अतिशय कच्ची स्मरणशक्ती असलेला व्यक्तीसुद्धा आपले आयुष्यातील पाहिले प्रेम विसरू शकत नाही तर मग सायली तर अद्वितीय स्मरणशक्ती लाभलेली मुलगी होती आणि पहिल्या प्रेमाची गोष्टच वेगळी असते. प्रेम ही जगातील सर्वात पवित्र आणि हवीहवीशी वाटणारी भावना! आपण कुणालातरी आवडतो किंवा आपल्याला कुणीतरी आवडतं आणि हवंहवंसं वाटतं, कुणाचातरी सहवास हवासा वाटतो ही मखमली भावनाच आपल्या हृदयावर कोमल फुलपाखरू फिरवते आणि आवडती व्यक्ती समोर आली तरी हृदयाची धडधड वाढवते. आवडत्या व्यक्तीशी बोलतांना मनावर मोरपीस फिरत राहातं.

 

असंच एक मोरपीस एमबीबीएसला असतांना सायलीच्या मनावर फिरत राहून तिला गुदगुल्या करायचं, जेव्हा ती सोबतच्या डॉक्टर सूर्यप्रताप मल्होत्रा सोबत बोलायची. त्याच्या बोलण्याच्या आकर्षक पद्धतीवर ती भाळली! त्याची केसांची विशिष्ट स्टाईल, आवाजातला भारदस्तपणा, नियमित व्यायामाने कमावलेले एखाद्या बॉलिवूड हिरोप्रमाणे भासणारे शरीर, त्याची अभ्यासातली हुशारी या सगळ्या गोष्टींमुळे ती त्याच्या प्रेमात पडली होती!

 

कॉलेजमधील सहा सात मुली त्याच्यावर एकतर्फी प्रेम करायच्या. त्या सर्वजणींनी धिटाईने सूर्यप्रतापसोबत झटपट मैत्री करून टाकली होती. पण एकीचीही अजून त्याला प्रपोज वगैरे करण्यापर्यंत मजल गेली नव्हती. त्या सर्वजणींना हे माहिती होते की त्याची कुणीही अजून एकमेव पक्की गर्लफ्रेंड नव्हती. पण खरे काय ते फक्त सूर्यप्रतापलाच माहिती होते. पण सायलीची मात्र जुजबी अभ्यासातील गोष्टी त्याच्यासोबत बोलण्याव्यतिरिक्त त्याच्याशी अवांतर मैत्री करण्याची हिम्मत होत नव्हती. इतर अनेक मुलांशी ती अतिशय मोकळेपणाने बोलू शकायची पण हा समोर आला की तिच्या छातीत धडधड व्हायला लागायची, काय बोलावे तेच सुचेनासे व्हायचे. सहज काहीतरी विषय काढून तरी त्याच्याशी बोलावे असे ती ठरवून त्याच्याकडे जायची पण जुजबी बोलून कसेतरी हसून फजिती होऊन तिथून काढता पाय घ्यायची.

पण एकदा त्याला कॉलेज कँटीनमध्ये एका टेबलावर एकटा गाठून तिने सुरुवात केलीच. त्याला इंग्रजी, हिंदी आणि थोडे मराठीपण येत होते. ह्युमन ऍनाटॉमी बद्दल ते बराच वेळ बोलत बसले, तिने सगळं येत असूनही त्याला बऱ्याच शंका विचारल्या आणि त्याने दिलेल्या उत्तरांचा दर्जा पाहून ती आणखीनच त्याच्या प्रेमात पडली. मेडिकल अभ्यासक्रमातले खूप लांबलचक स्पेलिंग त्याला सहज लक्षात राहत होते, आणि विशेष म्हणजे त्याला सायली सारखी अनंत हस्ते मुबलक मिळालेली स्मरणशक्ती सुद्धा लाभलेली नव्हती. त्यालाही तिच्याशी त्याच दिवशी पहिल्यांदा एवढ्या मोकळेपणाने बोलून तिच्याबद्दल जाणून घेता आले.

 

त्या रात्री तर ती हरखून गेलेल्या अवस्थेतच होस्टेलवर बेडवरच्या पांघरुणात शिरली. तिला बराच वेळ झोपच आली नाही. त्याचा बोलतांनाचा चेहरा आणि त्याने लावलेल्या परफ्युमचा वास तिला राहून राहून आठवत होता. तिने पांघरलेल्या अंथरुणातून तिला त्याच परफ्युमचा वास येऊ लागला. ती रात्र स्वप्न बघण्यातच निघून गेली.

 

लवकरच काही दिवसांनी तिच्या जवळच्या काही मैत्रिणींकडून सूर्यप्रतापबद्दल काही गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्याच्यासाठी मुली म्हणजे निव्वळ टाईमपास असतात. कोणत्याही मुलीला तो सिरियसली घेत नाही, यापूर्वीचे त्याचे जीवन अशाच घटनांनी भरलेले आहे वगैरे वगैरे. प्रेम वगैरे त्याच्यासाठी केवळ खेळ आहे. मात्र सायली त्याच्या प्रेमात एवढी आकंठ बुडालेली होती की तिला असे वाटायचे की मैत्रिणी मुद्दाम तिला त्याच्याविषयी उलटसुलट सांगतात. एखादी सुंदर मुलगी किंवा हँडसम मुलगा कॉलेजमध्ये असतो तेव्हा सर्वजण मुद्दामून त्याच्याविरोधात अफवा पसरवत असतात कारण त्याचा प्रभाव काहींना सहन होत नाही. त्यामुळे तिने अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे ठरवले.

बरेचदा आपण ज्या माणसाच्या प्रेमात असतो त्याचेबद्दल वाईट ऐकले तरी आपण त्यावर विश्वास ठेवत नाही. आणि एखाद्याचा द्वेष करायला लागलं की त्याच्याबद्दल कोणी कितीही चांगलं सांगितलं तरीही त्यावर आपला विश्वास बसत नाही. तसेच सायलीचे झाले होते. तिने त्याच्याशी खूप जवळीक वाढवली होती. तो पण तिच्याशी दिवसातून बऱ्याच वेळा बोलायचा. अभ्यासासंदर्भात एकमेकांना कॉलेजबाहेरसुद्धा भेटायला लागले. एकमेकांसोबत हॉटेलिंग व्हायला लागले. पण त्यासोबत तो इतर मुलींशीही तेवढेच मोकळेपणाने बोलायचा पण त्याला सायलीची काही हरकत नव्हती कारण आजकाल कॉलेजच्या ग्रुपमध्ये मुला-मुलींमध्ये एवढा मोकळेपणा असतोच.

तिने एकदा एका गार्डनमध्ये बेंचवर बसले असताना त्याला विचारले, "तुझ्या दृष्टिकोनातून प्रेम म्हणजे नेमकं काय मला सांग बरं!"

"तुला काय सांगू? प्रेम हे व्याख्येत बांधता येत नाही! ती एक तरल भावना आहे, हृदयातून येणारी! तिचे वर्णन करता येणार नाही. प्रेमाचा फक्त अनुभव घेता येतो!"

त्याच्या या उत्तराने ती खूपच खुश झाली, हरखून गेली! तिच्याही मनात प्रेमाबद्दलची अशीच काहीशी भावना होती. त्याचे हे उत्तर म्हणजे आपल्यावरचे प्रेम असून त्याच्या आपल्यावरच्या प्रेमाची ही मूक संमती आहे असे तिने गृहीत धरून टाकले.

एकमेकांवर प्रेम असल्याची स्पष्टपणे स्पष्ट शब्दात कबुली देण्याचा प्रसंग खूप महत्त्वाचा आणि हवाहवासा असतो, पण तो प्रसंग येईपर्यंत अप्रत्यक्षपणे सांगितलेल्या गोष्टीतून आणि विविध कृतीमधून व्यक्त केलेले प्रेमच आहे हे जाणता येऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्ष स्पष्ट प्रेमाची कबुली देण्याआधीचे अनेक अप्रत्यक्ष कबुली असणारे प्रसंग प्रेमात आकंठ बुडालेल्या मनाला खूप खूप आवडतात.

 

कॉलेजच्या शेवटच्या वर्षी ते एकमेकांच्या खूप जवळ आले. बराच काळ ते दोघे एकमेकांना भेटत राहीले. त्यांच्यात प्रत्यक्ष शरीरसंबंध अजून जरी आला नसला तरी वरवरचे प्रेमसंबंध त्यांनी अनुभवले होते. अनेकदा किसिंग केले होते, एकमेकांना घट्ट मिठी मारणे झाले होते तसेच तासनतास एकमेकांच्या शरिराला मिठी मारून बसून राहणे हेही झाले होते. अशा गोष्टी सूर्यप्रताप त्या अनेक सात-आठ मुलींसोबत सुद्धा सहजपणे करायचा पण सायलीला हे माहिती नव्हते आणि कदाचित माहिती पडल्यावर तिने अफवा म्हणून विश्वास ठेवला नसता.

 

शेवटचे इंटर्नशिपचे वर्ष सुरु झाले तेव्हा एकदा सूर्यप्रताप पंधरा दिवस अचानक सुट्टीवर  गेला. परत आल्यानंतर त्याने आपले लग्न झाले हे जाहीर केले तेव्हा कॉलेजमध्ये मुलींच्या ग्रुपमध्ये एकच हलकल्लोळ माजला. त्याच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलींना तर ते असह्य झाले.

 

घडले असे होते की, सूर्यप्रतापने त्याच्याच मूळ राज्यातल्या त्याच्या लहानपणापासूनच्या एका मैत्रिणीसोबत या पंधरा दिवसांच्या सुट्टीत लग्नही करून टाकले होते, कारण त्या दोघांच्या घरी दोघांच्या प्रेमसंबंधाला विरोध निर्माण झाला होता आणि आणखी महत्वाचे कारण म्हणजे ती मुलगी त्याच्यापासून प्रेग्नंट होती. लग्न नाही केले तर केस करीन असे तिने धमकावले म्हणून सूर्यप्रताप नमला आणि  त्यांनी पळून जाऊन लग्न केले आणि मग घरच्यांना सांगितले. घरच्यांचाही आता नाईलाज झाला होता.

 

सूर्यप्रतापच्या लग्नाची बातमी ऐकल्यानंतर अनेक मुली यातून सावरल्या आणि  त्यानंतर आपापल्या कामाला लागल्या कारण आजकालच्या जमान्यात इन्स्टंट प्रेम आणि इन्स्टंट ब्रेकप सहजगत्या होत होते.

 

पण अगदी मनाच्या गाभार्‍यापासून आणि हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यापासून सूर्यप्रतापवर प्रेम करणारी सायली मात्र आतून कोलमडून पडली.

तिने हॉस्पीटलच्या कॉरीडॉरमध्ये त्याला स्पष्ट आणि मोठ्याने चिडून विचारले, "तुझे माझ्यावर प्रेम होते तर मग तू असे का केलेस?"

जाणारे येणारे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक एकदम चमकून त्या दोघांकडे बघायला लागले.

तेव्हा तो अगदी शांतपणे आणि सहजपणे म्हणाला, "मी तुला असं केव्हा म्हणालो की माझे तुझ्यावर प्रेम आहे? कधीही नाही! तू काय आणि त्या चार पाच जणी काय सगळे माझ्या फक्त मैत्रिणी आहेत. यापुढेही तुम्हा सगळ्यांशी माझ्या मैत्रीचे संबंध राहणार आहेत!"

यावरच सायली खूप चिडली आणि रडत्या डोळ्यांनी तिने रागारागाने त्याला सुनावले, "यापुढे त्या सर्वजणी असतील पण मी तुझी मैत्रीण म्हणून राहणार नाही हे लक्षात असू दे आणि माझ्याशी बोलण्याचा भेटण्याचा प्रयत्नही करु नकोस!"

 

त्याने खेळकरपणे हे घेतले आणि इट्स ओके म्हणून तो निघूनही गेला, पण ह्याचा जास्त त्रास सायलीला होऊ लागला. तिचे एकूणच अभ्यासातून आणि प्रॅक्टिसमधून लक्ष उडाले. त्याच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण न क्षण आठवून आठवून अनेक रात्री रडण्यात घालवू लागली. मनावर स्वार झालेल्या नकारात्मक भावना प्रकर्षाने आठवू लागल्या. विसरू म्हणता विसरणं शक्य नव्हतं. रुग्णांना तपासता तपासता तिच्याकडून चुका होऊ लागल्या होत्या. तेव्हा तिने काही दिवस सुट्टी घेतली आणि घरी गेली.

 

घरी गेल्यानंतर तिने लगेचच आईला सगळे खरे खरे सांगून टाकले आणि हमसून रडू लागली. आईने तिला अगदी मैत्रिणीसारखे खूप समजावले. त्यानंतर आईने वडिलांना सुद्धा याबाबत सांगितले. वडिलांनी तिला धीर दिला आणि म्हणाले, "अशा गोष्टी होत असतात. आता तू पुढे चल, मागे भूतकाळात अडकू नकोस! मात्र यापुढे प्रेम करताना सावध राहिले पाहिजे".

पण प्रेम असे सावध राहून ठरवून थोडंच करता येते? ते आपोआप होऊन जाते! असे तिने वाचलेल्या अनेक प्रेम कथांमध्ये आणि पाहिलेल्या अनेक चित्रपटांमध्ये वारंवार सांगण्यात येत होते. तेच जास्त वेळ तिच्या मनावर सुद्धा आपोआप बिंबवले गेले होते. जे आपण परत परत बघतो ऐकतो वाचतो तेच आपल्या मनावर जास्त कोरले जाते आणि तेच आपल्याला खरे सुद्धा वाटू लागते!

काही दिवसांपासून सायली नकारात्मक आणि प्रेमभंग झालेल्यांचे संगीत आणि गाणे ऐकू लागली. 

"दिल तो है दिल दिल का ऐतबार क्या किजिये, आ गया जो किसी पे प्यार क्या किजिये?"

"छन् से जो तुटे कोई सपना, जग सूना लागे, कोई रहे ना जब अपना!"

"मेरी जिंदगी एक प्यास, सब पाके सब गवाया!"

"दिल के अरमा आसुओं मे बह गये!"

"ऐसा जखम दिया हैं, जो ना फिर भरेगा!"

"जुदा होके भी तू मुझमे कहीं बाकी हैं!"

"तुमसे मिलकर, ना जाने क्यूँ और भी कुछ याद आता है, आज का अपना प्यार नहीं है, जन्मों का ये नाता हैं!"

अश्या प्रकारची गाणी परत परत ऐकून ऐकून तिने आपली एकूणच हालत आणि तब्येत बिघडवून घेतलेली होती. ही सगळी गाणी जणू काही मेंदूत रेकॉर्ड झाली होती आणि ती इच्छा नसतांनाही मेंदूत आपोआप प्ले व्हायला लागली.  कारण आधीच तिची मेमरी पुसता येण्याजोगी नव्हती! त्यामुळे गाण्यांच्या ओळींच्या ओळी तिला परत परत आठवून आठवून त्रास देत होत्या.

तिने सूर्यप्रतापसोबत आपलं पुढचं सगळं आयुष्य, संसार कल्पून टाकला होता. त्या काल्पनिक स्मृतीपण तिला त्रास द्यायला लागल्या. त्याच्यासोबत आयुष्य कसं जगायचं हे मनातल्या मनात ठरवून टाकलं होतं. त्यामुळे मनाला होणारा त्रास प्रचंड होता.

आई-वडीलांनी एकदा तिला सल्ला दिला की तिने कुठेतरी बाहेर मित्र मैत्रिणींसोबत फिरून यावे म्हणजे ती सगळं या वातावरणापासून दूर राहून विसरून जाईल. पण तिच्या बाबतीत विसरणं हे शक्य नव्हतं पण त्या विचारांना परत-परत येण्यापासून थांबवणं हेच फक्त तिच्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये होतं. एखादी गोष्ट भावना वस्तू ठिकाण तारीख हे सगळं तिने मनात योजलं की तिला लगेच त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांशी संबंधित सगळं काही तिला इथ्यंभूत आठवायचं. त्यामुळे तिने असे काही विरुद्ध विचार करण्यास सुरुवात केली की ज्याद्वारे त्या गोष्टी आठवण्याची वारंवारता कमी होईल. बंद मात्र होणार नव्हतं! 

काही दिवस सुट्टी घेऊन ती केरळ, उटी येथे मित्र मैत्रिणींच्या ग्रुपसोबत जाऊनही आली. त्यामुळे जरा ती कुठे त्या आठवणींपासून दूर जाऊ शकली. इंटर्नशिप संपता संपता हॉस्पिटलमध्ये सूर्यप्रताप आजूबाजूला दिसायचा पण ती त्याला टाळून तिथून दूर निघून जाण्याचा प्रयत्न करायची. असे केले तरच निभावणार होते. तो दिसला की लेगेचच तिच्या मेंदुतून त्याच्या सोबतच्या असंख्य स्मृतींची मालिका मनात प्रकट व्हायची आणि नंतर हृदयातून एक "नकारात्मक लहर" चमकून जायची जी बराच वेळ टिकायची. जेवढा वेळ ती लहर असायची तेवढा वेळ तिला आयुष्य असह्य वाटू लागायचं. शेवटी इंटर्नशिप एकदाची संपली. सायली डॉक्टर झाली.

^^^

 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel