काय आहे मी माझी मलाच सापडत नाही,
कशी आहे मी माझी मलाच कळत नाही.
प्रयत्न नेहमीच होता आदर्श मुलगी होण्याचा,
इंतजार अजून आहे त्या आदर्श प्रशस्तीपत्राचा.
विद्यार्थी दशेत मान मोडून अभ्यास खूप केला,
तिन्ही त्रिकाळ घरकाम होतेच खनपटीला.
ओल्या मातीला मात्र आकार प्राप्त झाला,
पण गवसले नाही मी "माझीच मला".
उंबरठ्याचे माप ओलांडून सॄजनाचा प्रारंभ झाला,
आनंदाने सर्वस्व अर्पियले त्या घरकुलाला.
सात्विकता जपली कुटुंब एकत्र गुंफण्याला ,
पण सापडेना मी त्या नात्यांच्या मेळ्याला?
आईपण निभावण्यात कधी कुसूर नाही केली,
संस्कारांच्या शिदोरीची कधी कमी नाही पडली.
गॄहिणी व आईपण ठरले का पात्र कौतुकाला?
विचारले कित्येक प्रश्न मी माझ्याच वेड्या मनाला
नात्यांचा तर गुंता क्वचितच असेल झाला
कधी मोठं नाही होऊ दिलं माझ्यातील" मी" ला.
तरी प्रश्न आहे मनात मोठा आज या घडीला,
द्याल का कोणी शोधून "माझ्यातल्याच मला"?
सापडले जर मी कळवा नक्की मला,
तुमच्या कसोटीवर पारखून घेईन स्वतःला.
गुणांचे करीन संवर्धन, दोषांची करीन वजाबाकी,
तुमच्या मनातील मंगलला प्रतिबिंबित करा की
तूमच्या मनातील मंगलला प्रतिबिंबित करा की……