“कोठे जाणार?” रामदासने विचारले.
“अल्लाको मालूम!” एकजण दु:खाने म्हणाला.
“तुम्ही आमच्यात रहा. आमच्यात मुसलमान मित्रही आहेत. आम्ही येथे सहकारी जीवन जगतो. सारे भाऊ भाऊ जणू बनलो आहोत. प्रभूनेच तुम्हांला रस्ता दाखवला असेल. नका जाऊ दूर. ही मुले भुकेली आहेत.” रामदासने गोड वाणीने सांगितले.
इतक्यात कुतुब, लाला, अहमद हेही आले.
“यहीं रहना. ये सब दोस्त है. खतरा नहीं, धोखा-दगा नहीं. सबके साथ काम करना, मैजमें रहना.” कुतुब म्हणाला.
घना व सखारामही आले. त्यांनी त्या सर्वांना आपल्या वस्तीत नेले. त्यांची त्यांनी व्यवस्था केली. मुलांना दूध देण्यात आले.
तिकडे महात्माजी देशातील ज्वाला शांत करीत होते. स्वराज्य आले, परंतु राष्ट्राचा आत्मा मला कोठेच दिसत नाही, असे ते करुणपणे म्हणाले.
घना व सखाराम दु:खी होते. परंतु दु:ख विसरून ते सर्वांबरोबर राबत. पावसाळा संपत आला. पीक मस्त आले. ज्वारी, बाजरी, मकई यांचे पीक. आणि रब्बीच्या पिकाचीही पेरणी झाली. गहू, हरबरा पेरण्यात आला. तिकडे थंडीत होणा-या कोबी वगैरे भाज्या लावण्यात आल्या. काकड्या, भोपळे भरपूर लागले. एकेक भोपळा मोठ्या हंड्याएवढा; आण् टमाटोची नवीन लागवड खूप करण्यात आली. थोडे थोडे सोनखत त्यांना टाकण्यात आले.
एके दिवशी अमरनाथ अकस्मात आला. तो तेथील लोकांना महात्माजींचा आशीर्वाद घेऊन आला होता. अमरनाथ दिल्लीस गेला होता. या नवप्रयोगाची माहिती त्यांनी गांधीजींना दिली. मुसलमान निर्वासितांना कसे आपल्यात घेतले ते सांगितले. त्यांनी वसाहतीला आशीर्वाद दिला. अमरनाथने सरदारांचीही भेट घेतली. वसाहतीचा प्रयोग उद्या विलीनी-करणानंतरही चालू रहायला हवा, या प्रयोगाला मदत मिळायला हवी, असे त्याने सांगितले. त्या प्रयोगाची हकीगत ऐकून सरदारांनी धन्यवाद दिले. अमरनाथ या सर्व गोष्टी सांगायला आला होता.