दिलोमे तू अपनी बेताबिया लेकर चल रहे हो, तो जिंदा हो !
नजरोंमे अपनी ख्वाबोकी बिजलीया लेकर चल रहे हो, तो जिंदा हो !
हवा के झोके के जैसे आझाद रहेना सिखो, तो जिंदा हो !
तुम एक दर्या के जैसा बहना सिखो, तो जिंदा हो !
दिलोमे तू अपनी बेताबिया लेकर चल रहे हो, तो जिंदा हो !
नजरोंमे अपनी ख्वाबोकी बिजलीया लेकर चल रहे हो, तो जिंदा हो !

अंतर्गत उर्मीच्या येणाऱ्या हाकांनी आतापर्यत जवळजवळ संपूर्ण भारत दर्शन झाले, मात्र त्याच हाकांना प्रतिसाद देवून बुलेटवर भारत भ्रमंती बरोबर भारताला लागुन असलेल्या देशातही बुलेट भ्रमंती करण्यास अंतर्गत प्रेरणा मिळाली आणि त्याला साथ माझ्या अर्धांगिनीची "मी आता पुन्हा बुलेटवर येणार नाही" अशी धमकी देवूनही पुन्हा पुन्हा बुलेटवर माझ्या सोबत येणाऱ्या सौ. नेहाची मिळाली.

बुलेट घेतल्या-घेतल्या सर्वात प्रथम नाशिक-गोवा-नाशिक अशी भ्रमंती झाली. त्यानंतर प्रत्येक बाईकस्वाराचे असलेले स्वप्न म्हणजे "लडाख" बाईक भ्रमंती पाहीजे. मात्र झालेल्या  अपघातामुळे व त्यानंतर झालेल्या हृदयशस्त्रक्रियेमुळे ते पुढे ढकलले गेले. मात्र त्या दरम्यान "भुतान" या आपल्या शेजारच्या चिमुकल्या आनंदी देशाला बुलेटवर उभयता जावून आलो. त्यानंतर "लडाखचे" स्वप्न पूर्ण केले. आता पुढील वर्षी "नेपाळ" या शेजारच्या राष्ट्रात जायचे हे ठरविले. दरम्यान इतिहासाची व आपल्या वैभवशाली परंपरेची आवड असल्याने "हम्पी" या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीने मारलेल्या हाका ऐकून तिथे डिसेंबर - 2018 मध्ये जाण्याचे निश्चित केले. चि. पार्थची परिक्षा असल्याने यावेळी सौ.नेहा हिचे "हम्पीला" येणे रद्द झाले होते. मग 10 वी च्या बॅचमधील मित्रांना विचारले, तर आठवडयातुन 4 ते 5 वेळा बाहेर जेवणाऱ्या संदीपने,"मी बाहेरचे काही खात नाही" म्हणून येवू शकत नाही असे सांगितले तर धन्याने "मला घेतले तर जास्तीत-जास्त" सिन्नरपर्यतच जावू असे सांगून माघार घेतली. शेवटी गृपमधील सर्वच बाबतीत तरूण अशा 49 वर्षाच्या नितिनला सोबत घेतले आणि "हम्पी टूर" पूर्ण केली. मात्र नेपाळ अजूनही बोलवत होतेच. शेवटी मे - 2019 मध्ये नेपाळला जायचे ठरविले. नाशिकहुन बाईक पाठविणे शक्य नसल्याने "सिलिगुडी" येथुन बाईक भाडयाने घ्यायची असे ठरविले आणि त्याप्रमाणे "दार्जिलीग राईडर्सच्या " अमितकुमार मंडल याच्याकडून बाईक भाडयाने घेतली.

सिलिगुडी येथे पोहचल्यावर बाईक ताब्यात घेतली आणि सकाळी नेपाळकडे प्रयाण केले. "काकरबिटटा" येथे भारत-नेपाळ सिमा आहे. तेथुनच नेपाळमध्ये प्रवेश करावयाचा ठरविला. बाईकला महाराष्ट्राचे प्रतिक तसेच जगात आदरणीय असलेल्या "छत्रपती शिवाजी महाराजांचा  भगवा" ध्वज लावलेला होता. तो बघून भारताच्या सिमेवर सातारा जिल्हयातील पॅरा मिलटरी मध्ये काम करणारी एक भगिनी होती ती लगेच मदतीस पुढे आली. ती 23-24 वर्षाची महाराष्ट्र कन्या जी घरापासून जवळ -जवळ 3000 कि.मी. लांब नोकरी करते हे बघून कौतुक व अभिमान वाटला, नाहीतर आपल्या कडील "गावातच नौकरी पाहीजे तरच नौकरी करीन" असे म्हणणाऱ्या युवकांची किव वाटली, असो...!  

काकरबिटटा पार करून नेपाळ चेक पोस्ट येथे परमिट काढण्यास थांबलो. तिथेही नेपाळी आर.टी.ओ चे एजंट आपल्या देशातल्या एजंटप्रमाणेच लोकांकडून पैसे उकळत होते. आपला एक रूपया म्हणजे नेपाळी एक रूपया साठ पैसे होतात. आर टी ओ परमिट होते नेपाळी एक हजार रूपये म्हणजे आपले साडेसहाशे रूपये मात्र हे एजंट लोक सर्वाकडून एक हजार रूपये म्हणजे  नेपाळी सोळाशे रूपये गोळा करत होते. ते देण्यास नकार देणाऱ्याला उभे ठेवत होते. परमिट घेतले आणि आता काठमांडूच्या दिशेने प्रवास सुरू झाला. अंतर होते जवळ-जवळ 550कि.मी. इतिहारी, विराटनगर,मिथिला, बारदीबासा हि मोठी गावे रस्त्यात होती. भारतात जागोजागी "चायनिज" विकणारी नेपाळी मुले, त्यांच्या देशात मात्र एकही "चायनिज" चा स्टॉल दिसला नाही. इव्हन "चायनीजही" कुठे खायलाही मिळाले नाही. आता संध्याकाळ होत आली आणि अजून दोनशे कि.मी. अंतर पार करावयाचे होते. मात्र पुढील सर्व रस्ता जंगलातील असल्याने, व त्यात जवळ-जवळ दिडशे कि.मी घाट असल्याने लोकांनी "बारदीबास" ला मुक्काम करायचा सल्ला दिला.

सकाळी काठमांडूकडे जाण्यासाठी बुलेटला किक मारली. संपूर्ण  सिंगल रस्ता, त्यात जागो-जागी पडलेले खड्डे आणि उंचच-उंच घाट, थोडीशी जरी चूक झाली तर कपाळमोक्ष ठरलेलाच. अशा घाटातून गाडी चालवत काठमांडूकडे हळूहळू सरकत होतो तेवढयात गाडी  रिझर्व्हला लागली. आता काय करायचे? कारण अजून काठमांडू सव्वाशे कि.मी लांब होते आणि रस्त्यात आता एकही पेट्रोल पंप नाही असे समजले, कशीबशी गाडी चालवत होतो, एकजण म्हणाला इथे पेट्रोल हे हॉटेलवर मिळेल मग एक हॉटेलवाल्याला विचारले, तो म्हणाला माझ्याकडचे संपले आहे त्या किराणा दुकानवाल्याला विचारा, त्याच्याकडे गेलो त्याच्याकडे दोनच लिटर पेट्रोल शिल्लक होते. त्याने शंभर रूपये दराने  ते दिले. अडला नारायण.....! आता काहीही झाले तरी यापुढे सर्वात प्रथम पेट्रोलची टाकी फुल करायची हे ठरवून टाकले.

एका बाजुला खोल दरी तर दुसऱ्या बाजुला हिमालयाची शिखरे अशा "शिवालीक" रांगातून प्रवास करत-करत "भक्तपुर" आले. भक्तपुर येथे जवळजवळ 143 फुट उंचीची शंकराची मुर्ती आहे. त्याला "सांगा" असे म्हटले जाते. जवळच "नागरकोट" हे हिल स्टेशन आहे. येथील निसर्ग सौदर्य डोळे दिपवणारे आहे.

आता काठमांडूला पोहचलो. नेपाळची ही राजधानी, अतिशय रहदारी असलेले मात्र शिस्त पाळणारे शहर. येथे जागोजागी सिग्नल असून पोलीसही असतात. भारतात कोणतेही शिस्त न पाळणारे, कुठेही चायनिजची गाडी लावणारे हे नेपाळी स्वत:च्या देशात मात्र शिस्तीत राहतात. त्यांचप्रमाणे भारतात जागोजागी "चायनीजच्या" गाडया लावणा-या नेपाळयांची त्यांच्या देशात एकही गाडी नाही किंवा तिथे "चायनीज" मिळतही नाही. म्हणजे नेपाळयांना कळते कि, हे खाऊ नाही आणि आपल्या देशांत विशेषत: तरूण पिढी व लहान मुले याचे वेडे झाले आहेत. आता दोन दिवस काठमांडूत थांबून काठमांडू दर्शन करावयाचे होते. आता "थमेल" या भागात राहिलो होतो.

सकाळी सुप्रसिध्द़ "पशुपतीनाथ" मंदीरात दर्शनासाठी गेलो. येथे फोटोग्राफी करण्याची परवानगी नाही. दर्शनानंतर जवळच असणारे "पर्ल मार्केट" फिरलो. इथे चांगल्या प्रतीचे मोती व रुद्राक्ष मिळतात. त्यांनंतर "पाटन दरबार स्केअर" येथे गेलो. या ठिकाणचे नुकसान मोठया प्रमाणात नेपाळमध्ये आलेल्या भुंकपात झाले होते. याठिकाणी 34-35 वर्षापुर्वी "महान" या अभिताभ बच्चनच्या "ट्रिपल रोल" असलेल्या चित्रपटाचे शुटींग झालेले होते. त्यानंतर "बौध्दनाथ स्तुप" बघितला. हा सर्वात उंच स्तुप आहे. त्यानंतर "दरबार स्केअर" आणि "स्वयंभुनाथ" येथे भेट दिली.

दुस-या दिवशी "नारायण हिटी पॅलेसला" भेट दिली. थमेल ते "नारायण हिटी पॅलेसच्या" या रस्त्यावरच "सार्क" चे कार्यालय आहे. या पॅलेसला रक्तरंजित इतिहास आहे. राजघराण्यातील राजा, राणी, राजपुत्र, राजकन्या, यांची दि.1 जून 2001 रोजी राजपुत्र दिपेंद्र यांनी गोळया घालून हत्या केली होती. त्यावेळी झालेल्या गोळीबारात राजपुत्र दिपेंद्र हे ही जखमी झाले होते. त्यानंतर तीन दिवसांनी तेही मरण पावले. सध्या या राजवाडयात कोणीच राहत नाही. त्यामुळे त्याचे म्युझीयममध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे. येथे कॅमेरा-मोबाईल तर दुरच पैशाचे पाकीट सुध्दा न्यायला बंदी आहे.

काठमांडूच काय पण सर्व नेपाळमध्ये जेवण्याचे फार हाल होतात. नॉनव्हेज खाणा-यांना अडचण नाही, पण काय खाऊ घालतील याचा भरवसा नसल्याने ती काळजी घ्यावी. एका ठिकाणी " दालफ्राय " मिळत होते. काठमांडुत फिरतांना अचानक एक साऊथ इंडियन हॉटेल दिसले. ज्याप्रमाणे आपल्याकडे म्हण आहे."जहा न जाये गाडी, वहा जाये मारवाडी `` त्याचप्रमाणे आता नवीन म्हण तयार करावी लागेल कि,"जहा न जाये चिट्टी(मुंगी), वहा पहुंचे शेट्टी." आपल्याकडे मराठी माणुस हॉटेल उघडतो, आणि दोन-तीन महिन्यात ते साऊथ इंडियनला विकून, मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे कसा? यावर भाषण ठोकायला मोकळा होतो.

आज पोखराला जायचे होते. नेपाळ मधील निसर्ग सौंदर्याने नटलेले हे आणखी एक शहर. पोखराला जातांना रस्त्यात "मनोकामना मंदीर" लागते. उंच पर्वतावर असलेल्या या मंदीरात "रोपवे" ने जावे लागते. याचे तिकीट पाचशे रूपये होते. मात्र "रोपवे" सोडून येथे काही नाही. मंदीरात खूप गर्दी असते व दर्शनासाठी पाच-सहा तास लागतात. येथे काही युपी-बिहारी काम करत असलेली गुजराथ्यांची हॉटेल्स आहेत, आणि पाणीपुरी-चणाचोरी विकणारे भय्येही आहेत. पोखराला पोहचलो, रस्त्यात प्रचंड पाऊस होता.

सकाळी "सारंगकोट" येथे सुर्योदय बघायला गेलो, या ठिकाणी पोखराहून हेलिकॉप्टर राईड "अन्नपूर्णा सर्कलची" करता येते. येथे बरेच भारतीय ट्रेकींगला जातात.

पोखरा हे छोटेसे आहे. येथे हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भोजनाचे दर सर्वात जास्त आहे. साधी दालफ्राय दोनशे रूपयांना तर कोणतीही पनिर असलेली भाजी साडेतिनशे रूपयाला मिळते. पोखरा येथे सुंदर लेक असून तेथे बोटींगचा आनंद घेता येतो.

आम्हाला "चितवन" येथेही जायचे होते, मात्र "चितवन" अभयारण्य असल्याने व आम्ही बुलेटवर गेलेलो असल्याने तेथे जाणे शक्य झाले नाही. उदया परत काठमांडूला परतायचे होते.

आज काठमांडूला पुन्हा आलो. रात्री मुक्काम करून व खरेदी करून सकाळी निघायचे. नेपाळमध्ये जेवण्याचे खूप हाल होतात. एकतर तिथे भारतीय जेवण मिळत नाही आणि नेपाळयांना भारत व भारतीयांबद्दल कवडीची आत्मीयता वा आदर नाही. आमच्या शेजारी एक नेपाळी शिक्षक बसला, तो म्हणाला की, आम्हाला पाकीस्तानकडून सर्वात जास्त मदत मिळते, ते ऐकून नेहा चिडली, तीने त्याला सुनावले की, पाकीस्तान मदत करतो तर तुम्ही आमच्या देशात कशाला गुरख्याची नोकरी करायला किंवा हॉटेलमध्ये काम करायला येतात?  पाकिस्तानमध्ये कामाला का जात नाही मग? ते ऐकूण तो मास्तर तिथून निघूनच गेला. नेपाळ आणि भूतान या दोन्ही देशांना भेटी दिलेल्या असल्यामुळे दोन्ही देशातील जनतेचे वागणे लक्षात आले. नेपाळी हे चिनी धार्जिणे आहेत, तर भुतानी जनतेला भारताबद्ल आत्मियता आहे. तरी नेपाळला जास्तीत-जास्त भारतीय भेट देतात.आता ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नेपाळ टुर्स बंद करून, भूतान टुर्स सुरू कराव्यात.

आज भारतात परत जायचे होते. काही लोकांनी सांगितले कि, तुम्ही "महेंद्र महामार्गाने" गेले तर तुम्हाला "बारदीबासला" जाण्यासाठी तीनशे कि.मी. चा प्रवास करावे लागेल त्याऐवजी "हतोडा " मार्गे जा, तुमचे शंभर कि.मी. वाचतील. हतोडामार्गे निघालो, वीस-पंचवीस किमी चा चांगला रस्ता संपला आणि मग सर्व घाटाचा व खडडयाचा रस्ता लागला. कुठून हतोडा मार्गे जायची दुर्बुध्दी सुचली असे वाटले. पंच्याऐशी किमी चे अंतर कापण्यास पाच तास लागले.अखेर "बारदीबास" आले.

आज भारतात जायला निघालो. आज जवळ जवळ साडेतीनशे कि.मी एवढे अंतर पार करायचे होते. म्हणून सकाळी सात वाजताच बुलेटला किक मारली. रस्त्यात इतिहारीला जेवण केले. नेपाळमध्ये जागो-जागी मोठे टरबूज विकायला होते. एकेक टरबूज जवळ-जवळ 10ते12 किलोचे होते. त्याचे "बी" शेतात लावण्यासाठी आणले आहे. बघु येते कि नाही ?

घराची ओढ असल्याने गाडीनेही वेग घेतला होता त्यामुळे संध्याकाळी साडे पाचलाच सिलिगुडीला पोहोचलो. भूतान, नेपाळ या दोन देशांची बुलेट टुर पूर्ण झाली. आता पुढच्या टुरची प्लॅनिंग करायची आहे. सीतेला आणण्यासाठी श्रीरामाने लंकेवर स्वारी केली होती असा इतिहास आहे, आपल्याला आता त्या रामसेतुवर म्हणजे धनुष्य कोडीवर या भारताच्या शेवटच्या टोकावर "बुलेटस्वारी" करायची आहे, बघु काय होते.

अजित मुठे, उपायुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel