मी कोण असा प्रश्न केला तर अनेकजण देह म्हणजेच मी' बुद्धी  म्हणजेच मी ,मन म्हणजे मी  ,अशी. अनेक उत्तरे देतील .एखादा, आत्मा म्हणजेच मी, असेहि उत्तर देईल 
प्रत्येकात थोडाबहुत अर्थ असला तरीही आत्मा जाणवत नाही  व देह म्हणजेच मी हे पटत नाही. देह, बुद्धी व मन म्हणजेच मी हे पटण्यासारखे आहे. देहाचे नियंत्रण शेवटी मनाकडून होत असते त्यामुळे फक्त मनाचा विचार केला तरी चालेल  .मनाचे दोन भाग करता येतील .सैरावैरा वाटेल तसा धावणारा भाग व तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणारा व निष्कर्ष काढणारा भाग .पहिल्याला आपण मन म्हणतो, तर दुसर्‍याला बुद्धी म्हणतो आता मन व बुद्धी एकत्रितरित्या मन ,असे समजून विचार करूया.काही वेळा देह मनाला मोहात पाडतो अशावेळी मनाने म्हणजेच बुद्धीने त्याचे नियंत्रण करावयाचे असते
मन म्हणजे विचार ,तर्कशुद्ध किंवा भरकटलेले त्याशिवाय मन म्हणून आपल्याला काही ओळखता येणार नाही. हे विचार कशाबद्दल असतात ?
लहानपणापासून अापण  ज्या ज्या गोष्टींशी संबंधित असतो, त्याबद्दल आपल्या मनात विचार येतात .घर, नातेवाईक, आई वडील, मित्र, शैक्षणिक संस्था, आपला गाव व आपण पाहिलेली गावे, निसर्गसौंदर्य,  आपण वाचलेली असंख्य पुस्तके, पाहिलेले सिनेमा, नाटके , देहाच्या निरनिराळ्या गरजा, इत्यादी. या सगळ्या  स्मृती आपल्या मनात साठवलेल्या असतात. त्यातून तर्कशुद्ध किंवा वाटेल तसे भरकटलेले  ,निरनिराळे विचार मनात आपोआप थैमान घालीत असतात. आपल्या मनाला ओळखण्यासाठी या विचारां शिवाय दुसरा काही पर्याय दिसत नाही .हे विचार म्हणजेच  आपला सर्वाशी असलेला संबंध होय. मूल असताना हा मी फार कृश असतो जसं वय वाढत जाते तसा तो पुष्ट होत जातो, वाढत जातो, मोठा होत जातो,


हा मी आयुष्यभर जसा पुष्ट होतो, त्याचप्रमाणे कृशही होत जातो,  जशी गावे ,मित्र, नातेवाईक ,दूर होतात ,मृत्यू पावतात , तसे ते  बंंध सुटतात. व हा मी कृश होतो .मी जेवढा पुष्ट तेवढा विचारांचा कल्लोळ जास्त .एकदा मी म्हणजे सर्वांशी असलेले संबंध हे लक्षात आले की मी कसा आहे हे लक्षात येऊ लागते .संबंध प्रेममय असतील तर मी प्रेममय व जर संबंध मानसिक हिंसा द्वेष तृष्णा मत्सर राग इत्यादी प्रकारचे असतील तर मीही तसाच.हळूहळू मी कसा आहे हे लक्षात येऊ लागते ,मात्र त्यासाठी तटस्थपणे अलिप्ततेने या संबंधाकडे पाहता येऊ लागले पाहिजे. या विचारांबरोबर वाहावत न जाता त्यांच्याकडे  निवड रहित जागृततेने पाहता येऊ लागले पाहिजे या प्रक्रियेमध्ये चांगले विचार ठेवायचे वाईट टाकून द्यायचे असे काही नाही.फक्त विचार म्हणजेच मी कसा आहे ते पाहात राहावयाचे .विचार चांगले वाटले म्हणजे ते चांगलेच आहेत असे नाही व वाईट वाटले अयोग्य वाटले तर ते अयोग्य आहेत, असेही नाही चांगले व वाईट हे आपल्या मनो रचनेवर म्हणजेच धारणेवर अवलंबून असते   फक्त पाहत राहा, फक्त साक्षीत्व असू दे, फक्त जागृत रहा,   या मधून मी ची ओळख चांगल्याप्रकारे होते .आपोआपच तटस्थता जागृतता येते व सत्य स्वच्छ सूर्य प्रकाशाप्रमाणे दिसू लागते . आपोआप जे काही व्हायचे ते होते त्यासाठी आपल्याला काही धडपड करावी लागत नाही धडपडीतून काहीही साध्य होत नाही धडपड म्हणजे फरफट .इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तटस्थता किंवा जागृतता ही जाणीवपूर्वक निर्माण करण्याची अंगी बाणवण्याची गोष्ट नाही .समज .आली की ती तटस्थता  आपोआप येते त्यातूनच हा मी हळूहळू नाहीसा होऊ लागतो मीच मीला आपोआप नष्ट करतो .
२६/४/२०१८  प्रभाकर  पटवर्धन 
.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel