एकीकडे असे छळ चालले असतां दुसरीकडे मोठीं मोठीं आमिषें दाखवून मुहंमदांस वश करुन घेण्याचे प्रयत्न चालले होते. एके दिवशी काबाच्या सभागृहापासून दूर अंतरावर मुहंमद बसले होते. त्यांच्या विरोधकांपैकीं जरा नेमस्त वृत्तीचे एक गृहस्थ त्यांच्याजवळ येत म्हणाले, 'बेटा, तूं गुणानें थोर आहेस. मोठया घराण्यांतला आहेस. तूं आमच्या लोकांत भांडणें लावीत आहेस, भेद पाडीत आहेस, वितुष्टें लावीत आहेस. तूं आमच्या घरांतील आनंद, ऐक्य, सलोखा नष्ट केलास. तूं देवदेवतांचा उच्छेद मांडला आहेस. आमचे सर्व पूर्वज मूर्ख व पापी होते, अधार्मिक होते असा तूं शेरा मारीत आहेस. तुझ्यासमोर एक योजना ठेवायला मी आलों आहें. बघ तुला पटली तर.'
मुहंमद म्हणाले, 'सांगा काय तें. वलीदचे बाबा, सांगा, बोला.'

वलीदचे बाबा म्हणाले, 'ऐक. माझ्या भावाच्या मुला ऐक. या नव धर्माचा मुख्य होऊन तुला का श्रीमंत व्हायचें आहे ? तसें असेल तर आमच्यांतील सर्वांत श्रीमंत असेल, त्याच्याहूनहि तुला अधिक श्रीमंत होता येईल इतकी संपत्ति तुला आम्ही गोळा करुन देतों. तुला मानसन्मान पाहिजे असेल तर तुला आमचा नायक आम्ही करतों. तूं म्हणशील तें प्रमाण. तुझ्या संमतीशिवाय आम्ही कांही करणार नाहीं. तुला राज्य पाहिजे असेल तर आम्हीं तुला आमचा राजा करतों. तुला भुतांनीं पछाडलें असेल तर आम्हीं वैद्य बोलावतो व तुला बरें करायला लागतील तेवढे पैसे आम्ही त्यांना देऊं.'

पैगंबरांनी विचारलें, 'वलीदचे बाबा, संपलें का आपलें बोलणें ?'
"संपलें.'
"तर मग माझें आतां ऐका.'
"सांग. ऐकतों.'

"त्या परम दयाळू परमेश्वराची शपथ घेऊन मी सांगतों कीं मी जें सांगत आहें ती त्या प्रभूचीच शिकवण आहे. प्रभूनें जें पुस्तक मला दिलें, दाखवलें तेंच मी सांगतों. ज्यांना समजूत आहे, समजशक्ति आहे अशांना शिकण्यासाठीं हें पुस्तक आहे. या अरबी भाषेंतील कुराणांत सज्जनांस आशा आहे, दुर्जनांस शिक्षा आहे. परंतु लोक न ऐकतांच जातात. म्हणतात, तूं जें सांगतोस त्याचा प्रकाश आमच्या हृदयांत पडत नाहीं. आमचे कान बधीर आहेत. तुझ्यांत व आमच्यांत आडपडदा आहे. तुला योग्य वाटत असेल तसा तूं वाग. आम्हांला योग्य वाटतें तसे आम्ही वागूं. म्हणतात कीं आमच्या सारखाच तूं ! परंतु तुमचा ईश्वर एक आहे असें ज्ञान मला झालें आहे. म्हणून त्या एका परमेश्वराकडे तुम्ही सर्व चला. जें पूर्वीचें झालें त्याची क्षमा मागा. आणि जे मूर्तिपूजक ठरवलेलें दान करणार नाहींत, ठरीव भाग गरिबांसाठीं देणार नाहींत, परलोकावर जे विश्वास ठेवणार नाहींत, त्यांचें भलें होणार नाहीं. परंतु जे विश्वास ठेवतील, श्रध्दापूर्वक कर्तव्यें करतील, त्यांना अमर बक्षीस मिळेल.'

कुराणांतील सुरा म्हणून दाखवून ते म्हणाले, 'आजोबा ऐकलेंत का ? आतां योग्य तें करा.'

एके दिवशी अब्दुल्ला इब्न मसूद हा काबाच्या अंगणांत बसून धैर्यानें कुराण पढूं लागला. जमलेल्या कुरेशांनी त्याला मारहाण केली. तोंडावर गुद्दे दिले तरी तो उठेना, निघून जाईना. दुस-या दिवशींहि तो तसेंच करणार होता. परंतु मुहंमद म्हणाले, 'काल धैर्य केलेंत तेवढें पुरे. काल तुम्ही त्यांना बळजबरीनें कुराण ऐकवलेंत, जें ऐकण्याचा ते द्वेष करीत तें त्यांच्या कानांत दवडलेंत. पुरे, आतां पुन्हां नका जाऊं.' मुहंमद शक्य तों जपून जात होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel