नमस्कार वाचकहो! आरंभ त्रैमासिकाचा 2020 या वर्षातील पहिला अंक (मार्च ते मे) आणि एकूण सलग 14 वा अंक आपल्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. अंक आपल्या हातात पडेपर्यंत 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आपण साजरा केलेला असेल. परंतु, जगातील प्रत्येक मराठी माणसाने वर्षाचे सर्वच्या सर्व दिवस मराठी भाषेचा अभिमान बाळगून स्वत:च्या मातृभाषेच्या प्रगतीसाठी प्रयत्न केला पाहिजे, तरच मराठी भाषा टिकेल! "वाचाल तर वाचाल", असे म्हणून आपण वाचनाचे महत्व सांगतो त्याच धर्तीवर मी मराठी भाषेसाठी म्हणेन की, "वाचवाल तर वाचेल!" म्हणजे मराठी माणसांनो, तुम्ही सतत बोलून, लिहून, वाचून मराठी भाषा "वाचवाल" (हाच वारसा आपल्या पुढच्या पिढीकडेसुद्धा देत राहाल) तरच ती "वाचेल"!
आरंभ टीमचे मला नेहमी कौतुक वाटते. आपापल्या व्यक्तिगत, सामाजिक आणि व्यवसाय किंवा नोकरी यातून वेळ काढून ही टीम आरंभ अंक दर्जेदार व्हावा म्हणून सतत झटत असते. व्यक्तिगत कारणास्तव टीममधून काहीकाळ रजा घेतलेल्या सातारा येथील सविता कारंजकर या अंकापासून विशेष सल्लागार म्हणून परत आल्या आहेत तर आरंभ टीम मध्ये नवीन सदस्य म्हणून नवी मुंबई येथील वंदना मत्रे या प्रूफ रीडर टीम मध्ये सामील झाल्यात. तसेच, नाशिकच्या मैत्रेयी पंडित या सह-संपादक म्हणून आपल्या आरंभ कुटुंबात सामील झाल्यात. सविता यांची मुलगी वैष्णवी जी पुण्यात "मास्टर इन जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन" करते आहे तीही स्वेच्छेने आपल्या टीम मध्ये आलेली आहे! या अंकात तिने गेल्या तीन महिन्यांतील महत्वाच्या घडामोडींचे संकलन करून दिलेले आहे. सामान्य ज्ञानासाठी ते नक्कीच वाचकांना उपयोगी पडेल! कला दिग्दर्शन क्षेत्रातील अश्विनी मिस्त्री यांनी या अंकापासून कला विभाग सांभाळला आहे आणि या अंकाचे सुरेख असे मुखप्रुष्ठ त्यांनी तयार केले आहे. या अंकासाठी आपण एक अभिनव उपक्रम राबवला आहे तो असा की, वाचकांनी बघितलेल्या आणि त्यांना आवडलेल्या लघुपटाची कथा स्वत:च्या शब्दांत पटकथा स्वरूपात लिहायची आहे, ते आपल्याला या अंकात वाचायला मिळेलच तसेच एकूणच सिनेमा क्षेत्राशी संबंधित अनेक लेख या अंकात लेखकांनी पाठवले आहेत, त्याला साजेसेच त्यांनी हे मुखपृष्ठ बनवले आहे!!
एकूणच काय तर देश विदेशातील मराठी वाचकांत लोकप्रिय असलेले असे नव्या साहित्य युगाचा आरंभ करणारे हे आरंभ ई-मासिक आता तरुण विचारांचे त्रैमासिक झाले आहे आणि वाचकांना साद घालत आहे आणि घालत राहणार आहे की - "लिहिते व्हा आणि लिखाणातून वैचारिक बदल घडवा!" कारण जगातील कोणताही बदल हा आधी मनांतील विचारांत होतो आणि मग तो दृश्य स्वरूपात उमटतो!!
निमिष सोनार, संपादक, आरंभ त्रैमासिक
(आरंभ... एका नव्या साहित्य युगाचा!)