वाचकहो,
सर्वप्रथम आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार! ऑक्टोबर ते डिसेंबरच्या अंकाचा विषय होता ‘भारतीय समाज आणि स्त्रियांबद्दलची मानसिकता.’ या विषयावर अनेक वाचकांचे साहित्य आले. हे दर्जेदार साहित्य वाचकांना विचार करायला भाग पाडेल अशी अपेक्षा!
दिवाळी अंकांच्या काळात आरंभने मात्र दिवाळी अंक प्रकाशित केला नाही. त्या ऐवजी अंकासाठी सदर विषय निवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे स्त्रीयांवरचे वाढणारे अत्याचार. लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराच्या प्रमाणात वाढ झाली, कोरोना संकटाच्या काळातही बलात्कार, अत्याचार सुरुच राहिले. अत्याचारांच्या वाढत्या सत्रावर ठोस उपाय काय हे कदाचित आपण कोणीच सांगू शकणार नाही. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या विषयावर विचारमंथन तसंच चर्चा करणे गरजेचे आहे. ही चर्चा आरंभच्या माध्यमातून घडून यावी, अशी आमची इच्छा होती. अशाच प्रकारच्या चर्चेतून या विषयावरचा उपाय मिळू शकतो, असा आम्हाला विश्वास वाटतो.
आरंभ केवळ मनोरंजनासाठी मर्यादित न राहता विचारमंच व्हावा, त्यातून समाजाला प्रेरणा मिळावी यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. या दिवाळीनिमित्त आम्ही आरंभला विचारमंच बनवण्याचा संकल्प केला आहे. सुजाण आणि सजग नागरिक असलेले आमचे वाचक कायम आमची साथ देतीलच, असा ठाम विश्वास आम्हाला आहे. याच विश्वासामुळे यंदा दिवाळी अंक प्रकाशित न करता सामाजिक विषयावर, समस्येवर समाजात विचारविमर्श घडवून आणण्याचा छोटासा प्रयत्न आरंभने केला आहे आणि इथून पुढेही करत राहणार आहोत.
या अंकाचे आरंभयात्री प्रसिद्ध वृत्तनिवेदिका ज्योती अंबेकर यांनी आपल्याशी संवाद साधला आहे. यात त्यांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला आहे. आपले अनुभव, विचारांनी त्यांनी हा अंक सजवला आहे. तेव्हा हे सदर आवर्जून वाचावे असे आहे.
या विचारमंचाला तुम्ही आतापर्यंत साथ देत आला आहात. अशीच साथ यापुढेही द्याल अशी आम्ही अपेक्षा करतो. अंकाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला अधिक चांगला आणि दर्जेदार वाचनानुभव देऊ शकू.
धन्यवाद.