मुक्तविहारी परळी वैजनाथ
शेतातल्या मातीवाणी
रंग माझा छान गं
तुझा रंग गव्हावाणी
गोरा गोरापान गं
ज्वारीच्या दाण्यापरी
तुझे टपोरे गं डोळे
बघ माझ्या डोळ्यांत
खेळू डोळे डोळे
शेंग जशी चवळीची
तुझे हात पाय
माझ्याकडे बघून अशी
करशी हाय हाय!
तुझे ओठ जणू
गुलाबाची पाकळी
माझ्याकडे बघून तुझी
खुलली कळी
मोगऱ्याचा सुगंध
दरवळे की आज
तुझा देह शेवंती
चंद्रमुखी साज!
जाई जुई चमेली
प्राजक्ताचे फूल
कानामंधी शोभते
डोलणारे डूल
तुझे हसू गाली जसे
गोड मधुघट
मधमाशी होऊनिया
भरले पटापट
तुझी वेणी कशी बघ
वळवळे नागीण
तुझ्यापुढे बसून मी
वाजवितो बीन
चालण्याची लकब
मला पाडिते भुरळ
हृदयात बाण माझ्या
घुसला सरळ!
तुझ्या भेटीचा हा
घडला प्रसंग
ऐकणारे पाहणारे
झाले किती दंग
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.