शहरातील एका चकचकीत रस्त्यावरून पाठीवरून सॅक लटकवून गॉगल घातलेला सुनिल चालला होता. बाजूला विविधरंगी छत्रींच्या खाली अनेकजण सिम कार्डस् विकत होते, विविध खाद्यपदार्थ विकत होते! तप्त ऊन पडलं होतं. घाम येत होता. रस्त्यावरून चालताना प्रखर उन्हामुळे रस्त्यावरून प्रकाश परावर्तित होऊन तो डोळे दिपवत होता. त्यानंतर सुनिलला अचानक एका ठिकाणी आल्यावर कसलीतरी वेगळीच जाणीव झाली जणू काही अंगात काहीतरी संचारले आणि बघता बघता त्या रस्त्यातून डांबरी रंग वेगळा झाला आणि आकाशात उडू लागला.

 

त्याकडे आश्चर्याने सुनिल बघतो न बघतो तोच त्या सिमकार्डवाल्या दुकानातल्या छत्रीमधून सगळे रंग बाहेर पडून उडू लागले. व्होडाफोनचा लाल आणि आयडियाचा पिवळा दोन्ही रंग एकत्र हातात हात घालून वर उडाले आणि नारिंगी झाले. डांबर आणि छत्रीतले सगळे रंग एकत्र होत आणि वेगळे होत उडत गोल फिरत पुढे वेगाने जात होते, जणू काही अत्यंत आनंदी असलेल्या अनेक मैत्रिणी गोल करुन फुगड्या खेळत वर्तुळाच्या मध्यावर येऊन एकमेकांत मिसळत आहेत आणि पुन्हा लयीत परिघाकडे जात आहेत.

 

त्या रंगांमधून एक पुसटशी स्त्री चेहेराकृती अधूनमधून प्रकट होत होती आणि मनमोहक हसून सुनिलला खुणावून तिच्या मागे बोलावत होती आणि तो भारावल्यासारखा त्या रंगसमूहाच्या मागे मागे पळू लागला. त्यात झाडांच्या पानांचा हिरवा, खोडांचा तपकिरी, बाजूच्या गार्डनमधल्या फुलांचे, फुलपाखरांचे रंग मिसळत गेले. ती स्त्री आकृती आता स्पष्ट झाली. ती अधांतरी तरंगत होती आणि संपूर्ण नग्न होती. तीचे स्त्रीत्व दर्शवणारे अवयव उठावदार होते आणि एकूणच शरीर अतिशय आकर्षक होते. जणू काही ती पृथ्वीवरची नसून एखादी अप्सराच होती! तिचे संपूर्ण शरीर रंगानीच बनलेले होते. अवतीभोवती रंगांचे आकर्षक वलय गुंडाळून ती आता हवेत स्थिर झाली. मात्र तिचा रंग प्रत्येक क्षणी बदलत होता. कधी कधी ती संपूर्ण रंगहीन पारदर्शक पाण्यासारखी तर कधी स्फटिकासारखी शुभ्र तर कधी काळोखासारखी दिसायची. आता आजूबाजूच्या जगात फक्त रंग आणि केवळ रंगच दिसत होते. त्या रंगांच्या जगात तिची आकृती ठळकपणे उठून दिसत होती आणि त्यात सुनिल आणि ती स्त्री जणू काही तरंगत होते.

 

"क कोण तू?", घाबरत सुनिलने विचारले.

 

"घाबरु नकोस. मी तुझी मैत्रीण आहे! मी आहे रंगमिती. मला सगळे रंग प्रेमाने रंगधारिणी म्हणतात. मला रंगिनी म्हटलं तरी चालेल!", ती सुंदर स्त्री मोहकपणे हसत म्हणाली.

"रंगमिती? रंगधारिणी? रंगिनी? म्ह... म्हणजे? नेमकी कोण आहेस तू?", अजूनही सुनिलला भीतीने घाम येत होता.

 

"मी रंगाचा जीव आहे, आत्मा आहे!  जसे लांबी, रुंदी, खोली, गुरुत्वाकर्षण आणि काळ वगैरे या मिती (डायमेंशन) आहेत तसेच मी रंग मिती - डायमेंशन ऑफ कलर्स", ती म्हणाली.

 

"म्हणजे? मला समजलं नाही!", सुनिल गांगरून गेला. बावचळला.

 

"सांगते, नीट लक्ष देऊन ऐक! एखाद्या निर्जीव वस्तूला वर्षानुवर्षे त्याच स्थितीत ठेवले तर जडत्व येते!  म्हणजे कित्येक वर्षे स्थिर असलेली निर्जीव वस्तू एखाद्या सजीवाने हलवण्याचा प्रयत्न केला तर ती निर्जीव वस्तू एखाद्या सजीवासारखी हलायला प्रचंड आंतरिक विरोध करते, जागची हलत नाही. याचप्रमाणे फिरते जडत्व प्राप्त झालेली फिरती वस्तू थांबण्यास मनापासून नकार देते! म्हणजे निर्जीव वस्तूमध्येपण विशिष्ट परिस्थितीत एक प्रकारचा जीव निर्माण होतो असे म्हटल्यास हरकत नाही!"

 

"असे खरंच असते? आणि समजा हे खरे मानलेच, तर त्याचं काय? त्याचा तुझ्याशी किंवा माझ्याशी काय संबंध आहे?"

 

"याचा संबंध माझ्याशी आहे आणि माझा संबंध तुझ्याशी आहे, तुझ्यात असलेल्या विशिष्ट शक्तींशी आहे. कसं ते सांगते! संपूर्ण सृष्टीतील जे काही एकूण रंग आहेत त्या रंगांचे विशिष्ट सजीव किंवा निर्जीव वस्तूंशी एक संबंध किंवा नाते निर्माण झालेले असते. उदाहरणार्थ झाडांच्या पानांचा आणि हिरव्या रंगाचा एकमेकांशी संबंध! कारण वर्षानुवर्षे पानांच्या हिरव्या रंगामुळे जडत्व तयार होऊन हिरव्या रंगाचा एक जीव तयार होतो आणि तो झाडाशी सलग्न होतो. तसेच सर्व रंगजीवांचे एकमेकांशी सुद्धा एक नाते तयार झालेले असते. एखादा निर्जीव किंवा सजीव आणि त्यांचा रंग यांचा एकमेकांशी तसेच सर्व रंग यांचा एकत्रितपणे एक जीव निर्माण होतो. किंवा समज की एक मन तयार होते आणि त्या सर्व रंग मनांची मी धारिणी आणि नियंत्रक आहे. त्या सर्व रंगांचा एकजीव झालेला मी जीव आहे. सगळे रंग माझे ऐकतात. मी जशी जीव असलेली मिती आहे तसेच लांबी, रुंदी, खोली, गुरुत्वाकर्षण आणि वेळ वगैरे या मितींनासुद्धा स्वतःचा जीव असतो. जगात काही फक्त एवढ्याच मिती नाहीत, खूप आहेत पण अजून मानवाला त्याचे आकलन झाले नाही!"

 

सुनिल श्वास रोखून हे सगळे ऐकत होता.

 

रंगिनी पुढे म्हणाली, "आता पुढचे ऐक. तुला जन्मापासून रंगांशी संबंधित एक विशिष्ट शक्ती मिळालेली आहे त्यापैकी एकाची तुला कल्पना आहे. ती म्हणजे तुला लोकांच्या मनातील निगेटिव्ह विचार लाल रंगांच्या वलयाच्या स्वरूपात दिसतात आणि ते लोक जर तुझ्या दृष्टीआड पण जवळपास असले तर त्या नकारात्मकतेचा एक प्रकारचा ध्वनि ऐकू येतो आणि आता लवकरच त्या नकारात्मक शक्तींचा तुला विशिष्ट वास पण येणार! पण इतर वासांपासून ते वास वेगळे ओळखता येणार!"

 

आता सुनिलला उलगडा झाला की त्याला प्रत्येक व्यक्तीमधील नकारात्मक विचार लाल रंगाच्या स्वरूपात डोक्याभोवती दिसतात, आवाज ऐकू येतात त्याचे हेच कारण किंवा हीच शक्ती आहे! आणि माणसेच नाही तर प्राण्यांच्या डोक्यातील नकारात्मक लहरी सुद्धा आपल्याला दिसतात, जसा तो प्राणिसंग्रहालयातील सिंह!

 

रंगिनी सांगतच होती, "दुसरी आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जी तुझ्यात आहे पण तुला त्याची संपूर्ण कल्पना नाही!"

 

सुनिल विचार करू लागला, "इतरांना जिथे रात्री अस्पष्ट दिसते तिथे आपल्याला मात्र स्पष्ट दिसते याच्याशी संबंधित ती दुसरी शक्ती असणार!"

 

आता सुनिलचे मन अधीर झाले ते ही रंगिनी पुढे काय सांगते ते ऐकण्यासाठी!

 

तिने पुढे सांगितले, "तुला लहानपणापासून सृष्टीतले सगळे रंग हे निगेटिव्ह दिसतात म्हणजे कॅमेरातली फिल्म असते किंवा चित्रपटात फ्लॅशबॅक दाखवताना निगेटिव्ह मध्ये दाखवतात तसे!"

 

"पण मला हे कधी जाणवले नाही! कृपया नीट समजावून सांग!"

 

"तुला कधी जाणवले नाही कारण तू कधी पॉझीटिव्ह सृष्टी पहिलीच नाही. म्हणजे असे की प्रत्येक रंगाचा एक निगेटिव्ह रंग असतो जसे काळ्याचा पांढरा, हिरव्याचा लाल, पिवळ्याचा जांभळा, नारिंगीचा निळा याप्रमाणे! आणि कोणतेही दोन विरूद्ध रंग मिक्स केले तर करडा किंवा ग्रे रंग बनतो हे तुला माहिती असेलच!"

 

"हो माहिती आहे!"

 

"व्हेरी गुड, आता ऐक! तुला रात्री काळ्या आकाशाचा काळा रंग हा पांढरा दिसतो त्यामुळे तुला उजेड आहे असे वाटते त्यामुळे रात्री तुला नीट दिसते त्यामानाने दिवसा तुला अस्पष्ट दिसते कारण तुला प्रत्येक रंग हा निगेटिव्ह दिसतो. बालपणापासूनच जो रंग तुला हिरवा दिसतो तो खरेतर लाल रंग आहे पण तू शाळेत शिकला आहेस की तो लाल रंग आहे. म्हणजे ज्या रंगाला तू लाल म्हणतोस तो खरोखर लालच आहे पण तो तुला दिसतो मात्र हिरवा!"

 

"आलं लक्षात, म्हणजे रात्री आकाश काळं असतं पण ते मला दिसतं पांढरं पण मी त्याला काळंच म्हणतो आणि मी सगळे रंग तसेच शिकलो आहे म्हणून इतरांशी बोलताना गोंधळ होत नाही, माझा आणि इतरांचाही!"

 

"बरोबर! आणि तुला प्रत्येक ठिकाणी असलेला छोटा उजेड सुद्धा मल्टिप्लाय होऊन दिसतो म्हणजे जास्त गुणीत होऊन प्रखर होऊन दिसतो जो इतरांना त्यामानाने कमी प्रखर दिसतो. याच कारणामुळे दिवसासुद्धा दिसायला तुला अडचण येत नाही आणि रात्री तर नाहीच नाही. अर्थात रात्री वस्तूंवरून परावर्तीत होणारा जोही प्रकाश तुझ्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो त्याचा निगेटिव्ह रंग तुला दिसेल. पण संपूर्ण काळोख असला तर त्याऐवजी तुला संपूर्ण पांढरा रंग दिसेल. पण अंधारातील वस्तू व्यक्ती तोपर्यंत दिसणार नाहीत जोपर्यंत त्यांचेवर थोडासा प्रकाश पडून तो परावर्तीत होणार नाही. पण अतिशय सूक्ष्म प्रकाश सुद्धा मल्टिप्लाय होऊन तुला दिसत असल्याने तुला त्याही परिस्थितीत दिसेलच. आणि नकारात्मकतेचे लाल वलय मात्र तुला चोवीस तास दिसेलच, रात्र असो की दिवस! अर्थात ही शक्ती कार्यरत असेल तेव्हा!"

 

"ही शक्ती कार्यरत असेल तेव्हा? म्हणजे? या शक्तीला थांबवता सुद्धा येईल?!"

 

"होय!  थांबवता येईल. गरज नसेल तेव्हा! पण एक लक्षात ठेव! तुला मिळालेले वरदान कुणाला सांगू नकोस. जेव्हा तुला खात्री पटेल की तुझ्या वरदानाचा उपयोग चांगल्या कामासाठी होणार आहे तेव्हाच त्या व्यक्तीला ते सांग. तुला माहीतच आहे की प्रत्येक विशेष शक्तीबरोबर एक जबाबदारी पण येते त्यामुळे ही शक्ती वापरताना प्रत्येक वेळेस आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून प्रश्न विचार! जर काही वेळेस काही प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली तर माझी आठवण काढ, मी येईन! मी तुला आता यापुढे भेटत राहणारच आहे. वेळोवेळी तुला मार्गदर्शन मी करणारच आहे आणि आणखी काही रंगांशी संबंधित नवीन शक्ती देणारच आहे. या शक्तीचा उपयोग जगामध्ये चांगल्या बदलांसाठी कर! आता मी तुला एक वस्तू देते ज्याद्वारे या शक्तीला निष्प्रभ किंवा कार्यरत करता येईल! "

 

हे सगळे ऐकून सुनिल मंत्रमुग्ध झाला होता. त्याला बराच वेळ काही बोलणे सुचलेच नाही फक्त आवंढे गिळत होता. तिने सांगितलेले त्याने अनुभवलेले होतेच पण ते स्पष्ट शब्दांत आता त्याला समजत होते. आता ती रंगिनी स्फटिकासारखी पारदर्शक झाली. आजूबाजूचे जग पण स्फटिकासारखे  पारदर्शक झाले. जणू काही सर्वत्र एक अदृश्य काच असून त्यात काचेने बनलेले दोघेजण तरंगत आहेत! तिच्या हातात आता एक छोटे चमकणारे एक सप्तकोनी आकाराचे स्फटिक होते. तिने ते सुनिलला दिले.

 

"हे स्फटिक नीट सांभाळ! हरवू नकोस. कुणाला दाखवू नकोस. यापुढेसुद्धा तुझा सृष्टीतील प्रत्येक नकारात्मक गोष्टींशी संबंध येतच रहाणार आहे म्हणजे त्या तू डिटेक्ट करू शकशील, ओळखू शकशील आणि त्यावर मात करण्याचे उपाय तुला शोधावे लागतील! तुला हे स्फटिक शरिराला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने कायम स्वतःजवळच ठेवावे लागेल. जेव्हा शक्तींचा वापर करायचा असेल तेव्हा या स्फटिकाचा शरिराला एकदा स्पर्श कर म्हणजे शक्ती कार्यरत होतील आणि पुन्हा स्पर्श केल्यास शक्ती काम करायच्या थांबतील!  म्हणजे जेव्हा तुला या शक्तींची गरज नसेल तेव्हा नकोसे रंग, ध्वनि आणि वास टाळता येईल! आणि माझी आठवण काढून याला तू हात लावला की मी हजर होईन!"

 

आणि आता तो पुन्हा त्या चकचकीत रस्त्यावर चालत होता. अगदी क्षणभरात हे आपल्यासोबत नेमके काय घडले हे त्याला समजत नव्हते परंतु सर्व त्याला आठवत होते आणि विशेष म्हणजे ते रंगिनीने दिलेले स्फटिक त्याच्या हातात होते.

 

त्याने नंतर इंटरनेटवर शोधल्यावर त्याला अशी माहिती मिळाली की माणसांच्या मनातील नकारात्मक विचारांतून विशिष्ट किरण बाहेर पडतात. ते तीव्र झाले की एक विशिष्ट रंग तयार होतो, ती किरणे मानवी क्षमतेच्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत तसेच त्या किरणांतून एक ऑडिओ फ्रिक्वेन्सी तयार होते. तीचा अवाज मानवाच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या पलीकडे असतो म्हणजे 30KHz च्याही वर!! काही प्राण्यांत ते किरण बघण्याची क्षमता आणि ते आवाज ऐकण्याची क्षमता असते पण तशीच क्षमता आपल्याकडे आहे हे वाचून सुनिलच्या अंगावर शहारे आले आणि रंगमिती म्हणल्याप्रमाणे त्याचा विशिष्ट प्रकारचा वास सुद्धा मला येईल?

 

रंगमिती रस्त्यावर ज्या ठिकाणी मला भेटली किंवा भेटल्याचा आभास झाला ते ठिकाण म्हणजे दोन तीन किंवा जास्त डायमेंशन किंवा मिती एकत्र भेटण्याचे ठिकाण तर नसेल ना? कारण तो जेव्हा रंगांच्या मितीत गेला तेव्हा काळ ही मिती मात्र थांबली होती.

 

तो विचार करू लागला, "सगळ्या मितींचे एकमेकांशी काय रिलेशन असेल? त्यांचा एखादा फॉर्म्युला बनवता येईल का? इतर अनेक अज्ञात मितींपैकी सकारात्मकता आणि नकारात्मकता यासुद्धा मिती असतील का? त्या दोन्ही मितींनापण एक जीव असेल का? पंचेंद्रियांच्या पण पाच मिती असतील का? रंगमिती सारखा सृष्टीतल्या प्रत्येकच मितीला जीव असेल का? कारण आतापर्यंत नकारात्मकता, रंग, प्रकाश, ध्वनि, वास या मितींचा माझ्याशी संबंध आलाय!"

 

त्याला आठवले की एकदा त्याने घरी सहज प्रयोग म्हणून उंदीर मारण्यासाठी बनवलेले अल्ट्रासॉनिक मशीन सुरू केले होते तेव्हा त्याला कानठळ्या बसवणारा आवाज येऊन असह्य झाल्याने त्या मशीनच्या वाटेला तो पुन्हा गेला नाही.

 

नंतर त्याने विविध ज्ञात मितींबद्दल माहिती मिळवली आणि अज्ञात मितींबद्दल संशोधन सुरु केले. घरी कुणालाच याबद्दल त्याने काहीही सांगितले नाही.

 

स्फटिकाला स्पर्श केल्यावर त्याला सगळे रंग जे आतापर्यंत निगेटिव्ह दिसत होते ते त्यांच्या मूळ स्वरूपात दिसायला लागले. जग अतिशय वेगळं दिसू लागलं. लोकांच्या डोक्यावरचे लाल वलय दिसणं बंद झालं. डोळ्यांनी आतापर्यंत दिसलेलं हे सारं अचानक वेगळ्या रंगात दिसू लागल्यावर त्याला विचित्र वाटू लागलं. ते सहन न होऊन त्याला चक्कर यायला लागले. मग परत त्याने स्फटिकाला स्पर्श केला. मग काही दिवसांनी या सगळ्याची सवय झाल्यावर तो सावरला. हे सगळे प्रयोग त्याने आई वडील भाऊ रखमा यापैकी कुणीही घरी नसतांना करुन बघितले.

फक्त गॅलरीतून एकटा पोपट हे सगळे बघत रहायचा. आजकाल त्या पोपटाला अधून मधून गॅलरीत येऊन घोंगावणाऱ्या एका हिरव्या-लाल भुंग्याचा नाद लागला होता. तो पोपट अधूनमधून मूड आला तर सुनिलशी चांगला बोलायचा. अगदी पूर्ण वाक्ये माणसांसारखे बोलू शकणारा तो अनोखा पोपट होता.

 

"अरे फिनिक्स, काय रे सारखा त्या भुंग्याशी खेळत असतोस?"

 

"अरे, हा भुंगा ना वेगळाच आहे. चोचीत धरून त्याला चांगला पकडून खायचा बेत आहे पण हातीच येत नाही तो! इकडे येऊन बघ कसा करतो, कसा दिसतो!"

 

सुनिल त्याला मिळालेल्या स्फटिक आणि रंगिनीच्या आलेल्या अनुभवात हरखून गेलेला होता. त्याला सध्या पोपटपंची करायला वेळ नव्हता. नंतर एका मित्राच्या घड्याळाच्या शॉपमध्ये जाऊन त्याने एक घड्याळ घेतले आणि घड्याळाच्या काचेच्या आत तो स्फटिक बसवून घेतला. डायलवरचा काच उघड बंद करता येत होता. हवे तेव्हा डायलचा काच उघडायचा आणि त्यातील त्या स्फटिकाला बोटाने स्पर्श करायचा म्हणजे त्याची शक्ती तो वापरायला तयार!

^^^

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel