सुनिलने दूरदृष्टीने चौघांच्या घरी जाऊन ते ठीक आहेत याची खात्री करून घेतली. नंतर चौघांनी आपापल्या घरी कम्युनिकेशन डिव्हाईसच्या नॉर्मल मोबाईल फोन मोडवर जाऊन आपापल्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला. आतापर्यंतचा थोडक्यात प्रवास सांगितला आणि स्वागतचे चौघे सुपरहिरो दुसरे तिसरे कुणी नसून तेच आहेत असे सांगितले. घरातून बाहेर शक्यतो पडू नका असे त्यांनी आपापल्या घरी बजावले.
नंतर सुनिलच्या प्लॅनप्रमाणे एकमेकांना फोनवर कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्र घेऊन असे ठरले की पुण्यात FF1,2 आणि MF1,2 हे लढण्यासाठी सुनिलसोबत राहतील. पुण्यातील दोन्ही व्हीआयपीच्या घरांजवळ हाडवैरी आणि दोघे नुकतेच हाडवैरीने स्वागतमध्ये सामील केलेले राऊटरन आणि वायफायर असे तिघे राहतील.
निद्राजीता आणि इतर काही स्वागत फायटर्स नरिमन पॉईंट परिसर आणि इतर जिथेही मानवी आणि यांत्रिक प्राणी हल्ला करत आहेत तिथे राहतील तर सारंग, सायली आणि इतर फायटर्स मुंबईतील व्हीआयपीच्या घराजवळ राहतील, पण -
सायलीने ते नाकारले. ती म्हणाली, "मला आणखी काही वेळ द्या. मी इथेच लॅबरेटोरी मध्ये थांबते, मला आणखी काही प्रयोग करायचेत!"
"कोणते प्रयोग राहिलेत आता सायली? युद्ध सुरू झालंय बाहेर! आता लढायचं आहे, प्रयोग करायची वेळ आता संपली!"
"या प्रयोगाचा आपल्याला खूप फायदा होईल सुनिल! प्लिज प्रयोग पूर्ण होईपर्यंत ते सिक्रेट राहील, बाय! लव्ह यू! किस यू अ लॉट! आणि हो, तुझा तो पक्षी निघालाय वेगाने उडत. तुझ्याकडे! बाय!!", असे म्हणून तिने डिस्कनेक्ट केलेसुद्धा!
सुनिलसहित इतरांना तिने विचारांत पाडले. ही नेमकी करणार काय आहे? असो. हरकत नाही. तिला चान्स द्यायलाच हवा!
निद्राजीता एका बोक्याला लाथ मारता मारता म्हणाली, "हे मात्र बरंय सुनिल! एक रिमोट किस काय मिळाला, लगेच तिचं म्हणणं ऐकलं, नाही का?"
सुनिल पण गमतीने म्हणाला, "तसं काही नाही, तू किस द्यायला तयार असशील तर तुलाही देतो परवानगी प्रयोग करायला!"
"हो का? येऊन ट्राय करून पहा किस करायचा! माझा प्रियकर जो आता सूर्यफूल होऊन जमिनीत खोचून पडला आहे तो जिवंत होऊन येईल तुला मारायला!"
"ओह, कधी बोलली नाहीस त्याच्याबद्दल. काय नाव त्याचं? आणि तसे असेल तर येऊ दे की त्याला. त्यानिमित्ताने तो येईल तरी. त्यालाही स्वागत मध्ये सामील करून घेऊ! मदत करील तो आपल्याला!!", सुनिल म्हणाला.
"त्याचं नाव आहे सूर्यविराट!", असे म्हणत निद्राजीताने एका हल्लेखोर मांजराचा गळा धरला आणि तिला समुद्रात फेकले.
सुनिल म्हणाला, "सूर्यविराट? ग्रेट कॉम्बिनेशन! निद्राजीता आणि सूर्यविराट! चला, वेळ नाहीये आपल्याकडे. नंतर गंमत करूया आता, आता फायटिंग अँड विनिंग!"
रजक आणि हितेन यांना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही बहाण्याने त्यांच्या घरातून निघू द्यायचे नाही हा सुनिलचा अजेंडा होता म्हणजे तोपर्यंत वाईट टीम खंडाळ्याहून हवेच्या अदृश्य स्तंभातून प्रतिसृष्टीकडे जाऊ शकणार नव्हते आणि मग त्यांना पकडता आले असते आणि पृथ्वीवर त्याचा विपरीत परीणाम पण टाळता येणार होता. तसेच स्वागतचे हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालून स्वागतच्या जमिनीवरील या लढवैय्यांना मदत करणार होतेच आणि सुनिल त्या सायलीने तयार केलेल्या पाणी आकाश जमिनीवर विहार करु शकणाऱ्या पक्ष्याची वाट बघत होता. पप्पू, अँटिनाडू हे मानव आणि क्लिफ्टाँन, युनिप्टस आणि टर्मिस हे प्राणी या पाच सजीवांपासून तयार झालेल्या पक्ष्याला सुनिल अँटीक्लिप म्हणणार होता.
न्यूज चॅनलवर लाईव्ह बातम्या बघतांना खऱ्या खोट्या डिटेक्टिव्ह निगेटिव्ह बद्दल आणि निद्राजीता, हाडवैरी बद्दल कळल्यानंतर आणि राऊटरन, वायफायर हे महत्त्वाचे माणसं पकडले जाऊन स्वागत मध्ये सामील झाल्याचे कळताच वाईट प्रमुख व्हायरसिक प्रचंड चिडला. त्याने लवकरात लवकर रजक, हितेन यांना कॉल करून त्यांच्या बनावट अपहरणाचा बेत लवकरच तडीस नेतो असे आश्वासन दिले आणि स्वागत टीमला जबरदस्त धडा शिकवायला मुंबई पुण्यात आतापर्यंत जिथे जिथे मानवी आणि यांत्रिक प्राणी सुप्त अवस्थेत होते त्यांना तयार करून ठिकठिकाणी सोडण्याचे आदेश त्याच्या टीमला दिले.
^^^