पाककृती एक प्रयोग
**

10 कप पाण्यात 10 चमचे चहा पावडर टाकून 10 कप चहा करावा नंतर तो स्वच्छ पातेल्यात गाळून घ्यावा... मग ते पातेलं परत 'चालू' गॅस शेगडीवर ठेवावं आणि एकतानतेने हे मिश्रण आटेपर्यंत ढवळत बसावं किंवा उभं राहावं....चहा घट्ट झाला पाहिजे... मग अगदीच ढवळता येत नसेल तर हे मिश्रण उन्हात सुकवावं.... मग पावडर तयार होईल ही पावडर एका हवाबंद डब्यात भरून ठेवावी...झाली इन्स्टंट चहा पावडर तयार! पाणी गरम करून त्यात ही पावडर आणि थोडी साखर टाकली की झाला चहा तयार!

आपल्या हातात जितका वेळ असेल त्याप्रमाणे चहासाठी पाणी घ्यावं....वर्षभराची पावडर पण करून ठेवता येईल!
ह्याने सुद्धा वेळ जात नसेल तर अशा इनोव्हेटिव्ह रेसिपी करून त्या viral कराव्यात....काही कामसू गृहिणी रेसिपी कितीही कठीण वाटली तरी ती निगुतीने करून बघणाऱ्या असतात....आपण फक्त दुरून मजा बघावी😀
अजून काही भन्नाट रेसिपीज हव्या असतील तर माझं चॅनेल subscribe करू नका कारण ते नाहीच आहे, त्यामुळे बेल आयकॉनवर क्लीक करण्याचा प्रश्नच येत नाही!😂

काय करायचं सोफ्यावर पडायचं, हातात मोबाइल घ्यायचा सुचतील ते ते जिन्नस घालून मनातल्या मनात रेसिपी करून बघत ती type करायची आणि whatsapp वर पाठवायची! कुणी सांगावं कोणीतरी ती करून बघेल आणि आज ना उद्या तुमचं youtube चॅनेल निघेल आणि तुम्ही पण हसतमुखाने घरातल्या घरात जरा ओटाबीटा आवरून, त्यातल्या त्यात चांगली दिसणारी भांडी वापरून आणि हलकासा मेकअप करून (म्हणजे स्वतःचा मेकअप आणि थोडा भांड्यांचा पण)बरीशी साडी नेसून तिचा पदर सावरत सावरत सुंदर सुंदर पाककृती करायला लागाल!

पण ह्या पाककृती करताना बऱ्याच गोष्टींचं भान मात्र ठेवायला लागेल हं!
म्हणजे रोज आपण कसाही तवा वापरतो....म्हणजे कधी कधी मध्यभागी बरा आणि सभोवती तेलाचे काळपट पापुद्रे धरून धरून कंकणाकृती सूर्यग्रहण झाल्यासारखा तो दिसत असतो...कारण आधी तो डोशांसाठी, उत्तप्प्यांसाठी वापरलेला असतो....तो कितीही नॉनस्टिक असला तरी डोसा घालून झाल्यावर कडेने गाणं गुणगुणत हलकेच तेल सोडायची आपली खोड असते....मग तेलाची पुटं चढून चढून तो बिचारा असा होतो तर त्याची नियुक्ती पोळीसाठी होते! तर सांगायचा मुद्दा काय तर हा तवा चॅनेलवर चालणार नाही...तिथे कसा तो नुकताच विकत घेतलेला ताजा तवाना दिसला पाहिजे... आपला नेहमीचा कुकर हा हँडल सैल झालेला असतो... तो चालणार नाही! कसं दिसेल ते!😂 कधीकधी पोळपाट तर इतका डुगडुगत असतो की खाली फडकं घ्यायला लागत असतं... प्रेक्षक घरी जरी स्वतः 'असलीच' भांडी वापरत असले तरी चॅनेल वर त्यांना 'रेसिपी दाखवणारी' जशी प्रेक्षणीय हवी असते तशीच ही भांडी पण प्रेक्षणीयच हवी असतात....तर या सगळ्या गोष्टींचं भान ठेवत आणि थोडी बडबड करत रेसिपी दाखवली की तुम्हाला पण भरपूर likes येतील, भले घरातले तुमच्या पदार्थांना कितीही नाकं मुरडत असत ना का! मग गिरकी घेत घेत म्हणाल की "मीच माझ्या किचनची राणी गं..."👰

Recipe by Madhuri Prabhu....
✍©माधुरी प्रभू
24 एप्रिल 2020#285327388
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel