अरबस्थानांतील परिस्थिति आणि लोकांचा स्वभावधर्म

अन्तर्गत भागांतील अरबांत फारसें शिक्षण नव्हतें, व्यापारहि नव्हता. फारसें शेतीचेंहि उत्पन्न नाहीं. शेतीचें जे कांहीं उत्पन्न येई त्यांनाहि पुरें पडत नसे. शेतीचा फारसा प्रचारहि नव्हता. शेती नाहीं, व्यापार नाहीं. त्यामुळें धनसंचयहि नाहीं. आणि म्हणून संस्कृतिहि नाहीं. कारण शेती, व्यापार, संपत्ति यांच्या पाठोपाठ संस्कृति येत असते. एकंदरीत बेदुइन हा फार मागासलेला होता. घोडे, उंट, गालिचे, तंबू, कांही हत्यारें हीच त्याची मालमत्ता. कुरणें, झाडें, सुपीक प्रदेश ह्यांच्यावर सर्वांची मालकी असे. खाजगी मालमत्तेची कल्पना फारशी पुढें गेलेली नव्हती. त्यांच्या मालमत्तेचें द्विविध स्वरूप असे. वैयक्तिक व सामुदायिक. जी कांही सामुदायिक अशी थोडीफार मालमत्ता असे तिचें शत्रूपासून रक्षण करण्यासाठी ते सावध रहात. कारण त्यांत त्यांचीं स्वतःची हितें गुंतलेली असत. यामुळें एक प्रकारची विशेष सामुदायिक भावना त्यांच्यात बळावली. सामुदायिक जीवनामुळें ते समुदायाकडे वळले. ती जरूरीच होती. सामुदायिक वृत्ति हा पुढें त्यांचा स्वभाव झाला.

अरबांत एका प्रकारची दत्तक पध्दती होती. एखाद्या व्यक्तीला आपल्या कुटुंबांतील समजून घेत. तूं माझा आजपासून भाऊ किंवा तूं माझा मुलगा असें म्हणत व घेत. आणि तो जणुं तुमच्या रक्ताचा असा होई. त्याला इस्टेटीचा वारसाहि मिळे. कधीं कधीं सबंध जातीहि जातिजमातींत अशा घेतल्या जात ! एखादें कूळ, जमात जर दुबळी झाली, त्यांच्यांत कमी लोक उरले, दारिद्य आलें, संरक्षण कठिण झालें तर दुस-या प्रबळ व मातबर जमातींत ते प्रवेश मागत. जी जमात सुप्रसिध्द असे, जिचा लौकिक असे तिच्यांत जात. अशा प्रकारें व्यक्ति वा जमाती दुस-यांत समाविष्ट होत.

कोणत्याहि देशांतील लोकांना कांहीं तरी ऐक्यबंधन लागतें. त्या त्या देशाच्या परिस्थित्यनुरूप हे बंधन निरनिराळया स्वरूपाचें असतें. कोठें भूमीचें बंधन असतें, कोठें धर्माचें, कोठें वंशाचें-कुळाचें तर कोठें भाषेचें; कोठें आर्थिक तर कोठें अन्य एखादें. या बेदुइनांना कोणतें बंधन? त्यांना ना जमीन ना एक धर्म. भाषेचें व जातीचें हेंच एक त्यांना बंधन होतें. आपलें कूळ, आपली जमात हेच बंधन. मामाभाचे, पुतण्ये, सगेसोयरे, भाऊ या सर्वांमिळून एक जमात होई. स्त्रियांना महत्त्व असल्यामुळें मामाचें  महत्त्व फार असे. भाऊ आपल्या बहिणीच्या पतीला मदत करायला सदैव सिध्द असे. माहेरच्या आजोळच्या मंडळींचा नेहमीं आधार असे.

अरबांची सामाजिक संघटना अशी असे. एकाच कुळांतील अनेक शाखा मिळून एक फखिधि बने, अनेक फखिधी मिळून एक बनु बने, अनेक बनु मिळून एक इम्रा बने; अनेक इम्रा मिळून एक कबिला बने; अनेक कबिले मिळून एक शोब बने.

अशी ही रचना होती. दोन फखिधि जरा एकाच बनूमधील असल्या तरी त्यांच्या अलग शाखा एकमेकांशी भांडत. फखिधीचीं दोन कुळें दुस-या फखिधीच्या दोन कुळांशीं भांडत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel