कर्तव्यासाठी प्राण हाती

कामाची अशी धुमश्चक्री सुरू असतानाच आसाममधील चहाच्या मळयांतील मजुरांची केविलवाणी हाक चित्तरंजनांच्या कानावर आली. मजूर त्रस्त झाले होते. त्यांची कोणीच दाद घेईना. त्यांनी संप केला. परंतु उपयोग नाही. शेवटी हजारो मजूर आपल्या गावांना परत जाण्यासाठी निघाले. पोटात अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही अशा कंगाल कामगारांचे ते प्रस्थान होते. ते हजारो कामगार करीमगंज येथे आले. तेथील लोकांनी त्यांना खायला-प्यायला दिले परंतु रेल्वेचे अधिकारी तिकिटेच देत ना. तिकिट दिले नाही म्हणजे हे कामगार पुन्हा मळयात कामावर जातील असे सरकारी अधिकार्‍यांस वाटत होते. नागरिकांनी बॅ. सेनगुप्ता यांना तार केली. सेनगुप्ता रेल्वे अधिकार्‍यास भेटले. तिकिटे मिळाली. हे कामगार चांदपूर येथे आले. परंतु तेथे त्यांची कोण व्यवस्था करणार? तेथून बोटीने जावयाचे! कसे एकदम सारे होणार? सरकारने या भुकेकंगाल कामगारांची काही व्यवस्था केली पाहिजे होती. बोटीनी सारे जाईपर्यंत त्यांच्या राहण्याची, खाण्याची तजवीज केली पाहिजे होती. परंतु या कामगारांना, त्यांच्या स्त्रियांना, मुलाबाळांना भाकर देण्याऐवजी गुरख्यांची फलटण त्यांच्या अंगावर सोडण्यात आली. आणि या गुरख्यांनी गोळीबार केला! निर्दोष रक्त सांडले गेले. सारा बंगाल हळहळला. संतापला. चित्तरंजन चांदपूरला जायला निघाले. परंतु जायचे कसे? रेल्वेच्या कामगारांनी संप केला होता. रेल्वे चालू नव्हती. पद्मा नदीतून जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. परंतु पद्मेला प्रचंड पूर आला होता. तिच्या प्रवाहात नाव कोण टाकणार? पद्मा म्हणजे सर्वनाशी. हत्तीसारख्या लाटा उठत होत्या. वारा घों घों करीत होता. मित्र म्हणाले, ''चित्तरंजन, जीव धोक्यात घालू नका.'' चित्तरंजन म्हणाले, ''कर्तव्य करीत असता मरण येणे याहून धन्यतर काय?'' शेवटी ते निघाले. त्यांच्याबरोबर कोण होते? कोणते मित्र होते? फक्त वासंतीदेवी बरोबर होत्या. पतीच्या पाठोपाठ सावित्रीप्रमाणे जाणारी ती थोर सती बरोबर होती. नाव निघाली. एकदा तर नाव गडप होणार असे वाटले, परंतु स्वतःच्या जगण्याचा विचार त्यांच्या मनात नव्हता. त्या गरीब कामगारांच्या लाचारीचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. स्वतःची चिंता नव्हती. दुःखितांची चिंता होती. आणि शेवटी ते सुखरूप आले, कामगारांना भेटले. प्रांतिक काँग्रेसच्या वतीने पाच हजार रुपये त्यांनी आधीच पाठविले होते. आता समक्षच ते आले. बोटीची त्यांनी व्यवस्था केली. ते घरोघर नीट जातील अशी व्यवस्था करून चित्तरंजन कलकत्त्यास परत आले. कर्तव्याचा थोर आनंद त्या वेळेस त्यांच्या मुखावर झळकत होता.

राजपुत्राच्या स्वागतावर बहिष्कार

असहकाराच्या कार्यक्रमाचा धूमधडाका चालला होता. विदेशी कापडाच्या प्रचंड होळया सर्वत्र होत होत्या. स्वदेशी घरोघर जात होती. चरख्याचे नवजीवन देणारे गुंगूं सुरू होत होते. स्वयंसेवकदले सुरू होत होती. तिकडे मँचेस्टर ओरडू लागले. हिंदुस्थानला संतुष्ट करण्यासाठी राजपुत्र इकडे येणार असे घोषविण्यात आले. परंतु राजपुत्र येऊन काय करणार? स्वराज्य देणार आहेत का? हा अपमानित हिंदुस्थान राजपुत्राचे स्वागत कसे करणार? काँग्रेसने स्वागतावर बहिष्कार घालण्याचे ठरविले. राजपुत्र जेथे जेथे जाईल तेथे हरताळ पाळला जावा. जनतेने स्वतंत्र अशी प्रचंड सभा त्या दिवशी घ्यावी. अशा सूचना काँग्रेसने दिल्या. सरकारने स्वयंसेवकदले बेकायदा ठरविली. काँग्रेसने सर्वांना स्वयंसेवक म्हणून नावे नोंदवा अशी आज्ञा केली. परकी सत्ता व काँग्रेस यांचा असा हा तेजस्वी सामना सुरू झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel