-    दिव्या वराडकर

(प्रथम क्रमांक)

उतरविण्या गर्व तुझा ठाकला उभा, शौयाचा सूर्य राम सैन्य ही प्रभा
जाळील तव वंश सर्व राज्य संपदा, शेवटचा करि विचार फिरून एकदा

गेले कित्येक दिवस दूरदर्शन माध्यमातून श्री राम चरित्र रामायण कथा मालिका सुरू आहे. सध्या कथेत युद्धनीती व युद्धप्रसंग चालू आहे, या युद्धकथेत प्रत्येक वेळी श्री रामाचे अनेक दूत येतात आणि लंकेश्वर रावणाला जाऊन कधी शांती संदेश देतात, कोणी माघार घ्यायला सांगतो, तर कोणी अत्यंत नम्रपणे त्याला सांगतो युद्ध मध्ये शांतता हवी असेल तर माघार घे, तुझं पाऊल लंकेच्या बाहेर आणू नकोस, शांतता पाळून तुझ्यातील योग्य नीतीमत्तेला, स्वाभिमानाला आठवून माता सीतेला परत कर !!

क्षणभर मनात आले अशाच या कोरोनाच्या लढाईत आपले भारतीय सरकारचे अनेक दूत मग तो कोणी मंत्री असो, अधिकारी असो, पोलीस असो, डॉक्टर असो व नर्स आज प्रत्येकाला विनंतीपूर्वक सांगत घराबाहेर पडू नका, घराबाहेर पडला की कोरोना (को-रावण) तुमच्याशी युद्ध करेल, जो कोणी कोरोना बाधित आहे त्याने बाहेर पडले तर एकाच्या निष्काळजीपणामुळे इतर निष्पाप बळी जातील. जसे सर्व रावणाचे मंत्री, भार्या, माता, सासरे त्यास समजावत होते की, युद्ध करू नको अन्यथा या पूर्ण लंका राज्याचा विनाश होईल तसेच जर आपल्याला आपल्या भारत देशाला वाचवायचे असेल तर आपले सर्व भारतीय दूत सांगत आहेत की बाहेर पडू नका.

माता सीतेने सुद्धा काही कारणास्तव रेषा ओलांडलेली आणि पुढील प्रसंग घडले, तसेच तुम्ही सुद्धा घराबाहेर पडू नका, तुमच्यातला संयम, स्वयंशिस्त अबाधित ठेवून, मर्यादेला न ओलांडता शिस्तीला जिंकायचे असेल तर घरातच रहा !! नाहीतर हानी निश्चित, कारण महायुद्ध सुरू झाले भोंगा वाजलाय, आज भारताने तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे.  युध्द म्हटलं की काही मिळवण्यापेक्षा अनावश्यक हानीच होते, त्यापेक्षा घरातच राहून या देशाच्या भवितव्यासाठी सहकार्य करा, स्वतःवर संयम मिळवा, जसे रामायणात सर्व पराक्रमी वानरसेना हर हर महादेवाचा जय घोष करून युद्ध जिंकते, तसाच आपल्यातील शिवरायांचा मावळा नसानसांत भिनू दे आणि हर हर महादेवची घोषणा करत घरातच राहून आपल्या भारत देशाला जिंकवून देऊ. आज आपण आपल्या मर्यादा लक्षात घेऊनच हे युद्ध जिंकू शकतो हाच सर्व देशवासियांचा एकनिष्ठ निर्धार हवा. आजच्या या लोकडाउन मध्ये आपल्याला माननीय श्री मोदीसाहेबांनी रामायण पाहण्याची सुविधा प्राप्त करून दिली, पण का? का रामायणच ? याचे एक कारण सध्याची विस्कळीत झालेली कुटुंब व्यवस्था व त्यास पुनर्विचार, चिंतन करण्यासाठी योग्य मार्गदर्शन माध्यम हेही असावे.

रामायण पाहताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, श्रीराम हा राजा मर्यादा पुरुषोत्तम आहे, तसाच राजा आपल्या घरातही आहे तो म्हणजे आपला पती, आपले वडील, आपले जेष्ठ. राम एक राजा होता ज्याने ऐकण्याचे कार्य केले, पटकन प्रतिक्रिया न देता विचारपूर्वक उत्तरे दिली, संताप राग आला तरीही आवरून सावधपणे ऐकले, एखादे कुतूहल जाणवले तरी योग्य लगाम लावला. त्या युद्धात कठीण व प्रतिकूल परिस्थितीत राजाची स्थिर नजर, देहबोली, अविचल मुद्रा, शांत मन आपणास संस्कार व संस्कृती दर्शन जपवणूक संदेश देते. कठीण प्रसंगात सर्व मानव सृष्टीच्या कल्याणासाठी व संरक्षणासाठी आवश्यक असणारा पराक्रम, निष्ठावंत, सावधचित्त, स्थितप्रज्ञता, क्षमाशीलता श्री राम आपणास वेळोवेळी लक्षात आणून देतात. कोणतेही संकट आले असता अथवा पराभव जवळ आला असता, उतावळेपणा, मन खच्चीकरण, द्विविधा इत्यादी प्रसंगी स्थितप्रज्ञवृत्ती यावी हेच आपण शिकले पाहिजे. पण अफाट शक्ती असूनही राम संयम ठेवतात. त्यांना मानवी करुणेची पूर्ण जाणीव आहे. राम हा फक्त एक आदर्श मुलगा नव्हता, तर एक आदर्श नवरा आणि भाऊ देखील होता. राम हे भारतीय समाजातील सन्मान, आदर्श, नम्रता, शहाणपणा, लोकशाही मूल्ये आणि संयम यांचे नाव आहे हे कधीच विसरून चालणार नाही.

सख्य जोड त्यासवे हो कृतार्थ जीवनी
नित्यशुद्ध जानकी राघवास अर्पूनी
ना तरी मृतीच ये चालुनी तुझ्या घरी

श्री रामाची पत्नी श्री सीता यांच्या प्रत्येक शब्दांत तिचे श्री रामांवर असलेले प्रेम व्यक्त होते. प्रेम हे पुरुषाच्या जीवनाचा एक भाग असते पण स्त्रीच्या जीवनाचे सर्वस्व असते या एकनिष्ठ वचनाचा सातत्याने प्रत्यय माता सीतेच्या चारित्र्यात प्रत्येक प्रसंगी अनुभव येतो. आजच्या युगातील पती पत्नी नातेसंबंधाचा विचार करता सीता राम नातेसंबंध किती मोठा आदर्श आपल्यापुढे आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. आजच्या हरवलेल्या संवादरुपी घरांना व घरातील नात्यांच्या जाणिवेस रामायण पुन्हा जिवंत करू शकते. पती पत्नी मधील प्रामाणिक जाणिवेशिवाय कोणतेही घर सुखी राहूच शकत नाही. पती पत्नी घरातील दोन महत्वाचे वासे वा आधारस्तंभच जणू. या आधारांनी आपल्या येणाऱ्या पिढीला एक सुस्पष्ट संस्कार द्यायचा असतो. त्यात नात्याची नाजूक वीण गुंफायची असते. घरातील आत्मा या दोन जीवांच्या जाणिवेवर जगत असतो. आज देशाच्या प्रतिकूल परिस्थिती प्रसंगी या नात्यांची बंधने,संवाद, जाणीव, व्यथा इत्यादी सारेच पुन्हा विचार करण्याची संधी देवाने आपणास दिलेली आहे. खरंतर आपल्याला आपल्या कुटुंबासाठी मिळालेला हा अत्यंत मोलाचा वेळ आहे. एकाच घरात राहणाऱ्या जीवांतील राग, रुसवा, लोभ, मत्सर, चेतना, जाणीव ओळखून पुन्हा जीवनास नवीन संधी नक्कीच मिळू शकते. मग ती रामायण माध्यमातून असो वा आत्मपरीक्षण माध्यमातून असो. पण प्रत्येकाने त्याचा सारासार विचार करून जीवन व कुटुंब जीवापाड जपले पाहिजे !! आता मिळालेल्या अमूल्य वेळेचा आपल्या कुटुंबाला त्यांच्या छंदासाठी मदत, त्यांच्या पुढील नियोजनात, कुटुंबातील आर्थिक गणिते नियोजन, आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या जुन्या आठवणींना संवादरुपी बळ देण्यासाठी केल्यास नक्कीच लाख मोलाचे समाधान प्राप्त होईल.

याच रामायणातून आपण पुन्हा काहीतरी शिकू. अदृश्य अबोल असलेल्या भावनांना आणि नात्यांना पुन्हा जपू. सध्या वेळ आहे एकत्रित लढण्याची, आपल्या दैनंदिन दिनचर्येतुन आपल्या वर्क फ्रॉम होम मधून आपल्या कुटुंबाला प्रेमळ वेळ देण्याची आणि हीच ती वेळ आहे आपल्या कुटुंबासोबत आनंदात वेळ व्यतित करण्याची !! नंतर कार्यालये सुरु होतील, दिनक्रम नेहमीप्रमाणे पूर्वीसारखा धकाधकीचा होऊन जाईल मग तेव्हा पुन्हा याच वेळेची कमतरता जाणवेल. तेव्हा घरातच राहून प्रेमाचे धागेदोरे घट्ट करा आणि स्वतःला बळकट बनवा. मीच आहे माझा रक्षक, मीच आहे माझ्या देशासाठी सदैव दक्ष !!

जय श्री राम, जय सीता माता, जय भारत माता, जय शिवराय !!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel