प्रथम प्रथम ज्यूहि प्रार्थनेस येत, प्रवचन ऐकत. नंतर होणा-या चर्चेत भाग घेत. प्रार्थनेच्या वेळेस प्रथम जेरुसलेमकडे सारे तोंडें करीत. ज्यूंची प्रीति मिळावी, ज्यूंना परकें वाटूं नये म्हणून मुहंमद किती जपत होते ! मोझेस, ख्रिस्त वगैरे पूर्वी होऊन गेलेल्या पैगंबरांविषयीं मुहंमदांस अत्यन्त आदर वाटत असे म्हणून जेरुसलेमकडे तोंड करण्यांत त्यांना अवघड वाटलें नाहीं. त्यांनींहि एकेश्वरी धर्मच, निर्गुण निराकार परमेश्वराचाच धर्म दिला होता. ज्यूंनाहि तिकडे तोंड केलें म्हणजे समाधान वाटेल व पैगंबरांविषयीं आपलेपणा वाटेल असें सर्वांस वाटत होतें. परंतु मुहंमदांनीं कितीहि आपलेपणा व औदार्य दाखविलें तरी ज्यू प्रसन्न झाले नाहींत. अरबस्थानाचें ज्यूस्थान करण्याचें का त्यांच्या मनांत होतें ? मुहंमदाला आपल्या हातचें एक साधन बनवावें असें का त्यांना वाटत होतें ? परंतु मुहंमद तर सत्ताधीश झाले. ज्यू जळफळूं लागले. आणि शेवटी या नव धर्माच्या शत्रूंना ते मिळाले ! मुहंमदांचा धर्म साधा होता. ज्यूंच्या धर्मांतून जेवढें घेणें शक्य तेवढें त्यांनीं घेतलें होतें. आणखी घेणें म्हणजे व्यापक धर्माला कमीपणा आला असता.

ज्यूंचा विरोध वाढूं लागला. ते सतावूं लागले. कुराणांतील शब्दांचा, वाक्यांचा मुद्दाम वेडावांकडा चुकीचा उच्चार करीत व त्यामुळें सुंदर अर्थ विकृत होई. ज्यू मुहंमदांस मुद्दाम कठीण प्रश्न विचारीत. कुराणांतील ज्यूसंबंधींचा मजकूर चुकीचा आहे म्हणत. मुहंमद म्हणत, 'मी नाहीं चुकलों. तुम्हीच तुमच्या पुस्तकांत बदल केला असेल. तुम्ही त्यांतला मजकूर दडपून टाकला असेल.' नवधर्माचा उपहास करण्यासाठीं ते स्वत:च्या धर्मासंबंधींहि खोटें बोलूं लागले. ते मूर्तिपूजाच खरा धर्म आहे असें म्हणूं लागले. इस्लामची नालस्ती करूं लागले. कोणी जर 'तुम्हांला इस्लाम आवडतो कीं, मूर्तिपूजा' असा प्रश्न केला तर खुशाल 'मूर्तिपूजा' असें उत्तर देत. त्यांनी ज्यू कवि कवयित्र्या यांचेंहि रान उठविलें. काव्यांतील इस्लामच्या नालस्तीला सीमाच राहिली नाहीं ! मुस्लिम स्त्रियांसंबंधींहि वाटेल तें अभद्र त्यांतून असे. पैगंबरांची, मुस्लिम भगिनींची नालस्ती व बेअब्रू करुनच ते राहिले नाहींत तर मदिनेच्या शासनसंस्थेशींहि त्यांनीं द्रोह मांडला. मक्केच्या कुरेशांना मदिनेंतील मुसलमानांचें बळ किती आहे वगैरे माहिती त्यांनीं पुरविली. ज्यू व असंतुष्ट अब्दुल्ला-उबय याचा मुनाफिकीन पक्ष हे कुरेशांशीं कारस्थानें करुं लागले. 'मुहंमदांशीं आम्ही केलेला करार वरपांगी आहे. तुम्ही मदिनेच्या दरवाजांत येतांच आम्ही तुम्हां मूर्तिपूजकांस मिळू !' असेंहि त्यांनीं कळविलें. मदिनेंत या राजद्रोह्यांचा, दगलबाजांचा सुळसुळाट झाला. मदिनेची सत्त्वपरीक्षा होती. बाहेरुन हल्ला आला व आंतहि बंड झालें तर ?

मुहंमदांसमोर कठीण समस्या होती. पैगंबर या नात्यानें त्यांनी सारे अपमान, सर्व निंदा यांना पोटांत घेतलें. परंतु आपल्या लोकांच्या स्वातंत्र्याचे व जीविताचेहि ते आतां रखवालदार होते. ते केवळ आतां धर्मसंस्थापक नव्हते तर राज्याचे प्रमुख होते. आणि वेळहि कठीण होती. सर्वत्र युध्दाचें वातावरण होतें-मदिना स्वत:च्या बचावासाठीं तयार होत होती. अशा वेळेस लष्करी शिस्त लागते. गुळमुळीत धोरण सर्वनाशी ठरतें. अशा वेळेस स्वजनद्रोह अक्षम्य असतो. त्या द्रोहाची उपेक्षा करुन चालत नसतें. पैगंबर या नात्यानें मुहंमदांनी ज्यूंच्या कारवायांकडे दुर्लक्ष केलें असतें, केलेंहि. परंतु मदिनेचे रक्षक व शासक या नात्यानें त्यांचें दुसरें कर्तव्य होतें. सहासात जणांना पकडण्यांत आले. त्यांतील कांहींना हद्दपार करण्यांत आले. कांहींनां देहान्त शासन मिळालें ! मुहंमद मदिनेची अशी तयारी करीत आहेत तोंच कुरेशांचे सैन आल्याची बातमी आली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel