सुहास टिल्लू
सन १९७० दिनांक १२ जानेवारी . स्थळ कोटा राजस्थान. शॉपिंग सेंटर ह्या नव्याने वसलेल्या वस्तीमधे आम्ही रहात होतो. हा भाग तटबंदी बाहेर होता. फॅक्टरीला खूपच जवळचा म्हणून बाहेरून आलेले सर्वच सोबती ह्या भागातच रहात होते.आमच्या लग्नानंतरची ही पहिली संक्रांत असल्याने सासूबाई सण घेऊन आल्या होत्या. आमचा हा दोन बेडरूमवाला फ्लॅट वरच्या मजल्यावर होता . तळमजल्यावर घरमालक रहात होते. ते सर्वच त्यांच्या गावाला गेले होते.रात्रीचे दोन वाजले होते. बाहेर जिन्यात कुणीतरी मोठ्याने ओरडत होतं. 'बम्बईसे तार आया है ' . आम्ही मुंबईचे असल्याने , मुंबईहून तार येण्याची शक्यता होती बेडरूम मधून बाहेर आलो तर मेनडोअरशी सासूबाई उभ्या होत्या.दरवाज्याला साखळी लावून किलकिल्या फटीतून पहात होत्या.
बाहेर गोठवणारी थंडी होती. अंगावर स्वेटर होता , वरून शाल लपेटून घेतली होती तरी कुडकुडत होतो हाडात थंडी गेली होती.मी दरवाजा उघडून कोण आहे ते पहाण्या आधीच सासूबाई म्हणाल्या, 'थांब एकदम दार उघडू नकोस .बाहेरून कुणा बाईचा आवाज येतो आहे. खरोखरच तार आली असती तर पुरुषी आवाज आला असता .'बाहेर आमची कुजबुज ऐकू गेली असावी कारण 'तार आया है ' चा घोषा वाढला होता. आवाज नक्कीच बायकी होता. जिन्यात काळोख होता . एरव्ही रात्रभर एक दिवा चालू असायचा, आजच नेमका नव्हता.
मी बॅटरी घेऊन आलो व दरवाज्याची फट थोडी मोठी करून पाहू लागलो .जे दिसले ते बरेच विचित्र होते. बाहेर एक जख्खड म्हातारी होती. पांढर्याशुभ्र केसांच्या झिपर्या , अंगावर मांसाचा लवलेशही नाही , सांगाड्यावर लोंबणारे सुरकुतलेले कातडे , व फाटके कपडे , जवळपास नसल्यासारखे ! त्या प्रचंड थंडीत , जिथे आम्ही अंगावर बराच सरंजाम असूनही कुडकुडत होतो , तिथे ही कशीकाय तग धरून होती ? देव जाणे !
कोणीतरी वेडी असावी अशी माझी समजूत झाली . हिला बाहेर काढणे गरजेचे होते कारण तिचा कर्कश्य आवाजातला आरडाओरडा अखंड चालू होता .मात्र मी त्या म्हातारीचं वर्णन जेव्हा सासूबाईंना सांगितलं तेव्हा त्यांनी ' कोणत्याही परिस्थितीत दार उघडू नकोस असं बजावून सांगितलं.
मला दार बंद करून आतून कडी लावायची होती म्हणून ते बंद करू लागलो तर तिने ते बंद होऊनये म्हणून बाहेरून जोर लावला. तिच्या ताकदी पुढे माझा जोर कमी पडूलागला (तेव्हा मी ऐन पंचविशीत होतो . अंगात भरपूर रग होती ) तेव्हा , ही व सासूबाई , दोघीही मदतीला आल्या व कसाबसा आम्ही दरवाजा बंद केला , कडी लावली , वरचा बोल्ट सुद्धा लावला. ती चिडली असावी . तिने दरवाज्यावर जोरदार धक्के मारणं सुरू केलं. ते धक्के एवढे जबरदस्त होते की दरवाजा निखळून जाईल अशी शंका आली. मग आम्ही आमचे डायनिंग टेबल दरवाज्यापाशी टेकून ठेवले .दोन्ही गॅस सिलिंडर टेकून ठेवले .
एव्हाना रात्रीचे तीन साडेतीन झाले होते . काय करावे ते कळत नव्हतं. आम्ही तिघं दरवाज्यापाशी , थंडीची पर्वा न करता बसून राहिलो.दूरवरून गस्तीवरच्या शिपायाच्या काठ्यांची टक टक ऐकू येऊ लागली.ते बरेच जवळ येताच मी त्यांना मोठ्याने हाक मारून बोलावून घेतलं व बाल्कनीतून त्यांना एकूण प्रकाराची कल्पना दिली .'साहबजी आप फिकर मत कीजीये हम उसका बंदबोस्त कर देंगे ' असं म्हणून ते जिना चढू लागले आणि वरून काचेच्या बाटल्या ती फेकू लागली सगळ्या पायऱ्यांवर काचेच्या तुकड्यांचा सडा पडला दोघांना तिच्या पर्यंत पोहोचणे अशक्य झाले.दोघे परत बाल्कनी खाली आले व म्हणाले , 'साहब आप कोई पुरानी चद्दर दिजीये , उसमे लपेटकर लेंगे और उठाकर ले जाएंगे.
मी चादर आणायला म्हणून आत आलो तर सासूबाई म्हणाल्र्या ' संक्रांतीच्या आधल्या दिवशी घरातला कपडा कुणाला देऊं नये अशी रीत आहे . दारिद्र्य येते ' .मी बाहेर आलो व रखवालदाराला म्हणालो , 'इतनी रात मे ट्रंकसे पुरानी चद्दर निकालना मुश्किल है । अगर आप अपनी चद्दर इस्तेमाल करेंगे तो मैं आपको नया कंबल लेने के लिये पैसे दे दुंगा ।'
मात्रा बरोबर लागू पडली . एकजण शेजारच्या घराच्या जिन्यातून गच्चीवर गेला व आमच्या गच्चीतून जिन्यात उतरला. त्या म्हातारीला मागून येऊन चादरीत लपेटले तो , पर्यंत दुसरापण तिथे पोहोचला, दोघांनी तिला उचलून घराबाहेर आणले व तिला दूर घेऊन गेले.
पहाटेचे.चार वाजून गेले होते पुन्हा झोप येणे शक्यच नव्हते .मनांत बरेच प्रश्न घोंघावत होते. एक म्हणजे ती नेमकी आमच्याच घरी का आली . तिला आम्ही मुंबईचे आहोत हे कसे कळले. एवढ्या अपरात्री तिच्या येण्याचे प्रायोजन काय .त्या जख्खड म्हातारीच्या अंगात इतकी प्रचंड ताकद कुठून आली आणि गच्चीच्या जिन्यातील खोबणीत काचेच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत हे तिला कसं कळलं ? आम्ही दररोज निदान चारपाच वेळा गच्चीत जात असू पण खोबणीत बाटल्या आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं.
फॅक्टरीत गेल्यावर मी ही घटना सहकार्यांना सांगीतली .तेव्हा प्रथमदर्शनी त्यांना मी माझी नवी हॉरर स्टोरी सांगतो आहे अशी त्यांची कल्पना झाली . ही सत्यघटना आहे हे लक्षात आलं तेव्हा मात्र बर्याच उलटसुलट प्रतिक्रिया झाल्या .
काहींच्या मते हा अमानवी प्रकार होता . हडळ चेटकीण अशी कोणीतरी ती होती .ती वेडीच होती , तिचं बोलणं आणि नेमकं माझ्या घरी येणं हा निव्वळ योगायोग होता ',अशी उरलेल्यांची प्रतिक्रिया होती.आमचे G.M .साहेब जरा वयस्क होते . त्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांनी मला बोलावून घेतलं नी म्हणाले ' कंपनीची जीप गावात अनायसे जातच आहे तेव्हा तू गावात जाऊन तशी कोणी वेडी गावात आहे का त्याची चौकशी करून ये . आम्ही गावभर हिंडलो ,बरीच विचारपूस केली पण ,'अशा वर्णनाची बाई कालच काय , कधीच आमच्या पहाण्यात नाही ', असंच उत्तर मिळालं.चौदा तारखेला सण होता म्हणून मामा मामीला जेवायला बोलावले होते .मामाचं सगळं आयुष्य कोट्यात गेलेलं .त्याला ही हकिगत सांगितली तेव्हा त्याने जे सांगितलं ते फारच विलक्षण होतं.
बरीच जुनी कहाणी आहे. तेव्हा कोटा हे केवळ तटबंदीच्या आतच वसलेलं होतं.कुठूनतरी सात डाकिणी आल्या व रात्री गावात उच्छाद मांडू लागल्या. राजेसाहेबांकडे तक्रारी गेल्यानंतर त्यांनी एका विख्यात तांत्रिकाला पाचारण केले.आपल्या मंत्रशक्तीच्या सहाय्याने त्याने त्या डाकिणींना तटाबाहेर हुसकावून लावले व एका तलावाच्या परिसरा बाहेर त्या जाऊं शकणार नाहीत असा कायम स्वरूपी बंदोबस्त केला. ही गोष्ट सांगून झाल्यावर मामा म्हणाला , ' तुमच्या फॅक्टरी जवळ जो तलाव आहे त्याला डकानिया तालाब असं नाव आहे हे तुला वेगळे सांगायला नको. हा शॉपिंग सेंटरचा परिसर , तलावाला लागूनच आहे . म्हणजे त्या डाकिणींच्या राज्यात तुम्ही आहात .हे लक्षात घे.
दुसरे दिवशी सकाळी माझा एक असिस्टंट धावत धावतच माझ्यापाशी आला व म्हणाला , ' सर , मेरे पिताजी सरकारी अस्पतालमें लॅब असिस्टंट है ये तो आप जानतेही है .परसों मैने वह आपके यहाँका किस्सा उन्हें बताया तो उन्होने कहा , 'एक लावारीस बुढी औरत की लाश दो दिनसे हमारे यहाँ मॉर्गमे जमा हुई हैं और वह बुढीया वैसीही है जैसा तुमने बतलाया . ' हे ऐकताच माझी हालत काय झाली असेल ? तुम्ही नक्कीच कल्पना करूं शकता.
ती नक्की कोण होती हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे.
*****