शारीरिक आनंदाचे स्तोम माजविणे चुकीचे आहे. विचाराच्या व बुद्धीच्या नियंत्रणाशिवाय केवळ भावनेच्या उद्रेकाने कर्मे करणे म्हणजे पुन्हा तिर्यकयोनीकडे जाणे होय, पुन्हा पशुत्वाकडे जाणे होय. वासनांनी बुद्धीच्या नियंत्रणाची जागा घेऊ नये. आत्म्याचे प्रकटीकरण म्हणजे वासना-विकारांचे प्रदर्शन नव्हे. सुखासक्ति म्हणजे आत्म्याचा आविष्कार नव्हे. जीवनात मोकळेपणा हवा व जी बंधने स्वतःच्या जीवनातून, स्वतःच्या इच्छेतून निर्माण झालेली नाहीत. ती स्वीकारणे योग्य नव्हे असे म्हणण्यात येते. विचारदृष्ट्या हे म्हणणे कितीही रास्त असले, तरी अप्रगल्भ अशा तरुणींनी अशा रीतीने वागने धोक्याचे आहे. तसे त्यांना वागू देणे हितावह होणार नाही. बाह्य बंधनांतून आंतरिक बंधने उत्पन्न होतात. बाह्य शिस्त पाळून मग स्वतःची आंतरिक शिस्त येते. बाह्य बंधनांची ज्यांना अतःपर जरुरी नाही. अशांनाच ती बंधने झुगारण्याचा अधिकार आहे; त्यांनाच आज्ञा मोडण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु असे हे स्वातंत्र्य मिळविण्यापूर्वी व्यक्तीने स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. संयमी राहण्यास शिकले पाहिजे. व्यक्तीला एक दिवस पूर्ण स्वातंत्र्य मिळावे यासाठी आज संयमी जीवन जगायला आपण तिला मदत केली पाहिजे. जे तरुण आहेत, अद्याप पोरवयाचे आहेत, त्यांनी स्वतःची इच्छा प्रमाण असे म्हणून चालणार नाही. आपण म्हणू तो कायदा असे त्यांनी करणे योग्य नाही. कसे तरी लहरीप्रमाणे वागणे, मनात येईल त्याप्रमाणे संगती जोडणे, संबंध जोडणे हे बरे नव्हे. लग्न म्हणजे गंमत होऊ नये, खेळ होऊ नये. लग्नासंबंधी भ्रामक कल्पना व भ्रामक ध्येये असणे बरोबर नाही. लग्न म्हणजे गंभीर पवित्र वस्तू आहे. अत्यंत अर्वाचीनलेले कोणी घटकाभर राहणा-या लग्नालाही ‘कायदेशीर’ म्हणून संबोधतात. लग्न म्हणजे का इतकी हास्यास्पद वस्तू? कोणी कोणी प्रायोगिक, तात्पुरत्या लग्नाची प्रथा सुचविली आहे; तर खरे लग्न लावावे. परंतु ही प्रायोगिक लग्ने म्हणजे सदर परवाना असलेला व्यभिचारच म्हणायचा! अशा गोष्टीचे पुरस्कर्ते भूतकाळाकडेच लक्ष देत नाहीत असे नव्हे, तर मानवजातीच्या भवितव्याकडेही दुर्लक्ष करतात. लग्न म्हणजे लैंगिक वासना तृप्त करण्याचे एक साधन यापलीकडे अधिक अर्थ हे लोक लग्नाला देऊ इच्छित नाहीत. लग्नातून शेवटी स्वतःचा विकास व्हावा, आध्यात्मिक साक्षात्कार व्हावा, उच्चतर जीवनाकडे जाण्याचे ते एक साधन व्हावे, नाना गुण अंगी यावे, लहर थोडी कमी व्हावी, उच्छृंखलता नष्ट व्हावी, अशी दृष्टीच या अर्वाचिनांजवळ नाही. तारुण्याच्या उन्मादात, त्या पहिल्या नव्या नवजातीच्या भरात सारी बंधने झुगारुन युवायुवती परस्परांस मिठ्या मारतील, मनसोक्त वागतील; परंतु ज्या वेळेस जीवनात परिपक्वता येईल, प्रौढपणा येईल, त्या वेळेस त्यांना आढळून येईल की, स्वैराचाने आध्यात्मिक व सामाजिक हानी तर होतेच, परंतु जे सुख त्यांना पाहिजे असते ते सुखही अशाने नीट मिळत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel