प्रश्न --तुम्ही वारंवार संबंधमयते बद्दल बोलत असता. तुम्हाला नक्की काय म्हणावयाचे आहे?

उत्तर--वेगळेपणा अशी वस्तू अस्तित्वात नाही. असणे म्हणजेच संबंध रूप असणे. संबंधमयतेशिवाय अस्तित्व नाहीं .संबंधमयता म्हणजे आपली काय कल्पना आहे ?दोन व्यक्तींमधील एकमेकांत गुंतलेले अाव्हान व जबाब म्हणजे संबंधमयता होय .तुमच्या व माझ्यातील आव्हान व जबाब .तुम्ही मला दिलेले अाव्हान त्याचा मी स्वीकार करतो आणि जबाब देतो .  त्याचप्रमाणे मीही तुम्हाला आव्हान देतो आणि तुम्ही त्यांचा स्वीकार करता .हे सर्व म्हणजेच संबंधमयता नव्हे काय ?दोन व्यक्तींमधील संबंध रूपतेमुळे समाज अस्तित्वात येतो .तुम्ही व मी सोडून समाज वेगळा नाही .आपल्या शिवाय समाजाला वेगळे म्हणून स्वतंत्र  अस्तित्व नाही.तुम्ही व मी आपल्या संबंधमयतेतून समाज निर्माण करतो .संबंधमयता म्हणजे या दोन व्यक्तींमध्ये असलेल्या संबंधांबद्दलची जागृतता.आपली ही संबंधमयता कशावर आधारित आहे ?ही संबंधमयता आपल्या एकमेकां बरोबरच्या संबंधांवर, म्हणजेच अवलंबित्वावर, सहकार्यावर,  आधारित नाही काय ? सहकार्य, एकमेकाना मदत,मिळून मिसळून असणे, व वागणे, असे आपण बोलतो; परंतु प्रत्यक्षात हा भावनात्मकतेचा पडदा दूर केला,तर ही संबंध मयता कशावर आधारित आहे?परस्पर समाधानावर व प्रशंसेवर ही आधारित नाही काय?जर मी तुम्हाला खूष केले नाही तर तुम्ही मला टाळता .मला दूर करता .मी तुम्हाला खूष केले तरच तुम्ही माझा पती पत्नी मित्र शेजारी म्हणून स्वीकार करता.ही वस्तुस्थिती आहे .
        
कुटुंब असे तुम्ही ज्याला म्हणता ते कसे असले पाहिजे ?अत्यंत ममतेची जवळीक, संपूर्ण तात्काळ स्वयंभू दळणवळण, अशी ती संबंधमयता आहे .तुमचे,पती पत्नी यांचे परस्परांशी  मुलांशी,अाईवडिलांशी,असे दळणवळण ,असे संबंध आहेत काय?संबंधमयतेने आपल्याला हेच सुचवायचे नाहीं काय?संबंधमयता म्हणजे भयरहित दळणवळण . एकमेकांना समजून घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य .प्रत्यक्ष तात्काळ दळणवळण .संबंधमयतेचा हाच अर्थ आहे .दुसऱ्याशी प्रत्यक्ष दळणवळण. तुमची अशी संबंधमयता आहे काय ?तुमचे आपल्या पतीशी किंवा पत्नीशी असे भयरहित, प्रत्यक्ष स्वयंभू, तत्काळ, दळणळवण आहे काय?कदाचित शारिरिक दळणवळण असेल, पण ते दळणवळण  म्हणजे संबंधमयता नक्कीच नव्हे.तुम्ही व तुमची पत्नी बऱ्याचवेळा भीतीच्या पडद्याच्या दोन बाजूला रहात असता. तुम्ही असे ऱहात नसता काय?तुम्हाला तुमची ध्येये आशा आकांक्षा आहेत .पत्नीला तिची ध्येये आशा आकांक्षा आहेत.तुम्ही भिंतीच्या दोन बाजूला राहता व मग कधीतरी अधूनमधून भिंतीवरून डोकावून एकमेकांना पाहता . या डोकावण्याला तुम्ही संबंधमयता असे म्हणता.ही वस्तुस्थिती नाही काय ? मी अतिशयोक्ती करीत आहे असे कदाचित तुम्ही म्हणाल . अशा  कठोर सरळसरळ बोलण्यापेक्षा तुम्ही त्याला मृदुत्व देऊ शकाल.नवीन शब्द योजना कराल. परंतु ही वस्तुस्थिती आहे . तुम्ही सर्व प्रत्यक्षात वेगवेगळे राहता आणि अशा राहण्याला तुम्ही संबंधमयता असे नाव देता.
          
जर दोन व्यक्तींमध्ये खरोखरच संपूर्ण संबंधमयता असेल, म्हणजेच संपूर्ण तात्काळ दळणवळण असेल, तर यातील गर्भितार्थ फारच मोठा आहे.आता निराळेपण नाही . कोंडी नाही . जबाबदारी नाही . कर्तव्य नाही . फक्त प्रेमच आहे.

जे लोक भिंतीच्या अलिकडे पलिकडे राहात असतात, ते कर्तव्य जबाबदारी वगैरे गोष्टी बोलत असतात .जो मनुष्य प्रेम करतो तो जबाबदाऱ्यांबद्दल बोलत नाही. तो फक्त प्रेमच करतो.आणि म्हणूनच तो दुसर्‍याबरोबर त्याचा आनंद दुःख व संपन्नता सर्व उपभोगतो.तुमची कुटुंबे अशी आहेत काय ?पती पत्नी मुले आई वडील यांच्याशी असे प्रत्यक्ष तात्काळ दळणवळण  आहे काय?अर्थातच नाही. आणि म्हणून तुमचे कुटुंब म्हणजे तुमचा वंश व परंपरा चालविण्याचे, शारीरिक सुख एकमेकांना देण्याचे,व मानसिक दृष्ट्या तुम्हाला जे काही हवे आहे ते एकमेकांना देण्याचे, एक साधन आहे.हे एक प्रकारचे अमरत्व, एक प्रकारचे सातत्य, आहे .कुटुंब हे स्वसमाधानाचे स्वखुशामतीचे स्वप्रशंसेचे एक साधन आहे.मी सामाजिक राजकीय व आर्थिक जगात इतरांची पिळवणूक करतो व मग घरात दयाळू ,प्रेमळ,उदार, असण्याचा प्रयत्न करतो.केवढा मूर्खपणा !!  किंवा जग मला पेलण्यासारखे नाही, मला शांती पाहिजे, म्हणून मी घरी जातो व शांतीची अपेक्षा करतो .मला जगात हालअपेष्टा सहन कराव्या लागतात .मी घरी जातो व आराम मिळविण्याचा प्रयत्न करतो .अशाप्रकारे मी संबंधमयता एक स्वसुखाचे साधन म्हणून वापरतो . म्हणजेच माझ्या संबंधमयतेकडून मी ढवळला जाणे मला आवडणार नाही.
             
अशाप्रकारे जिथे परस्पर प्रशंसा,परस्पर समाधान, असेल तीच संबंधमयता जतन केली जाते .जेव्हा तुम्हाला हे सुख समाधान शांती मिळत नाही तेव्हा तुम्ही संबंधमयतेत बदल घडवून आणता.एक तुम्ही घटस्फोट तरी घेता.किंवा दुसरीकडे तुम्हाला हवे असलेले समाधान मिळविण्याचा प्रयत्न करता. अशा प्रकारे एका संबंधमयतेकडून दुसऱ्या संबंध मयतेकडे,तुम्हाला जे काही हवे आहे ते मिळेपर्यंत, म्हणजेच सुख,समाधान, शांती, स्वसुरक्षितता, सुरक्षितता जाणीव, आराम, मिळेपर्यंत तुमचा हा प्रवास चालू रहातो.एका ठिकाणी वरील गोष्टी मिळत नाहीशा झाल्या तर मग तुम्ही पुन्हा दुसरीकडे जाता. जग हे असेच आहे .तुम्ही असेच आहात. आपली संबंधमयता ही अशीच आहे .आपली ही वस्तुस्थिती आहे.जिथे तुम्ही व्यक्ती म्हणून सुरक्षित असू शकाल,सुखी असू शकाल, अशीच संबंधमयता तुम्ही स्वीकारता.अशी संबंधमयता मिळविण्याचा तुम्ही प्रयत्न करता.या सर्व हालचालींमधून विरोध व संघर्ष निर्माण होत नाही काय ?तुमच्यापासून  मला सुख मिळत नाही आणि मी जर सुखाचा शोध घेत असेन तर मग संघर्ष विरोध अपरिहार्य आहे.आपण दोघेही एकमेकांमध्ये सुरक्षितता शोधीत आहोत .जेव्हा ती सुरक्षितता अनिश्चित बनते तेव्हा तुम्ही मत्सरी द्वेषपूर्ण हावरट दंगेखोर वगैरे वगैरे बनता.अशा प्रकारे संबंधमयतेचे रूपांतर संग्रह, धि:कार,  सुरक्षिततेसाठी सुखासाठी आरामासाठी स्वनिश्चिती पटविणाऱ्या मागण्या, वगैरेंमध्ये होते .यामध्ये कुठेही प्रेम नसते .आपण प्रेमाबद्दल फार बोलतो .आपण जबाबदारी कर्तव्य याबद्दलही फार बोलतो .परंतु आपल्या वर्तणुकीत बहुतेक वेळा ही तिन्हीही नसतात .संबंधमयता ही समाधानावर आधारित आहे. याचे गंभीेर परिणाम अापण सर्व सुधारणामध्ये पाहू शकतो .ज्या प्रकारे आपण बऱ्याच वेळा आपली पत्नी किंवा पती,आपली मुले,  शेजारी, मित्र,सहकारी, यांना वागवितो त्यावरून आपल्या संबंधमयतेत प्रेमाचा कुठेही लवलेश नाही हे अगदी उघड आहे.संबंधमयता हा समाधानासाठी घेतलेला परस्पर शोध आहे .जर हे असे आहे तर मग संबंधमयतेचा हेतू काय?या संबंधमयतेचे अंतिम महत्त्व काय?जर तुम्ही स्वतःला इतरांशी असलेल्या संबंधमयतेत पाहाल,तर ही संबंधमयता ही एक स्वसाक्षात्कार  प्रक्रिया आहे, असे तुम्हाला आढळून येत नाही काय ?माझी तुमच्याशी असलेली संबंधमयता, मला माझ्या अस्तित्वाची पातळी दाखवित नाही काय ?मात्र मी जागृत पाहिजे .मी माझ्या संबंधमयतेत निर्माण होणाऱया प्रतिक्रियांबद्दल, जाणीव युक्त असण्या इतका, तत्पर पाहिजे. संबंधमयता ही स्वसाक्षात्कारप्रक्रिया आहे .म्हणजेच ती स्वज्ञान प्रक्रिया आहे.या साक्षात्कारामध्ये किती तरी न आवडणाऱ्या न रुचणाऱ्या गोष्टी असण्याची शक्यता आहे.अशांतता निर्माण करणाऱ्या गोष्टी, पसंत न पडणारे विचार व क्रिया, आढळण्याची शक्यता आहे.मला जे काही सापडते ते आवडत नसल्यामुळे मी सुखमय नसलेल्या संबंधमयतेकडून दुसरीकडे सुखमय वाटणाऱ्या संबंधमयतेकडे पळण्याचा प्रयत्न करतो.अशा प्रकारे जेव्हा अापण एकमेकांची प्रशंसा व एकमेकांचे समाधान एवढेच पाहात असू तेव्हा या संबंधमयतेला काहीही अर्थ नाहीं . परंतु जेव्हा ही संबंधमयता स्वसाक्षात्काराचे, स्वज्ञानाचे,साधन बनते त्यावेळी ही संबंधमयता अतिशय महत्त्वाची ठरते.
             
शेवटी तुम्हाला हे मान्य करावेच लागेल कि प्रेमामध्ये संबंधमयता नसते.तिथे ती असते काय? जेव्हा तुम्ही प्रेम करता व त्याचा काहीतरी मोबदला मागता, तेव्हाच संबंधमयता निर्माण होते. जेव्हा तुम्ही आपले संपूर्ण सर्वस्व देऊन टाकता तेव्हा संबंधमयतेचा प्रश्नच उद्भवत नाही.
           
जर तुम्ही असे प्रेम करीत असाल, जर असे प्रेम तुमच्याजवळ असेल, तर ती फार आनंदाची गोष्ट आहे .अशा ठिकाणी विरोध संघर्ष घर्षण मुळीच नसते. तिथे द्वैत नसते. तिथे संपूर्ण ऐक्य असते .ती एक अशी स्थिती आहे की तिथे पूर्ण एकवटलेपणा असतो .तिथे फक्त संपूर्ण अस्तित्वच असते .असे तुरळक आनंदाचे  क्षण केव्हां केव्हां असतात. त्या वेळेला संपूर्ण प्रेम असते. संपूर्ण दळणवळण असते .दुर्देवाने बऱ्याच वेळा प्रेम महत्त्वाचे रहात नाही तर प्रेम वस्तू महत्त्वाची बनते.ज्यावर प्रेम केले आहे ती वस्तू महत्त्वाची बनते.प्रेम बिनमहत्त्वाचे ठरते .नंतर प्रेम वस्तू ,शारीरिक शाब्दिक किंवा सुख वासनेसाठी आरामासाठी वगैरे वगैरे महत्त्वाची बनते व प्रेम कमी महत्त्वाचे ठरते .संग्रह द्वेष मत्सर व इतर अनेक मागण्या या महत्त्वाच्या ठरतात व त्यामुळे स्वाभाविक विरोध व संघर्ष निर्माण होतो .प्रेम आणखी आणखी दूर जाते.जो जो हे प्रेम आणखी आणखी दूर जाते तो तो संबंधरूप समस्येचे महत्त्व किंमत व अर्थ हरपतो.म्हणूनच प्रेम ही समजण्याला अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे .बौद्धिक तीव्र गरजेतून ती निर्माण होणार नाही.समजता येणार नाही. निरनिराळ्या पद्धतीनी ती तयार करता येणार नाही.शिस्त व इतर साधने यातूनही ती निर्माण होणार नाही.जेव्हा "मी"च्या हालचाली संपूर्ण थांबतात तेव्हाच निर्माण होणारी ती स्थिती आहे .या"मी"च्या हालचाली दाबून टाकण्याचा, लपवण्याचा, त्याला शिस्त लावण्याचा, झाकून टाकण्याचा, वगैरे वगैरे तुम्ही प्रयत्न केलात तरी ती प्राप्त होणार नाहीं .यातून "मी"च्या हालचाली थांबणार नाहीत .तुम्ही "मी"च्या वेगवेगळ्या पातळ्यांवरील हालचाली फक्त समजून घेतल्या पाहिजेत. जेव्हा कुठचाही विचार नसतो, जेव्हा कुठलाही हेतू नसतो, फक्त प्रेम असते, असे क्षण जरूर असतात परंतु फार तुरळक असतात.ते अत्यंत तुरळक असतात आणि म्हणूनच अापण ते स्मरण रूपाने घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. अशाप्रकारे सत्य जीवन अनुभवणे व दैनंदिन अस्तित्व क्रिया यांच्यामध्ये अडथळा निर्माण होतो .
          
संबंध मयता समजण्यासाठी प्रथम जे काही आहे ते कळणे,प्रत्यक्ष आपल्या जीवनात काय घडत आहे, निरनिराळ्या गूढ रूपात प्रत्यक्ष काय चालले आहे ते समजणे,व संबंधमयता म्हणजे  काय ते खरोखरच कळणे फार महत्त्वाचे आहे .संबंधमयता म्हणजे स्वसाक्षात्कार हा स्वसाक्षात्कार आपल्याला नको असतो .म्हणून आपण स्वतःला आरामात दडवण्याचा प्रयत्न करतो . संबंधमयता तिची असामान्य खोली सौंदर्य व महत्त्व हरवून बसते.खरी संबंधमयता जेव्हा प्रेम असेल तेव्हाच निर्माण होते.प्रेम म्हणजे  सुखाचा शोध नव्हे.जेव्हा स्वविस्मरण असते, जेव्हा संपूर्ण दळणवळण असते, एक किंवा दोघांत नव्हे तर त्या सर्वोच्च वस्तूशी  संपूर्ण दळणवळण असते व हे दळणवळण फक्त जेव्हा "मी" हरपतो तेव्हाच असते,तेव्हा फक्त प्रेम असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel