बाणेदार धर्मनिष्ठा

असे दिवस जात होते. छळ होत होते. आपल्या अनुयायांचा छळ पाहून मुहंमद अत्यन्त दु:खी झाले. ते म्हणाले, "कुरेशांच्या मनांत प्रभुकृपेनें बदल होईपर्यंत तुम्ही अबिसिनीयांत जावें. तेथील राजा धर्मात्मा आहे. ख्रिश्चन असला तरी उदार व न्यायी आहे. तेथें कोणावर अन्याय होत नाहीं. परमतसहिष्णु असा तो राजा आहे. आलेल्या पाहुण्यांचें तो स्वागत करतो. जा. त्याच्या राज्यांत जा."

मुहंमदांच्या धर्मप्रचाराच्या पांचव्या वर्षी इ.स.६१६ मध्यें ११ पुरुष व ४ बायका अशीं १५ माणसें गलबतांत बसून गेली ! या गलबताला 'प्रथम अभिनिष्क्रमण' असे नांव इस्लामी इतिहासांत आहे. पुढील वर्षी आणखी ७२ पुरुष व १४ बायका केल्या. एकंदर १०१ संख्या झाली. परंतु कुरेश चिडले, खवळले. आपल्या हातांतील बळी निसटले, छळ करण्याचीं साधनें गेलीं म्हणून ते संतापले. कुरेशांनीं हबशी राजाकडे वकील पाठविला व सांगितलें, 'आमचे लोक परत द्या. आम्ही त्यांना ठार मारुं.'

राजानें दरबारांत वकिलास व त्या नवधर्मीयांस बोलाविलें. राजानें वकिलास विचारलें, 'यांचा काय अपराध ?'
"महाराज, यांनीं स्वधर्म सोडला आहे व नवधर्म घेतला आहे.'
"तुम्ही स्वधर्म सोडून खरेंच का नवधर्म घेतलात ?'
"हो.' ते लोक म्हणाले.
"ज्या नव्या धर्मासाठीं तुम्ही सनातन धर्म सोडलात, परंपरागत धर्म सोडलात, तो तुमचा नवा धर्म आहे तरी काय ?' राजानें विचारिलें.

अबु तालिबचा मुलगा, अलीचा भाऊ जाफर म्हणाला, 'राजा, आम्ही अज्ञानांत होतों. केवळ अडाणी जंगली होतों. आम्ही मूर्तीची पूजा करीत होतों. अपवित्र होतों. मृतमांस खात होतों. अभद्र बोलत होतों. माणुसकीची प्रत्येक भावना आम्ही पायांखालीं तुडवीत होतों. शेजारधर्म, अतिथिधर्म यांचीं कर्तव्यें मानीत नव्हतों. विधिनिषेध आम्हांला उरला नव्हता. सत्तेचा व सामर्थ्याचा फक्त कायदा आम्ही ओळखीत होतों. आणि अशा आम्हांत देवानें एक मनुष्य पैदा केला. त्याच्या जन्माची, त्याच्या सत्यवादीपणाची, सचोटीची, पावित्र्याची आम्हांला पूर्ण माहिती आहे. त्यानें आम्हांला सांगितलें, 'ईश्वर एक आहे. त्या अद्वितीय परमेश्वराशीं दुस-या देवदेवता मिसळूं नका. मूर्तिपूजा करूं नका. खरें बोला. दिलेला विश्वास पाळा. दया दाखवा. शेजा-यांच्या हक्कांचे रक्षण करा. स्त्रियांची कुटाळकी, कुचेष्टा करूं नका. अनाथ पोरकीं मुलें त्यांचें असेल तें लुबाडूं नका. दुर्गुणांपासून दूर रहा. पापापासून परावृत्त व्हा. आणि प्रार्थना नियमानें करीत जा. गरिबांसाठीं ठराविक रक्कम देत जा. उपवास पाळा.' राजा अशी-ही त्याची शिकवण. ती शिकवण आम्ही अंगिकारली आहे. एका ईश्वराची पूजा करा, अन्य त्याच्याशीं जोडूं नका, ही त्याची आज्ञा आम्हांस मान्य आहे. आमची या पैगंबरावर श्रध्दा आहे. आम्ही ही शिकवण अंगीकारली म्हणून कुरेश आमच्याविरुध्द उठले आहेत. पैगंबराविरुध्द उठले आहेत. आमचा छळ त्यांनीं मांडला. पूर्ववत् दगडांच्या, लांकडांच्या त्या मूर्ति पूजा, असें सांगूं लागले. आम्ही ऐकलें नाही. अधिकच छळ सुरु झाला. आमचा उच्छेद जणुं त्यांनीं मांडला. तेथें सुरक्षितता नाहीं असें पाहून तुझ्या राज्यांत आलों आहोंत. तूं त्यांच्या छळापासून आम्हांस सांभाळशील, अशी आम्हांला आशा आहे.' असें म्हणून कुराणांतील एक उतारा त्यानें म्हटला. त्यांत ख्रिस्ताचा उल्लेख होता. तो ख्रिश्चन राजा व त्याचे बिशप गहिंवरले. राजा व बिशप रडले. राजाच्या दाढीवर अश्रु घळघळले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel