avinash.halbe21@gmail.com
9011068472
माणसाचे मोठेपण वय, शिक्षण, शारीरिक आकार, ताकद, सांपत्तिक स्थिती, हुद्दा, घराणे, वक्तृत्व आणि विद्वत्ता इत्यादी गुणवैशिष्टयांतून ठरते असे सांगतात. परंतु काही माणसांत एकाच वेळी अनेक गुणांचा संगम आढळून येतो. याबाबतीता मला आलेले दोन मोठया माणसांचे हृद्य अनुभव येथे देत आहे.
पहिला अनुभव डॉ. विजय भटकर यांचा आहे. पुण्यातील श्री सद्गुरू जंगली महाराजांच्या पुण्यतिथी ऊत्सवात, सायंकालीन ज्ञानसत्रामध्ये, व्याख्यानांच्या आयोजनाची सेवा माझ्याकडे असते. एके वर्षी यात डॉक्टरसाहेबांचे व्याख्यान असावे असे वाटून, मी अपॉइंटमेंट घेऊन माझ्या पत्नीसह त्यांना, सकाळनगर मधील काऱ्यालयात जाऊन भेटलो. व्याख्यानास त्यांनी रूकारही दिला. बोलणे चालू असताना माझे लक्ष त्यांच्या टेबलावरील आद्य शंकराचार्यांच्या संगमरवरी पुतळयाकडे गेले आणि त्यांना आपण एक वस्त्र अर्पण करावे असे वाटले. डॉ. ना विचारताच, त्यांनी त्यासाठी अनुमती दिली. लगोलग माझ्या पत्नीने एक भरजरी कापड आणून स्वत: शिवून ते तयार केले. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देण्याचे वेळी आम्ही ते डॉक्टरसाहेबांकडे सुपूर्त केले.
डॉक्टरसाहेबांनी "संन्यासी व्यक्ती साध्या सुती कापडाची भगवी छाटी धारण करतो, भरजरी अथवा अन्य कोणत्याही कापडाची चालत नाही" असे सांगून नम्रपणे ती परत केली. ही गोष्ट माहिती नसल्याने आम्ही काहीसे खजील झालो. पण काही दिवसांतच चूक सुधारून, त्यांनी सांगितल्याप्रमाणे बनवलेली छाटी घेऊन जाताच, डॉक्टर साहेबांनी आनंदाने ती शंकराचार्यांना घातली.
मंदिरातील व्याख्यानाचे वेळी डॉक्टरसाहेब एक आंतरराष्ट्रिय ख्यातीची व्यक्ती असल्याने, आम्ही पारंपारिक व्यासपीठा ऐवजी, टेबलखुर्चीची व्यवस्था केली होती. परंतु, डॉक्टरसाहेबांनी "मी उभा राहूनच बोलेन" असे सांगितले. मी नम्रपणे कारण विचारताच "स्वत: महाराज समोर उभे असताना, मी बसून बोलणे बरोबर आहे कां?" असे स्मितहास्यपूर्वक उत्तर दिले. (मंदिरातील श्री जंगलीमहाराजांची तस्बीर उभ्या पविञ्याची (स्टॅंडिंग पोश्र्चर् मधील आहे) आम्ही त्या तस्बीरीकडे केवळ प्रतिमा म्हणून पाहात होतो परंतु डॉक्टरसाहेबांची भूमिका समोर प्रत्यक्ष महाराज उभे आहेत अशी होती. त्यांच्या या भक्तीभावनायुक्त नम्रतेस काय म्हणावे?
दुसरा अनुभव डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा आहे. मी एक व्याख्याता आहे. साधारणपणे 2008 च्या सुमारास, डॉ. अब्दुल कलाम, डॉ. विजय भटकर आणि डॉ. माशेलकरांच्या लेख, भाषणे, इतर कामगिऱ्यांतून प्रेरणा घेऊन, मी 'भारताची गौरवगाथा' या माझ्या भाषणाची बांधणी करून, त्यावर एक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनही बनवले. ते डॉ. रघुनाथ माशेलकर यांना दाखवून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे, या हेतूने मी डॉक्टरसाहेबांची अपॉईंटमेंट घेऊन, एन. सी. एल. मधील त्यांच्या काऱ्यालयात जाऊन भेटलो. मला 5 मिनीटांचा अवधी मिळाला होता. त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी निर्देश करताच मी केबीनपाशी गेलो, तो खुद्द डॉ. माशेलकरांनीच दार उघडून माझे स्वागत केले! मी भेटीचे प्रयोजन सांगताच, त्यांनी ते प्रेझेंटेशन, त्यांच्या आसनाच्या डाव्या बाजूला असलेल्या, पीसीवर (कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर) दाखवण्यास सांगितले आणि आपली जागा सोडून टेबलासमोरच्या खुर्चीत बसले.
मी तातडीने तिथे जाऊन पेन ड्राईव्हवरून माझे प्रेझेंटेशन त्यांच्या पीसी वर मराठी फॉंटसह लोड केले. सुरूवात करताच त्यांनी 'अहो उभे कशाला रहाता, बसून बोला की' असे मला स्मितहास्यपूर्वक सांगितले. मी नकळत खाली बसून, माझे प्रेझेंटेशन माझ्या विवरणासह स्लाईड बाय स्लाईड त्यांना दाखवण्यास सुरूवात केली. प्रत्येक स्लाईड डॉ. काळजीपूर्वक पहात होते आणि काही सूचना किंवा अधिक माहिती पण सांगत होते, जी मी टिपून घेत होतो. आमची भेट खरेतर 5 मिनिटांची ठरली होती, पण हा कार्यक्रम साधारणपणे पाऊण तास चालूनही, एकदाही त्यांनी मला वेळेची जाणीव करून दिली नाही, अथवा थांबण्यास सांगितले नाही. उलट सर्व स्लाईडस् दाखवून झाल्यावर त्यांनी माझे कौतुक केले आणि भावी व्याख्यानांसाठी मला शुभेच्छाही दिल्या.
पेन ड्राईव्ह वगैरे काढून आवराआवर करताना, एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मी विलक्षण दचकलो! ती म्हणजे प्रेझेंटेशन दाखवताना पाऊण तास मी पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या Executive Chair मध्ये बसलो होतो अणि ते स्वतः मात्र, टेबलापलीकडे माझ्या समोर एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे शांतपणे बसून ऐकत होते! या नम्रतेस काय म्हणावे? निघताना न रहावून मी त्यांना चरणस्पर्शपूर्वक नमस्कार केला. बाहेर आलो तो 'कास्प' या स्वयंसेवी संस्थेचे लोकप्रिय प्रणेते डॉ. शरश्र्चंद्र गोखले हे डॉक्टरसाहेबांच्या भेटीसाठी ताटकळत बसले होते. मी काहीसा ओशाळून त्यांनाही अभिवादन करून निघालो.
या दोनही प्रसंगातून एक इंग्रजी वाक्य मला उद्धृत करावेसे वाटते. ते असे की –
Great People do not do any extra ordinary things, but they do ordinary things extremely well! पुढे माझी या विषयावर शेकडो व्याख्याने झाली. यथावकाश मी या दोघांवर लेखही लिहीले. पण या दोघा महान व्यक्तींनी घालून दिलेले आदर्श मी आजन्म विसरू शकणार नाही!!