या विषयी काही लिहिताना मला अपरिहार्यपणे अध्यात्मामध्ये अनेकदा वापरल्या गेलेल्या उपमेची आठवण होत आहे . ती उपमा म्हणजे बिंब प्रतिबिंब ही होय.ही अनेकांच्या वाचनात बहुधा आलेली असेल . अनेक घट,भांडी, डबकी यामध्ये पाणी साठलेले आहे. जर पाणी स्वच्छ असेल आणि स्थिर असेल तर त्यात सूर्याचे(आकाशाचे )प्रतिबिंब यथातथ्य पडेल परंतु जर पाणी गढूळ किंवा हलते असेल तर आपल्याला सूर्याचे/आकाशाचे प्रतिबिंब दिसणार नाही किंवा अत्यंत अस्पष्ट दिसेल .काही वेळा आरशाची ही उपमा दिली जाते.आरसा अस्वच्छ असेल ,तुटका असेल, तर आपले प्रतिबिंब व्यवस्थित दिसणार नाही .परंतु जर आरसा चांगल्या प्रतीचा व स्वच्छ  असेल तर आपले प्रतिबिंब यथातथ्य दिसेल.ही उपमा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर किंवा भगवंतानी वापरलेली आहे की नाही ते मला माहिती नाही .कदाचित निरुपणांमध्ये अर्थ स्पष्ट करताना ती टीकाकारानी वापरलेली असेल .मुद्दा स्पष्ट आहे . --एक-- भांड्यातील पाणी/आरसा म्हणजे मन स्वच्छ  पाहिजे.--दोन-- पाणी/आरसा म्हणजे मन स्थिर पाहिजेआणि --तीन-- त्यामध्ये पडणारे प्रतिबिंब हे प्रत्यक्ष आत्मस्वरूप नाही .शेवटी तो आत्म्याचा भास आहे .(उपमा ही पूर्णोपमा नसते त्यातील भाव लक्षात घ्यावयाचा असतो .) मी म्हणजे निश्चित काय आहे असे आपल्याला म्हणता येईल ? हृदय ,मेंदू ,देह, हे अर्थातच मी नाही .जीवात्मा नक्की कसा हे आपल्याला माहीत नाही .आपल्याला जाणवणारी गोष्ट म्हणजे मन होय .जाणवणारी आणि जाणणारा दोन्ही म्हणजे मनच होय  .(आपण म्हणजेच मन होय )मन सर्व शरीरात असते की मेंदूच्या विशिष्ट संवेदनांमध्ये असते माहीत नाही .मी म्हणजेच मन हे मान्य होण्याला हरकत नसावी .विचार श्रुंखला म्हणजेच मी .त्याशिवाय मीची ओळख होण्याचे दुसरे साधन नाही .  त्यातून मी कसा आहे त्याची आपल्याला ओळख होते .मीचे दोन भाग होतात एक पाहणारा, दुसरा जे पहातो ते .मन म्हणजे  एकामागून एक येत असणाऱ्या असंबद्ध किंवा तर्कशुद्ध विचारांची साखळी असे म्हणता येईल.या विचारांचे स्वरूप कसे असते?भूतकाळामध्ये आपला ज्या ज्या वस्तूंशी , कल्पनांशी , लोकांशी , संबंध आला त्यातून या विचाराची निर्मिती होत असते .थोडक्यात हे विचार भूतकाळावर आधारित असतात .या वस्तू कल्पना ,विचार, व्यक्ती यांच्याशी असलेले संबंध  (संबंधमयता) यावर विचार अवलंबून असतात . यालाच धारणा असा शब्द मी वापरीत आहे .या धारणेमधून भविष्यकाळा संबंधी काही तर्क, विचार ,योजना  ,विचार रूपाने निर्माण होत असतात .काही वेळा हे विचार तर्कशुद्ध असतात तर काही वेळा  असंबद्ध ही असतात .

थोडक्यात भूत काळाकडून भविष्यकाळाकडे व भविष्यकाळतून भूतकाळाकडे आपल्या (मनाच्या , मन म्हणजेच मी)सारख्या येरझारा चालू असतात .या प्रक्रियेमध्ये अापण जिथे असतो म्हणजे वर्तमान तिथे बहुधा आपण नसतोच.किंवा अभावाने असतो .हे विचार सात्त्विक राजस किंवा तामस असे तिन्ही प्रकारचे सरमिसळ असतात .त्यात एक किंवा दोन गुणांचे प्राबल्य असते .निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या परिस्थितीत, निरनिराळ्या गुणांचे ,प्राबल्य आढळून येते भय, मत्सर , द्वेष , ईर्षा ,बदल्याची भावना ,करुणा, प्रेम , आदर , कौतुक , अभिमान(इ.) अश्या विविध छटा त्यामध्ये असतात .प्रत्येकाच्या वैशिष्ट्यपूर्ण धारणेवर हे विचार म्हणजे मनाचे स्वरूप अवलंबून असते .मी ही फार क्लिष्ट , गुंतागुंतीची गोष्ट आहे .या विचारांच्या गोंगाटामुळे काही जणांना फार त्रास होतो .मीचाच मीला त्रास होतो  .मी वाईट आहे दुष्ट,मत्सरी,अहंकारी,लबाड ,आंतल्या गाठीचा ,द्वेषपूर्ण आहे ,असे मान्य करण्याला अापण तयार नसतो .म्हणून माझे मन असे आहे तसे आहे असे आपण म्हणत असतो .आणि त्या मनाला सुधारण्याचा आपला प्रयत्न असतो .हा त्रास क्लेश आपल्याला होऊ नये म्हणून विचार कमी झाले पाहिजेत .वाईट हे वाईट आहे म्हणून त्याचा त्याग असे नसून आपल्याला त्रास होतो म्हणून त्याचा त्याग असा दृष्टिकोन असतो .आपल्याला वाईट वाटणारे विचार नष्ट झाले पाहिजेत ,असे स्वाभाविकपणे प्रत्येकाला वाटते .

कोणाला कोणते विचार भावना त्रास देतील आणि म्हणून नकोश्या वाटतील ते सांगता येणार नाही .ते ज्याच्या त्याच्या धारणेवर अवलंबून असेल .आपल्या दृष्टिकोनानुसार वाईट विचार जावेत चांगले विचार यावेत यासाठी होणारे प्रयत्न धडपड म्हणजे एक धारणा जाऊन त्या ठिकाणी दुसरी धारणा निर्माण करणे होय.विचार सात्त्विक असतील तर पाणी स्वच्छ शुद्ध आहे असे फार तर म्हणता येईल.ते हालत नाही ,डुचमळत नाही ,अस्थिर नाही  , असे म्हणता येणार नाही .पाण्याच्या शुद्धीकरणासाठी धडपड बऱ्याच जणांची चाललेली असते .या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये पाणी फार डुचमळत असते असे म्हणता येणार नाही का?मन स्थिर करण्यासाठी जे प्रयत्न होतात त्याने मन जास्त अस्थिर होत नाही का ? मनाला गप्प बसण्यासाठी काय घेशील असे विचारायची वेळ आली आहे !!जर आपण या सर्व विचारांच्या प्रवाहाकडे, प्रवाहाच्या कडेवर बसून शांतपणे ,स्तब्धपणे पाहात राहिलो तर काय होईल ?मीचाच एक भाग मीपासून अलग होऊन मीकडे पाहात असेल .ज्या वेळी मी अलग होऊन मीकडे पाहताना मीचे दुर्गुण पाहिल ,त्यावेळी मी त्या दुर्गुणांपासून कायमचा मुक्त होणार नाही का ?वाईटाच्या ठिकाणी चांगले आणण्यासाठी, प्रयत्न करण्याऐवजी ,जर आपण ही मनाची काहीतरी  बनण्याची धडपड पहात राहिलो तर ? सुरुवातीची उपमा घ्यावयाची झाल्यास , पाणी एकाच वेळी शुद्ध स्वच्छ व स्थिर होऊ लागेल.अश्या स्थिर व शुद्ध झालेल्या मनामध्ये क्षणिक प्रतिबिंब पडेल. पुन:प्रत्येकाच्या वैशिष्टय़ांप्रमाणे कमी जास्त प्रमाणात निरनिराळ्या विचारांची कमी जास्त गर्दी सुरू होईल ..प्रवाहाबरोबर "मी "वाहात जाईल लगेच भान येताच,"मी" काठावर बसून प्रवाहाकडे पाहू लागेल .तांत्रिक प्रसिद्ध शब्द वापरावयाचा झाल्यास साक्षित्व राहिल जाईल."मी "भानावर असेल ,भानावर नसेल ,वहात असेल वहात नसेल ,तरीही या पाठीमागे कुठे तरी मनाचा एक भाग साक्षित्व करीत असेल .मना बरोबर मी वहातआहे असे पाहिल्यावर तो टोकून जागा कारील.  मन स्तब्ध, प्रतिबिंब दिसेल ;मन अस्थिर, प्रतिबिंब  नसेल; अशी आंदोलने असतील .अश्या  दोलायमान स्थितीमध्ये सुंदर स्वच्छ तेजस्वी प्रतिबिंबाचे येणे जाणे अनुभवतांना ,केव्हा तरी मन पूर्ण स्तब्ध होईल व अशा वेळी ती समाधी अवस्था असेल .त्या वेळी काय होईल हे सांगता येणार नाही .जी व्यक्ती समाधी अवस्थेमधून पुन्हा या जगात येणार नाही त्यांचा प्रश्नच नाही .जे समाधी अवस्थेतून परत येतील ते आपल्या परीने तो अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतील . त्यांच्या वर्णनामध्ये काही मर्यादेपर्यंत समानता असेल.ते शब्दातीत आहे केवळ अनुभवण्यासारखे आहे त्याचे वर्णन करता येणार नाही असे म्हणत  म्हणत पानेच्या पाने त्याचे वर्णन करीत राहतील .त्यातून असंख्य ग्रंथांची निर्मिती होत राहील .

असेच झालेले आढळून येत नाही का ?या मधूनच अनेक धर्म अनेक पंथ उपपंथ निर्माण होत नाहीत का? या मधूनच काही तरी स्वतः बनण्याची आणि इथेच न थांबता दुसऱ्यांनाही आपल्यासारखे करण्याची धडपड निर्माण होत नाही काय?.त्यातून  आग्रह निर्माण होतो .आपल्या धर्माकडे लोकांना खेचण्यासाठी आपल्या धर्मातील लोकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होतात .शांत स्तब्ध सुंदर मन, मीचे अस्तित्व नष्ट होणे ,हा मूळ मुद्दा दूरच राहतो व निरनिराळ्या विचारांचे दृढीकरण सुरू होते .विचारांच्या कोलाहालांमध्ये भर घातली जाते.शांत सुंदर जगा ऐवजी असंख्य लहान लहान डबकी निर्माण केली जातात .जग एकसंध होण्याऐवजी त्याचे तुकडे तुकडे होतात .ज्या थोर व्यक्तींना त्या परतत्त्वाचा स्पर्श झाला त्या व्यक्ती जर शांत बसल्या असत्या तर हा कोलाहल कदाचित कमी झाला असता .परंतु प्रत्येकाच्या धारणे प्रमाणे त्याला त्याला स्वस्थ बसवत नाही . आपल्याला आलेला अनुभव इतरांना  सांगण्याचे प्रयत्न धडपड सुरू होते.लोकांचे त्यातून  कल्याण होईल असा प्रामाणिक समज असतो .या कशालाच काही इलाज नाही .हे असेच चालणार एवढे लक्षात आले तरी खूप झाले .आतापर्यंत हे कुत्र्याचे शेपूट सरळ करण्याचे अनेक प्रयत्न शेकडो वर्षात झाले .परंतु कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच .जो तो आपल्या धारणेनुसार वर्तन करीत आहे . त्यामुळे जग व्यवस्थित चालले आहे .त्यामध्ये प्रामाणिक पणे बदल करण्याचा प्रयत्न हेही त्या जगाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे .जग सुंदर करण्याचे प्रयत्नही स्वाभाविक आहेत.हाही त्या व्यवस्थेचा एक भाग आहे.जगात काहीतरी चुकत आहे आणि ते दुरुस्त केले पाहिजे असे वाटणे दुरूस्तीसाठी प्रयत्न करणे हाही त्या व्यवस्थेचाच एक भाग आहे .थोडक्यात जग व्यवस्थित आहे ते व्यवस्थित नाही हा भ्रम आहे . हा भ्रमही त्या व्यवस्थेचाच एक भाग आहे .थोडक्यात जे झाले ते बरोबर आहे. जे होत आहे तेही बरोबर आहे.जे होणार आहे तेही बरोबर आहे .  इत्यलम्!!
११/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel