|| मुखपृष्ठ कथा – चित्रपट जगत ||
"अँरेंज्ड मॅरेज". (Arranged Marriage). लघुपट.
भाषा: इंग्रजी. लांबी: १२ मिनिटे.
निर्माता: रफकट फिल्म्स (Roughcut Films)
पटकथा आणि दिग्दर्शक: नार्स क्रिष्णामाचारी (Nars Krishnamachari)
छायाचित्रकार: बिभू (Bibhu)
पात्र: एरीझ गँडडी (Areesz Ganddi) : अर्जुन, संस्कृती खेर : नेत्रा, अवंतिका शेट्टी : नेहा.
उपलब्धता: https://youtu.be/Z8X97OL06OY
स्क्रिप्ट:
लघुपट सुरु होतो तेंव्हा "फ्रेंच कट" दाढी असलेला आणि व्यवस्थित सुटाबुटात असलेला एक पुरुष रस्ता ओलांडून गाडीत बसताना दिसतो. (यापुढे सुटाबुटातल्या या पुरुषाला 'सुपु' हे विशेषण मी वापरणार आहे.) आणि आपल्याला दोघांतला – स्त्री आणि पुरुष यांच्यातला - संवाद ऐकू येऊ लागतो.
ते गप्पा मारता आहेत. पुरुषाचा वेश आता थोडा वेगळा आहे. वेषातला हा फरक आपल्याला जाणवेल इतका आहे.
ती गप्पांचे, प्रश्नोत्तरांचे सोपे पण पक्के नियम (ground rules) मांडते. जसे की एकूण वीस (आणि वीसच) प्रश्न ते एकमेकांना विचारातील. आणि प्रश्न 'खाजगी' नसतील. पुरुष 'खाजगी' आणि 'वैयक्तिक' प्रश्नातील भेद जाणून घेतो. वैयक्तिक प्रश्न चालतील. पण एखाद्या प्रश्नाला तीने उत्तर नाही दिलं की तो खाजगी होता हे समजेल असे ती स्पष्ट करते.
तो गप्पांना सुरुवात करतो.
सुरुवात एकमेकांच्या व्यावसायिक माहितीच्या देवाणघेवाणीने होते. ती मनोवैज्ञानिक आहे, आणि तो ऑडीटर आहे हे कळते.
तोपर्यंत नोकर चहा आणतो. एक कप बिनदुधाचा, कोरा, 'डीप'वाला असतो तर दुसरा नेहमीसारखा. हा फरक कॅमेरा वरून दाखवतो. ठसवला जातो.
इथे 'सुपु' गाडीतून जातांना आणि घड्याळात पहात, थोडा चिंताग्रस्त. आणि वरच्या सारखंच दृष्य संपायच्या आत संवाद ऐकू येऊ लागतो. (यापुढे याला मी दृसं – 'दृष्य संपायच्या आत संगिताच्या पार्श्वभूमीवर पुढील संवाद ऐकू येणे' असे म्हणणार आहे.)
आता ते एकमेकांच्या 'खाण्या-पिण्या'च्या आवडीनिवडी जाणून घेत आहेत. रोज करावं लागलं नाहीतर ती 'स्वयंपाका'कडे थेरपी म्हणून पाहते हे सांगते. त्याला विचारता तो सांगतो की त्याला कॉफी आणि ती ही फक्त 'इंस्टंट' कॉफीच बनवता येते. ते त्यांच्या व्हेज-नॉनव्हेज पसंतीविषयी गप्पा मारतात. तो कधीकधी मांसभक्षण करतो आणि ती पक्की 'व्हेगन' आहे हे कळते.
गप्पा चित्रपट विषयावर वळतात. तिला हिंदी मसालापट, 'शहारुखचे तर फारच' आवडतात तर तो पक्का इंग्रजी चित्रपटांचा चाहता असतो. त्यांच्या आवडींतला भेद स्पष्ट होतो.
आणि पुन्हा 'सुपु' हातात वेष्टनीत भेटवस्तू घेऊन मॉल समोर रस्ता ओलांडताना दिसतो. वरीलप्रमाणे दृसं.
आता ते पुस्तकांच्या आवडीनिवडी जाणून घेताहेत. पुढे ते दोघे एकमेकांची संगिताची आवड जाणून घेतात. तिला रेहमान, तर तर त्याला इंग्रजी 'टेक्नो' संगीत आवडते. इथेही ठसते ती त्यांच्या आवडीनिवडीतली भिन्नता.
यानंतर तो विचारतो की ती धार्मिक आहे का? ती हा प्रश्न 'खाजगी' आहे म्हणून टाळायचा प्रयत्न करते. My relationship with God is my buisness. ती म्हणते. या विषयावर त्याचं मत ऐकतांना तिचे स्मितहास्य, बट बाजूला करणे लोभस वाटते.
आणि पुन्हा 'सुपु' गाडीतून जातांना दिसतो. आता त्याच्या बाजूला आता एक मोठ्ठा पुष्पगुच्छ आहे. मागच्यासारखंच दृसं.
त्यांच्या गप्पा आता 'लैंगिकता' (sexual) विषयाकडे वळतात. तोच विचारतो. तिला ते फारच 'खाजगी' वाटतं. तो सांगतो की पुढे जन्मभर एकत्र राहायचं असेल तर ते जाणून घेणे त्याला महत्वाचे वाटते. ती उत्तरते की त्याचे त्यालाच ते हुडकावे लागेल. आणि मग ती तोच प्रश्न त्याला विचारून बाजू पलटवते, अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करते तेंव्हा तो तिचाच 'खाजगी'चा बचाव वापरून सुटका करून घेतो. गप्पांचा प्रवास आता 'ड्रिंक्स'कडे वळतो. धूम्रपानावरही गप्पा होतात. आणि संभाषणातलं तिच्या चेहऱ्यावरच स्मित आपल्याही ओठावर येतं. संवाद मी मुद्दामच देत नाहीये. तो मुळातूनच अनुभवण्याजोगा आहे.
आता पुन्हा 'सुपु'. तो अजून गाडीतच आहे. परत दृसं.
ते एकमेकांना आयुष्यातल्या ध्येयांबद्दल विचारू लागतात. त्याची ध्येयं, महत्त्वाकांक्षा सहजसाध्य वाटल्याने ती टोकरते, तर तो म्हणतो: They evolve.
पुढे ती एक महत्वाचा प्रश्न विचारते: रस्त्यात मुलं एखाद्या मुलीची छेड काढतांना दिसली तर तो मधे पडेल का, त्या मुलांना थांबवेल का?
तो सांगतो: एकट्याने नाही, पण काहितरी फेकून मारेन आणि पळून जाईन.
ती: लग्नझाल्यावर हेच माझ्याबाबत घडलं तर?
तो: नक्की सांगता नाही येणार, पण अजून बरच काही फेकून मारेन. आरडाओरड करून माणसं जमवेन, मदत मागवेन.
तिचे प्रश्न आता अधिक टोकदार होतायत हे पुढच्या प्रश्नावरून जाणवतं. ती रस्त्यावरल्या भिकारी लहान मुलांबद्दल विचारते.
ती: तू अशा मुलांना पाहून काय करतोस?
त्यालाही याची जाणीव होऊन तो तिला तसे विचारतो. पण तिच्या अबोल पण शारिरीक प्रतिसादानंतर तो काही उत्तर देतो. आता प्रश्न विचारण्याची त्याची पाळी आहे याची ती त्याला जाणीव करून देते.
पुन्हा 'सुपु'. काही क्षणात तो हातात ते प्रेझेंट, तो बुके, आणि त्याची अटॅची घेऊन गाडीतून उतरतांना आणि एका संकुलात शिरतांना दिसतो. दृसं.
आता संभाषणाची गाडी एकमेकांच्या आई-वडीलांकडे वळते. त्याचे आई-वडील लग्नानंतर त्याच्याबरोबरच राहतील हे ठरलेलं असते. तो तिला सुचवितो की तिचे आई-वडीलही त्यांच्याबरोबर राहू शकतात. इथे ती एकुलतीएक मुलगी आहे हे आपल्याला कळते. तिला ते पटत नाही.
तो: प्रयत्न केल्याशिवाय कसं समजणार?
पुन्हा एकदा तिचा तो अबोल शारिरीक प्रतिसाद.
ती घड्याळाकडे पहाते.
त्याला सुचवते की आपले वीस प्रश्न संपले आहेत. तो सांगतो की त्याने फक्त पंधराच मोजलेत. तिलाच अजून विचारायचे असल्यास त्याची तयारी दर्शवितो. ती त्याला स्पष्ट सांगते की आपल्यात काहीच समान नाही. आपण फक्त आपल्या आई-वडलांच्या इच्छेखातर भेटलोत. तो तिला पटवायचा प्रयत्न करतो की तेच तर चांगले आहे. नवीन विचारांना, अनुभवांना त्याला सामोरं जायचं असतं.
पुन्हा 'सुपु'. त्याच्या हातातल्या सगळ्या सरंजाम्यासह लिफ्टचे दार उघडतोय. दृसं.
लिफ्टने वर येतो.
या दरम्यान 'ती'चा आवाज आपल्या सांगतोय की तिला हे सारं नकोय.
दृसं.
तो घराचा दरवाजा उघडण्यासाठी किल्ली काढतो. पण काही लक्षात आल्यावर बेल दाबतो.
आता दृसं मध्ये त्याचा आवाज सांगतो की: मला एकटे राहण्यापेक्षा भांडणे आवडतील.
दरवाजा उघडतो. कुणी नवीन मुलगी दरवाजा आतून उघडते. फोनवर ती नवीन मुलगी कुणाशी बोलत असते ते ऐकू येते. बोलतच त्याला ती नवीन मुलगी आत घेते.
पुन्हा पार्श्वभूमीवर त्यांचा आधीचा संवाद.
तो विचारतो: तूला कशाने दुखः होतं?
ती: कोणी माझा अनादर केला तर.
तो: तूला आनंद कशाने होतो?
ती: (तेच सुंदर हसू) अनेक गोष्टींनी.
त्या गोष्टी ती सांगते. त्यावर तो तिला विचारतो: माझी ध्येयं सांगू?
ती: पण आपण यावर आधिच बोललोय.
तो: I told you they evolove. (तिच्या संमतीने) मला 'चॅट' खायला आवडेल, रहमान ऐकायला आवडेल आणि मी जिमला जाईन म्हणतो. ('चॅट'चा संदर्भ तिच्या खा.पी.च्या आवडीत आलेला असतो. विस्तारभयास्तव वर सगळंच दिलं नाही.)
पुढचं मिनिटभराचं काही इथे शब्दांत व्यक्तकरण्यापलीकडे मस्त आहे!
तो सांगतो की इथे आला तेंव्हा तो तिच्याइतकाच गोंधळलेला होता. I am a simple heartful guy. I adapt when adpating is required. I cross the bridge when I get there.
तो अजूनकाही सांगतो. तिला ते आवडत असाव असं तिच्या चेहऱ्यावरून, देहबोलीतून जाणवत. ते पुन्हा भेटायचं ठरवतात. त्याच्या "मग, आईला सांगू का की मला माझी 'चि.सौ.कां.' भेटलीय?" यावर ती फक्त देहबोलीतून हसते. इथे इतकावेळ त्यांच्या, दोघांच्या चेहऱ्यावर असलेला थोडा कॅमेरा लांब जावून दोघांनाही दाखवतो.
पुन्हा मागचचं ती नवीन मुलगी बोलत दरवाजा उघडतांनाचं दृष्य. ती नवीन मुलगी फोनवर बोलतच त्याच्या हातातला बुके घेते. पण आता तो आत जातांना आपली मूळ नायिका त्याने तिच्यासाठी आणलेल्या 'भेटी'बद्दल छेडते. क्षणभर काही म्हणते. तेवढ्यात ती नवीन मुलगी हातात वाईनबॉटल घेऊन तिथे येते. नायिकेला मिठीत घेऊन 'Happy Anniversary' म्हणते. आणिक काही बोलून रजा घेते. तिथून निघते. आपले नायक नायिका एकमेकांना जवळ घेतात. आणि उमटते:
Over 90% of marriages in India are still arranged.
Less than 5% result in divorce.
श्रेयनामावली देऊन लघुपट संपतो.
आता थोडंस माझं :
हा लघुपट २०११मध्ये आला. मी आणि पत्नीने तो पहिल्यांदा २०१४मध्ये पाहिला. खूप भावला. आवडला. इतका की, मग तो अनेकांना - लग्न झालेल्या आणि होऊ घातलेल्यांना आग्रहाने दाखवला. आणि म्हणूनच 'आरंभ'च्या माध्यमातून संधी मिळताच मी आपल्या समोर त्याची कहाणी घेऊन आलो आहे. युट्युबवर - https://youtu.be/Z8X97OL06OY वर साडेपाच लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिलाय.
एक चालक (ड्रायव्हर), नोकर आणि शेवटच्या मिनिटभरात आलेली ती नवीन मुलगी सोडल्यास पूर्ण लघुपटभर फक्त 'तो' आणि 'ती'च आहेत. सुपु सोडल्यास बहुतेक दृष्य 'तो' आणि 'ती'च्यावर केंद्रित आहेत. कॅमेरा त्यांच्या चेहऱ्यावर खिळून आहे. आणि म्हणूनच तिचे ते गोड हास्य...
असे म्हणतात की नायिकेची – संस्कृती खेरची – कारकिर्द या लघुपटाने बहरली. ती निर्माता-दिग्दर्शकांच्या नजरेत आली.