तुम्हाला स्वत:च्या ध्येयाची प्रतारणा नाही ना करावयाची? त्या ध्येयाशी एकनिष्ठ राहवयाचे आहे ना? तर मग तडजोडीसाठी अवकाश आहे कोठे? तडजोड म्हणजे काय? दोन परस्पराविरुध्द इच्छातील सहकार्य.  देवाणघेवाण हाच तडजोडीतील स्पष्ट अर्थ नाही का? परंतु आपणास जर एकच ध्यास व एकच वेड आहे तर तडजोड कशी होणार? आपण आता अशा शपथा घेतल्या पाहिजेत की, कोणतेही काम आम्ही अर्धवटपणे करणार नाही. धरसोडीने, तोंडदेखले करणार नाही. दुबळेपणाने करणार नाही. इकडेतिकडे रीतीने, हेही घेऊ तेही घेऊ, अशा रीतीने करणार नाही.  आपण आपली जीवने हसत हसत थोर ध्येयासाठी देऊन टाकू या. हाच जन्म काय, पण असे शेकडो जन्म घेऊ व ध्येयासाठी पुन्हा सहज लीलेने देऊन टाकू.

आता आपण व आपले काम या दोनच गोष्टी. मी व माझे ध्येय, मी व माझे कर्तव्य हेच लग्न लागू दे. ह्या तुमच्या एकांतात तिसर्‍या कोणाला येऊ देऊ नका. आपले काम म्हणजे आपले सर्व काही. हाच आपला धर्म मला हे माझे कर्म पार पाडण्यात जास्त भीती कशाची बरं वाटते? मरणाची का? ते पाहा मरण समोर उभे आहे व मला भिववू पाहत आहे त्या मरणाच्या पलीकडे काय आहे हे पाहण्याची मला छाती होत नाही. परंतु असे करून कसे चालणार? हे मृत्यो. आलो; तुला कवटाळण्यासाठी हा पहा मी येत आहे. तुझ्या पलीकडील अनंत जीवन पाहण्यासाठी हा बघ मी निर्भय होऊन आलो!

अमेरिकन कवी लॉवेल विचारतो'' सत्य हे सदैव फासावरच लटकावले जाणार का? आणि असत्यच नेहमी सिंहासनावर बसणार का? धर्माला सूळ व अधर्माला सिंहासन?'' असा प्रश्न विचारून कवीच एकदम उचंबळून  म्हणतो ''नाही, फास हाच भविष्यकाळाचा स्वामी आहे. फास भविष्यकाळाला बनवील. बदलील. आपल्या इच्छेप्रमाणे त्याला आकार देईल, त्या अंधूक अज्ञाताच्या पलीकडे, त्या अंधारात स्वयं परमात्मा उभा आहे. व अंधारातून आपल्या भक्तांकडे डोळे लावून बसला आहे त्याचे भक्तांकडे पूर्ण लक्ष आहे.  हा वीराचा वेदान्त भव्य आहे. दिव्य आहे हे निर्भयतेचे तत्तवज्ञान आहे. विजयाचे तत्त्वज्ञान आहे ही कर्मयोगाची श्रुती आहे, त्यागाचे गान आहे, आमच्यामध्ये लपून बसलेल्या दिव्य तत्वा! ऊठ-जागृत हो तू जागृत झाल्यावर सर्व काही आम्हास शक्य आहे. आता अशक्य शब्दच नाही जयापजय लाभालाभ समान लेखून ही पहा मारणमरणात मी उडी घेतली.

परंतु कसे लढावयाचे? कर्म करून, सेवा करून सेवा हेच आपले शस्त्र हेच आपले साधन. तो खराटा घ्या व रस्ता साफ करावयास लागा. ते खराटा, तो झाडू तो का तुच्छ आहे नाही. तो आपल्या लढाईतील भगवा झेंडा होय. लोकांची मने झाडा. गावातील रस्ते झाडा, सेवेला वाहून घ्या सेवा हे महान साधन आहे. सेवेच्या महनीय साधनेने आपण शुद्ध होतो.  चारित्र्यवान होतो. सेवा हे लोककल्याणाचे साधन आहे व आत्मकल्याणाची ती साधना आहे. सेवेने अहंकार झडून जाईल व जीवन निर्मळ होईल.  आणि निर्मळ झाल्यावर, चित्ता शुध्द झाल्यावर, निर्विकल्प समाधी पर्यंतही सहज उडी मारू; परब्रह्यात बुडून जाऊ. चारित्र्य, शील म्हणजे काय? चारित्र्य म्हणजे संयम. म्हणजे स्वत:ला विशिष्ट दिशेने घेऊन जाणे. एकाच विशिष्ट दिशेने घेऊन जाणे. एकाच विशिष्ट दिशेने सतत जाणे. एकच प्रयत्न सतत करणे महणजेच एकाग्रता आणि एकाग्रता म्हणजेच स्वत:ला विसरणे आणि म्हणजेच समाधी! निर्दोष सेवा करीत चला की समाधीजवळ जाऊन पोचाल; त्या अव्यंग निजधामाकडे जाल; असा हा दिव्य पंथ आहे.  त्याचा अवलंब करून निर्दोष सेवा करावयास निघू या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel