड वाल्या हिरे चोरीच्या आयडिया वापरतो, म्हणजे हाही चित्रपट जेम्स बॉण्ड मुव्ही च्या आयडिया वापरून बनवलेला! जुना धर्मेंद्र चा शालिमार आठवतोय? तो पण आयडिया चोरलेला चोरपट!

सतत भुतांच्या मागे असलेल्या राम गोपाल वर्माला सुद्धा एकदा अचानक रिमेक काढायची बुद्धी झाली होती (आणि तोही शोलेचा) आणि नाव दिले "आग!" त्यात गब्बरची भूमिका अमिताभला दिली (आणि अमिताभने कशी काय स्वीकारली??) आणि चित्रपट एवढ्या जोरात आपटला की त्या आवाजाने अनेक सिनेमा मालकांचे कान बधिर झाले आणि राम गोपाल वर्मा पुन्हा भुतांच्या मागे लागला, पण आजकाल भुते सुद्धा त्यांचेवर नाराज आहेत. आजवर शोले चित्रपटाचे सगळे रिमेक किंवा भ्रष्ट नकला फसल्या आहेत: धडाकेबाज (कवट्या महाकाल म्हणजे मराठीतला गब्बर), थरथराट, मेला, आग, शान, चायना गेट.

मुकेश भट सारखा दिग्दर्शक त्याही पुढे जातो. तो भुतांचे चित्रपट काढतो आणि त्यांचे सिक्वेल म्हणजे पुढचे भाग काढतो. तीन भाग झाल्यावर आणखी पहिल्याच भागाचा रिमेक बनवतो आणि विषेश म्हणजे ठराविक प्रेक्षकवर्गात हा रिमेक सुद्धा हिट होतो. बिपाशाचा "राज" सुपरहिट झाल्यावर त्याचे पुढचे दोन भाग विशेष चालले नाहीत पण "राज रिबूट" हा मला पहिल्या राजचा रिमेक मला मात्र आवडला (यात इम्रान हाश्मी होता, आणि परदेशातील नेत्रसुखद स्थळांचं चित्रीकरण होत) यात पहिल्या "राज"ची तीच कथा घेऊन पण त्याला इंटेलिजंट तडका मारून ट्विस्ट दिलेली होती ती मला फार आवडली.  1920, 1920 Retunrs, 1920 London, 1921 असे कालचक्र ही भट्ट मंडळी फिरवत राहतात, पुढे काही सुचेनासं झाला की मग तेच चक्र पुन्हा गोल फिरून पहिल्या भागाचा रिमेक. या १९२० वाल्या आणि इतर भूतपटांत  आणि त्यांच्या सिरीज मध्ये असलेले बहुतेक हिरो हे मख्ख चेहेऱ्याचे आणि चेहऱ्यावरची मख्खी न उडणारे का असतात हे मात्र न उलगडलेले कोडे आहे. कदाचित हिरोच्या ऍक्टिंगवर लक्ष देत बसण्यापेक्षा भूत, भीती आणि त्यातील हॉट हिरोईन्सची शारीरिक मिती हेच अशा चित्रपटाचे हिरो आहेत असं भट्ट मंडळींचा समज झालेला असतो आणि प्रेक्षकांनी तो खराही ठरवलेला असतो.

जुना शोले हा अतिशय सुपरहिट चित्रपट सुद्धा तीन ते चार हॉलिवूड चित्रपटांवरून बनवला आहे. बाजीगर (अ किस बिफोर डाईंग), डर (केप फियर) हे पण हॉलिवूड चित्रपटांचे रिमेक आहेत. बाजीगर मध्ये तर काजोलच्या हातातून टीव्ही वरची न्यूज बघतांना कपबशी ज्या पद्धतीने खाली फरशीवर पडते ती तो सिन अगदी तसाच्या तसा ओरिजिनल चित्रपटातला उचलला आहे.  इतकाच काय तर "प्यार तो होना ही था" हा सुद्धा फ्रेंच किस या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे.

आणि अनेक जुनी प्रसिद्ध हिंदी गाणी ही हॉलिवूड गाण्यांवरून बिनधास्त चोरली आहेत म्हणजे त्यांची धून किंवा काही वाक्ये किंवा संपूर्ण गाणे सुद्धा! (ऑफिशियल रिमेक नाही) आणि तेही मूळ मालकांची परवानगी न घेता! पण त्यावेळेस इंटरनेट नसल्याने सामान्य प्रेक्षकांना त्याबद्दल काळात नव्हते. अनु मलिक ने इतरांच्याच नाही तर स्वतःच्याच गाण्यातून सुद्धा चोरी केली आहे. इष्क हुवा कैसे हुवा या गाण्यातील "ना मै जानू  ना तू जाने" या वाक्याची चाल त्याने त्याच्या स्वतःच्या बाजीगर मधल्या "ए मेरे हमसफर" या गाणयातील एका शिटीतून चोरली आहे (किंवा घेतली आहे असे म्हणूया फार तर). ताल साठी सुभाष घाई ने ए आर रेहमान ला घेतले पण तेव्हा अनु मलिक नाराज झाला होता. असं ऐकिवात आहे की "रमता जोगी" हे गाणं रहमान पेक्षा त्याने आणखी किती चांगल्या प्रकारे कंपोज केलं असतं हे सुभाष घाई ला ऐकवून दाखवलं होतं.

बरेचदा म्युझिशियन्स (संगीतकार) यांची एक विशिष्ट स्टाईल असते त्याद्वारे ते संगीत कुणाचे आहे हे लगेच ओळखू येते. पण त्यातही बरेचदा एकमेकांच्या स्टाईलची सुद्धा चोरी होतांना दिसतंय. ए आर रहमान इलायराजा टीम मधून बाहेर पडला पण त्याच्या म्युझिकवर इलायराजाची छाप जाणवते. फना मधल्या "चांद शिफारीश" या गाण्यावर तसेच परदेस मधल्या "दो दिल मिल रहे है, मगर चुपके चुपके" या गाण्यांवर रहमानची छाप जाणवते. लक्ष्मीकांत प्यारेलालच्या म्युझिक स्टाईलचा प्रभाव इस्माईल दरबार आणि त्याचा प्रभाव संजय लीला भन्साळीच्या म्युझिक वर आणि त्याचा प्रभाव कलंक मधल्या प्रीतमच्या म्युझिकवर जाणवतो. रहमानच्या स्टाईलचा प्रभाव संदीप चौटा वर सुद्धा जाणवतो आणि माझ्याअ मते अजय अतुल यांच्या म्युझिक वर पण जाणवतो. गजनीमधील रहमानच्या म्युझिक वर इतर संगीतकारांच्या प्रभाव जाणवतो. रहमान च्या लगान मधील म्युझिक वर लक्ष्मीकांत प्यारेलाल किंवा इस्माईल दरबारचा थोडा थोडा प्रभाव जाणवतो. असो. एकातून दुसरी लिंक ही अशी आठवत जाते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. या प्रभावाबद्दल मतभेद असू शकतात आणि त्याचा मी आदर करतो.

तसेच सारख्या धाटणीच्या चित्रपटांची सुद्धा एक लाट येते. म्हणजे कथा बीज तेच फक्त हाताळणी वेगळी! अग्निसाक्षी (नाना, मनीषा) आणि दरार (जुही, अरबाज) आणि कुछ ना कहो (अभिषेक, अरबाज, ऐश्वर्या) आणि त्याच विषयावर आणखी बरेच; लिजंड ऑफ भगतसिंग आणि 23 मार्च शाहिद; बायोपिकची लाट; फॅमिली चित्रपटांची आणि लांबलचक नावे असलेल्या चित्रपटांची लाट जसे हम आपके है कौन, हम साथ साथ है, हम आपके दिल मे राहते है, हमारा दिल आपके पास है;  कॉमेडीची लाट जसे हेराफेरी सिरीज, यावर पागल दिवाना सिरीज, क्या कुल है हम सिरीज, धमाल सिरीज;  रामगोपाल वर्मा च्या "सत्या" नंतर क्राईम आणि अंडरवर्ल्ड चित्रपटांची लाट आली; बाहुबली नंतर ऐतिहासिक फँटसी चित्रपटांची लाट आली, हॉलिडे आणि  बेबी नंतर दहशतवादावर आणि देशभक्तीवर आधारित चित्रपटांची लाट आली; "मर्डर" (मल्लिका शेरावत) नंतर हॉट चित्रपटांची लाट आली अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

आता सारख्या धाटणीचे काही गाणे बघू. बाजीगरचे टायटल सॉंग चे उदाहरण घेऊ. त्यातील काही वाक्ये बघा: "ओ मेरा चैन चुरा के, मेरी नींदें उड़ा के, खो न जाना किसी मोड़ पर, बाज़ीगर मैं बाज़ीगर...मुझको गलत ना समझना, मैं नहीं बादल आवारा!" म्हणजे यात प्रेमी प्रेमिकांना एकमेकांविषयी असलेल्या निष्ठेविषयी शंका किंवा भीती आहे. मग यानंतर अशाच धाटणीची अनेक गाणी लिहिली गेली. जसे "दिल को चुराके, अपना बनाके, धोका ना दूंगा व बेखबर, गॅम्बलर गॅम्बलर हा मै गॅम्बलर!", चुराके दिल मेरा गोरिया चली या गाण्यातील "किसी मोड़ पर मैं, तुमको पुकारूं, बहाना कोई बना तो ना लोगे!...नही बेवफ़ा तुम ये मुझको खबर है, बदलती रुतों से मगर मुझको डर है" वगैरे. लिहायला बसलं की खूप काही लिहिता येईल, खूप आठवत जातं. या लेखात आता इथेच थांबतो. पुन्हा पुढे भेट राहू आणि चित्रपटांतील असेच काही धागे पकडून फिल्मी गॉगल लावू!! लेख संपवता संपवता तुम्हाला डोक्याला खाद्य किंवा होमवर्क देतो. खाली दिलेल्या गाण्यांची ओरिजिनल गाणी तुम्ही शोधून काढा पाहू!

काही जुन्या गाण्यांची चोरीची उदाहरणे:

हा यही प्यार है, बिन तेरे दिल काही लागता नही

तीरछी टोपीवाले (त्रिदेव)

ऐ दिल है मुश्किल (देवानंद CID)

मिल गया (RD बर्मन हम किसींसे कमी नही)

मेरे रंग मे (मैने प्यार किया)

सून सून सून बरसात की धून (अनु मलिक, सर)

एक शरारत होणे को है (अनु मलिक, डुप्लिकेट)

कोई याहा नाचे नाचे (बप्पी लाहिरी, डिस्को डान्सर)

पहली बार मिले है (नदीम श्रवण, साजन)

जय माँ काली (राजेश रोशन, करणं अर्जुन)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel