नवराष्ट्र निर्मितीचे प्रयत्न

यसरिब येथें आल्यापासून मुहंमदांच्या जीवनाची बारीकसारीक माहिती मिळूं लागते. येथें आल्यापासूनचें त्यांचें जीवन जगासमोर उघडें आहे. अति महान्, लोकोत्तर विभूति ! आईबापांच्या प्रेमाला बाल्यांतच पारखा झालेला हा मुलगा. त्याचें लहानपण किती केविलवाणें ! आणि पुढें कौमार्यावस्थेंतून तारुण्यावस्थेंत ते आले. तें तारुण्यहि किती पवित्र व सत्यमय. पुढें जरा प्रौढपणा आल्यावर पहा. किती निष्ठा व प्रखरता. दीनदरिद्रांसाठीं, अनाथां-दुबळयांसाठीं किती कळवळा. दुस-यांचें दु:ख ऐकायला, दुस-यांची हांक ऐकायला कान सदा टवकारलेले. प्राणिमात्रांकडे सहानुभूतीनें पाहणारें त्यांचें हृदय. प्रेमानें पाहणारे त्यांचे मोठे डोळे. अत्यन्त विनम्र व विशुध्द असें जीवन. मुहंमद जाऊं लागले म्हणजे बोट करुन लोक म्हणत, 'तो पहा अल अमीन चालला !' सच्चा, न्यायप्रिय, विश्वासू पुरुष. प्रामाणिक विश्वासु मित्र, प्रेमळ निष्ठावंत, पति. जीवनमरणाचीं गूढें उलगडूं पाहणारा ऋषि. मानवी कर्तव्यांचा विचार करणारा हा तत्वज्ञ. मानवी जीवनाचें गन्तव्य काय, याचें चिंतन करणारा योगी. असा हा महापुरुष नवराष्ट्र-निर्मितीच्या उद्योगास आरंभ करतो. सा-या जगाला सुधारुं बघतो. पदोपदी विघ्नें. परंतु हा महावीर डगमगत नाहीं. पदोपदीं पराजय. परंतु निराशा त्याला शिवत नाहीं. अदम्य आत्म्यानें सदैव पुढे जाण्यासाठीं धडपड करतो, जीवनाचें कार्य पुरें करण्यासाठीं धडपडतो. शेवटीं त्याचें पावित्र्य व त्याची उदात्तता, ईश्वराच्या दयेवरची त्याची जिवंत श्रध्दा व त्याची तळमळ यांमुळें शेंकडों अनुयायी त्याला मिळतात. आणि शेवटीं त्या सर्वांना यसरिबमध्यें सुरक्षित पाठवीपर्यंत आपण मागें वाघाच्या तोंडीं राहतो ! आपण सर्वांच्या शेवटीं त्या उदार आश्रय देणा-या, स्वागत करणा-या यसरिबला येतो. यसरिबला आल्यावर मुहंमद सर्वांचे पुढारी झाले. जणुं राजे    झाले. मानवी हृदयाचे सम्राट बनले. सर्वांचे नेते बनले. ते सल्ला देणारे, तेच स्मृति देणारे, तेच न्यायाधीश, तेच सेनापति ! परंतु गर्व तिळभरहि नाहीं. केवळ अगर्वता व नम्रता होऊन रहात. नवीन लोकसत्ता त्यांनीं स्थापिली. ते स्वत: त्या सत्तेचें केंद्र होतें. स्वत:च्या हातानें स्वत:चे कपडे शिवणारा, कधीं कधीं उपाशी राहणारा हा धर्मसंस्थापक. पृथ्वीवरील सामर्थ्यवान् सम्राटांपेक्षांहि अधिक सामर्थ्यवान् तो होता.

मुहंमदांचें उदात्त उज्ज्वल स्वरुप जगाला दिसलें. इतकीं वर्षे खटपट व कष्ट करुन आज त्यांचे ३०० च फक्त अनुयायी होते ! परंतु या ३०० चे ३० कोटी पुढें होणार होते. अपरंपार पीक पुढें यायचें होतें. रोंप वाढणार होतें. त्यांची उदात्तता, अढळ मैत्री, सहनशीलता, निस्सीम धैर्य, उत्कटता, तळमळ, उत्साह, स्फूर्ति, प्रेरणा, सत्याची लागणी हे सर्व गुण त्यांच्या बारीकसारीक गोष्टींतून प्रकट होत होते. मुहंमद हे वीर आहेत, महान् वीर आहेत, ही गोष्ट जगाला कळली. येथें लेंचेंपेंचें मन नव्हतें. निश्चयाचा महामेरु अशी ही मूर्ति होती. त्यांच्यावर प्रेम न करणें, शक्यच नव्हतें. त्यांची आज्ञा न पाळणें शक्य होत नसे. हळूहळू यसरिबचे लोक त्यांच्या चरणीं नमले. त्यांच्या भोंवतीं जमले. शरीर व मन मुहंमदांस अर्पिते झाले. आणि ही श्रध्दा सा-या अरबस्थानभर पेटत गेली. सारें अरबस्थान पुढें त्यांच्या चरणांशी आलें. स्वत:चे कपडे शिवणा-या या मुहंमदांपेक्षा मुकुटधारी सम्राटांना अधिक मान नव्हता. माणसांवर छाप पाडण्याची अद्भुत शक्ति मुहंमदांत होती. आणि ही जी छाप पडे ती कल्याणावह असे, मंगलावह असे.

मक्केपासून मदिनेला यायला दहा दिवस लागत. मुहंमद आले त्या वेळेस यसरिबभोंवतीं भिंती नव्हत्या. मुहंमदांनीं शहराभोंवतीं खंदक करवला. यसरिबच्या आसपास अमलकी लोक रहात असत. रोमन, ग्रीक व बाबिलोनच्या सदैव स्वा-यांमुळे ज्यू उत्तरेकडून खालीं आले. त्यांनी अमलकींचा पराजय करुन हिजाजच्या या उत्तर भागांत वस्ती केली. ज्यू आले व नीट तटबंदीच्या जागीं राहिले ! तेथें राहून आसपासच्या अरबांवर ते प्रभुत्व स्थापित. यसरिब शहरांतहि ज्यूंच्या दोन शाखा होत्या. पुढें या यसरिब शहरांत औस व खजरज या दोन अरब शाखा आल्या. त्यांनीं ज्यूंचें वर्चस्व कमी करुन त्यांना एकप्रकारें मांडलिक केलें. परंतु आपसांत लढाया, मारामा-या सदैव चालतच. मुहंमदांनीं मक्केंत आपलें जीवनकार्य जाहीर केलें, त्या सुमारासच यसरिबमधील ही भांडणें तात्पुरतीं तरी मिटली होतीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel