©सरिता सावंत भोसले

         आज हाफ डे घेऊन घरी आले. रुची माझी मुलगी तिच्या शाळेत मिटिंग होती तिथे जायचं आणि उरलेलं प्रोजेक्टच काम घरी करायचं अस नियोजन एकंदरीत. एक दिवस आधी अनिल (नवरोबा) म्हणाला मी नाही जात शाळेत मिटींगला तू जा..माझं महत्वाचं काम आहे ऑफिसमध्ये..मी तस रुचीला बोललोय....आणि तुला काय विचारायचं त्यात म्हंटल....तू तर तिला नाही बोलणार नाहीस. 

     शाळेत मिटिंग संपवून घरी आल्यावर प्रोजेक्टच काम सुरू केलं लॅपटॉपवर... संध्याकाळी अनिल आला,"अग चल माझ्या मित्राकडे आपल्याला पार्टीला जायचंय. आवर"

"अरे पण अस कस अचानक सांगतोस? आधी मला विचारायचं तरी...माझं काम आहे महत्वाचं"

"अग मित्र आहेच पण तो मॅनेजर आहे माझा....न जाऊन कस चालेल आणि तुला काय विचारायचं त्यात...तू मला नाही म्हणणार आहेस का..माझ्यासाठी एवढं करशील माहितीये मला".   काय करणार..गेले पार्टीला आवरून. प्रोजेक्ट राहिला अर्धा. दुसऱ्या दिवशी सकाळी बॉसने खरपूस समाचार घेतला आणि हाफ डे घेऊन तुम्ही छान काम केलत अशी स्तुतीसुमनेही उधळली.

     ती बॉसची टेप ऐकण्यातच पूर्ण दिवस गेला ऑफिसमध्ये...संध्याकाळी घरी आली...सासूबाई कोणाची तरी लग्नपत्रिका बघत बसलेल्या. मी दिसताच, "अनिलच्या मामेभावाच लग्न आहे ना पंधरा दिवसांनी..जायला हवं आपल्याला..सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे बघ...मी कळवलं सगळे येतोय.. तू सुट्टी घे चार दिवस."

"अहो आई पण आता लगेच सुट्टी कशी मिळेल?..मला जरा आधी विचारायचं किंवा सांगायचं तरी"-  मी

"तुला अग काय विचारायचं आणि सांगायचं त्यात...तू नाही म्हणशील का घरच्या समारंभाला..मिळेल सुट्टी बघ".

 ( मागच्या महिन्यात माझ्या चुलत भावाच्या लग्नाचंही आग्रहाचं निमंत्रण होत पण तेव्हा "असेच आग्रहाचं बोलायची पद्धत असते ग" अस बोलून कोण आलं नाही)

          रात्रीचा दिवस करत, कधी ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबत, घर  ऑफिस अशी तारेवरची कसरत करत प्रोजेक्ट वर्क संपवलं आणि लग्नसमारंभाला हजर झाले. तिथे पाहुणचार करून घरी आले...नणंद बाई आल्या सोबतच त्यांची दोन पिल्लं घेऊन..मग परत घर ऑफिस फुल टाइम ड्युटी सुरू.

      जाताना नणंद बाईंनी माझ्या कपाटातून नवीन साडी काढली आणि म्हणाल्या , "वहिनी मी ही घेऊन जाते ग..तुला काय विचारू ना ग त्यात...तू कधी नाही म्हणतेस का मला".


खरतर ऑफिसमध्ये एक कार्यक्रम होता तेव्हा त्या साडीच उदघाटन करणार होते पण त्या आधीच तिचं उदघाटन झालं.


    सासऱ्यानी एक दिवस आदेश दिला मित्र येणार आहेत घरी दहा जण ...जेवण बनव.

"अहो बाबा आधी विचारायचं तरी. इतकं अचानक कस?"

"अग तुला काय विचारायचं..तुला आवडत ना पाहुणचार करायला...करशील ग तू माहितेय मला". माहितीये म्हणजे करणं भाग पडलंच.

      दोन दिवसांनी अनिल - "तू आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये जा घरी लवकर जाऊन. मला मित्राकडे जायचंय".

"अरे पण अस कस अचानक? आधी जरा..."

"त्यात तुला काय विचारायचं ग...माहितीये तू जाणारच".

कितीतरी दिवसांनी जाता जाता बहिणीला भेटायचं ठरवलेलं..गेले हॉस्पिटलमध्ये सासूबाईंना घेऊन डॉक्टरला भेटायला.

    काही दिवसांनी मी,   "अनिल एका आठवड्याने माझ्या चुलत बहिणीच लग्न आहे आणि आपण जातोय. तू येणार अस मी सांगितलंय सगळ्यांना तिकडे..त्यामुळे जावंच लागेल..आणि तू सुट्टी घेतोयस".

   "What is this yar?  तू अस कस सांगू शकतेस डायरेक्ट तिकडे? एकदा मला विचारायचस तरी...याला काय अर्थ आहे?  माझं काही मत असेल की नाही यावर? माझीही काम आहेत.. workload  आहे आणि यात हे लग्नसमारंभ वगैरे कस जमेल ग? तू मला गृहीत कस धरू शकतेस?

    "जस तू मला गृहीत धरतोस नेहमीच. घरातले सगळेच मला गृहीत धरतात तसच. बाहेर जेवायला जायचं असो,कोणाच्या लग्नाला जायचं असो किंवा घरी पाहुणे बोलवायचे असुदे..तुम्ही मला गृहीतच धरता..तुला काय विचारायचं त्यात..तू नाही म्हणतेस का...अस बोलून मोकळे होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत गृहीतच तर धरता तुम्ही मला...पण त्यावर माझही काही मत असत हे लक्षात कधी येणार तुमच्या? 

       मी नाही म्हणणार नाही कारण मला नाती जपायची आहेत..त्यांना सजवायचय..फुलवायचय.. मीही घर,रुचीची शाळा,आईंचं दुखणं,बाबांचे मित्र, पाहुणचार,लग्नसमारंभ सगळं बघून ऑफीस आणि workload सांभाळते पण तुला नाही बोलले आजपर्यंत मला का नाही विचारलंस किंवा तुला काय विचारायचं त्यात असंही बोलले नाही. तुला स्वतंत्र मत आहेत याच भान नेहमी ठेवलं आणि त्या मतांचा आदरही केला. 

    आम्ही बायका नाही म्हणणारच नाही रे...तुमच्या आनंदात आमचा आंनद असतो पण तिला गृहीत धरलं की त्रास होतो.

 तिला विचारल आणि तिच्या मतांचा आदर केला की ती हसत हसत सगळ्या गोष्टी करेल."

   पोटतिडकीने एवढं मत मांडल आणि नवरोबाला ते पटलं आणि माझ्या मताचा आदर करून आले साहेब लग्नाला. त्यामुळे लग्न अजून द्विगुणित आनंदाने पार पडलं

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel