हिंदुस्थान हा देश त्यांनी आपला मानला होता व म्हणून त्यांस भारतीय भाषेची ही आस्था व गोडी. आमचा तर जन्मप्राप्त, हा देश आहे; मानीव नाही असें असून स्वभाषेची हेळसांड मोठमोठया लोकांनी कां करावी ! मोठमोठया पुस्तकांवर अभिप्रायही इंग्रजीत; ते ग्रंथलेखकांस कळले नाही तरी चालतील ! अशी उपेक्षा कां ? आपण पूर्ण स्वदेशी राहावें व परकीयाचें सर्व उत्तम आपल्या संस्कृतीत मिळवून घ्यावें. मराठी भाषेबद्दल त्या काळांत ज्यांनी लोकोत्तर अभिमान दाखविला त्यांत शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे नांव प्रथम उच्चारिलें पाहिजे. अहर्निश १०। १२ वर्षे खपून त्यांनी ज्योतिषशास्त्राचा प्रचंड इतिहास मराठींत लिहिला. न्या. रानडे वगैरे त्यांस हा ग्रंथ इंग्रजीत लिहून प्रसिध्द करावयास सांगत होते. परंतु या थोर पुरुषाने उत्तर दिले 'ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा शिकतील. पाश्चात्य लोक माझ्या ग्रंथाची पूजा करितील; मी परकी भाषेंत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीचा हपापलेला नाही.' चिपळूणकर, दीक्षित, राजवाडे यांसारखी भाषाभिमानी माणसें ज्यावेळेस अनेक उत्पन्न होतील, भाषाभिमानाची कडवी रजपूती कृति जेव्हां आमच्यांत उद्भूत होईल, त्यावेळेसच आमची भाषा सजेल व सुंदर होईल. कीर्ति व पैसा यांची अपेक्षा ठेवून मराठी संपन्न होणार नाही. मराठीत जें अमोल प्राचीन काव्य आहे, तें अर्थाभिलाषी कविवरांनी विनिर्मिलें नाही. ज्ञानेश्वरांसारख्या वागीधरांनी आपल्या आमृतासमान, ओव्या कोळशानें खांबावर लिहिल्या; दासोपंतानें निंबाचा पाला खाऊन लक्षावधि ग्रंथ लिहून ठेविला. या प्राचीन वाग्वीरांप्रमाणे नि:स्वार्थ होऊन ज्यावेळी आम्ही लिहावयास लागूं त्यावेळेस मराठी समृध्द होण्यास वेळ लागणार नाही. परंतु हें करावयास जो तयार होईल त्याला खरी मायभाषेची माया पाहिजे; प्रेम पाहिजे; आस्था व अभिमान पाहिजे. आचार, विचार, भाषा यांत परकीयत्व स्वीकारल्यामुळें स्वजनांपासून आपण कसे दूर जात चाललों, व सुशिक्षित ही एक नवीनच जात कशी निर्माण झाली आहे हें दिसून येतें; असहकारितेपासून पुन्हां लंबकास विरुध्द दिशा मिळूं लागली आहे. सारांश राजवाडे यांनी वरील अवतरणांत जें लिहिलें आहे तें अगदीं निर्विकार दृष्टीनें पाहिलें व दूरवर विचार करुन पाहिलें तर पटेल असें वाटतें.

निबंधमाला, नवनीत, व काव्येतिहाससंग्रह या त्रयीनें आपणांस राजवाडे दिले. निबंधमालेनें एक राजवाडे दिला एवढयानेंच निबंधमाला कृतकार्य झाली. तत्कालीन व तत्पूर्वकालीन नवसुशिक्षितांस प्राचीन इतिहास, काव्य सर्व अज्ञातच होतें. ज्यावेळेस रा.व.साने यांनी बखरी सारखें सुंदर हृद्य व जोरदार वाड्.मय छापावयास घेतलें, त्यावेळेस मराठीचे पाणिनि दादोबा आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “आं, असे सुंदर वाड्.मय मराठीत आहे!” स्वदेश व स्वभाषा यांबद्दल अभिमान ज्यांनी या भावी महापुरुषाच्या हृदयांत उद्दीप्त केला ते खरोखर कृतार्थ होत.

ज्या कॉलेजमध्यें राजवाडे शिकत होते, त्याची आजूबाजूची स्थिति चित्तवृत्ति विषण्ण करणारी होती. ज्या लढायीनें पुण्याचें पेशव्याचें राज्य गेलें, तो लढायी येथेंच झाली. तेथें हिंडत असतां पुढील आयुष्यांत पूर्वजांची स्मृति जागृत करणा-या या थोर पुरुषास फार उद्विगता प्राप्त होई.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel