आताशा मन कशातच रमत नाही
सगळं कसं अगदी रुक्ष रुक्ष वाटतं
अनुभवांनी मन जास्तच रुक्ष झालंय
व्यवस्थेने जगण्याचा रस शोषून घेतलाय
सगळीकडे एक छळवादी अनुभव येतो
रांगांमध्ये जीव थकून जातो
कागदी घोड्यांनी जीव थकून जातो
बालपणाचे रंग उडून गेले आहेत
आपण कितीही प्रेमाने वागलो तरी
माणसं त्यांचा स्वार्थ अहंकार हेका सोडत नाहीत
संवादाच्या सगळ्या वाटा बंद झाल्या आहेत
खोटं वागणं खोटं जगणं खोटं हसणं
स्वार्थ साधण्यापुरतं गोड बोलणं
स्वार्थ संपला की ढुंकून न पहाणं
अपमानांचे आघात करीत रहाणं
काम असलं की कवटाळणं
काम संपलं की टाळणं
जिव्हारी बोलणी जिव्हारी घाव
जिव्हारी दृष्टीत जिव्हारी भाव
कुठेतरी कुणाला तरी कशाने तरी
जखमी केल्याशिवाय पोट भरत नाही
कुठेतरी कुणालातरी कशानेतरी लुटल्याशिवाय
कुणाला समाधानाची प्राप्ती होत नाही
शरीर मन बुद्धीचा ऱ्हास होत चाललाय
आत्म्याची तर गोष्टच लांब राहिली
तो बिचारा हे सगळे खेळ फक्त बघतो आहे
सगळ्या देवता दगड बनून मुक्या झाल्या आहेत
सुविचार सदाचार आणि संस्कार भयभीत होऊन
सहन होत नाही आणि सांगताही येत नाही म्हणून
कोणताही अपराध केलेला नाही तरीही
खाली मान घालून अपराधीपणे वाटचाल करीत आहेत
उठवळ छाती काढून चालते आणि सोज्वळ शालीन
रस्त्याच्या कडेकडेने बिचकून चालते आहे
विसंवादी विनाशाच्या ह्या उंबरठ्यावर
कविता जळत चालली आहे
नाट्य फुलत चाललं आहे
आणि तमाशाचा फड तर अगदी रंगात आलाय
दौलतजादा उधळून मद्य मदिराक्षीच्या सान्निध्यात
उन्मत्त खुशालचेंडू चुस्त मस्त कैफात मश्गुल आहेत
हरामाचा पैसा आणि मद्य मांस मदिराक्षी, मग काय ?
"ला पीला दे साकीया पैमाना पैमानेके बाद"
ही गझल आळवीत
"आधीच मर्कट तशात मद्य प्याला आणि विंचूदंश झाला"
अशा अवस्थेतला तो मधुशालेत मदिराक्शीला
बालीश बहु बायकात बडबडला अशा थाटात म्हणतो
"होशकी बाते करुंगा होशमे आनेके बाद"
अरे पण तू होशमध्ये आला तर ना ?
आणि ती मदिराक्षी मधुबाला मधुशालेतून तुला
होशमध्ये येऊ देईल तर ना ?
तुझा भिकारी देवदास होईपर्यंत ती तुला सोडणार नाही
तू त्यांना सोडणार नाही
आणि असं झाल्याशिवाय
आमचं दुःख हताशा आणि निराशा
आमच्या आयुष्याचं हे ओकंबोकेपण
आमचा हा रुक्ष शुष्क उदास भकास विषादयोग संपणार नाही
आणि खऱ्या अर्थाने तोपर्यंत आमची
कविताही फुलणार नाही, खुलणार नाही
आणि हसणारही नाही
आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड दुःखात
आमची कविता हिरमुसली आहे, रुसली आहे
व्यवस्थेच्या दुष्टचक्रात तिच्या रथाची चाकं फसली आहेत
ऐकू येतो आहे तो फक्त तिचा आर्त चित्कार
ह्या चित्काराचं रुपांतर कदाचित
भुजंगाच्या फुत्कारात झालं तर
असा आशावाद उराशी बाळगून
सध्या तरी ती तिचं धरणीच्या गर्भात रुतलेलं
रथचक्र बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे.!