"अमृतातेहि पैजा जिंके" अशी थोरवी असणारी लाघवी मराठी भाषा! जिच्या संगाने दऱ्या-खोऱ्यातील शिळा जागतात असे वर्णन केले जाते त्या मातीत जन्माला येणे म्हणजे अहोभाग्यम्!! आज आरंभ त्रैमासिकाच्या निमित्ताने सहसंपादक म्हणून या अमृतवाणीची सेवा करण्याची संधी मला मिळते आहे हे वाचक मंडळींना कळवण्यात मला अत्यंत आनंद होत आहे.
नमस्कार, मी मैत्रेयी पंडित. मी नाशिकची रहिवासी असून इंजिनीअर आहे. आरंभच्या मार्च महिन्याच्या अंकापासून या वाचनप्रवासात तुमच्यात सामील झालेली नवीन सहप्रवासी! साहित्याचे माझ्यावर संस्कारच आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण लेखन ही मला माझ्या कुटुंबाकडून मिळालेली देणगी आहे. लहानपणी बालकविता लिहिण्यापासून सुरू झालेला माझा लेखनप्रवास उत्तरोत्तर वाढत जाऊन आज या त्रैमासिकाच्या संपादनापर्यंत आलेला आहे. या आधी मी महाविद्यालयीन नियातकलीकासाठी दोन वर्षे काम केले आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून मी प्रासंगिक लेखन करते. आणि आवड म्हणून वैयक्तिक ब्लॉगदेखील लिहिते. माझ्या या आवडी जाणून घेऊन, निमिष सरांनी मला सहसंपादक म्हणून काम करण्याची संधी दिली याचा मला खूप आनंद आहे.
परदेशातूनही ज्या अंकाला भरघोस प्रतिसाद मिळतोय अशा इ-मॅगझीनचे सह-संपादन करणे ही मला माझ्या लेखनप्रवासातील एक मोठी संधी वाटते आहे. आणि या प्रवासात मला मिळालेली टीमही अत्यंत उत्साही आहे. आमच्यातील प्रत्येकजण आपल्या कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळून स्वयंस्फूर्तीने या अंकासाठी काम करतो. आणि विशेष गमतीची बाब म्हणजे आमच्यापैकी कोणीही एकमेकांना भेटलेले नाही, तरीही कामातील सुसूत्रता खूप छान आहे. आरंभच्या टीम सोबत काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे वाचकमित्रांसोबत ओळख करून घेणे इतकेच या संपादकीय मध्ये मला संयुक्तिक वाटते. नव्या तरुण विचारांच्या साहित्य युगाचा हा "आरंभ" आहे, आणि या व्यासपीठावर आपण दर अंकात नक्कीच भेटू अशी मी अपेक्षा करते. आपल्या अंकाविषयीच्या प्रतिक्रिया आणि सूचनांची मी आणि संपूर्ण आरंभ टीम प्रतीक्षा करत असतो आणि त्या अंमलात आणण्यासाठी सदैव तत्पर असू या आश्वासनासह इथे शब्दांना अल्पविराम देते; पण... तुम्ही मात्र वैचारिक बदलांसाठी आपल्या लेखणीला मनसोक्त लिहू द्या... लिहिते व्हा! आणि आरंभवर असेच भरभरून प्रेम करत रहा.
मैत्रेयी पंडित, सहसंपादक, आरंभ त्रैमासिक
(आरंभ... एका नव्या साहित्य युगाचा!)