घनाने लिहिणे थांबवले. तो अंथरुणावर पडला. त्याला पटकन झोपही लागली.
आणि झोपेत मनोहर स्वप्न!
तो विंचू झोपेत त्याच्याजवळ बोलत होता : “मी तुझ्यासाठी काय करू? तू मला प्रेम दिलेस; मी तुला काय देऊ? आम्ही विंचूही कृतज्ञ असतो. माणूस एकवेळ कृतज्ञ राहणार नाही, परंतु आम्ही मानवेतर प्राणी उपकार स्मरतो.” असे तो विंचू बोलत होता.
तो विंचूवाला म्हणतो, “बोल, आणखी बोल.”
“काय बोलू? अरे, तुम्ही मानव आम्हांला विषारी विषारी म्हणता, परंतु तुम्ही नाही का विषारी? सारखे तर एकमेकांविरुद्ध फूत्कार सोडीत असता. आमच्याजवळ ही एक लहानशी नांगी, परंतु तुमच्याजवळ शेकडो नांग्या! तुम्ही एकमेकांचा किती हेवादावा करता? साप-विंचू यांच्या दंशामुळे माणसे मरतात, त्याच्या किती पट दुष्काळात मरतात; युद्धात मरतात, खायला नाही म्हणून क्षयी होऊन मरतात. सर्वांत विषारी प्राणी कोण असेल तर तो मानव! तुम्ही स्वत:ला आधी सुधरा. मी अजून विषारी आहे. याला चावा घेतो, त्याला डसतो. याच्यावर टीका करतो, त्याच्यावर सूड धरतो, मला आधी निर्विष होऊ दे — असे येते का तुम्हा मानवांच्या मनांत?” तो विंचू बोलत होता.
ते बोलणे केव्हा बंद पडले कोणास कळे.
एकदम घाबरून घना उठला. त्याला वाटले की विंचू त्याच्याजवळ आहे. त्याने दिवा लागवा. त्याने सर्वत्र पाहिले, ना विंचू, ना काही, परंतु स्वप्नातील ते वृश्चिकोपनिषद त्याला आठवत होते; मनाच्या शक्तीची त्याला गंमत वाटली.
घना व इतर कामगारमित्र रोज सायंकाळी गिरणी सुटल्यावर मोटार घेऊन खेड्यापाड्यांतून प्रचारार्थ हिंडू लागले. घना सारे समजावून देई. गंभीर, कुतुब हे गाणी म्हणत. ब्रिजलालही बोले.