उमरनें मुहंमदांच्या हातांचे चुंबन घेतलें. नंतर तो म्हणाला, 'मलाहि तुमच्या संघांत सामील करा.' सर्वांना आनंद झाला. सर्वांनी प्रार्थना केली व सर्वांनीं प्रभूचे आभार मानले.

हा धर्म अत:पर अंधारांत राहिला नाहीं. मुहंमदांच्या भोंवतीं आतां केवळ खालच्या दर्जाचेच लोक नव्हते तर बुध्दिमान, शूर, उत्साही अशीं माणसें त्यांच्या झेंडयाखालीं होतीं. हमजा, अबूबकर, उमर अशीं मातबर व शूर माणसें त्यांच्या धर्मांत होतीं. अलि तर होताच. तो मोठया पदवीस चढत होता. उच्च वृत्तीचा होत होता. हमजा, तल्हा, उमर यांच्यासारखे तरवारबहादूर थोडेच असतील !

हे नवधर्माचे लोक, हे मुस्लीम आतां उघडपणें उघडयावर प्रार्थना करुं लागले. उमरनें नवधर्म स्वीकारतांच कुरेशांना अंगावर वीज पडल्यासारखें झालें ! निर्णायक प्रहार करण्यासाठीं ते संधि पहात होते. अबिसिनियांतील शिष्टमंडळहि हात हलवीत परत आलें होतें. प्रखर उपाय योजावे असें कुरेश म्हणूं लागले. शेवटीं इ.स.६१६ मध्यें मुहंमदांच्या मिशनच्या सातव्या वर्षी कुरेशांनीं हाशिम व मुत्तलिब यांच्या घराण्यांवर बहिष्कार घातला. हाशिम व मुत्तलिब यांच्या घराण्यांशीं कोणीहि रोटीबेटी व्यवहार करुं नये, त्यांच्याशीं सौदा विक्री देवघेव करुं नये, असा करार लिहून काबामंदिरांत त्यांनी ठेवला.

हाशिमी व मुत्तलिब मंडळी शहरभर विस्कळितपणें वसलेली होती. ते सारे अबु तालिबांच्या मोहल्ल्यांत रहायला आले. मक्केच्या पूर्वेस पर्वतांच्या अरुंद घळींत ही जागा होती. हा भाग भिंती व प्रचंड फत्तर यांमुळें शहरापासून जसा कांहीं अलग झालेला होता. या भागांत यायला व बाहेर पडायला एकच लहान दरवाजा होता. या घराण्यांतील अबुलहब तेवढा शत्रूकडे गेला.

तीन वर्षे अशा बहिष्कृत स्थितींत गेलीं. धान्याचे संचय संपत आले. हाशिमी व मुत्तलिबी सारे मरणार का ? भुकेलेल्या मुलांच्या आरोळया कानांवर येत. कांहीं दयाळू लोक चोरुन धान्य वगैरे पाठवीत. मिशनच्या या सातव्या वर्षी मक्केंत बाराशिवाय जास्त वजनदार लोक मुहंमदाकडे नव्हते ! मोठी कठीण वेळ होती. सर्व जगाला जवळ घेऊं पाहणारे मुहंमद बहिष्कृत होते. जो जगाला जवळ घेऊं पाहतो त्याला जग प्रथम दूर लोटतें, असाच या वक्रतुंड जगाचा इतिहास आहे !

कुरेशांनाहि मनांत आतां लाज व शरम वाटूं लागली. कांहीं तरी पुन्हां तडजोड व्हावी वाटत होतें. एके दिवशीं वृध्द अबु तालिब काबाच्या मंदिरांत गेले होते. तो तेथें लावलेला करार उधईनें खाऊन टाकला होता ! अबु तालिबांनीं तें पाहिलें. ते कुरेशांना म्हणाले, 'तुमचा बहिष्कार देवालाहि आवडत नाहीं. तो पहा उधईनें खाल्लेला करार. किती निर्दय आहांत तुम्ही !' आणि कुरेशांच्या घराण्यांतील पांच प्रमुख लोक अबु तालिबांकडे गेले व म्हणाले, 'चला आमच्या बरोबर. या कोंडलेल्या जागेंतून बाहेर पडा. बहिष्कार संपला. इ.स.६१९ मध्यें मिशनच्या दहाव्या वर्षी ही तडजोड झाली. हाशिम व मुत्तलिब घराणीं पुन्हां घेण्यांत आलीं. सारे मक्कावाले एकत्र राहूं लागले.

हीं जीं बहिष्काराचीं तीन वर्षे, त्या वर्षांत फक्त यात्रेच्या वेळेस मुहंमद प्रचार करीत. यात्रेकरूंत कोणी श्रोता मिळतो का पहात. परंतु खुनशी अबु लहब पाठोपाठ असेच. तो ओरडून म्हणे, 'याचें ऐकूं नका. हा सैतान आहे. झूट आहे.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel