juilyatitkar@yahoo.in
8655778845
आकाशात बरसणारा, विजेशी खेळणारा
जमिनीत मुरणारा, सुखावणारा पाऊस
कधी गडगडणारा, सडेतोड पडणारा
नुसताच रिपरिपणारा. माझ्या मनातला पाऊस ||
कधी किनाऱ्याने वाहणारा, सोबत होड्याना नेणारा
कधी थरारक भासणारा हा पाऊस
रंग बेरंगी छत्र्यांनी रंग भरणारा
उत्साही वाटणारा. माझ्या मनातला पाऊस ||
कधी पाण्यासाठी रडवणारा, पाण्यामुळेच हसवणारा
अश्रुनी भिजवणारा, झिजवणारा हा पाऊस
पाण्यापाईच मारणारा अन त्यातूनच तारणारा
सृष्टीला जागवणारा. माझ्या मनातला पाऊस ||
कधी प्रेमात रंगणारा, कळीतून फुलणारा
कधी सौंदऱ्याने सजणारा असा हा पाऊस
कधी ओशाळलेल्या मायेचा, नात्याची ऊब देणारा
बेधुंद बरसणारा. माझ्या मनातला पाऊस ||
थंडगार वाऱ्यावरती मनमुराद नाचणारा
डोंगरमाथ्यावरून कधी तृप्तीने कोसळणारा
चिंब भिजवून निथळणारा
हवाहवासा वाटणारा. माझ्या मनातला पाऊस ||
खिडकीतून नुसते नयन सुख देणारा
भिंतीच्या कोपऱ्यातून नुसताच ठीपकणारा पाऊस
चिखलाने बरबटणारा
आडोशासाठी वळवणारा. माझ्या मनातला पाऊस ||
कोसळून कोसळून सारेच वाहून नेणारा
अचानक गुडूप होऊन काळजाला भेगा देणारा पाऊस
तरीही येताना आनंद घेऊन येणारा
असा अनप्रेडिक्टेबल. माझ्या मनातला पाऊस ||
आहे पूर्वीचाच पण नव्याने समजणारा
प्रत्येक थेंबातून जगणं शिकवणारा पाऊस
एकच विनंती आहे तुला. भावनांचा ओलावा आटला
तरी बाबा कधी दूर नको जाऊस
असाच राहावा माझ्या मनातला पाऊस ||