एखाद्या राज्याचा उत्तराधिकारी नेमणे,  ही प्राचीन काळी एक महत्त्वाची बाब समजली जायची. अगदी इसवी सन पूर्व काळापासून १६ महाजनपदांपर्यंत आणि तिथून पुढे आधुनिक इतिहासात पर्यंत राजे आपल्या ज्येष्ठ पुत्राचा राज्याभिषेक करत. यामुळे वारसाहक्काने ज्येष्ठ पुत्रच राजा होई. मात्र आपल्याकडे पुराणापासून  काही प्रसंग असे झाले की ज्यात ज्येष्ठ पुत्राला डावलून त्याच्या कनिष्ठ भ्रात्यांचा राज्याभिषेक करण्याचा प्रयत्न केला गेला . परंतु काही कारणास्तव यातले बरेच प्रयत्न अयशस्वी झाले. मात्र काही काळात काही राज्यांच्या बाबतीत कनिष्ठ पुत्रांना राज्य देण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरला. या राज्यांचे रक्षण तर झालेच ,पण यातील बऱ्याच राजसत्तांनी भारतीय इतिहासातील महान सम्राटांची ओळख देशाला करून दिली. यापैकीच ज्येष्ठ पुत्राच्या ऐवजी कनिष्ठ पुत्राचा राज्याभिषेक करून भारतीय इतिहासातला एक महान राजा बनवण्याचे कार्य गुप्त घराण्याच्या चंद्रगुप्ताने केले.
    इसवी सन तिसऱ्या शतकात गुप्त घराणे उदयास आले होते . चंद्रगुप्त पहिला हा त्याचा राजा होता. सम्राट चंद्रगुप्ताने राज्य बरेचसे वाढवले .आपल्या अंतकाळी त्यांनी आपल्या बऱ्याच जेष्ठ पुत्रांना डावलून कनिष्ठ पुत्र समुद्रगुप्त याचा राज्याभिषेक केला . ही चाल यशस्वी ठरली आणि तिचा फार मोठा परिणाम भारतीय इतिहासावर आणि संस्कृतीवर दिसून आला.
      समुद्रगुप्त इसवीसन 335 साली राजगादीवर आला. आपल्या पित्याने त्याचा उत्तराधिकारी म्हणून आपली केलेली निवड किती योग्य आहे,  ते चंद्रगुप्ताने अल्पावधीतच समुद्रगुप्ता ने अल्पावधीतच दाखवून दिले. सुरुवातीला समुद्र गुप्तांनी आसपासची राज्ये जिंकून घेतली. त्यानंतर दूरच्या राज्यांकडे मोर्चा वळवला . त्याच्या राज्याच्या सीमा पार समुद्राला जाऊन भिडल्या होत्या. नागसेन ,नागदत्त, रुद्रदेव अशा राजांना त्याने पराभूत केले. त्याचा पराक्रम पाहून बऱ्याच राज्यांनी त्याला खंडणी देऊ केल्या.
      पराक्रमी समुद्रगुप्ताची सत्ता आसाम पासून पंजाब पर्यंत पोचली होती व त्यांनी तमिळनाडूमधील कांची पर्यंतचा प्रदेश जिंकला होता. सर्वत्र समुद्रगुप्ता असा दबदबा वाढत होता. अशा स्थितीत श्रीलंकेच्या राजा त्याच्याशी मैत्री करार केला . समुद्रगुप्त एक धोरणी माणूस होता. त्याने जाणले आपल्या जवळच्या राज्यांचा कारभार आपण सांभाळू शकतो परंतु दूरवरच्या राज्यांचा नाही . यासाठी त्याने राज्यविस्तार करताना दूरची राज्य खालसा केली नाहीत. त्यांचे अस्तित्व तसेच ठेवले आणि त्यांना आपले स्वामित्व स्वीकारणे भाग पाडले , हा दूरदृष्टीचा निर्णय त्याच्या आयुष्यातील एक प्रमुख घटना होती.
    समुद्रगुप्ता विषयी अधिक विश्वासाची माहिती मिळते ती कौशंबी येथील अशोक स्तंभावरील प्रशस्ती मधून.. असे म्हटले जाते की , समुद्रगुप्त मोहिमांनंतर परत आल्यावर आपला महादंडनायक हरिसेन याला ही प्रशस्ती लिहिण्याचे आज्ञा केली होती.
   तत्पश्चात त्याने प्राचीन संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे अश्वमेध यज्ञ केला. त्याच्या पूर्वी अश्वमेध यज्ञ कित्येक शतकांपूर्वी केला गेला होता . त्यामुळे समुद्रगुप्ताच्या अश्वमेध यज्ञ करण्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. याद्वारे त्यांनी भारतीय वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले . याप्रसंगी त्यांनी अश्वमेध नाणी सुद्धा पाडली. त्याच्यावर अश्वमेध यज्ञ शी संबंधित लेखही आहे. त्याला 'चिरोत्सन्नाश्र्वमेधाहर्ता' म्हणजेच वर्षांपासून प्रचारात नसलेला अश्वमेध यज्ञ करणारा राजा अशी ओळख  आहे . त्याच्या साम्राज्याचा दरारा उत्तरेकडे अफगाणिस्तानपासून ते दक्षिणेकडे सिलोनद्वीपापर्यंत पसरला होता.
    "  पराक्रमांग  विक्रमांक" अशी सार्थ पदवी धारण करणारा समुद्रगुप्त एक महान राजा तर होताच,  याशिवाय तो एक विद्वान,  पंडित , प्रतिभासंपन्न आणि कलासक्त राजाही होता. तो स्वतः एक महान कवी आणि संगीतकार होता . त्याच्या स्वतःच्या अनेक रचना त्याकाळी प्रसिद्ध होत्या. त्याचा महादंडनायक हरिसेन एका ठिकाणी त्याला नारदापेक्षा गायनात श्रेष्ठ असे म्हणतो,  यावरूनच त्याची संगीतक्षेत्रात असलेली महानता लक्षात यावी . समुद्रगुप्त हा चंद्रगुप्त पहिला यांच्याप्रमाणे संस्कृत भाषेचा अभ्यासक आणि अनुयायी होता. त्याने संस्कृत भाषा वापरणे चालूच ठेवले. याशिवाय त्याचे तत्कालीन नाण्यांवर संस्कृतमधील लेखही आढळतात.
     समुद्रगुप्त स्वतः हिंदू धर्मीय होता. तो हिंदू धर्माचा पूजकाने उपासक होता. त्याने बांधलेल्या विष्णू मंदिराचे अवशेष आजही सापडतात.
      चंद्रगुप्ताच्या या  उत्तराधिकार्याने  जवळपास 45 वर्षे पृथ्वीवर राज्य केले . आपल्या हयातीत त्यांनी वीस पेक्षा जास्त गणराज्य आपल्या राज्याला जोडली. हा एक प्रकारचा दिग्विजय होता .म्हणून तत्कालीन परदेशी इतिहासकार समुद्रगुप्ता ला 'भारताचा नेपोलियन' असेही म्हणतात.
    महान सम्राट , योद्धा, वीर याशिवाय कलाप्रेमी,  महान गायक आणि संगीतकार तसेच अनेक कलांचा भोक्ता असलेला राजा समुद्रगुप्त हा इतिहासातला एक सुवर्ण अध्यायच आहे . अश्वमेध यज्ञ करून वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारा समुद्रगुप्त हा निश्चितच भारताचा एक महान सम्राट होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel