जगदीश लहानपणापासून खूप हट्टी होता. त्याच्या अंगात आणखीन एक खोडी होती, तो दुसऱ्यांना जाणूनबुजून त्रास द्यायचा. कोणाचीही मस्करी करायचा. खोटं बोलणे, लबाडी करणे हे त्याचं चालू असायचं. यावरून तो घरी आणि शाळेत रोज मार खायचा. पण जगदीश काही सुधारायचा नाही. त्याची आई खूप वैतागली होती आणि आपल्या मुलाच्या काळजीने रडत राहायची.
जगदीशला वडील नव्हते, त्याची आई दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणे भांडी करायची. जगदीश अभ्यासात खूप हुशार होता, पण त्याच्या या वाईट खोड्यांमुळे सगळे कंटाळले होते. काही ढ मुलं त्याचे मित्र होते. तो त्यांच्या मदतीने हे सगळे उद्योग करायचा. जगदीश नेहमी काही ना काही खोड्या शोधून काढायचा. कोणाची पेन्सिल चोरायची, कोणाचं पुस्तक असेल, असं रोज तो काही करायचा. दोन मुलींच्या केसांच्या वेण्या बांधून टाक, कोणाच्या बुटांची लेस बांधत असतो. या त्याच्या वात्रटपणामुळे शाळेतली मुलं सुद्धा खूप कंटाळली होती. काही मुलं तर धडपडून पडायची आणि ह्याला मजा वाटायची, मग तो टाळ्या वाजून हसायचा. त्याच्या जोडीला जी मुलं होती तीसुद्धा हसून मजा घ्यायची.
रोज शाळेतून जगदीशच्या आईला, जगदीश बद्दल तक्रार यायची. बिचारी गयावया करून, माफी मागून पुन्हा असं तो करणार नाही असं बोलून त्याला घरी घेऊन जायची. जाताना त्याच्या पाठीवर धपाटे घालत घालत त्याची आई त्याला घरी घेऊन यायची. जगदीशची आई मग रडत राहायची. जगदीश आई त्याच्या जवळ हात जोडायची आणि मग बोलायची,
"अरे बाबा असं काय करतोस?, एकदाचा माझा जीव घे. कळत नाही का तुझी आई किती मेहनत करते, तुला कशी सांभाळते. तुझं शिक्षण, सगळं मी कसं निभावते. तू असाच करत राहिलास तर तुला शाळेतून काढून टाकतील, तुझ्याशी कोणी बोलणार नाही. जरा शहाण्यासारखा वाघ बाळा, तुला मी किती समजावते."
पण या सगळ्याचा जगदीशवर काही परीणाम व्हायचा नाही. जगदीश मात्र ठोंब्या सारखा फक्त तिच्या तोंडाकडे बघत राहायचा. जगदीशच्या आईला कळत नव्हते की, हा असा का करतो? अभ्यासात एवढा हा पोरगा हुशार असताना हे असे नको ते उद्योग का करतो. कशाला तो दुसऱ्यांना त्रास देतो, तिला काही समजत नव्हते.
एक दिवस ती ठरवते की आपण थोडे दिवस जगदीशला घेऊन गावी जाऊया. तसं ती जगदीशला सांगतेआणि शाळेतून चार पाच दिवसांची सुट्टी घेते. मग जगदीशला घेऊन जगदीशची आई गावी घेऊन येते. गावी आल्यावर सुद्धा जगदीशचं हेच चालू असतं. जगदीशच्या मामाचं गांव खूप सुंदर असतं. घरामध्ये मामी असते, आजी-आजोबा असतात आणि मामांची मुलं असतात. त्या मुलांना आता हा त्रास द्यायला लागतो. गावातल्या मोठ्या लोकांची मस्करी करून, त्यांना काही ना काही तरी त्रास देणं हे असं त्याचं चालू असतं.
गांवच्या लोकांना तो कधी कधी खोटं काहीना काहीतरी सांगून फसवायचा. सगळ्यांना वाटायचं की खरच काहीतरी घडलं आणि सगळे लोकं हातातलं काम सोडून तिकडे बघायला धावायची. पण खरं पाहिलं तर तिकडे काहीच झालेलं नसतं आणि हा जगदीश टाळ्या वाजवत तिकडे हसत राहायचा. मग तो उड्या मारत बोलायचा,"कसं मी तुम्हाला फसवलं...हाहाहाहा...आणि मोठमोठ्याने हसायचा. सगळे लोक मग त्याच्याकडे रागाने बघून तिकडून निघून जायचे. जगदीश रोज त्यांना असा त्रास द्यायचा आणि गावची लोक गुपचूप सहन करायची.
गावातली लोक जगदीशच्या मामाला खूप मानत होती आणि म्हणून ते काही बोलत नव्हते. पण आता जगदीशचं अती झालं होतं आणि म्हणून मग त्यांनी त्याच्या मामाकडे तक्रार करायची असे ठरवले. सगळे लोक शांतपणे जगदीशच्या मामाला हकीकत सांगितली. जगदीशचा मामा सगळ्यांची हात जोडून माफी मागतो आणि ते गावातल्या लोकांना सांगतात, "तो थोड्या दिवसांसाठीच इथे आहे, तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्या"
सगळे गावकरी माना हलवून, तिथून निघून जातात.
गावकरी निघून गेल्यावर, जगदीशचा मामा जगदीशला समजावतो "जगदीश बाळा, तू का असा करतोस? तू मुंबईला पण सगळ्यांना त्रास देतो? काही ना काहीतरी करत राहतोस. तुझी आई एवढी मेहनत करते, तुला सांभाळते. घर काम करते तुला कळत नाहीये का?"
जगदीश मामाला सांगतो,"मामा, मी यापुढे असं नाही वागणार".
पण या सगळ्याचा जगदीशवर काही फरक पडलेला नसतो. एके दिवशी जगदीश गावातल्या लोकांना सांगतो, की विहिरीमध्ये एक बाळ पडलं. गावातले लोक सगळं काम तिथेच टाकतात आणि धावतपळत विहिरीजवळ येतात. सगळे काळजीत पडतात, कोणाचं बाळ विहिरीत पडलं असेल असा विचार करतात. सगळे विहिरी जवळ येऊन बघतात. पण पाण्यात कोणीच नसतं. हे सगळं जगदीश त्या विहिरीजवळच्या झाडा आड लपून बघत असतो आणि 'आपण गावकर्यांना कसं फसवलं' असं मनात बोलत असतो. मजा बघत गालातल्या गालात हसत असत, तो सगळ्यांसमोर येतो. गावातले सगळे लोक त्याला विचारतात, "काय रे, कुठे आहे बाळ? काही दिसत नाही?"
तो म्हणतो, "कोण म्हणालं तुम्हाला? मी तसं म्हणालो नव्हतो." असं म्हणून जगदीश तिकडून हसत हसत निघून जातो.
या गोष्टीला गावातले लोक आणखीन वैतागतात आणि रागावतात. आता या मुलाचं काहीतरी करायला हवं असं गावातली लोकं विचार करतात. रात्रीच्या वेळेला सगळे लोक जमा होतात आणि म्हणतात 'काय करायचं हा मुलगा आपल्याला खूप त्रास द्यायला लागला आहे. खोटं सांगतो आणि मग आपल्याला फसवून, निघून जातो. पण काहीच झालेलं नसतं, आपण मात्र आपल्या हातचे काम सोडून धावत पळत बघायला सुटतो.'
झालेली घटना गावातले लोक मामाच्या कानावर घालतात. एक दिवस जगदीशचा मामा, जगदीशला घरातून बाहेर पाठवतच नाही. मग जगदीश रडून-रडून खूप गोंधळ घालतो. तरीसुद्धा त्याचा मामा त्याला बाहेर पाठवत नाही. जगदीश काय करतो वर माळ्यावर जाऊन कौलं काढून तिथून तो बाहेर पडतो आणि गावांमध्ये धूम ठोकतो. गावातल्या लोकांना जरा बरं वाटतं की आज जगदीश नाहीये. आज आपल्याला व्यवस्थित काम करायला मिळेल.
पण जगदीशने आधीच घरातून पळ काढला होता. त्रास देणार नाही तो जगदीश कसला! त्याची पुन्हा मस्करी सुरू झाली होती. यावेळी तो वेगळी खेळी खेळतो. तो स्वत: मोठ्याने ओरडायला सुरुवात करतो,"मी पाण्यात पडलो, वाचवा! वाचवा!" असं म्हणत म्हणत तो मोठमोठ्याने रडायचं नाटक करतो.
गावातले लोक आवाजाच्या दिशेने धावत सुटतात आणि आवाज जिथून येत होता त्या दिशेने बघतात. पण कोणालाच जगदीश दिसत नाही. जगदीश झाडाच्या आडोशाला उभा राहून हा सगळा प्रकार बघत होता. पण विहिरी मध्ये काही नसतं हे पाहून गावातली लोकं तिकडून निघून जातात. ते लोक जायला निघतात तसा जगदीश मोठ्याने हसायला लागतो. तो म्हणतो, "तुमची फजिती मी कशी केली? तुमची माझ्यामुळे मजा होते, तुमच्या लोकांची करमणूक होते."
गावातले सगळे त्याच्या मामाच्या घरी जातात. जो प्रकार झाला तो त्यांना सविस्तर सांगतात. पण यावेळी त्याचा मामा ऐकून घ्यायला तयार नसतो. ते गावकऱ्यांना सांगतात," कसं शक्य आहे हे, जगदीश घरी आहे. त्याला मी माळ्यावर बंद करून ठेवलं आहे. घरातून तो बाहेरच गेला नाही".
मग गावातली लोक म्हणतात," घरी आहे तर बोलवा त्याला इथे."
जगदीशचा मामा त्याला आवाज देतात, "जगदीश! बाळा, खाली ये"
जगदीश अगदी सोज्वळ मुलांसारखा चेहरा करतो आणि मामा समोर येऊन उभा राहतो. गावातली लोकं त्याला आपल्या समोर पाहून अवाक् होतात. ते म्हणतात, "हा काय प्रकार आहे? आम्ही तर त्याला तिकडे बघितलं होतं.. हा इकडे कसा काय लगेच."
गावातली लोकं म्हणतात,"याने नक्कीच काहीतरी गडबड केलेली असणार."
मग त्याचा मामा म्हणतो, "अहो तो कसली गडबड करणार? आम्ही सगळे घरीच आहोत आणि तोही घरातच आहे. कसली गडबड केली असेल त्यांने. तुम्हाला रोज तो काही ना काही करतो, म्हणून ही सवय झालेली, म्हणून तसा भास तुम्हाला झाला असेल. चला जावा तुम्ही सर्वांनी आपापल्या घरी. तुमच्या डोळ्यांनी समक्ष बघितलं ना! चला निघा आता."
गावातली बिचारी लोकं भांबावून जातात आणि तिथून मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत, निघून जातात. जगदीश मनातल्या मनात हसतो आणि म्हणतो कसं गावातल्या लोकांना मी फसवलं.
एक दिवस काय होतं जगदीश असाच फिरत असतो. फिरत असताना तो मध्येच रस्त्यावर दगड येईल तो पायाने उडवत असतो. हे त्याचं चालू असतं आणि असं करता करता तो विहिरीजवळ येतो. त्याचं लक्ष नसतं, तो आपल्याच तंद्रीत असतो. कधी त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडतो, हे त्याला कळत नाही. विहिरीमध्ये पडल्यावर तो मोठमोठ्याने आवाज देतो, "वाचवा! वाचवा! मी विहिरीत पडलो आहे. मामा-मामी या ना." असं तो खूप मोठ्याने आवाज देतो.
पण गावातली लोक म्हणतात, "ही पण जगदीशची काही ना काहीतरी खोडी असणार. मग सगळे तिकडे दुर्लक्ष करतात. गावातली लोक म्हणतात हा रोज काहीना काहीतरी करतो आणि आपण आपल्या हातचे काम सोडून धावत पळत जातो."
इकडे जगदीश गटांगळ्या खात असतो. त्याच्या नाकातोंडात पाणी जात असतं. पण कोणीही तिकडे त्याला वाचवायला येत नाही. शेवटी एक कोणीतरी माणूस तिकडून जात असतो आणि त्याला त्या विहिरीच्या इथून आवाज येतो. तो विहिरीत वाकून बघतो, त्याला एक मुलगा खाली पडलेला आहे आणि तो बुडत आहे.'हा मुलगा एवढा आवाज देत आहे तरी गावातली लोकं कसे कोणी येत नाहीये त्याला वाचवायला, असा तो विचार करतो आणि मग त्या विहिरीमध्ये तो उडी मारतो. जगदीशला तो बाहेर काढतो. बाहेर काढल्यावर त्याच्या पोटात गेलेलं पाणी बाहेर काढतो आणि मग त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो. शुद्धीवर आल्यावर तो माणूस त्याला विचारतो, "बाळा, तुझं नाव काय? कोण आहेस तू? कुठे राहतोस?"
जगदीश सगळं सांगतो,"माझं नाव जगदीश आहे आणि मी इकडे माझ्या मामाच्या गावी आलो आहे."
"चल जाऊया, तुझ्या घरी तुला नेऊन मी सोडतो." असं बोलून तो माणूस त्याला त्याच्या मामाच्या घरी आणून सोडतो.
जगदीश पूर्ण भिजलेला बघून सगळे घाबरून जातात, आणि विचारतात, "काय झालं? हा असा भिजलेला का आहे?"
तो माणूस सांगतो," तुमचा मुलगा विहिरीत पडला होता, गटांगळ्या खात होता. गावातले कोणीच त्याला वाचवायल आले नाही. मी बाजूने जात होतो आणि कानावर याचे शब्द ऐकले. मग मी उडी मारली आणि त्याला त्या विहीरीतून बाहेर काढलं."
हळूहळू मग गावातली लोकं पण जमा झाली होती. त्यांना झालेली घटना समजते.गावातली लोक सगळे खाली मान घालून उभे असतात.
शेवटी त्याची आई त्याला समजावते, "बघितलं जगदीश 'अति तेथे माती' कशी होते.माणसाने एवढा पण अति पणा करू नये की ते सगळं आपल्यावर बीतेल. तेव्हा यापुढे कधीही तू कोणाचीही मस्करी करू नकोस. मस्करी करता करता तुझं नुकसान होत आलं होतं. आज तुझं काय झालं असतं तर मी काय केलं असतं. तेव्हा बाळा दुसऱ्यांना त्रास देणे बंद कर."
मग जगदीश आईला मिठी मारतो आणि मोठ्याने रडायला लागतो.आईला वचन देतो, "आई, यापुढे मी कधीही कुणाला त्रास देणार नाही. मी शहाण्या मुलासारखा राहीन आणि खूप अभ्यास करीन, खूप मोठा होईन मी."
सगळेजण त्याच्या या वाक्यावर टाळ्या वाजवतात आणि जगदीशचन कौतुक करतात. या गोष्टींमधून आपण हेच शिकलो की जेव्हा आपण कोणाच्या बाबतीत करतो, तेव्हा तीच गोष्ट आपल्या बाबतीत होते आणि तीच गोष्ट आपल्या आयुष्यात धोकादायक ठरते.