प्रकरण चार

 

बाहेर आल्यावर पाणिनी ने सौम्या ला फोन लावला.  “ जेवलीस का सौम्या ?”

“ नाही,नाही.तुम्ही मला थांबायला सांगितलं होत ना?”

“ मी जेवायलाच गेलो होतो.” पाणिनीम्हणाला.

“ हे बर आहे तुमचं.मला थांबायला........”

“ आणि जेवणा ऐवजी खून सामोरा आला.”पाणिनीम्हणाला.

“ कोणाचा खून झाला?”

“ पद्मनाभ पुंड ”
“ अरे देवा ! ” सौम्या उद्गारली.“ असं कसं काय झालं पण? ”

“ काय माहिती ? झालं खर ” पाणिनीम्हणाला

“ आपलं अशील कोण आहे? ”

“ कोणीच नाही. अशिला शिवाय आपण खुनाचा खटला घेऊ शकत नाही का? ” पाणिनीने विचारले.

“ बहुतेक नाही घेऊ शकत.” सौम्याउत्तरली.

“ कनकला वर्तमान पत्र वाल्यांकडे पाठव, त्यांचे कडून पुंड च्या खुना बद्दल काही माहिती मिळाली तर काढायला सांग. ”

“ सर, हिशोबाच्या दृष्टीने हा खर्च कोणत्या तरी अशिला कडून वसूल करायला लागेल.कोणावर टाकू हा?” सौम्याने विचारले.

पाणिनीला असल्या गोष्टीत रस नसायचा.  “ टाक  त्या राजे बाई च्या नावाने.”

“ तू आता जा बाहेर जाऊन खावून  ये ”पाणिनी तिला म्हणाला आणि आपल्या ऑफिस ला यायला निघाला.

त्याची अपेक्षा होती की सौम्या ऑफिस ला नसेल पण ती जेवायला बाहेर गेली नाही हे बघितल्यावर त्याला आश्चर्यच वाटले.पाणिनीने तिला त्याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली “ मी निघालेच होते जेवायला ,तेव्हढ्यात एक पांढरे कपडे घातलेली तरुणी ऑफिसात आली आणि तुम्हाला तातडीने भेटायचय अस सांगू लागली .तिला सांगितले मी की सोमवारीच भेटाल तुम्ही परंतू तिचा हट्टच होता की भेट घेणारच म्हणून ”

“ आता वेळ नाही आपल्याला दुसरे कोणतेही प्रकरण घेण्यात. तू तिला वाटेला लाव.” पाणिनीम्हणाला.

“ त्या तरुणीचे नाव काया प्रजापति आहे.” सौम्या म्हणाली

“ काहीही असुदे ......... थांब ,थांब सौम्या,प्रजापति म्हणजे, कुक्कुटपाल कंपनीशी संबंधित तर नसेल? ” पाणिनीने विचार केला.

“ म्हणून तर मी थांबवलं तिला.” सौम्याम्हणाली.

“ बोलू आपण तिच्याशी. ती बाहेर आहे? ”

“ बसवूनच आल्ये मी तिला.” सौम्या.

“ एकदम अधीर आहे ? ”

“ प्रचंड. पाठवते तिला मी आत.पण त्या आधी मला सांगा सर, मिसेस पुंड ने , नवऱ्याच्या खुनाची घटना कितपत स्वीकारली? ”

“ मी तिच्या स्वयंपाक घरात होतो तेव्हा,तारकर ने जेव्हा तिला ही बातमी दिली तेव्हा ती किंचाळल्याचे मी ऐकले.पण त्या आधी मी तिच्या दाराची बेल वाजवली आणि तिने दार उघडले, तेव्हाच तिचे डोळे मला रडल्यासारखे दिसले.तिला आधीच त्याच्या खुनाची कल्पना असावी.”पाणिनीम्हणाला.

पाणिनीने नंतर तिला सर्व हकीगत सांगितली.सौम्या प्रजापति ला घेऊन आत आली.

“ मिस्टर पटवर्धन, माझ्या वडिलांचे मत आहे की  कुक्कुटपाल कंपनीच्या ट्रक ची भानू  च्या गाडीला जी  धडक बसली, ते प्रकरण तुम्ही भानू चे वकील म्हणून फारच कौशल्याने हाताळलेत.”  काया प्रजापति म्हणाली.

“ मला वाटत तुम्ही एवढेच सांगण्यासाठी एवढ्या लांब आणि तातडीने आल्या नाहीत.” पाणिनीम्हणाला.

“ वडिलांचे म्हणणे आहे की भविष्यात काही अडचण आली तर तुम्ही आमच्या बाजूने वकील म्हणून उभे राहावे., म्हणजे विरुद्ध बाजूने वकिली घेण्या ऐवजी.”

“ तुमचे वडील कुक्कुटपाल कंपनीशी संबंधित आहेत? ” पाणिनीने शंका  विचारली.

“ आहेत पण अप्रत्यक्षपणे.” ती म्हणाली.

“ वडलांचं नाव काय आहे तुमच्या? ”

“ रेयांश प्रजापति ”

“ तुम्ही माझ्याकडे आलाय त्या अर्थी ते सध्या काही अडचणीत आहेत?” पाणिनीने विचारले.

“ हो.माझ्या वडिलांचा एक सहाय्यक आहे,पुंड नावाचा, माझ्या वडलांच्या मालकीच्या बोटीवर त्याचा खून झालाय. त्यांची अवस्था फार बिकट झाली आहे.त्यांना मदत करा तुम्ही.”

“ जेव्हा खून झाला त्यावेळी तुझे वडील बोटीवर होते?”पाणिनीने विचारले.

“ बोटीवर नव्हते. पण तीच मोठी समस्या आहे.म्हणजे ते बोटीवर नव्हते पण त्यांना लोकांना असे भासवायच आहे की ते बोटीवर होते.”

“ कुठे आहेत ते अत्ता?”

“ मला खात्रीलायक पणे नाही सांगता येणार.”

“ तुम्ही काही उत्तर देण्यापूर्वीच मी सांगतो की तुमच्या वडिलांचे वकील पत्र मी नाही घेऊ शकणार.”

“ कारण काय ?”

“ दुसऱ्या अशिलाच्या बाजूने मी आहे.आरक्ता राजेच्या ऐंशी एकर जमिनीच्या विषयात.”पाणिनीम्हणाला.

“प्रणव पालेकर   हाच खरा मालक आहे ,कायद्याने.” ती म्हणाली

 

“ अहो त्याच्या ताब्यात आहे ती मिळकत.” काया प्रजापति म्हणाली.

“ बळजबरी  ने घेतलेली ” पाणिनीम्हणाला.

“ तुम्हाला किती जागा  हवी आहे ? ” अचानक तिने विचारले

“ भरपूर हवी आहे.” पाणिनीम्हणाला.

“ जमीन  म्हणून त्याला  .......”

“ काही किंमत नाही , मला माहीत आहे. पण  नियोजित धरण क्षेत्रातील जमीन  म्हणून नक्कीच आहे.”पाणिनी ,तिचे बोलणे मधेच तोडत म्हणाला.

“ धरण क्षेत्रातील जागा हा विषय कुणाच्या डोक्यातून आला मिस्टर पटवर्धन?”

“ हा सुचलेला विषय नाही तर वस्तुस्थिती आहे.” पाणिनीम्हणाला.

तिने पाणिनी कडे नजर रोखून पहिले.

“ आरक्ता राजे ना त्या जमिनीचे एक कोटी मिळाले पाहिजेत.” पाणिनीम्हणाला.

“ का ssss य ! ” ती किंचाळली. “ हे अशक्य आहे. केवळ अशक्य.”

“ त्यामुळेच मी तुमच्या वडलांची वकिली घेऊ शकत नाही असे म्हणालो ”

“ मला तुम्हीच हवे आहात वकील म्हणून. आपण दोन्ही विषय वेगवेगळे ठेऊ या ना ! तुम्ही जर त्यांची वकिली स्वीकारली तर चर्चेमध्ये तडजोड करा.” तिने तोडगा काढायचा प्रयत्न केला.

“ वडलाना खूप कठीण जाईल माझ्याशी तडजोड करणे.”

“ मला त्याचा अंदाज आला आहे.   अत्ता   ” ती म्हणाली.

“ तुम्हाला वडलांच्या वतीने बोलण्याचा अधिकार आहे ?”पाणिनीने विचारले.

“ अत्ता सारख्या तातडीच्या प्रकरणात आहे मला अधिकार.”

“ या बाबतीत कोणताही गैर समज आपल्यात असता कामा नाही.”

“ नाही होणार गैर समज ”

“ मी काय करणे अपेक्षित आहे तुम्हाला?”

“ माझ्या बरोबर तुम्ही येऊन एकत्रितपणे आपण वडलाना शोधावे ” ती म्हणाली.

“ काय करताहेत वडील सध्या? ”

“ एका अति महत्वाच्या प्रकल्पावर काम करत आहेत. ते कुठे आहेत ते कोणालाच समजणे हितावह नाही. त्यातील गुप्तता राखली जाणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर मला सांगा की ते कितपत अडचणीत येऊ शकतात?” तिने विचारले.

“खुनात गोवले जाण्याच्या दृष्टीने ? ” पाणिनी ने विचारले

“ हो, त्या दृष्टीने. कसं आहे पटवर्धन, दर शुक्रवारी वडील त्यांच्या बोटीवर मुक्कामाला जातात.नदीच्या पात्रात जिथे भरती येते त्या जागी बोट नांगरली जाते.मग एक रात्र  ते तिथे बोटीवर जगा पासून दूर एकांतात राहतात.गेले कित्येक वर्षे ते अस करत आलेत. या शुक्रवारी सुद्धा ते बोट घेऊन गेले होते आणि नेहेमीच्या ठिकाणी त्यांनी ती लावली होती, पण त्यांनी त्या रात्री तिथे बोटीत वस्ती केली नाही. ते एका मोठ्या प्रकल्पावर  अत्यंत  गुप्त पणे  काम करत आहेत  त्यामुळे त्यांचा ठाव ठिकाणा कोणाला कळू न देण्याचा ते प्रयत्न करत आहेत.”

“ ते कुठे आहेत याची कल्पना आहे तुम्हाला? ” पाणिनीने विचारले.

“ साधारण माहिती आहे. आपण त्यांना पोलीस तिथे पोचण्यापूर्वी शोधून काढणे आवश्यक आहे.”

“  का? ”

“ म्हणजे बोटीवर काय घडलंय त्यांना सांगता येईल.” काया म्हणाली.

“ पोलीस सांगतीलच की ”

“ ते त्यांना प्रश्न विचारून जाळ्यात अडकवतील आणि खून झाला तेव्हा ते बोटीवरच होते असे त्यांच्या कडून वदवून घेतील , वडील ते नाकारू शकणार नाहीत कारण आपण खरेच कुठे होतो याची माहिती गुप्त असल्याने ते देऊ शकणार नाहीत.”

“ म्हणून ते असे सांगतील की खून झाला तेव्हा ते बोटीवर होते? ” पाणिनीने विचारले.

“ हो.ते सांगण्यावाचून त्यांना गत्यंतरच नाही म्हणूनच आपण त्यांना पोलीस येण्यापूर्वी  भेटलो तर पोलिसांना काय सांगायचे याबद्दल ते ठरवू शकतील.”

“ काहीतरी थापा मारू शकतील , असंच ना? ” पाणिनीने विचारले.

“ थापा नाहीत. सत्यच सांगतील  पण संपूर्ण सत्य नाही कदाचित सांगू शकणार.जेवढे शक्य तेवढे सांगतील.” काया म्हणाली.

“ मला आणखी काही माहिती लागेल तुझ्या कडून.वडलांची केस घ्यायची की नाही हे ठरवायला.” पाणिनी म्हणाला.  “ वडील काय करताहेत नक्की? ”

“ त्यांच काम राजकारणी लोकांशी संबंधित आहे. धरणाच्या क्षेत्रात येणाऱ्या जमिनी बद्दल कुठल्या तरी राजकारण्याला लटकवण्याचा डाव खेळला जातोय.वडील त्या बद्दल मूलभूत  माहिती जमा करायचे काम करताहेत.म्हणूनच काम पूर्ण व्हायच्या आधी त्याची माहिती बाहेर फुटणे म्हणजे जिवाशीच खेळ आहे. ”ती म्हणाली

“ मी नेमके काय करावे असे तुला वाटतंय? ”पाणिनी ने विचारले

“ माझ्या वडिलांना पूर्ण संरक्षण देणे, वकील या नात्याने. फक्त त्यांनाच नाही तर पर्यायाने सर्वच कुटुंबाला.”

“ आपण काय करणार आहोत? म्हणजे सुरुवात  कधी आणि कुठून करायची? ”पाणिनी ने विचारले

“ तुम्ही बाहेर निघायची तयारी करा , लगेचच. कुठे जायचंय ते मी अत्ता नाही सांगू शकणार.” काया म्हणाली.

“ आपण परत कधी यायचं? ”पाणिनी ने विचारले

“ वडील भेटले की लगेच.”

 ते बाहेर पडले.पाणिनी ने सौम्या ला हाक मारली.कायाला न दिसता,डावा डोळा मिचकावला. “ आम्ही बाहेर जाऊन येतोय . तू तुझी वेळ झाली की खाऊन घे., खरं तर जेवायची वेळ टाळून गेली आहे आपली.”

“तुम्ही परत कधी येणार सर? ” सौम्याने विचारलं.

पाणिनी बोलायच्या आधी,कायाने  ठाम पणाने उत्तर दिले.  “ अनिश्चित आहे ते.”

( प्रकरण चार समाप्त.)

 

प्रकरण पाच.

काया प्रजापति पाणिनी पटवर्धन ला घेऊन एका इमारतीच्या पार्किंग जवळ आली.

“ इथेच असणार ”ती म्हणाली.

“ कोण ?  वडील ? ”

“ नाही , माझ्या वडलांचा उजवा हात,जतीन भारद्वाज ”

“ त्याला खुना बद्दल माहिती आहे? ” पाणिनी ने विचारले

“ हो.”

“ तू अत्ता कुठे चालल्येस हे पण माहिती आहे? ”

“ कार मधे टाकी भरून पेट्रोल भरायचं आणि वडील किंवा मी सांगू तिकडे जायचं या व्यतिरिक्त त्याला काही माहिती नसते.” कायाने उत्तर दिले. तेवढ्यात एक गाडी रोरावत आली आणि त्यांच्या जवळ येऊ लागली.आतील माणसाने गाडी पार्कींग चालवणाऱ्या माणसाच्या ताब्यात दिली आणि कुपन घेतले.

“आलाच जतीन ” ती म्हणाली.  “ त्याच्या कडे फारसे लक्ष देऊ नका. आपण एखादी टॅक्सी बघत आहोत असं अविर्भाव करा.”

“ का एवढा गूढ पणा? ”पाणिनी ने विचारले

“ मी नाही सांगू शकत आत्ताच. मी सांगेन तसे करा.”

जतीन गाडीतून उतरला.पटवर्धन आणि काया उभे होते त्यांच्या जवळून पुढे गेला. जाताना पार्किंग चे  कुपन पटकन काया कडे दिले. पण त्याने कोणतीही ओळख दिली नाही.

“ कोणी याचा पाठलाग करतय का बघू या.” काया म्हणाली.  “ तो बघा गाडी लाऊन उतरलेला माणूस जतीन च्या दिशेनेच येतोय.”

“ एवढी गर्दी आहे इथे, प्रत्येकाच्या मागून इतर माणसे येतंच असतात. ते सगळे काय त्यांच्या पुढे असणाऱ्या माणसांचा पाठलाग करत असतात की काय?” पाणिनी ने विचारले.

काया पाणिनीच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या भानगडीत नाही पडली.जतीन कोपऱ्या पर्यंत जाई पर्यंत तिने वाट पहिली, नंतर पार्किग चालवणाऱ्या दुसऱ्या माणसाच्या हातात तिने पार्किन चे कुपन देऊन तिची गाडी बाहेर काढायला सांगितली.गाडी बाहेर आल्यावर ती ड्रायव्हर च्या सीट वर बसली .पाणिनीतिच्या बाजूला बसला. तिचे गाडी चालवण्याचे कसब कौतुकाने बघत होता.

“ जरा खात्री करून घेते, मी, पाठलाग होत नाहीना याची.” ती म्हणाली आणि अचानक तिने गाडी डावीकडे वळवली. “ करतयका कोणी पाठलाग ? ” तिने पाणिनी ला विचारले.

“ करत असतं तर एव्हाना आपल्याला धडकला असता तो.” पाणिनी म्हणाला.

त्यानंतर अनेकदा तिने विचित्र पद्धतीने गाडी चालवून पाठलाग होत नाही याची खात्री केली.

म्हापसा  आणि सालीगाव या दोन गावांच्या मधे एका ठिकाणी तिने गाडीचा वेग कमी केला आणि एका मोटेल मधे गाडी आणली.ते एक बंगले वजा मोटेल होते.निळ्या समुद्राच्या आणि हिरव्या नारळाच्या पार्श्वभूमीवर बंगल्यांच्या छ्तांचा गडद लाल रंग उठून दिसत होता.

“ इथे उतरणार आहोत आपण ? ”  पाणिनीने तिला विचारलं

“ हो. ” ती गाडीतून उतरली.पटवर्धन आणि ती मोटेल च्या रिसेप्शन मधे आले.

“ तुमच्या इथे मिस्टर प्रबोध या नावाने बुकिंग आहे ना? ” तिने विचारलं.

स्वागतिकेने आपले रजिस्टर चाळले. “ चौदा नंबर मधे आहेत ते. पाच जण आहेत.”

स्वागतिकेचे  आभार मानून ते दोघ चौदा नंबरच्या दिशेने निघाले.दारावर तिने टकटक केले.आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तिने दाराची मूठ फिरवली.दार उघडेच होते.आत कोणाचीच चाहूल नव्हती.

 “ आपण आत जाऊया.” ती म्हणाली.

“ कोणी आत आहे ? ” पाणिनीने मोठ्या आवाजात  विचारले.

आत कोणीच नव्हते.पाणिनीआणि काया आत गेले.एका लहान टेबला भोवती तीन खुर्च्या अर्ध वर्तुळात ठेवल्या होत्या.चार पाच अॅश ट्रे टेबलावर होते ते सगळे सिगारेट च्या थोटका ने भरले होते.मद्याचे  चार पाच रिकामे ग्लास ही टेबलावरहोते.सर्व खोलीभर सिगारेट च्या धुराचा आणि मद्याचा वास दरवळत होता.

“ मला काळजी वाटायला लागल्ये.ते निघून गेले असावेत.” काया म्हणाली.  “ आत जाऊन पहिले पाहिजे काही बॅगा किंवा सामान,वस्तू आहेत का .”

त्यांनी आत जाऊन पहिले पण काहीच नव्हते.काया ने बाथ रूम तपासले तिथे बेसिन वर दाढीचे समान होते,एक रेझर आणि दाढीचा साबण लागलेला ब्रश होता. “ माझ्या बाबांचा आहे हा ! ” काया एकदम उद्गारली.

“ अजून रेझर आणि ब्रश ओला आहे.त्या अर्थी जवळच कुठेतरी जाऊन येणार असतील.” पाणिनीम्हणाला.

“ तसं नाही होणार.त्यांची बॅग दिसत नाहीये त्या अर्थी ते गेलेत निघून.ते प्रचंड विसराळू आहेत.” ती म्हणाली.

“ तुला का वाटतंय की ते परत नाही येणार म्हणून? ”

“ ज्या कारणासाठी ही जागा बुक केली होती ,तो हेतू सध्या झाला असावा म्हणून ते निघून गेले सर्व.ती सर्व मोठी राजकारणी मंडळी होती आणि ते ज्यासाठी जमले होते ते मला माहीत आहे पण त्याची पुसटशी कल्पना जरी कोणाला आली ना तरी इथे जमलेल्या मंडळींचे राजकीय भवितव्य संपुष्टात येईल त्यामुळे मी तुम्हाला पण नाही सांगू शकणार.” काया म्हणाली.

“ तुझा निर्णय आहे तो, आणि तुझीच माणसे आहेत त्यात. पुढे काय करायचं आहे मी? ” पाणिनीने विचारले.

“ आता काही करण्यासारखं नाहीच राहिले.”ती म्हणाली.  रेझर आणि ब्रश तिने हातात घेतला आणि धुवायला लागणार तेवढ्यात तिच्या मनात काय आले पण अचानक तिने विचारले, “ बाबांनी तो स्वच्छ पण नाही केला. मी आहे तसाच ठेवणे आवश्यक आहे की धुवून घेऊ? ”

“ ते बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे.” पाणिनीगूढ पणे म्हणाला.

“ म्हणजे कशावर अवलंबून आहे नेमके  ?”

“ वडील इथे होते हे तुला सिद्ध करायचे आहे का? त्यावर ते अवलंबून  आहे.” पाणिनी म्हणाला.

“ डॅड कधीच मान्य करणार नाहीत की ते इथे होते.”

“ कारण काय ”पाणिनी  ने विचारले.

“ तुम्हाला मगाशीच सांगितलंय.”

“ पण त्यात तुझ्या वडलांच्या कारकीर्दीला काहीच धोका नाहीये ना? ” पाणिनी  ने विचारले.

“ कशा मधे धोका नाहीये ? ”

“ ते इथे असल्याचे कोणाला कळले तर ” पाणिनी म्हणाला.

“ वडलाना नाही पण मी इतरांचा विचार करत्ये.”

“ वडिलांनी त्यांची नावे जाहीर केली नाहीत तर काय अडचण आहे? ”पाणिनी  ने विचारले.

“  त्याने काय होईल? ”

“  इतरांची नावे जाहीर करायची नसतील  आणि  त्याच वेळी स्वतःला वाचवण्यासाठी ते इथे होते हे सिद्ध करायची वेळ आली तर तो न धुतलेला रेझर पुरावा ठरू शकतो . त्याची मायक्रोस्कोप खाली तपासणी केली तर त्यांच्या केसा वरून ते सिद्ध होईल की हा रेझर त्यांनीच वापरला होता.”पाणिनी म्हणाला

ती पाणिनी च्या या खुलाशाने प्रचंड खुष झाली. “ अहो काय सुंदर सल्ला दिलं तुम्ही.! ” ती उद्गारली.

“ तुम्ही स्वागतिकेला जाऊन सांग की ही खोली आणखी आठवडाभर बुक कर म्हणून.तिचे भाडे सुद्धा आधीच देऊन टाक. तिला सूचना दे की त्या खोलीत कोणालाही जाऊन देऊ नको, अगदी  खोली साफ करणाऱ्याला सुद्धा.”पाणिनी म्हणाला

“ छान कल्पना आहे.चला लगेच जाऊन सांगूया ”

“ हे चौदा नंबर चे दार कुलूप लाऊन बंद करूनच जाऊ ”पाणिनी म्हणाला

त्यांना कुठेच किल्ली सापडली नाही.शेजारच्या तेरा नंबर च्या दाराला पण कुलूप होते पण त्याची किल्ली तिथेच होती पण या चौदा नंबर ची मात्र नव्हती.

“ ठीक आहे .आहे ते आहे.”पाणिनी म्हणाला “ तुझे डॅड कुठे असतील ? ”

“ ते बोटीवर गेले असणार. पोलिसांनी गाठण्यापूर्वी आपण त्यांना भेटायला हवं. तुम्ही त्या स्वागतिके बरोबर बोला.आणि काय सूचना द्यायच्या आहेत त्या द्या.” ती पाणिनी ला म्हणाली.  “ आणि हे खर्चासाठी पैसे ठेवा तुमच्याकडे.”तिने पाच हजारच्या नोटांची थप्पी पाणिनी ला दिली.  “ खूप झाले हे.” पाणिनी म्हणाला

“ राहू दे तुमच्या कडे.  आपण त्याचा नंतर हिशोब करू.”

तो रिसेप्शन पाशी गेला.

“ भेटले ना तुम्हाला हवे ते लोक ? ” तिथल्या मुलीने हसून  विचारले.

“  परिस्थिती जरा विचित्र झाली आहे.’’ पाणिनी म्हणाला

तिच्या चेहेऱ्या वरील हसरे भाव पाणिनी च्या उत्तरामुळे लुप्त झाले. तिने पाणिनी आणि काया कडे आलटून पालटून पहिले. “ म्हणजे नेमकं काय झालंय ? ”

“  या मुलीच्या वडिलांना भेटायला आलो होतो आम्ही.” कायाकडे बघत पाणिनी म्हणाला  “ पण आम्हाला उशीर झाला आणि बहुतेक ते आम्हाला भेटायला म्हणून मेन रोड ला गेले असावेत.”

त्या मुलीच्या चेहेऱ्यावर काहीही भाव उमटले नाहीत.पाणिनी पुढे बोलेल असे सुद्धा तिने गृहीत धरले नाही.मख्ख पणे ती बसून राहिली.

“ आम्हाला आता एवढचं हवं की ती रूम दुसऱ्या कोणाला देऊ नका.” पाणिनी म्हणाला

“ उद्या दुपारी बारा वाजे पर्यंतचे बुकिंग आहेच तुमचे.तेवढे पैसे आधीच जमा आहेत.

“ तुमच्या रजिस्टर वर रूम मधे कोणकोण होते त्या सर्वांची नावे असतात? ”पाणिनी  ने विचारले.

“ का बर? ”

“ आम्हाला खात्री करून घ्यायची आहे की आम्हाला हवी असलेली खोली हीच होती ना.”पाणिनी म्हणाला

“ त्यातले एक नाव प्रबोध होते का? ” तिने विचारले.

त्या ग्रुप मधल्या एकाचं ते नाव आहे पण ते माझ्या वडलांचे नाही.” तिने उत्तरं दिले.  “ सगळ्यांची नावे दिली गेली होती का या बद्दल मला शंकाच आहे.”

 “ तुमच्या वडलांचे नाव काय आहे? ”

“ रेयांश प्रजापति” काया म्हणाली.

स्वागतिकेने रजिस्टर चाळले “ नाही तुमच्या वडिलांच्या नावाने बुकिंग नाही. मिस्टर प्रबोध आणि अन्य असे बुकिंग आहे. ”

“ उद्या पर्यंत त्या खोलीत तुमच्या पैकी कोणी जाण्याची गरज नाही.खोली व्यवस्थित तयार करून ठेवली आहे. आम्हाला पुढचे पाच दिवस तीच खोली हवी आहे.” पाणिनी म्हणाला

“रोज दोन हजार भाडे आहे. ” स्वागतिकेने सांगितले.

पाणिनीने तिच्या हातात दहा हजार च्या नोटा दिल्या.

“ तुम्हाला पावती लागणार असेल ना? ” तिने विचारले.

“ अर्थात ”

पावती घेऊन पाणिनी आणि काया बाहेर पडले.

( प्रकरण पाच समाप्त.)

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel