हमीद आज विलक्षण उदास होता. पुण्यातून शिवनेरी मुंबई कधी काय पोचते असे त्याला झाले होते. आयेशा ने त्याच्या बरोबर ब्रेकअप केला होता, ते सुद्धा तो पुण्यात जॉब इंटरव्यू साठी गेला असताना. त्याने तिच्या अनेक विनवण्या केल्या पण त्याने काहीही ऐकले नाही. तिच्या मते तो अगदीच युसलेस होता. अगदी कामचुकार. इरफान चे सुद्धा तसेच मत होते. हमीद आयेशासाठी काहीच करत नाही असे तो सुद्धा म्हणायचा. हमीद ने खूप विचार केला. त्याला जितके शक्य होते तितके तो करत होताच. आयेशावर त्याचे जीवापाड प्रेम होते. नोकरीची मुलाखत चांगली नाही गेली तरी अम्मीने सांगितलेल्या पुण्यातील दर्ग्यावर जाऊन त्याने प्रार्थना सुद्धा केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव खरे तर ते त्याच्या बॅग शकत त्याला आंत सोडायला कसेच तयार नव्हते, शेवटी एक फकिराने त्याची बॅग पाहायचे वचन दिले. बॅग त्याच्याकडे सोडून हमीद आंत जाऊन प्रार्थना करून आला. फोन वर हि गोष्ट त्याने इरफान ला सहज सांगितली तेंव्हा इरफान ने त्याला खूप काही ऐकवले. 

हमीद चिंताग्रस्त होऊन शिवनेरीतून उतरला. नंतर त्याने लोकल पकडली आणि शेवटी पैसे वाचवण्यासाठी रिक्षा सोडून तो चालत गेला. इरफान हमीद आणि आयेशा एकाच गावांतून मुंबईत आली होती. त्याची घराची परिस्थिती गरीब आणि मुंबई सारख्या शहरांत कोणीच ओळखीचे नव्हते म्हणून त्यांनी शेवटी एकाच फ्लॅट मध्ये रहायचा निर्णय घेतला. एका बेडरूम मध्ये आयेशा आणि हमीद तर दुसरा बेडरूम इरफानचा होता. आयेशा आता रागाने फ्लॅट सोडून जाणार होती. तिची नोकरी एका हॉटेल मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून होती तर इरफान सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. 

हमीदने रूम वर येतांच सर्वप्रथम आयेशा आहे का हे पहिले. तिचे सामान तिथेच होते पण ती रूम मध्ये नव्हती. तिची असंख्य सँडल्स, मेकअप चे सामान, कपडे सगळीकडे विखरले होते. हमीद ने आपली बॅग जमिनीवर ठेवली आणि ती उघडायचा प्रयत्न केला. बॅग उघडतांच त्याची भयाने बोबडी वळली. बॅग मधील दृश्य पाहून तो थर थर कापू लागला. बॅग मध्ये एक माणूस होता. ज्या बॅग मध्ये लॅपटॉप आणि कपडे ठेवले होते त्या २ फुटांच्या बॅग मध्ये सलवार घातलेला एक माणूस अतिशय अमानुष पणे कोंबला गेला होता. त्याचा चेहरा एका कोपऱ्यांत होता तर दोनी पावले वाकडी तिकडी होऊन चेहेऱ्याच्या बाजूला होती. पोट आणि पाठीचा कणा कुठे होता हे बघवत सुद्धा नव्हते आणि जिथे माणसाचे पाय असायला हवे होते तिथे त्याचे हाथ होते. म्हणजे एखाद्या प्लॅस्टीच्या बाहुलीला कुणी बळजबरीने मोडून तोडून बॅग मध्ये कोंबले तर कसे वाटेल तसे हे वाटत होते. ६० किलोच्या ह्या माणसाला बॅग मधून ओढून आणताना आपल्याला वजन कसे बरे जाणवले नाही ? हमीद ने विचार केला. 

हा अमानुष पणा आहे कि आणखी काही ? तो विचार करत होता. मानवी शरीर इतके मोडले तर कुठून तरी रक्त यायला पाहिजे पण इथे रक्त कुठेच दिसत नव्हते. चित्रपटात कधी कधी स्पेशल इफेक्ट साठी अश्या प्रकाच्या हुबेहूब मानवी दिसणाऱ्या बाहुल्या करतात हे हमीद ला ठाऊक होते. हे असेच काही नसेल ना ? त्याने विचार केला. हळू हळू त्याच्या हृदयाची धकधक कमी झाली. त्याने हळूच आपला हात पुढे नेला आणि त्या चेहेऱ्याला हात लावून ती बाहुली आहे का  असे पाहण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी त्या चेहेर्याने वळून हमीद कडे पहिले. हमीदच्या तोंडातून किंचाळी सुटली. हमीद घाबरून काही फूट दूर जाऊन पडला. हमीदच्या भयग्रस्त चेहेर्याने बॅग मधील माणूस सुद्धा घाबरला आणि त्याने सुद्धा बोंब सुरु केली. काही क्षण दोघेही एकमेकाला पाहून किंचाळत होते. 

बाजूच्या खोलीत कदाचित इरफान नसावा नाहीतर तो हा गोंधळ ऐकून नक्कीच आंत आला असता. काही क्षणाने हमीदची भीती थोडी कमी झाली. बॅग मधील माणूस धड उर्दू, धड फारसी सारख्या भाषेंतून कधी बडबडत होता. 

"साहेब .. मी डॉक्टर ला बोलावू का ? " त्याने त्या बॅगमधील माणसाला विचारले. 

"नाही नाही नको काही फायदा नाही. ह्याआधी मी ह्यापेक्षा छोट्या बॅग मध्ये होतो, मला इथे कुणी आणले ? आणि तू कोण आहेस ? " त्या बॅग मधील व्यक्तीने स्पष्ट मराठीनं विचारले. 

"तुम्ही माझ्या बॅग मध्ये कसे आला आणि तुम्हाला वेदना होत आहे का ? " 
"तुमची हाडे मोडली असतील. मदन नाही मिळाली तर तुम्ही मारू शकता " हमीद ला काय बोलावे सुचत नव्हते त्यामुळे तो जो विचार मनात आला तो बोलून दाखवत होता. 

"नाही नाही. तू माझी मदत करू शकशील असे वाटत नाही. हो मला वेदना होत आहेत पण मला त्याची सवय आहे. एक काम कर ... माझा हात पकड आणि मला हळूच बॅग मधून बाहेर काढायचा प्रयत्न कर. पाहू काय होते ते" बॅग मधील माणूस बोलला. 

हमीदला खरे तर त्याला पुन्हा हात लावायला भीती वाटत होती. पण तरीही त्यांनी अवसान गोळा करून त्या माणसाचा हात पकडला हात ओढायचा प्रयन्त केला पण ज्या प्रमाणे खिश्यांत एअरफोन्स गुंततात त्याप्रमाणे ह्या माणसाचे अवयव गुंतले होते. हात येत नाही म्हटल्यावर हमीद ने त्याचे पाऊल पकडले आणि ते चेहेऱ्यापासून दूर ओढले. आंतून काही तरी तुटल्याचा आवाज आला आणि तो माणूस वेदनेने पुंन्हा ओरडला. पण ह्यावेळी एक नवल घडले. त्याच्या तोंडातून एक सोन्याची अशर्फी वेगाने बाहेर आली आणि हमीदच्या नाकावर आदळली. हमीद ला आधी वाटले कि तो माणसाचे काही तर हाड तुटून उसळले असावे पण ती अशर्फी होती. हमीदने ती अशर्फी उचलली. बॅग मधील माणूस थोडा ओशाळला होता. 

"मला जेंव्हा जेंव्हा वेदना होते तेंव्हा माझ्या तोंडातून अश्याच प्रकारे अश्रफया येतात. मला माफ कर." त्या माणसाने खिन्न पणे म्हटले. 

हमीदने हातातील सोन्याची अशर्फी न्याहाळून पहिली. ती अतिशय जुनी वाटत होती. त्यावर फारसी भाषेंतून काही लिहिले होते. त्याचा आपल्या डोळ्यांवर अजिबात विश्वास बसत नव्हता. अम्मी कडून त्याने अनेकदा अश्या अजब कथा ऐकल्या होत्या पण असे काही प्रत्यक्षांत घडेल हे अजिबात त्याला वाटले नव्हते. 

"मी तुम्हाला कशी मदत करू शकतो ?" त्याने त्या बॅग मधील माणसाला विचारले. 

"तू काही करू शकशील असे वाटत नाही. मला ह्याच बॅग मध्ये आता कायम राहावे लागेल" त्याने उत्तर दिले. त्याच्या चेहेऱ्यावरचा उदासीन भाव पाहून हमीदला त्याची अतिशय दया आली. 

"आम्ही हे बॅग चाकूने कापले तर ? " त्याने विचारले. 

"चाकू कुठे आहे ? " त्यामाणसाने विचारले. 

हमीद कडे काहीच धारधार हत्यार नव्हते.

"मी उद्या काही तरी आणतो" त्याने त्या माणसाला सांगितले. 

"ठीक आहे, तर मला तू सध्या असाच बंद करून ठेव, मी काही कुठं जात नाही" त्याने सांगितले. 

हमीदची झोप उडाली होती. त्याने बॅग बंद केली आणि कोपऱ्यांत व्यवस्थतीत आडवी ठेवली. तो आंत असा कसा झोपू शकतो हमीदला आश्चर्य वाटत होते. पण आज सगळ्याच घटना अघटित होत्या. 

त्याने खिशांतील अशर्फी पुन्हा बाहेर काढून न्याहाळली. इरफानच्या खोलीवर तो आहे का हे पाहायला तो आंत गेला पण इरफानचा काहीच पत्ता नव्हता. त्याच्या टेबल वर आयेशाची पर्स होती. आयेशा कदाचित विसरून गेली असावी, ती पर्स हमीद ने पुन्हा आपल्या खोलीवर आणून ठेवली. 

विचार करता करता हमीद चा डोळा लागला. सकाळ झाली तरी आयेशा किंवा इरफान फ्लॅट वर आले नव्हते. हमीद ने चहा केला, बॅग मधील माणसाला सुद्धा चहा वगैरे लागत असेल का ? त्याने विचार केला. पण चहा पिला तर तो माणूस लघुशंका किंवा इतर विधी कसा करेल ? त्याला विचार सुद्धा करवेना. 

दादर स्टेशन जवळ बगदाद ज्वेलर्स आहेत जिथे हमीदचा जुना मित्र काम करत होता. हमीद सरळ तिथे गेला. त्याने आपली अशर्फी तिथे सोनाराला दाखवली. सोनाराने संशयास्पद नजरेने हमीद कडे पहिले. "हो फार जुनी आहे, आमच्या पूर्वजाला अकबर बादशहांनी दिली होती. आर्थिक अडचण असल्याने अम्मीने विकायला काढली आहे. आणखीन २ सुद्धा आहेत पण सध्या त्या विकायच्या नाहीत" हमीदने थाप ठोकली. 

"हम्म .. ठीक आहे पण पुरावा नसेल तर फक्त रोख व्यवहार करेन, जास्तीत जात मी ८००० रुपये देऊ शकतो." त्या गलेलठ्ठ सोनाराने हमीदला सांगितले. हि किंमत फारच कमी आहे हे हमीद ला ठाऊक होते पण त्याच्या ओळखीचा हा एकमेव मुस्लिम सोनार होता, इतर सोनाराकडे गेल्यास ते सुद्धा हमीद ला संशयास्पद नजरेने पाहणार नाहीत ह्याची शाश्वती नव्हती. "ठीक आहे साहेब, पण किमान १० दिवस दिलेत तर मी पुन्हा १०,०० देऊन हीच खानदानी अशर्फी परत घेऊन जाईन" हमीदने पुन्हा खोटेच सांगितले. "डील" असे म्हणत सोनाराने गल्ल्यातून २ हजारांच्या ४ नोटा मोजत हमीदच्या हातावर ठेवल्या. 


हमीद पुन्हा आपल्या बिल्डिंग कडे पोचला तेंव्हा खाली इरफान चहाच्या ठेल्यावर चहा घेत होता. हमीद ने त्याला दुरूनच हात दाखवला. इरफानने त्याला जवळ बोलावले. हमीदने त्याला आलिंगन दिले आणि नंतर दबक्या आवाजांत त्याला अशर्फी बद्दल सांगितले. अर्थांत बॅग मधील माणूस हा विषय मात्र त्याने गुप्त ठेवला. आपल्याला एक अशर्फी जुन्या बॅग मध्ये सापडली आणि आपण ती ८००० रुपयांत विकली इतकेच त्याने कथन केले. 

"हा ... मी हीच अशर्फी किमान २०,००० रुपयांना विकली असती हमीद. तुला ना असेच काहीही गट्स नाही त्यामुळे नेहमीच तुला लोक गंडवतात. म्हणूनच आयेशा तुला सोडून जात आहे. be a man" इरफान ने त्याला पुन्हा ऐकवले. हमीद ला सुद्धा ते बरोबर वाटले. आपण इरफान प्रमाणे कूल असतो तर कदाचित आयेशा सुद्धा मला सोडून गेली नसती. 

"काल तू कुठे होतास ? आणि आयेशा कुठे होती ?" त्याने प्रश्न केला. इरफान थोडा गडबडला "अरे मी पिक्चर पाह्यला गेलो होतो लेट शो. आणि नंतर तिथून सूर्याच्या घरी गेलो. आयेशा ठाऊक नाही, तिने दुसरी खोली पहिली आहे म्हणे" 

इरफान आणि हमीद चहा घेऊन परतले. लिफ्ट मधून वेळ येऊन ते आपल्या फ्लॅट चा दरवाजा उघडणार इतक्यांत .. आतून भेदरलेली आयेशा बाहेर आली आणि धाडकरून इरफान आणि हमीद वर आदळली. ती इतकी भेदरलेली होती कि इरफान आणि हमीद सुद्धा घाबरले. 

"हमीद ... हमीद ... तू युसलेस आहेस हे ठाऊक होते पण तू खुनी आहेस ? हे मला ठाऊक नव्हते . मी पोलिसांना बोलावून आणेन" असे म्हणून ती पळणार इतक्यांत इरफान ने तिला पकडले आणि कुणी काही पाहण्याच्या आंत तिला फ्लॅट मध्ये ओढून नेले. हमीद इरफान आणि आयेशा आंत अली आणि इरफान ने दरवाजाला कडी लावली. आयेशा थर  थर  कापत होती. 

"कुठे खून आहे ? " इरफान ने तिला विचारले. 

तिने त्याच्या हात पकडून बेडरूम मध्ये नेले. तिथे कोपऱ्यांत बेग होती. बॅग बंद असली तरी एके ठिकाणी चेन मधून एक मानवी हाताची ३ बोटें बाहेर आली होती. इरफान ने चमकून हमीद कडे पहिले. 

"अरे खून बिन काही नाही. हे प्रकरण वेगळे आहे" त्याने बॅग ची चेन उघडली आणि सगळं प्रकार दाखवला. आधीच्या एपिसोड प्रमाणेच पुन्हा बॅग मधील माणूस, आयेशा आणि इरफान सर्वानीच किंचाळ्या मारल्या. 

३-४ मिनिटांनी सर्वजण आपल्या शुद्धीवर आले. 

"हा जिन्न असावा. ह्यानेच अशर्फी दिली का तुला ? " इरफान ने विचारले. 

"त्याचा तोंडातून अशर्फी उसळली. मी त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि त्याला प्रचंड वेदना झाली आणि त्याला म्हणे वेदना झाली कि त्याच्या तोंडातून सोन्याच्या अशार्फिया बाहेर पडतात" हमीदने आपल्याला जे समजले ते सांगितले. 

"पण हे बरोबर नाही, आम्ही पोलिसांना बोलवायला पाहिजे" आयेशा बोलली. 

"हो पण पोलीस आम्हालाच आंत टाकतील. हा प्रकट काही तरी अतींद्रिय आहे" हमीद आणि आयेशा वाद घालू लागली. दोघांचे भांडण सुरु झाले. तो वाद चालू असतानाच इरफान मात्र सरळ बॅग जवळ गेला आणि त्याने त्या जिन्न चा पाय पकडून त्याला बाहेर खेचले. अक्खे बॅग वर आले पण पाय काही हलला नाही आणि ह्या वेळी जिन्न पुंन्हा कळवळला आणि तोंडातून ५-६ सोन्याची नाणी बाहेर पडली. जिन्न घामाघूम झाला. नाण्यांचा आवाज ऐकून आयेषाचे डोळे विस्फारले. ती वाद विसरून नाणी गोळा करायला लागली. 

हमीद सुद्धा आश्चर्य चकित झाला. इरफान ने नंतर जवळ असलेले हमीदचे क्रिकेट बॅट उचलले आणि दणादण चार पांच फटके जिन्न च्या तोंडावर मारले. जिन्न आणखीन ओरडला आणि ह्यावेळी त्याच्या तोंडातून २०-३० नाणी बाहेर पडली.

पण हमीदला मात्र फार दुःख झाले. "इरफान, नाणी मिळतात म्हणून इतके अमानुष होणे बरोबर नाही. तो मेला बीला तर ?" त्याने इरफान ला अडवायचा प्रयत्न केला. 

"अरे बॅग मध्ये असा पडून असलेला माणूस मरू शकतो काय ? आणि नाहीतरी आम्ही काय करू शकतो ? " इरफान ने म्हटले. 

 'तरी सुद्धा , दुसऱ्या जीवावर इतके क्रौर्य दाखवणे मला तरी बरोबर वाटत नाही" हमीद ने त्याला म्हटले. 

"एक काम करू, २४ तास आम्ही त्याला इथे ठेवू आणि त्याला बॅग मधून बाहेर काढायचा प्रयत्न करू आणि नंतर सुद्धा जर तो बाहेर आला नाही तर त्याला आम्ही मशिदीत जाऊन ठेवून येऊ" हमीदने आपले प्रपोसल मांडले. कुठेतरी हृदयांत ह्या सर्व नाण्यावर आपला एकट्याचीच अधिकार आहे आणि इरफान आणि आयेशा उगाच इथे आपला स्वार्थ पाहत आहेत असे हमीद ला वाटत होते. 

" ओके डन " इरफान ने आपला हात हमीदच्या हातावर ठेवला. आयेशाने सुद्धा आपला हाथ त्याच्या हातावर ठेवला. मार खाऊन व्हीव्हळणाऱ्या जिन्न च्या चेहेऱ्यावर सुद्धा भले मोठे स्मित हास्य आले होते. तो पुन्हा काही तरी फारसीतून बरळू लागला. 

पुढील ४-५ तास आयेशा आणि इरफान ने त्या जिन्न वर अनन्वित अत्याचार केले आणि परिणाम स्वरूप हजारो सोन्याची नाणी उत्पन्न केली. इरफान ने गॅस वर पाणी गरम करून ते जिन्न वर ओतले, नंतर तेल गरम करून ओतले. आयेशाने पक्कड घेऊन जिन्न च्या हातांची बोटे छिन्न विच्छिन्न केली. ह्या सर्वांच्या दरम्यान आधी जिन्न त्याच्याशी संभाषण करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केली काही वेळां खूप मर खाऊन त्याच्या मनाचे संतुलन बिघडले आणि तो त्यांना आपल्याला त्रास देण्याचे इतर उपाय सुचवू लागला. त्या फ्लॅट मध्ये अनेक नाणी गोळा झाली होती. 

आता हि नाणे ठेवण्यासाठी बॅग्स हवी होती. हमीद ने बाहेर जाऊन बॅग्स विकत घ्यायचे ठरवले तर इरफान ने आपल्या कॉन्टॅक्टस ना वापरून काही नाणी विकून पैसे घ्यायचे ठरवले. आयेशाला मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करायचे होते. सुमारे १० नाणी इरफान ने विकून सुमारे १ लाख रुपये रोख घेतले. काही पैसे त्याने हमीद ला देऊन काही बॅग्स आणि कुलूप आणायला सांगितले तर आयेशा आपले पैसे घेऊन मॉल मध्ये गेली. 

हमीद ने बाजारांत जाऊन ६ मोठी बॅग्स आणि ६ कुलुपे विकत घेतली. त्यांत हार्डवेर शॉप मध्ये जाऊन त्याने एक इलेक्ट्रिक करवत सुद्धा घेतली. त्याला बॅग कापून पाहायची होती. 

तो घरी आला तेंव्हा इरफानची बाईक खाली होते त्यावर तो रूम वर होता हे त्याला समजले. तो वर जाऊन त्याने फ्लॅट ची किल्ली वापरू दर उघडले. आंतून काही धडपडल्याचा आवाज येत होताच. आंत तो आपल्या रूम वर पोचला तर तिथे वेगळेच दृश्य होते. त्याच्या बेड वर आयेशा पडली होती आणि मादक नजरेने ती हमीद कडे पाहत होती. तिच्या गोर्यापान शरीरावर फक्त तिची ब्रा होती आणि त्याच्या जीन्स चे बटन सोडले गेले होते. "ये ना ... " तिने त्याला हाक मारली. हमीद ने आजू बाजूला पहिले जिन्न चे बॅग तिथेच कोपऱ्यांत होते आणि त्यावर चादर टाकली गेली होती. रक्तात माखलेली सोन्याची नाणी सर्वत्र विखुरलेली होती. तो तिच्या जवळ आला पण तिथे इरफान चे बूट होते त्यांना अडखळून तो पडला. 

आयेशा पट्टकरून उठली आणि तिने आपले टॉप पुंन्हा परिधान केले. "इरफान .. हमीद आला आहे" तिने ओरडून इरफान ला हाक दिली आणि इरफान धावत त्यांच्या रूम मध्ये आला. आपल्या वेंधळेपणा मुळे आपल्या प्रणयाचा प्रसंग चुकला असे वाटून हमीद ला राग आला. 

एन्व्हाना रात्र झाली होती. रात्रीची विश्रांती तरी घेतील असे हमीद ला वाटले होते पण इरफान ने आता आपली नवीन शस्त्रें निर्माण केली होती. विजेची तार जिन्न च्या नाकांत घुसवली आणि त्याला जोरदार विजेचा झटका दिला आणि शेकडो नाणी त्याच्या तोंडातून भडाभडा बाहेर आली. रात्रभर विजेचे झटके, उकळते तेल, हातोडी, असे प्रकार सुरूच होते, जिन्न सुद्धा ह्या सर्व छळाने थोडा थोडा दमत होता. त्याचं नका तोंडातून रक्त येत होते. आयेशाने पक्कड घेऊन त्याचे दांत उपटायला सुरवात केली होती. प्रत्येक दाताबरोबर त्याच्या तोंडातून किमान ५०० तरी नाणी बाहेर पडली होती. 

हमीदने अजून अपर्यंत ४ बॅग्स नाण्यांनी काठोकाठ भरली होती. सोने प्रचंड जड असते त्यामुळे एकदा बॅग भरले के ते हलविणे अजिबात शक्य नव्हते. सकाळी ११ वाजता २४ तास पूर्ण होत होते. त्यामुळे तेंव्हापर्यंत सर्व ६ बॅग्स भरण्याची चढाओढ सुरु होती. जिन्न चे ३२ दांत उपटले गेले होते आणि त्यांतून वाहणारे रक्त सगळीकडे पसरले होते. इरफान आता खिळे घेऊन आला होता आणि जिन्न च्या शरीरावर खिळे ठोकत होता. आयेशा रक्त साफ करत होती. 

"इरफान .... शेवटचा प्रयोग मला करायचा आहे" हमीद ने त्याला म्हटले आणि आपल्या बॉक्स मधून त्याने इलेकट्रीक करवत बाहेर काढली. 

"वाव ... हे आधी दाखवायचे ना" इरफान ने आनंदाने म्हटले. 

"हे त्याला त्रास देण्यासाठी नाही. ते बॅग फाडून त्याला यातून बाहेर काढायला मिळेल का हे पाहण्यासाठी आहे. " हमीद ने आपला विचार स्पष्ट केला. 

"आर यु क्रेझी ?" आयेशा त्याच्यावर खेकसली.

"ह्याला कश्याला बाहेर काढायचे ? हा आमच्यासाठी सोन्याची अंडे देणारा कोंबडी आहे " तिने त्या दोघांना म्हटले.  

इरफान सुद्धा तिच्याबरोबर सहमत होता असे वाटत होते. 

"नो वे" हमीद ने मुंडी हलवली. झाला तो अत्याचार पुरे झाला आता असे त्याला वाटत होते. 

त्याने आयेशाचा हात झटकला आणि बॅग वर इलेक्ट्रिक करवतीने कापायचा प्रयत्न केला. पण आयेशाने त्याच वेळी तिथे पडलेली हातोडी उचलली आणि रंगाच्या भरांत हमीदच्या डोकावर मारली. त्या जबरदस्त प्रहाराने हमीद च्या डोळ्यापुढे काही क्षण काजवे आले नंतर प्रचंड वेदना झाल्या आणि काही क्षणांनी तो कोसळला. त्याची कवटी फुलली होती आणि त्यातून भळाभळा रक्त वाहत होते. 

"तू असाच घाबरट आहे. म्हणूनच मी आणि इरफान आता एकत्र राहू. मागील कित्येक महिने आमचे प्रकरण चालू आहे. तुला कसे जीवनातून हाकलावे हेच आम्ही प्लॅन करत होतो. पण आता तू मारत आहेस तर मी हे तुला सांगते" ती त्याच्या बंद होणाऱ्या डोळ्याकडे पाहत बोलत होती पण हमीद चे डोळे बंद होत होते. 

इतक्यात हमीदला हसण्याचा आवाज आला. हमीद जिथे पडला होता तेथून त्याला बॅग किंवा जिन्न दिसत नसला तरी बॅग मधू धूर येत आहे असे स्पष्ट दिसत होते. त्या धुरांतून जिन्न हसत होता. त्याचे हे नवीन हास्य आनंदाचे हास्य होते असे वाटत होते पण हमीद पुढचे काही पाहू शकला नाही कारण त्याची शुद्ध हरपली होती. 

हमीदचे डोळे उघडले तेंव्हा तो मुंबईतील सर्वांत महागड्या ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये होता. त्याचे डोळे उघडताचं नर्स आनंदाने त्याचे पुढे आली. "काँग्रट्स सर" तिने त्याचे अभिनंदन केले. 

"आपणाला कदाचित आठवत नसेल पण आपला पाय घसरून आपण जिन्यावरून पडलात आणि आपले डोके आदळले. आपण एक दिवस बेशुद्ध होतात.  पण आपले अंकल आपल्या बेड शेजारी बसून होते. काही तास आधीच ते बाहेर गेलेत. सुदैवाने मळायला काहीही मोठी इजा झाली नाही आणि आपण आजच घरी जाऊ शकाल " नर्सने त्याला सांगितले. 

हमीदने आपल्या डोक्याला हात लावला, तिथे काहीही जखम वगैरे नव्हती. त्याच्या बेड शेजारी दुर्मिळ अश्या पर्शिअन गुलाबांचा बुके होता. त्यावर न होती. 

"To Dear Hamid, From the man in the bag. A promise must be kept. A favour must be returned. If you ever need anything just remember me. I will be there. " 

हमीद घरी आला तेंव्हा त्याचा फ्लॅट पूर्ण पणे साफ होता. कुठेही रक्त नव्हतेच पण आयेशा किंवा इरफान सुद्धा नव्हते. त्यांचे कुठलेही सामान किंवा साधी खूण सुद्धा नव्हती. 

चार बॅग मध्ये सोन्याच्या अश्रफया होत्या आणि २ बॅग्स गायब होती. 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel