आता रात्र झाली होती. वांद्रे वरळी सी-लिंक ब्रिज जवळच समुद्रात एक जहाज होते. ते म्हणजे एक तरंगते हॉटेल होते. "ओशन वाईड डायनिंग" लग्झरी फ्लोटिंग हॉटेल! जहाजावर काही भागांत नाच गाणे सुरू होते. एक सुंदर स्त्री संगीताच्या तालावर मादक हालचाल करत बेली डान्स  करत उपस्थित मंडळींना घायाळ करत होती. धनिक लोक या जहाजावर सेलिब्रेशन आणि एन्जॉय करण्यासाठी आलेले होते.

 

वांद्रे वरळी सी-लिंक ब्रिजच्या बरोबर खालच्या बाजूला असलेल्या समुद्राच्या पाण्यातून पाच काळे विंचू पाणी झटकत झर्रकन वर उडाले आणि पुलाच्या खांबांवरून सरपटत जाऊन वर सरकायला लागले. नंतर ते पुलाच्या खालच्या बाजूला उलटे होऊन चिकटले आणि हळूहळू वर सरकू लागले. सरकत सरकत ते पुलाच्या वरच्या बाजूला गेले.

 

सुजित लहाने याची व्हॅन वेगाने त्या पुलावरून प्रवास करत होती आणि मागे दोन कार थोड्या अंतराने येत होत्या. व्हॅनमध्ये मागच्या बाजूला सुजित आणि अमित त्या उपकरणांच्या जवळ बसले होते. पुढे ड्रायव्हर जवळ अमितचे वडील होते तर मागच्या त्या दोन कारमध्ये शिक्षक मंडळी होती.

 

ते पाचही विंचू आता रस्त्यावर आले. पैकी एक विंचू खूप मोठा होता. ते सर्व खरे विंचू नव्हते. टणक धातूने बनवलेले रोबोटिक विंचू होते. सुजितची व्हॅन त्यांच्या जवळ येताच गाडीखालच्या रस्त्यावरून ते व्हॅनच्या खालच्या बाजूने उलट चिकटले. मोठा वगळता इतर चारही विंचू आपापल्या नांग्यांनी गाडीचा खालचा टणक भाग कोरून चिरू लागले तेव्हा ठिणग्या उडू लागल्या. त्यांच्या प्रयत्नातून गाडीला खाली मोठे छिद्र पडले. हे व्हॅनच्या खालच्या बाजूला घडत होते आणि इतक्या वेगाने घडत होते की व्हॅन आणि कारमधल्या कुणालाही ते समजलेच नाही.

 

पाचवा विंचू डीटोनेटर होता. गाडीखाली आधीच लावलेल्या स्फोटक पदार्थाला त्याने कार्यरत केले आणि क्षणार्धात गाडीत प्रचंड स्फोट होऊन ती पुलावर दोनशे फूट वर हवेत उडाली. व्हॅन हवेत उलटीपालटी होत असल्याने व्हॅनच्या खालच्या बाजूला विंचूंनी पडलेल्या मोठ्या भगदाडातून सुजितने बनवलेले उपकरण निघून तेही हवेत उडाले आणि प्रचंड वेगाने खाली पाण्यात जाऊन पडले. व्हॅन उलटीपालटी होत होत पुलावरच्या रस्त्यावर मागच्या दोन्ही कारवर वेगाने आदळली. प्रचंड आवाज झाला. दोन्ही कारनी पेट घेतला. ज्वाळा आणि धुराचे लोट दिसू लागले. ती व्हॅन तिथून पुन्हा रस्त्यावर आदळून हवेत उडाली आणि स्वत:भोवती गरगर फिरत  खाली समुद्रात पाण्याकडे जाऊ लागली. मागच्या दोन्ही कार आणखी मागच्या गाड्यांवर आदळल्या. पुलावर एकच हलकल्लोळ माजला.

 

मागे असलेल्या गाड्या एकमेकांवर आदळू लागल्या. लोक जखमी झाले. काचा फुटल्या आणि काचेचे तुकडे हाता पायांत आणि चेहऱ्यात, डोळ्यांत जाऊ लागले. स्फोटाची तीव्रता एवढी प्रचंड होती की व्हॅन आणि दोन्ही कारमधल्या सगळ्या लोकांचा जळता कोळसा होऊन तेही हवेत उडाले. व्हॅन पाण्याकडे खाली समुद्रात येऊ लागली आणि पाण्यात पडली. माणसांची जळलेली शरीरं पाण्यात पडली, काही रस्त्यांवर पडली. ते पाचही विंचू त्या स्फोटात तुकडे तुकडे होऊन इकडे तिकडे विखुरले गेले.

 

"ओशन वाईड डायनिंग" लग्झरी फ्लोटिंग हॉटेल मधील लोक आ वासून पुलावर जे काही घडत होते ते बघत होते. काहींनी ते मोबाईल कॅमेरात शूट करायला सुरुवात केली. त्या जहाज हॉटेलमधील एका रूममधल्या एका काचेच्या खिडकीतून एक माणूस बायनॅक्युलरने हे सर्व बघत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

 

बऱ्याच वेळानंतर बांद्रा येथे लकी चार्म हॉटेलमध्ये व्हेज मंचुरियन राईस वर ताव मारत असतांना एका माणसाने गॉंगल आणि क्रिकेटची टोपी डोक्यावरच ठेवली होती पण तोंडावरचा  पांढरा रुमाल काढून बाजूला ठेवला होता. हॉटेलमधल्या टीव्हीवर "आज की दुनिया" न्यूज चॅनेलवर पुलावर झालेल्या बॉम्बस्फोटची बातमी दाखवत होते. हेलिकॉप्टरद्वारे पुलावर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान उतरले होते व तेथे मदतकार्य सुरु झाले होते. पाण्यातून क्रेनने गाडी वर काढण्यात यश आले पण गाडीतले ते उपकरण सापडले नाही.

सुजित, अमित, अमितचे वडील आणि सर्व शिक्षक यांचा मृत्यू झाला होता. प्रेतं पाण्यातून बाहेर काढण्यात येऊन ओळख पटवली जात होती. रस्त्यावरील पडलेल्या प्रेतांची देखील ओळख पटवली जात होती. विशेष राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा म्हणजे सनसिया (SNSIA) च्या मुंबई शाखेचे हेड जयवंत जसकर तेथे हजर झाले होते.

 

या सगळ्या बातम्या बघून त्या टोपीवाल्या माणसाला जेवणच गेले नाही. जेवण अर्धवट टाकून जेवणाचे संपूर्ण बिल देऊन लगबगीने हॉटेल बाहेर येऊन त्याने आपल्या मोबाईलवरून कुणालातरी एक फोन केला. दोन वेळा फोन उचलला गेला नाही. तिसऱ्या प्रयत्नात उचलला गेला.

 

या घटनेनंतर सुजितच्या गावावर शोककळा पसरली. सुजितची आई धाय मोकलून रडू लागली. अमितच्या घरी शोकाकुल वातावरण तयार झालं. या घटनेत शिक्षकांचाही प्राण गेला असल्याने शाळेतल्या सगळ्यांना धक्का बसला.

 

सुनिलने कुटुंबासह उशिरा रात्री ही बातमी घरी टीव्हीवर पहिली. त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि प्राण गमावलेल्यांबद्दल दु:ख झाले. उद्या त्याला सायन्स फेस्टिव्हल बघायचा होता पण आता तो रद्द करण्यात आला होता. संबंधित ठिकाणांचे सगळीकडचे सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले. सायन्स फेस्टिव्हलमधल्या उरलेल्या सर्व सहभागी विद्यार्थी आणि इतर शास्त्रज्ञांना कडेकोट सुरक्षेत घरी पोचवण्यात आले. काहींना चौकशी करून सोडले तर काहींना ताब्यात घेण्यात आले. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या. न्यूज चॅनेलवाले सुरक्षा यंत्रणांना, फेस्टिव्हल आयोजकांना  धारेवर धरत होते. पोलिसांना प्रश्न विचारत होते.

 

रात्री बराच वेळ सुनिल रणजित सोबत आलेल्या अनुभवाबद्दल आणि एकूणच घडलेल्या बॉम्बस्फोटाबद्दल विचार करत राहिला. या दोन्ही घटनांचे काही कनेक्शन आहे का याचाही त्यांनी खल करून पहिला पण अजून काही निष्कर्ष काढता येणार नव्हता कारण तसे पुरावे नव्हते!

^^^

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel