चौघांचे 360 डिग्री अँगल मधून चेहरे आणि संपूर्ण शरीराचे कॉम्प्युटरने स्कॅन करण्यात आले. चौघांनी सांगितलेल्या माहितीनुसार आणि गरजेनुसार सायलीच्या मदतीने चौघांचे पोशाख डिझाईन तयार होऊन त्यांचे 3D प्रिंटिंग पण झाले होते. चौघांना ते व्यवस्थित फिट बसले. प्रत्येकाने दिलेल्या आवडीनुसार चौघांचे किमान प्रत्येकी 20 मुखवटे आणि पोशाख तयार होते. कारण एक मास्क एकदाच वापरता येणार होता आणि पोशाख जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत वापरता येणार होता.

 

संस्थेच्या प्रायव्हेट सॅटेलाईटद्वारे एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईलसारखे कम्युनिकेशन गॅजेट्स मास्कच्या आतमध्ये फिट करता येईल असे बनवले होते. चोवीस तास ते गॅजेट्स चालू असतील आणि केव्हाही त्याद्वारे एकमेकांशी संपर्क करता येईल अशी सोय होती. त्यांची बॅटरी डिस्चार्ज झाली तरीही चौघांच्या शरीराच्या हालचालीमुळे त्याची बॅटरी चार्ज होईल अशी इलेक्ट्रॉनिक व्यवस्था त्या सर्वांच्या पोशाखात होती. त्या कम्युनिकेशन गॅजेट्सचा मोड बदलला तर नेहमीच्या मोबाईलसारखे ते वापरता येत होते. ते चौघे जगातील कुणाच्याही मोबाईलवर कॉल करू शकत होते पण त्यांचा नंबर इतरांना कधीही दिसू शकणार नव्हता अशी सोय त्यात होती आणि लोकेशन डिटेल्स सॅटेलाईटद्वारे डिलीट केले जाण्याची व्यवस्था होती त्यामुळे कुणालाही ते कुठून बोलत आहेत हे कधीही समजू शकणार नव्हते. त्यासाठी सायलीने शक्य तितके मोबाईल नंबर नावसाहित वाचले आणि कायमचे लक्षात ठेवले आणि सगळ्यांच्या मोबाईलवर सेव्ह पण केले. अनेक जुन्या नव्या टेलिफोन डिरेक्टरी वाचून काढल्या. यामुळे तिच्यावर ताण आला होता, पण देशासाठी हे करायलाच हवे होते!

 

सुनिलला ब्लॅक हॅट कोट चष्मा असा अवतार ठरला. सुनिलच्या उजव्या कानाच्या वर रंगिनीने दिलेला आणि सायलीने पक्का बसवलेला स्फटिक असल्याने, स्पर्श करण्यापुरता तो उघडा राहील अशी काळजी त्या मुखवट्यात घेण्यात आली होती. त्याची हॅट ही डोक्याद्वारे मुखवट्याला जोडलेली होती. मुखवटा काढला तरच हॅट निघू शकणार होती. त्या हॅट मध्ये सुनिलने एक बटनाद्वारे उघडू शकणारी एक झडप बसवली ज्यात त्याने कामाच्या बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या होत्या. अनेक मोठ्या वस्तू आणि उपकरणे झिरको टेक्निकद्वारे छोट्या आकारात रूपांतर करून त्या हॅटखाली लपवून ठेवण्याचे तंत्र शोधण्यात शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांना सुनिलच्या मदतीने दिवसभरात यश मिळाले. फक्त सुपर नेचर बेटावर सापडणाऱ्या एक काचेसारखा पारदर्शक आणि रबरासारखा लवचिक धातूमुळे (ज्याचे नाव झिरकोडियम होते) आणि फक्त तिथेच अस्तित्वात असणाऱ्या किर्मोटो वायूला कॅटॅलिस्ट म्हणून वापरल्याने हे शक्य झाले. नॅनो टेक्नॉलॉजीच्याही पुढे जाणारी आणि आधुनिक अशी ही झिरको-टेक्नॉलॉजी होती. या संशोधनात सायलीचा फास्टर आणि कायम लक्षात ठेवणारा मेंदू कामास आला कारण तिने पटापट सगळी वैज्ञानिक माहिती प्रोसेस केली तसेच डॉक्टर असल्याने बॉडीवर या सगळ्यांचे होऊ शकणारे संभाव्य परिणाम याबद्दल तिने माहिती दिली.

 

सगळ्यांचे एक्स्ट्रा मुखवटे पोशाख, इतर अनेक वस्तू, उपकरणे सूक्ष्म स्वरूपात सुनिलच्या हॅटमध्ये ठेवायचे ठरले. हवे तेव्हा त्या वस्तू त्यांच्या मूळ स्वरूपात आणता येणार होत्या. पण हे करण्यासाठी त्या वायूला द्रव स्वरूपात कॅटॅलिस्ट म्हणून सुनिलच्या शरीरात इंजेक्शनद्वारे टोचण्यात आले होते. मग सुनिल हवे तेव्हा तोंडाने फूक मारून त्या वस्तूला सूक्ष्म स्वरूपात आणि मूळ स्वरूपात रूपांतर करू शकेल. फक्त सुनिलचे शरीरच असे होते ज्याला झिरको टेक्नॉलॉजी सूट होत होती, मानवत होती! त्यामुळे त्याची मालकी सुनिलकडेच होती.

 

सायलीला अंगाला फिट बसेल असा मजबूत व्हाइट कलरचा पोशाख ज्यावर हसणाऱ्या मेंदूचे चित्र होते.

 

हाडवैरीला त्याच्या आवडीच्या लाल रंगाचा बॉडी फिट असा पोशाख मिळाला ज्यावर हाडांनी बनलेल्या कवटीचे चित्र होते कारण हाडवैरीने कितीही उंचावरून उडी मारली किंवा कुठेही तो आपटला गेला तरीही त्याची हाडे तुटत नसत तसेच त्याच्या त्वचेला पण काहीही होत नसे. साधे खरचटत सुद्धा नव्हते.

 

निद्राजीताला निळ्या रंगाचा फिट पोशाख मिळाला ज्यावर रातरणीच्या फुलाचे चित्र होते. ती एक फायटर होती. समोरचा ज्या पद्धतीने लढेल तीच पद्धत क्षणार्धात ती आपोआप आत्मसात करून समोरच्याशी जास्त ताकदीने लढू शकत होती. विशेषकरून रात्रीच्या वेळेस तिला अनेकपट जास्त शक्ती प्राप्त होत होती.

 

मग स्वागतच्या आदेशानुसार मुंबई पुण्यातील ऑफिसला कॉन्टॅक्ट करून रणवर्धन, रजक, हरित आणि हितेन या चौघांच्या घरी चोवीस तास पोलीस पहारा लावला गेला आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जात होती तसेच आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक जीव जंतू प्राणी कीटक पक्षी यांचेवर लक्ष दिले जात होते. शहरभर पोलीस सतर्क झाले होते. तसे सावधगिरी म्हणून भारतातील सर्वच शहरांतील डॉक्टर, वैज्ञानिक आणि विविध कंपन्यांचे प्रमुख ज्यांनी कर्मचाऱ्यांना जॉबवरून काढले होते त्यांना काही सूचना दिल्या गेल्या होत्या आणि थोड्या प्रमाणावर त्यांच्याही संरक्षणार्थ पोलीस होतेच.

 

आज पाच तारखेची रात्र होती. एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तिन्ही ट्रीहाऊसेसच्या छतावर असलेल्या गोलाकार खिडकीतून आकाशातील चंद्र निरखत सर्वजण पहुडले होते. निद्राजीता स्वतःच्या ट्रीहाऊसच्या लाकडी छतावर जाऊन कपाळावर हात ठेऊन आकाशाकडे बघत पहुडली होती. रोज तिला रातराणीची फुले खायला लागायची. त्यातूनच तिला खास शक्ती मिळाली होती. रातरणीच्या फुलांशी तिचा खास असा बंध तयार झाला होता. तिच्याजवळ नेहमी रातराणीच्या फुलांचा अर्क असायचा, तो ती प्यायची. कधी फुलं मिळाली तर खाऊन घ्यायची. फ्लॉवर मितीकडून तिला ही शक्ती मिळाली होती.

 

तिचा प्रियकर सूर्यविराट अनाथ होता. त्याने केलेल्या एका चुकीमुळे तो शिक्षा भोगत होता. फ्लॉवरमितीनेच त्याला एका सनफ्लॉवरमध्ये रूपांतर करून जमिनीत राहण्याची शिक्षा दिली होती. ते सूर्यफूल रोज रडायचे. त्याला कुंपण बांधून निद्राजीताने त्याची काळजी घेतली होती. सूर्यविराटला फ्लॉवरमितीतर्फे सूर्यफुलाकडून शक्ती मिळाली होती. आकाशात सूर्य तळपत असेपर्यंत त्याच्यात अफाट आणि अचाट शक्ती येत असे. पुन्हा त्याची भेट कधी होईल हे माहिती नव्हते. पण निद्राजीताने जर का तिच्या शक्तीचा वापर करून खूप चांगली कामं केली तर त्याची शिक्षा कमी होणार होती आणि तो पुन्हा मूळ सूर्यविराट रुपात येऊ शकणार होता. आता पुढे चालून आलेली ही चांगली संधी होती. सूर्यविराट भेटला तेव्हापासून त्याला शिक्षा मिळाली तोपर्यंत सगळा घटनाक्रम तिला आठवत होता. त्याला शिक्षा मिळाली त्यात तिचीही चूक कारणीभूत ठरली होती...

 

आणखी एक दिवस विविध प्रकारच्या तयारीत आणि नियोजनात गेला. सुनिलने अनेक पर्यायी प्लॅन्सचा विचार केला होता. मिशनला जाण्यापूर्वी एक महत्वाची बैठक पार पडली.

 

शेवटी सहा तारखेला सुपर नेचर बेटावरून मजबूत बांधणीचे काळ्या निळ्या रंगाचे पट्टे असलेले दोन भव्य हेलिकॉप्टर्स रात्री अकरा वाजता उडाले ज्यावर स्वागत संस्थेचा सायली आणि सुनिलने मिळून बनवलेला लोगो होता. त्या लोगो मध्ये एका गर्द निळ्या रंगाच्या वर्तुळात स्वागत करणारे दोन पांढऱ्या रंगाचे हात होते जे उडणाऱ्या पक्ष्यासारखे भासत होते, ज्याच्या डोक्यावर डिटेक्टिव्हची काळी हॅट होती आणि त्या हातांवर पिवळ्या रंगाचे प्लस म्हणजे अधिक चिन्ह होते आणि गोलकारात इंग्रजीतून SWAGAT असे पांढऱ्या रंगात लिहिले होते.

 

हेलिकॉप्टर उडाले त्यावेळेस कोणी आकाशात आसपास असते तर त्यांना अचानक समुद्राच्या पाण्यामधून दोन हेलिकॉप्टर निघाले असे दिसले असते कारण सुपर नेचर बेट अदृश्य होते!!

 

^^^

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel