सर्वपल्ली डॉँ. राधाकृष्ण् हे आधुनिक जगातील एक श्रेष्ठ दर्जाचे विचारवंत होते, तत्त्वज्ञ होते.

जगप्रसिद्ध अशा अर्वाचीन तत्त्ववेत्त्यांवर आणि त्यांच्या तत्त्वज्ञानविषयक विचारवंत एक ग्रंथमाला प्रसिद्ध झालेली आहे. त्या मालेत अल्बर्ट आईन्स्टाईन, व्हाइटहेड, बर्ट्रेंन्ड रसेल... इत्यादी विचारवंतांच्या पंक्तीला डॉँ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनाही मोठ्या बहुमताने बसविण्यात आले आहे आणि ते रास्त, यथायोग्यच आहे.

भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचा परिचय जगाला करुन देणारे स्वामी विवेकानंद, गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, म.गांधी या महापुरुषांच्या परंपरेतले अलीकडच्या काळातले थोर तत्त्वज्ञ म्हणजे डॉँ. राधाकृष्णन् !

भारताची थोरवी आणि परंपरा सांभाळून किंबहुना आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने त्यात मोलाची भर घालून, राधाकृष्णन् यांनी भारताची गौरवगाथा उज्ज्वलित केलेली आहे.

परकी-इंग्रजी सत्तेचे जोखड शतकाहून अधिक काल भारताने कष्टाचे वाहिले. या अवधीत, राजकीय स्वातंत्र्याबरोबरच, सर्व प्रकारची अन्य स्वातंत्र्यदेखील नष्ट झालेली होती. सर्व क्षेत्रांत पिछेहाट भारतात सुरु होती. अशा वेळी भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञान कसे श्रेष्ठ आहे, कसे उचित आहे, याची प्रचिती सर्व जगाला डॉ. राधाकृष्णन् यांनीच अत्यंत प्रभावी रीतीने आणून दिली आहे.

आणि म्हणून तर डॉ. राधाकृष्णन् यांनी भारताच्या कुठल्याही स्वातंत्र्य संग्रामात भाग न घेता, सत्याग्रह-तुरुंगवास-हद्दपारी न भोगतादेखील भारताच्या श्रेष्ठ श्रेणीच्या नेत्यांत त्यांची आदरपूर्वक गणना केली जाते. राजकीय स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी देहदंड सोसला, त्याग केला, त्यांच्याच बरोबरीने किंबहुना कांकणभर जास्तच अशा सन्मानाने, आदराने डॉ. राधाकृष्णन् यांना मानले जाते आणि हा देखील भारतीय संस्कृतीचाच मोठेपणा आहे. कारण प्रत्यक्ष राजकारणापासून, सत्तास्थानापासून अलिप्त राहून, तपस्वी वृत्तीने, निर्लोभीपणाने केवळ ज्ञानार्जन करणा-या व धर्म, संस्कृती, नीती, न्याय यांचे पालनपोषण करणा-या ऋषीमुनींना भारतात प्राचीन कालापासूनच श्रेष्ठपदाचा मान देण्यात आलेला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel