प्रश्न: लोकांच्या अपेक्षांचं ओझं तुम्हाला दाबून टाकतं आहे? काय करावे?
उत्तर: त्याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करा. जर लोकांच्या तुमच्याबद्दलच्या अपेक्षांचा त्रास होत असेल, तर कदाचित त्याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची वेळ आली आहे. अपेक्षा या आपल्याला सध्याच्या क्षमतांच्या पलीकडे जाण्याची आणि जीवनात काहीतरी करण्याची संधी देऊ शकतात.
वेगवेगळ्या लोकांच्या तुमच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात, आणि त्या अपेक्षा परस्पर विरोधीही असतात.
तुमच्या पत्नीची इच्छा असते की तुम्ही ५:३० पर्यंत घरी यावं, पण तुमच्या बॉसची इच्छा असते की तुम्ही ७:३० पर्यंत ऑफिसमध्ये थांबावं. तुमच्याजवळ फक्त चोवीस तासच आहेत, पण तुम्हाला तुमच्या आई-वडिलांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, तुमच्या मुलांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, तुमच्या बॉसच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, आणि त्यावर पुन्हा पतीच्या किंवा पत्नीच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत; एवढं करायला खरंतर तुम्हाला साठ तासांचा दिवस लागेल. "बाकीचे जास्तीचे तास मला कुठून मिळतील?" हाच मुळात प्रश्न आहे.
सध्या, लोकांच्या तुमच्याकडून असणाऱ्या अपेक्षा या तुमच्या क्षमतांच्या कितीतरी पलीकडच्या आहेत. याला एक शाप ठरवू नका. उलट, ते एक मोठं वरदान आहे की लोकं तुमच्याकडून इतक्या मोठ्या अपेक्षा ठेवत आहेत.
जर लोकांनी तुमच्याकडे बघितलं आणि विचार केला, "अरे! आपण ह्याच्याकडून काहीच अपेक्षा ठेवू शकत नाहीत", आणि त्यांना तुमच्याकडून काहीही अपेक्षा केल्या नाहीत, तर तुम्हाला वाटतं हे काही तुमच्यासाठी चांगलं लक्षण असेल? जर तुमच्या बॉसला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नसतील तर तो तुम्हाला कामावरून काढून टाकेल. ते सगळे तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवून आहेत. तुमच्या मर्यादांपलिकडे जाऊन आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची ही एक संधी आहे. याचा अर्थ असा होतो का की इतरांच्या अपेक्षापूर्तीसाठी तुम्ही काहीतरी सर्वोत्तम गोष्ट कराल? असं कधीही घडणार नाही. पण ते सगळे सदैव तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवू लागले, याचा अर्थ तुमचं आयुष्य सुरळीत चालू आहे. हा एक शुभसंकेत आहे. त्याबद्द्दल तुम्ही खुश असलं पाहिजे, त्याबद्दल तक्रार करू नका. तुमच्याकडून जे सर्वोत्तम होऊ शकेल ते करा आणि बस्स, एवढंच आहे.
हे काही मी तुमचे कार्य निर्दोष करण्याबद्दल बोलत नाहीये. आयुष्यात 'परफेक्ट' असं काही नसतंच.
एकच गोष्ट आयुष्यात एकदम अचूक होते, ती म्हणजे मृत्यू!
जर तुम्ही आयुष्यात अजाणतेपणे अचूकतेच्या मागे लागलात तर तुम्ही मृत्यूकडे वाटचाल कराल.
त्यामुळे आयुष्यात अचूकतेच्या मागे लागू नका. तुम्ही अचूक असाल म्हणून काही तुमचं आयुष्य सुंदर होत नाही, तर तुम्ही आयुष्यात जे जे काही करता त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिल्यानं आयुष्य सुंदर बनतं. जीवन कधीही अचूक असू शकत नाही कारण ज्या कोणत्या प्रकारे तुम्ही आत्ता या क्षणी कार्यरत आहात, त्यापेक्षा तुम्ही थोडेसे अधिक असू शकता, नाही का? त्यामुळे अचूकतेचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा अपेक्षा भव्य-दिव्य असतील तेव्हाच तुम्ही बंधनं झुगारून स्वतःला ताणू शकाल. जर तुम्ही अजून ताणू शकत असाल, याचा अर्थ तुम्ही अजूनही तुमच्या अंतिम मर्यादांपर्यंत पोहोचलेला नाही आहात. जर काहीच अपेक्षा नसतील, तुम्ही कधीच स्वतःच्या पूर्ण क्षमतांचा शोध घेऊ शकणार नाही.
कोणाच्याही अपेक्षेविना स्वतःला स्वतःच्या अंतिम रेषेपर्यंत ताणण्यासाठी अत्यंत वेगळ्या पातळीची चेतना आणि जागरूकता लागते. यासाठी काहीतरी सर्वस्वी वेगळं लागतं. आत्ता सध्या तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही फक्त लोकांच्या अपेक्षेप्रमाणे चालणारे आहात. तर असू द्या लोकांच्या तुमच्याकडून मोठ-मोठ्या अपेक्षा. तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे परिस्थिती सांभाळा. काही गोष्टी नियंत्रणाच्या पलिकडे असतील, आणि जितक्या जास्त गोष्टी करू लागाल, तितक्या जास्त गोष्टी आयुष्यात चुकत जातील. पण बऱ्याच गोष्टी सुरळीत मार्गावर लागतील. तुमच्या आयुष्याची गुणवत्ता, किंवा तुमच्या आयुष्याचं यश हे काहीतरी पूर्ण करण्याच्या मापनावर अवलंबून असण्याची गरज नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीप्रती स्वतःला संपूर्ण समर्पित करू शकता की नाही यावर त्याचे मूल्यमापन व्हायला हवे. तुमच्या क्षमतांप्रमाणे जे घडायचं आहे ते घडेल. आणि सगळं काही जुळून येण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. पण आयुष्यात तुम्ही जे काही करताय त्याला तुम्ही शंभर टक्के समर्पित आहात का? हा खरा प्रश्न आहे.