आणि तेवढ्यात बहिरी ससाण्यासारखे शरीर, सेल फिश या माशासारखी शेपटी, डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी दोन वेगवेगळे प्रचंड मोठे पंख, चित्त्यासारखे चार पाय आणि चित्त्यासारखे तोंड पण त्याला ससाण्यासारखी चोच असा भव्य पक्षी प्रचंड वेगाने उडत उडत डिटेक्टिव्ह निगेटिव्हकडे आला आणि पुलावर येऊन त्याच्याजवळ विसावला.
"चला, डिटेक्टिव्हजी बसा माझ्यावर!", अँटिक्लिप म्हणाला.
"वाव यार! मी जशी अपेक्षा केली होती त्यापेक्षा कितीतरी पट तू चांगला आणि मजबूत आहेस!", सुनिलचा आनंद गगनात मावत नव्हता.
"सर, धन्यवाद! आता मी तयार आहे. सायलीचे पण धन्यवाद! तीच माझी निर्माती आहे!"
सुनिलने उडी मारली आणि तो अँटिक्लिपवर बसला.
हितेन यांच्या घरासमोर वर्तुळाकार सिक्युरिटी तैनात होती. आसपासच्या भागांतून कोणत्याच वाहनांना जाऊ येऊ दिले जात नव्हते. वायफायर, राऊटरन आणि हाडवैरी हे तिथेच ठाण मांडून होते. सगळीकडे बंदुकधारी सुरक्षा रक्षक पहारा देत होते आणि इकडे हितेन अस्वस्थ होत होते. व्हायरसिक ने त्यांना लवकरच तुम्हाला घरातून बाहेर काढतो असे आश्वासन दिले होते. त्यांच्या घरावर आता अचानक घुबडांच्या घोळक्याने हल्ला केला. एरवी घुबड फक्त रात्री कार्यरत असतात पण इथे आलेले काही घुबड हे मानवी पेशीसमूहापासून बनलेले आणि काही यांत्रिक होते. त्या घुबडांच्या भीतीदायक डोळ्यांमुळे तिथे असलेल्या सर्वजणांची घाबरगुंडी उडाली, क्षणभर सुरक्षारक्षक पण गांगरले. पळापळ सुरू झाली. त्यात भर म्हणून तिथे असंख्य मधमाशा घोंघावत आल्या आणि तिथल्या माणसांना शरीराचा जोही भाग उघडा असेल तिथे घोळक्याने चावायला सुरुवात केली.
हाडवैरी, वायफायर, राऊटरन तिघांनी सगळ्यांना न घाबरण्याचे आवाहन केले. वेळ न दवडता तिघांनी त्या घुबडांशी लढायला सुरुवात केली. मधमाश्यांच्या घोळक्यांना हाडवैरीने हातात पकडून शॉक द्यायला सुरुवात केली. त्यामुळे मानवी आणि यांत्रिक दोन्ही मधमाश्यांचा अंत होत होता. हाडवैरीच्या लक्षात येत होते की ज्या पद्धतीने सात आठ घुबडांनी मिळून वायफायर, राऊटरन यांना अचानक घेरले आहे त्यानुसार हे निश्चित होते की त्या दोघांनी वाईट टीम सोडून स्वागत जॉईन केल्याचा राग येऊन त्या दोघांचा खात्मा करण्याचा त्या मानवी घुबडांचा उद्देश दिसत होता आणि अर्थात गोंधळ माजवून त्या गडबडीत हितेनला किडनॅप करायचे हा मुख्य उद्देश होता. पण आजूबाजूला एकही वाहन येऊ शकत नव्हते तसेच आकाशातही काही दिसत नव्हते.
दोघांनी त्या घुबडांच्या घोळक्याला लाथा बुक्क्यांनी बुकलून काढले. ते घुबडं आणखी त्वेषाने त्या दोघांवर चालून आले. ते दोघे अतिशय सहनशील आणि चिवट होते. त्यांनी त्या घुबडांना खूप ठोसे लागावले. या झटापटीत दोघे बरेच जखमी झाले.
तेवढ्यात स्वागतचे हेलिकॉप्टर्स तिथे पोहोचले पण त्यांना लगेच या घुबडांवर आकाशातून जमिनीवर गोळीबार करता येत नव्हता कारण निरपराध माणसांना गोळी लागण्याची शक्यता होती. हाडवैरीने पण त्यांना गोळीबार करण्यास मनाई केली. त्यामुळे सर्व हेलिकॉप्टर्स सध्या फक्त एकंदरीत शहरातील परिस्थितीचा आढावा घेत होते. त्यात एका न्यूज चॅनेलच्या हेलिकॉप्टरलाही स्वतःच्या संपूर्ण जबाबदारीवर परवानगी देण्यात आली होती.
"अरे, किशोर आता मला असं वाटतंय तुझ्या ऐवजी मी असायला हवे होते या हेलिकॉप्टरमध्ये वार्तांकन करायला!"
"कशाला? मरायला? तू आपली तिथेच स्टुडिओमध्ये बरी आहेस अनघा!"
"पण मला तुझी काळजी वाटतीय रे किशोर! आपल्याला लवकरच लग्न करायचे ना?"
"अगं, साखरपुडा तर करूया आधी? तो राहिलाय ना?"
"राहिलाय रे राजा, पण मला आता वाटतंय ही पत्रकारितेची नोकरीच नको. हे असले महायुद्ध? नको रे बाबा! आपण दोघे मिळून ही नोकरी सोडून देऊ, लग्न करू आणि शांततेत दुसरा काहीतरी बिझनेस करू!"
"अगं काय हे अनघा? लोक ऐकताहेत आपलं बोलणं!मला तर उलट हे युद्ध बघून हुरूप येतोय!!"
चॅनेलचा हेड पुन्हा कॅमेरासमोर आला आणि अनघाला म्हणाला, "अनघा बेबी! या गोष्टी नंतर! आधी बातम्या दे. अगं फक्त आपल्याच चॅनलला हेलिकॉप्टरमधून शूटिंग करून वार्तांकन करण्याची परवानगी मिळाली आहे. तुम्ही एका ऐतिहासिक युद्धाचे साक्षीदार आहात याचा अभिमान बाळगा, नोकरी सोडण्याच्या कशा बाता करता? नीट बातम्या दे नाहीतर मी तुम्हा दोघांना आताच नोकरीवरून काढून टाकेल!!"
"बरं बरं सर! नक्की! तर आपण बघत आहात की पुणे मनपा जवळ डिटेक्टिव्ह निगेटिव्ह लढतोय तर गणेशखिंड रोडवर हाडवैरी लढतोय. मुंबईतील स्थितीबद्दल लवकरच आम्ही आपल्याला अपडेट करू!"
हितेन यांच्या घरासमोरच्या उंच बिल्डिंगवरील टेरेसवरून अचानक दोन बाईकस्वारांनी हवेत उडी मारली आणि ते थेट हितेन यांच्या घरासमोर चाललेल्या गोंधळाच्या ठिकाणी येऊन थांबले!! ते बाईकस्वार संपूर्ण काळे बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेल्मेट घालून आले होते. तिथल्या गोंधळात प्रथम कुणालाच या बाईकसमोर आल्यावर काहीच उमगले नाही.
त्या बाईकस्वारांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. त्यात तीन सुरक्षा रक्षक मारले गेले. ते बाईक स्वार बाईकसह थेट घरात घुसले आणि त्यांनी दोघांनी मिळून हितेन यांना उचलले, एका बाईकवर मागे बसवले आणि दोन्ही बाईक परत घुं घुं आवाज करत घोंगावत बाहेर आल्या.
"खबरदार कुणी गोळी मारली तर! इथेच हितेन यांना आम्ही गोळी घालू. त्यांचा पेशीसमूह नाही मिळाला तरीही चालेल!"
असे म्हणून ते वेगाने जायला निघाले. एका दोघा सुरक्षारक्षकांनी त्या बाईकच्या टायरवर गोळी मारली पण त्या टायर्सवर गोळीचा काहीच परिणाम होत नव्हता.
स्वागतच्या स्पेशल फोनद्वारे हाडवैरी सुनिलशी संपर्क साधून होता.
सुनिल म्हणाला, "मी मुद्दाम न्यूज चॅनलला शूटिंगसाठी परवानगी दिली आहे. लाईव्ह न्यूज व्हायरसिक खंडाळ्याला त्याच्या गुहेत लाईव्ह बघत असेल. आपल्याला दोघा बाईक वाल्यांना खंडाळापर्यंत पोचू द्यायचं नाही आहे. पण हितेन त्यांना सामील आहे हे आपल्याला माहीत आहे हे पण वाईट टीमला कळू द्यायचं नाही आहे. नाहीतर तो काहीतरी दुसरा अनर्थ करेल. त्यामुळे आपण हितेनला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत असेच कॅमेरात दिसले पाहिजे. आणि आपण वाईटला सामील आहोत असे हितेन पण दाखवणार नाही कारण त्याला माहिती आहे की न्यूज चॅनल शूटिंग करत आहेत. राऊटरन आणि वायफायर या दोघांना त्यांच्या मागे बाईकने पाठवा, बाईक चालवण्यात एक्सपर्ट आहेत ते!!"
असे म्हणून सुनिल हत्तींना मारायला एकेक शस्त्र हॅट मधून काढत होता आणि त्यांना जखमी करत होता. सुनिल अँटिक्लिप वर बसला होता. तो जमिनीपासून बराच वर होता आणि उडणारे आणि जमिनीवरचे अशा विविध प्राण्यांशी लाल वर्तुळ पाहून मारा करत होता म्हणजे एका ग्रुप मधला एक मानवी प्राणी किंवा पक्षी मेला की मोशन सेन्सरद्वारे त्यांना कॉपी करणारे यांत्रिक प्राणी पक्षी आपोआप नष्ट होऊन खाली पडून जात होते. दरम्यान आकाशात सुनिलला घेऊन उडत असलेल्या अँटिक्लिपच्या वरच्या बाजूला दोन ढग आले, म्हणून अँटिक्लिप आकाशात पंख फडकवत त्याच जागी स्थिर झाला. ढगांतून आवाज आला तेव्हा सुनिलने वर पाहिले.
"सुनिल, आम्ही आता इथेही आलोत, तिथे निद्राजीताला मदत करणे सुरूच आहे. आमच्यापैकी काहीजण आता ढग रूपाने वेगाने प्रवास करत पुण्याला आलो आहोत!", ढग रूपातील जलजीवा म्हणाला.
"वाह! ग्रेट. प्लिज इथे मदत करा. जमल्यास तिकडे हाडवैरीच्या मदतीला जा! आणि एक जण इथे पुण्यात आणि मुंबईत मी जिथे जिथे झाड मानव छोट्या स्वरूपात ठेवले आहेत, त्यांच्यावर झिरकोडीयम वायू हवेतून फवारून त्यांना मूळ मोठ्या आकारात आणा."
थोडक्यात सुनिलने गणेशखिंड रोडवरील परिस्थिती समजावून सांगितली आणि ट्री मेनचे बोन्साय जिथे ठेवले होते ती ठिकाणं सांगितली. मग ढग रूपातले जलजीवा पाऊस रूपाने हत्तीच्या समोर पडू लागले आणि एकेक पावसाचा थेंब एकत्र येत येत त्याचा पाणी मानव तयार झाला आणि मग तापमान कमी होऊन ते मानव गोठले आणि बर्फ रुपातील जलजीवा तयार झाले. मग एकेक हत्तीच्या अवतीभोवती वाफ गुंडाळली जाऊन ती पटकन त्याचा बर्फ होऊन एकेक हत्ती बर्फात बंदिस्त होऊ लागला.
एका जलजीवाला सुनिलने हॅट मधून काढून झिरकोडीयम लिक्विड दिले. मग तो जलजीवा दोन्ही हात बर्फ़ाचे आणि उरलेले शरीर वाफेचे आशा स्वरूपात रूपांतरित झाला. बर्फाळ कडक हातात त्याने लिक्विड झिरकोडीयम धरून ठेवले आणि उरलेल्या शरीरातील वाफेद्वारे ठिकठिकाणी उडत जाऊन पाण्याच्या रुपात खाली पडतांना स्वतःमध्ये झिरकोडीयम मिक्स करून तो बोन्साय ट्रीमेनवर पाऊस रूपाने पडू लागला. मग तो पुन्हा संपूर्ण ढग होऊन वेगाने उडत मुंबईला गेला. तिथेही त्याने तेच केले. त्यामुळे सगळे छोटे ट्रीमेन हळूहळू मूळ रुपात मोठे होऊ लागले. त्यांची मुळं ही पाय बनली तर फांद्या त्यांचे हात बनले. मग एकेक ट्रीमॅन एकेका मांजराला आपल्या फांद्यांच्यामध्ये गुंडाळून फेकू लागला. इकडे पुण्यात ट्रीमेन हत्तींना आपल्या फांद्यांममध्ये ओढून जखडून ठेऊ लागले. झाडांच्या पानांमध्ये उडणारे कीटक अडकू लागले.
"याला म्हणतात स्वागत टीमचा धमाका! लगे रहो झाड मानव!", सुनिल म्हणाला आणि तेवढ्यात त्याला निद्राजीताचा कॉल आला.
"अरे सुनिल, प्रॉब्लेम झालाय!"
"काय आता आणखी नवीन? ट्रीमेनची मदत होत नाही आहे का?"
"होतेय, त्यांची आणि जलजीवांची चांगली मदत होते आहे, पण या सर्व गोंधळात रजक हडपकर टेरेसवरून एका हॉट एयर बलून मध्ये बसून उडत निघालाय! त्याच्या सोबत बलून मध्ये दोन जण आहेत आणि त्यांनी अनाऊन्समेंट स्पीकरद्वारे आम्हाला सांगितले आहे की आम्ही यांना कीडनॅप करतोय! आम्हाला मारण्याचा किंवा आमचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तर रजक यांना आम्ही गोळी मारू! आम्ही जमिनीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती पण आम्हाला काय माहित की ते असे हॉट एयर बलून मधून येणार ते?"
"तो बलून आकाशातून घराकडे आला तेव्हा तुम्हाला दिसला का?"
"नाही. कदाचित जवळच्या एखाद्या दुसऱ्या बिल्डिंगमधून ते दोघेजण बलून मधून बसून अचानक रजक यांच्या टेरेसवर उतरले असावे! आता काय करायचं सुनिल?"
"इथेही हितेन यांचं अपहरण झालंय. टीममधील दोघांना मी त्यांच्या मागावर पाठवलं आहे! तू काळजी करू नको. आपल्याला माहीत आहे की ते रजकला काही करणार नाहीत पण आपल्याला रजकला खंडाळ्याला वाईटच्या गुहेत त्यांना पोहोचू द्यायचे नाही आहे! मी माझ्या दूरदृष्टीने अधूनमधून त्या बलूनचा पाठलाग करतो आणि ते काय चर्चा करतात ते ऐकण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत तू प्राण्यांशी लढत रहा आणि सामान्य लोकांना वाचव!"
"ठीक आहे सुनिल!"
तेवढ्यात सुनिलला सायलीचा कॉल आला.
"प्रयोग यशस्वी झालाय, डियर! बिग सक्सेस!"
^^^