(हा इंटरनेटवरील काही लघूकथांचा स्वैर अनुवाद आहे)
1
त्या दिवशी पाच वर्षाचा मुलगा एलेक्स हा त्याचे वडील डेव्हिड यांच्या सोबत एकटाच बेडवर खेळत बसलेला होता, तो म्हणाला, " पप्पा बेडखाली कुणीतरी आहे, बघा ना!"
" अरे कुणी कशाला येईल बेडखाली?"
" बघा ना, मला हालचाल जाणवतेय!"
" ठीक आहे, तुझ्या समाधानासाठी बघतो" , असे म्हणून डेव्हिडने बेडखाली वाकून पाहिले, बघतो तर काय घाबरून पाय दुमडून थरथरत अलेक्स बेड खाली बसला होता आणि घाबरत हळू आवाजात म्हणाला,
" पप्पा बेडवर कुणीतरी आहे!"
2
मी त्या दिवशी घरी एकटाच होतो. रात्री सगळी दारं खिडक्या बंद करून बसलो.
तेवढ्यात लाईट गेली. अंधारात चाचपडत मी टॉर्च शोधला आणि अचानक मला काचेवर कुणी टकटक करतंय असा आवाज आला.
मी काचेच्या खिडकीकडे टॉर्च मारून पाहिले आणि परत पुन्हा पुन्हा टकटक झाली पण तो आवाज त्या खिडकीतून येतच नव्हता.
खिडकी बाहेरही कुणीच नव्हतं.
मी आवाजाच्या दिशेने मागे टॉर्च वळवला तर कळलं की आवाज आरश्यातून येत होता.
3
मी हॉस्टेल रूम मध्ये एकटा रहात होतो तेव्हाची गोष्ट.
रोज रात्री एक मांजर खिडकीतून यायचं. ते रोज रात्री टेबलावर बसून माझेकडे एकटक बघायचं.
त्याला एवढं माझेकडे एकटक बघून काय वाटायचं काय माहीत?
एकदा त्याच्या जवळ जाऊन मी पाहिलं तर लक्षात आलं की ते मांजर माझ्याकडे नाही, माझ्या मागे कुणाकडे तरी बघत होतं.
4
ते नेहमी म्हणतात की अभिनय नीट शिकायचा असेल तर आरश्यात बघून सराव करावा.
मी एकदा आरशात पाहून हसले पण माझे प्रतिबिंब मला साथ देत नव्हते, ते उलट माझ्याकडे डोळे रोखून पाहत होते.
सांगा मी काय करू आता?
5
एका गावात दोन लहान निरागस भावंडं एका झोपडीत आई बरोबर रहात असतात. थंडीचे दिवस असतात. एके संध्याकाळी ती मुले त्यांच्या झोपडीजवळ असलेल्या पर्वतावर नेहेमीसारखी आपडी थापडी हा टाळ्यांचा खेळ खेळत असतात. आईला त्या दिवशी कामावरून यायला उशीर होतो. त्यामुळे त्यांना नेहमीची आईची हाक अजून ऐकू न आल्याने ती खेळात एवढी मग्न होतात की त्यांना घरी परतायचे भानच रहात नाही. इतर मुले घरी निघून जातात. नंतर लक्षात आल्यावर अंधार झालेला असतो.
आईची आठवण आल्यानंतर, घाबरल्याने आणि बावरल्याने ती दोघेजण रस्ता चुकतात आणि अंधारात भरकटत जातात. सगळीकडे त्यांना एकसारखी झाडे दिसायला लागतात. घराकडे जायचा रस्ता सुद्धा सापडेनासा होतो. त्यादिवशी आकाशात चंद्र सुद्धा नसतो. दूरपर्यंत त्यांना स्वत:ची झोपडी दिसून येत नाही.
शेवटी मेटाकुटीला येऊन ते एका झाडाखाली बसतात. दोघेजण आता थंडीने कुडकुडायला लागतात. तेवढ्यात समोर त्यांना मोडकळीस आलेली एक मोठी झोपडी दिसते. त्यात प्रकाश असतो. त्यात ते जायचे ठरवतात.
झोपडीचे दार उघडे असल्याने ढकलून ते आत शिरतात. आत कुणीच नसते. झोपडीला खिडक्या असतात पण त्यांना दारे नसतात. खिडकीतून थंडी आत येत असते. दोघांना एक शिडी दिसते जी माळ्यावर जाते. ते माळ्यावर चढतात तशी त्यांना ऊब जाणवते. माळ्यावर पांघरूण असते. ते दोघे रात्री तेथेच थांबायचे ठरवून अंगावर पांघरून घेतात आणि झोपून जातात. माळ्याच्या वरच्या बाजूला छतावर एक छोटा गोल झरोका असतो.
बरोबर मध्यरात्री त्या गोल झरोक्यातून कुणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू येेतो. आवाज हळूहळू वाढत जातो. त्यामुळे मुलगा बहिणीला उठवतो. ते घाबरून एकमेकांना बिलगतात पण आवाज वाढत गेल्याने तो मुलगा पांघरूण बाजूला करून बाजूच्या एका लाकडी स्टूलवर चढून त्या झरोक्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण हात पुरत नाही.
मग पुन्हा खाली उतरून मुलगा छताकडे बघून म्हणतो, "कोण आहे छतावर? आम्हाला घाबरवू नको. आम्ही छोटे आहोत. आम्हाला त्रास देऊ नको!"
छतावरचा आवाज अचानक बंद होतो. ते दोघे झोपतात. तेवढ्यात पूर्वीपेक्षा दुपटीने मोठ्या आवाजात छतावर चालण्याचा आवाज ऐकू येतो.
मुलगी निरागसतेने म्हणते, " दादा अरे कुणीतरी आपल्यासारखे छोटे असणार. रस्ता चुकलेले. ते आत यायला घाबरत असतील!"
" अगं ताई भूत पण असू शकतं. भूत आहे की आपल्यासारखे कुणीतरी लहान मूल हे बघायला आपण त्यांना टाळी वाजवायला सांगू. जर वर भूत असेल तर त्यांना दोन टाळ्या वाजवायला सांगू आणि लहान कुणीतरी असेल तर एक टाळी! आपडी थापडी सारखं!"
शेवटी निरागस मुले ती. पांघरूण बाजूला सारून ते दोघेजण झरोक्याखाली उभे रहातात.
मुलगा झरोक्याकडे पाहून विचारतो, " छतावर जर भूत असेल तर दोन टाळ्या वाजव आणि लहान मुलगा असेल तर एक टाळी वाजव!"
छातावरची हालचाल बंद होते आणि पांघरुणाखालून दोन टाळ्या वाजवल्याचा आवाज येतो.