नमस्कार वाचक मंडळी. आरंभचा सप्टेंबर अंक आपल्या हाती देताना मला खूप आनंद होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहेच की आरंभ हे एक ऑनलाइन त्रैमासिक असून वर्षातून चार वेळा प्रकाशित होते आणि गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असते तसेच या अंकाची पीडीएफ आवृत्तीसुद्धा निघते आणि तीसुद्धा मोफत उपलब्ध असते. यात लिहिणारे प्रसिद्ध तसेच नवोदित लेखक कोणतेही मानधन न घेता लिखाण करत असतात. संपूर्ण आरंभ टीम एक सामाजिक बांधिलकी म्हणून, मराठी भाषेची सेवा करावी म्हणून तसेच नवोदित लेखकांना लिहिण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून हा अंक चालवत आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस लेखक आणि वाचकांचा आरंभला भरघोस प्रतिसाद लाभतो आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे.
गेल्या काही महिन्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचे झाले तर, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे अनेक जण बेघर झाले तसेच जीवित आणि वित्तहानी झाली. महापुरात मृत्युमुखी पडलेल्या सगळ्यांना आरंभ टीम तर्फे श्रद्धांजली. आरंभ टीममधील प्रत्येकाने आपापल्या परीने पूरग्रस्तांना मदत केली आणि सामाजिक बांधिलकी जपली याचा मला आनंद वाटतो. तसेच जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द झाले आणि लडाख हे वेगळे राज्य झाले. त्याचे दूरगामी परिणाम हळूहळू दिसायला लागतील. तसेच भारताने वर्ल्डकप गमावला याचे सच्चा क्रीडा रसिकांना दुःख झाले असेल पण ज्याच्या अंगी खिलाडू वृत्ती आहे अशा प्रेक्षकांनी आणि क्रीडाप्रेमींनी हा पराभव खिलाडूवृत्तीने नक्कीच घेतला असेल. आगामी T20 वर्ल्ड कप साठी आरंभ टीम कडून टीम इंडियाला शुभेच्छा! फक्त क्रिकेटच नाही तर इतर क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या खेळाडूंना आराम टीम तर्फे हार्दिक शुभेच्छा! चित्रपट क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत सामाजिक, राजकीय, कायदा, कॉर्पोरेट क्षेत्रात नवनवीन बदलाचे वारे वाहत आहेत. कोणताही बदल असो त्याबद्दल सुरुवातीला भाई आणि विरोध होतच असतो. पण त्याचे बरे वाईट परिणाम अनुभवायला भरपूर काळ जाऊ द्यावा लागतो.
असे म्हणतात की कोणतेही नियतकालिक, वर्तमानपत्र आणि पुस्तक असो किंवा मग टीव्ही मालिका, चित्रपट असो त्यात सद्यस्थितीतील समाजजीवनाचे प्रतिबिंब उमटत असते. आरंभमध्ये सुद्धा आपणास हे दिसेलच पण त्याच सोबत आपण निखळ साहित्याचा आनंद सुद्धा घेत असतो म्हणजे कथा कविता आणि कला यांनाही आपण बरोबरीने स्थान दिले आहे. लेखकांकडून आरंभ टीमची एक अपेक्षा आहे की सध्या विनोदी लिखाण करणारे खूप कमी आहेत, तेव्हा पुढील अंकासाठी विनोदी लिखाण करणाऱ्या लेखकांनी पुढे यावे हे या महिन्यातील आरंभ टीम तर्फे आवाहन आहे.
चला तर मग हा अंक वाचनाचा आनंद घ्या आणि पुन्हा भेटूया डिसेंबर महिन्यात म्हणजेच या वर्षीच्या शेवटच्या अंकात! तोपर्यंत लिहिते व्हा आणि लिखाणातून वैचारिक बदल घडवा.
- संपादक