सुपर नेचर बेटावर पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस लागणार होते. दरम्यान चौघांना जहाजावर प्रशिक्षित व्यक्तींकडून विविध अपेक्षित किंवा अनपेक्षित परिस्थितीत संकटात सापडल्यावर त्यातून स्वत:ला कसे वाचवायचे याची ट्रेनिंग देण्यात आली. नेत्राजवळ होते त्या प्रकारचे कम्युनिकेशन गॅजेट्स त्यांना दिले गेले, जे सॅटेलाईटद्वारे ऑपरेट होत होते. या संस्थेचे नाव Allied Secret Forces असे होते परंतु आता सुपरनॅचरल पॉवर असलेले लोक त्यात समाविष्ट केले गेल्याने त्याचे स्वागत म्हणजेच SWAGAT = Supernatural Warriors And Gadgets Assisted Team हे नाव ठेवण्यात आले. तर अशाप्रकारे त्या चौघांचे या संस्थेत काही दिवसांपूर्वी स्वागत झाले होते आणि अशाच प्रकारच्या सुपर पॉवर असलेल्या अनेक व्यक्तींना शोधून त्या सर्वांचे ह्या संस्थेत स्वागत यापुढे ही होणार होते.
नेत्रा त्या स्वागत संस्थेची सध्या प्रमुख होती. त्या संस्थेच्या उभारणीपासून आतापर्यंत नेत्राने खूप मेहनत घेतली होती. संस्थेमधील प्रत्येकाला एक सांकेतिक नाव देण्यात आले होते. त्यामुळे इतर जगापासून त्यांचे खरे नाव लपून राहणार होते. हे सर्वजण एकाच ध्येयाने प्रेरित होते, ते म्हणजे जागतिक पातळीवर सध्या वाढलेल्या विशिष्ट पद्धतीने विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींवर होणारऱ्या हल्ल्यांच्या घटना आणि त्यामागे कोण आहे आणि त्यांचा हेतू काय हे शोधून काढणे आणि आणखी अशा घटना पुढे होण्यापासून थांबवणे!
दरम्यानच्या काळात जहाजावर सुनिलला सारंगकडून कळले होते की जग्गू भुसनळ्या तुरुंगातून सुटल्यानंतर त्याच्या भावाला भेटायला धारावीतील त्याच्या घरी गेला होता. त्याच माहितीच्या आधारे नेत्रा आणि इतर तिघांशी विचार विनिमय करून मुंबईच्या दिशेला चेहरा करून सुनिलने नजर पुढे नेत सारंगने सांगितलेल्या ठिकाणी दृष्टीने जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळेस जग्गू तिथे नव्हता. बरेचदा सुनिलचा अंदाज चुकायचा. पण हळूहळू दूरदृष्टी वापरण्याची सवय सुनिलला झाली. कधीकधी त्याची डोळे दुखायला लागायचे. डोळ्यांवर, मेंदूवर, मनावर एक प्रकारचा ताण निर्माण व्हायचा आणि दृष्टी शेवटी तो परत स्वतःकडे घेऊन यायचा.
दरम्यान सायलीने या संस्थेविषयी सर्व माहिती वाचून काढली तसेच या संस्थेसाठी जे जे काही म्हणून वापरले जाते त्या सर्व गोष्टींची, व्यक्तींची माहिती इतरांकडून प्रश्न विचारून गोळा केली आणि अर्थातच ती कायमची तिच्याकडे मेंदूत साठवली गेली. इतर अनेक प्रकारची उपयुक्त माहिती सुद्धा तिने जहाजावरील काही पुस्तकांतून तसेच इंटरनेटवरून वाचून काढली. कोणत्या माहितीची केव्हा भविष्यातगरज पडेल हे सांगता येत नव्हते त्यामुळे जास्तीत जास्त उपयुक्त माहिती तिने आपल्या मेंदूत साठवली.
नेत्राने आता सुनिलला जग्गूचा पाठलाग करून लवकर ते प्रकरण निकाली काढण्याची विनंती केली आणि ते करणे आवश्यकच होते.
जग्गूचा भाऊ पप्पू एका फॅक्टरीत वर्कर म्हणून काम करायचा. आता दोघे मिळून काहीतरी संशयास्पद करत आहेत असा सुनिलला संशय होता. कारण दोघांच्या डोक्याभोवती बहुतेक वेळेस लाल वर्तुळ दिसायचे. जग्गू पप्पू यांच्या बोलण्यातून सुनिलला असे जाणवले की, आता पोलिसांची नजर जग्गूवर असल्याने त्याची कामे पप्पू करायचा. पण सध्या या दोघांच्या फक्त मागावर राहणे आवश्यक होते. सुनिल सिक्रेट फोन करून माहिती सारंगला द्यायचा आणि सारंग आवश्यकता भासल्यास तिथे पोहोचायचा आणि दोघांवर लक्ष ठेवायचा. पण अजून पर्यंत दोघांनी कसलेही गुन्हेगारी कृत्य केलेले नव्हते. करण सुनिलच्या दृष्टीचा वापर करून सारंगला तिथे पाठवून त्या दोघांना रेड हॅन्ड पकडायचे होते. सारंगसुद्धा स्वागत टीमचाच एक भाग होता.
साधारण रोज रात्री फॅक्टरी मधून पप्पूचे काम संपल्यानंतर सुनिल आपली दृष्टी तिकडे नेऊन थांबवायचा. एके दिवशी पप्पू रात्री काम संपल्यानंतर फॅक्टरीतून घरी न जाता जवळच असलेल्या निर्जन ठिकाणी एका पुलाच्या खाली गेला. त्याच्या डोक्यावर प्रखर जळते वर्तुळ दिसले. सुनिल दृष्टीने त्याचा पाठलाग करु लागला. एका काळ्या रंगांचा मास्क घातलेल्या माणसाने पप्पूला एक पॅकेट दिले. ते पप्पूने बॅगेत टाकले आणि त्या माणसाकडून पैसे घेऊन पप्पू निघाला. निघतांना तो माणूस म्हणाला, "आणि लक्षात ठेव, पॅकेट ठरलेल्या ठिकाणी गुप्तपणे पोचवण्याची पद्धत जग्गूला माहीत आहे! त्याचेकडून गायडन्स घे. जराही चूक झाली नाय पायजेल. नायतर तुम्ही दोघीबी राम नाम सत्य!"
मग हसून तो म्हणाला, "वाईट लोक येतील आणि वाईट लोकांना मारतील!"
हे तेच वाक्य होते जे जग्गू परत परत तुरुंगात असतांना म्हणायचा. हे तेच वाक्य होते जे अनेक मोबाईलवर SMS ने अज्ञात नंबर वरून यायचे आणि लोकांना घाबरवून सोडायचे. सायबर सेल ला त्याचा छडा अजून लागला नव्हता.
पप्पू सरळ घरी आला तिथे त्याने जग्गूला पॅकेटवाली बॅग दिली. पॅकेटमध्ये काय आहे हे उघडून बघण्याची परमिशन नव्हती. तशी कडक सूचना त्या माणसाने पप्पूला दिलेली होती. कारण नुसत्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना भरपूर पैसे मिळत होते. पण त्या रात्री दोघांना त्या पॅकेटमध्ये काय आहे हे बघण्याचा मोह झालाच आणि सुनिलची दृष्टी तिथे होतीच. त्या पॅकेटमध्ये 10 छोट्या पारदर्शक बाटल्या होत्या आणि त्यात कसलेतरी केमिकल होते. त्यामुळे त्यांनी ते बघून पुन्हा पॅकेटमध्ये बंद करून टाकले. या आधी पार्सल मध्ये फक्त शस्त्र प्रकार असायचे, आता हे केमिकल वगैरे काय भानगड आहे हे त्या दोघांना कळत नव्हते.
पप्पू ते पॅकेट कुठे पोहोचवणार त्यासाठी सुनिलची दृष्टी पप्पूचा पाठलाग करणार होती आणि सारंगने मुद्दाम पप्पूपासून लांब अंतरावर राहून फोनवर सुनिलचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन पावले उचलायची असे ठरले होते. त्या पॅकेटमधले केमिकल काय आहेत आणि केमिकलचा वापर नेमका कसा कुठे केला जातो हे जाणणे आता आवश्यक झाले होते त्याशिवाय छडा लागणार नव्हता. अशा पद्धतीने हा महत्त्वाचा पाठलाग सुरू झाला: सुनिलच्या दृष्टीचा आणि सारंगचा!
पप्पू पॅकेटवाली बॅग घेऊन घरातून निघाला. बेस्ट बसमधून तो जुहूला आला. त्याच बसमध्ये सावध राहून त्याला कळू न देता त्याच्या मागावर सुनिलच्या नजरेच्या मार्गदर्शनाखाली सारंग होताच. बसमधून उतरल्यावर त्याच्या मागोमाग सुरक्षित अंतर ठेऊन सारंग चालू लागला. जुहू बीचवर दूरवर एक काळा मास्क घातलेला माणूस पप्पूची वाट बघत समुद्राच्या बऱ्याच आतमध्ये कमरेपर्यंत पाण्यात उभा होता. त्याच्या डोक्याभोवती लाल प्रखर वर्तुळ होते. म्हणजे तो पप्पूचा घात करणार?
मग पप्पूलाही त्याने तिथेच बोलावले. सारंग दूर उभा होता, मात्र सुनिल दृष्टीनेच त्या दोघांकडे पाण्यात काय चाललंय ते बघत होता. पप्पूने त्या मास्कवाल्या माणसाकडे त्याचा मोबदला मागितला. दोघांमध्ये काहीतरी वादावादी झाली आणि नंतर ते हमरीतुमरीवर आले. त्या मास्कवाल्याने पप्पूला पाण्यात ढकलले, पॅकेटमधून एक केमिकलची बाटली काढली आणि ती धरून तोही पाण्यात गेला, त्याने पाण्यातच पप्पूच्या नाकात आणि घशात त्या पॅकेटमधले केमिकल ओतले आणि पुढे जे घडले ते सुनिल आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला आणि सारंगला फोनवरून काही सूचना द्यायचे तो विसरला....
केमिकल शरीरात जाताच पप्पूचे डोक्यावरचे केस हळूहळू विरळ होऊन नष्ट झाले मग डोके, चेहरा, मान, हात, छाती, पोट, हाडे, शरीराच्या बाहेरचे आणि आतमध्ये असलेले एकेक अवयव हळूहळू नष्ट होत होत दोन्ही पाय नष्ट झाले. आता पप्पूच्या जागी एक छोटा पेशींच्या समूहाचा तुकडा होता. पप्पूने अंगावर घातलेले सगळे कपडे ढिले होऊन पाण्यात वाहून जायला लागले. पप्पूच्या पेशीसमूहाचा तुकडा त्या माणसाने मुठीत पकडला आणि पाण्याच्या बाहेर उसळी मारली...
सारंगला घातपाताचा संशय आलाच होता त्यामुळे तो सुनिलच्या सूचनेची वाट न बघता गर्दीतून मार्ग काढत मास्कवाल्या माणसाकडे पळू लागला. सारंगला पाण्यात काय घडले हे माहिती नव्हते. सुनिलने विचार केला तेच झाले. सारंगने त्या माणसाकडे एकदम जायला नको होते त्या ऐवजी तो आता येथून कुठे जातो ते बघायचे असे सुनिल सारंगला फोन करून सांगणार होता कारण त्या केमिकलमुळे जसा पप्पू नष्ट झाला तसा आणखी कुणाकुणाला नष्ट करायचा प्लॅन आहे ते मास्कवाल्या माणसाचा आणखी पाठलाग केल्यावर कळले असते पण...
आपल्याकडे कुणीतरी म्हणजे सारंग पळत येत आहे आणि तो आपल्यावर झडप घालून पकडणार हे दिसताच मास्कवाला सावध झाला आणि त्याच्या तावडीत कदापि सापडायचे नाही असा निश्चय करून त्याने स्वत: ते केमिकल स्वतःच्या नाकात आणि घशात ओतले आणि सारंगने झडप घालून त्याला खाली पाडले खरे, पण त्याच्या अंगाखाली त्या मास्कवाल्या माणसाचे एकेक अवयव नष्ट होत होत गेले, त्याचे सर्व कपडे ढिले होत अंगावरून निघाले आणि बाजूला पडले. शेवटी समुद्रकिनारी निश्चल पडलेल्या कपड्यांच्या आत पप्पूचा आणि मास्कवाल्या माणसाचा असे छोटे दोन पेशीसमूह सारंगला सापडले. केमिकलची बॅग झटापटीत दूर जाऊन एका दगडाला लागून फुटली आणि सगळे केमिकल वाळूमध्ये पडले आणि जिरले आणि लाटेबरोबर वाहून गेले.
तेवढ्यात सुनिलने फोन करून ते दोघी पेशीसमूह ताब्यात घेऊन तडक पोलीस स्टेशन गाठून ते कुणाकडे तरी सोपवून पुढील सूचना मिळेपर्यंत सांभाळून ठेवायला सांगितले. सारंगला हे सगळे कल्पनातीत आणि अद्भुत वाटत होते.
सारंगने त्याच्या असिस्टंटला त्याच्या पेक्षाही काही अंतरावर मागोमाग यायला सांगितले होते. त्यांनी आणलेल्या गाडीतून तो पोलीस स्टेशन मध्ये आला आणि सायन्स अँड रिसर्च सेक्शन मध्ये त्याने दोन वेगवेगळ्या बाटलीत ते दोन छोटे पेशीसमूह बंद करून एका लॉकरमध्ये ठेवले. सायन्स अँड रिसर्च सेक्शन मधील डॉक्टर आणि सायंटिस्ट श्री राजमे यांना त्याने घडलेला प्रकार सांगितला आणि केमिकल आणि पेशीसमूहाबद्दल सांगितले.
सुनिलची दृष्टी इकडे समुद्र किनाऱ्यावर बिझी होती तेव्हा पप्पूच्या घरी एक घटना घडली. त्याच्या घरात एकजण शिरला. त्याने दारू नशेत धुंद पडलेल्या बेसावध जग्गूला ते केमिकल पाजले आणि जेव्हा त्याचे पेशीसमूहात रूपांतर झाले तेव्हा ते घेऊन तो पसार झाला. पोलिसांना कळलेच नाही की जग्गू आणि पप्पू हे दोघे भाऊ शहरातून कुठे गायब झालेत?
इकडे जहाजावरच्या डेकवर उभे राहून आपल्या दृष्टीने बीचवरील हे सगळे बघून आश्चर्यातून सुनिल अजूनही बाहेर येऊ शकला नव्हता. त्याने जे बघितले त्या संदर्भातील विविध शक्यता, कारणे आणि परिणाम यांच्या विचारांतून अजूनही बाहेर येऊ न शकलेला सुनिल अजून धक्क्यातून सावरला नव्हता!
आता वेगाने आपली दृष्टी मागे मागे घेत सुनिल उभाच होता आणि त्याची दृष्टी अजून परत त्याचेकडे जहाजावर यायची बाकी होती.....
सुनिल आणि सारंग हा सगळा जग्गूचा पाठलाग करत असताना नेत्राने सुनिलला हा छडा लागेपर्यंत दृष्टी परत घेऊ नकोस आणि डेकवरच रहा असे बजावले होते. तसेच तोपर्यंत सुनिलचे संरक्षण करण्यासाठी दोन फायटर त्याचेजवळच राहावेत असे नेत्राने आदेश दिले होते. कारण लवकर शोध लावणे आता आवश्यक होते. वेळ दवडून चालणार नव्हता.
दूरदृष्टीचा उपयोग आता सुनिल बऱ्याच चांगल्या क्षमतेने करू शकत होता. तो डेकवरच होता. दोनेक ब्लॅक कपड्यातील फायटर डेकवर फिरत होते आणि सुनिल त्याच्या कामात बिझी होता.
^^^