सुप्रिया ताम्हाने
सखे..
गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी
शुभेच्छा आणि सन्मान देत
पार पडला गं महिला दिन
आता आज उठ, लाग कामाला
परवडणार नाही इतकी चैन,
कालचं कोडकौतुक
पुरे नाही का झालं?
आज मात्र चित्त
पुन्हा भानावर आलं?
दुर्गा तू, पार्वती तू
मीराची भक्ती तू,
कोण म्हणे ज्योत
कोण म्हणे पणती
तर कुणासाठी ज्वाला तू.
सगळं ऐकून सारं पाहून,
किती खुश झालीस??
वर्षभर गाडा ओढायला
पुन्हा तयार झालीस
तुझी स्वप्न, तुझ्या आशा, आकांक्षा
ठेव गुंडाळून माळ्यावरती
तुलाही आवडतच की म्हणून घ्यायला
यशस्वी पुरुषा मागची स्त्री
खोच तुझा पदर
ओढणी टांग खुंटीला
सज्ज हो पुन्हा
सारे घाव सोसायला
आई बहीण मुलगी बायको
बनून जप सारी नाती
पण शेवटी तू एक बाई आहे
याची बाळग भीती
खूप शिक, खूप नाव, पैसे कमव
घे उंच भरारी,
तरीही पावलोपावली होणारा अपमान,
अन बलात्कार, हिंसाचार या साऱ्याची,
ठेव मनाची तयारी
दर वर्षी याच दिवशी
मनाशी ठरवत असतेस
बस झालं, खूप केलं
स्वतःसाठी जगेन म्हणतेस
नेहमीच तयार असतेस
साऱ्या अपेक्षा झेलायला
खरं सांग जमलंय का ग
स्वतः साठी जगायला?
पुन्हा पुढल्या वर्षी ही
महिला दिन साजरा होईल
आणि तुझ्या मधली स्त्री मग
पुन्हा हुरळून जाईल