व्यक्तीचे निरनिराळ्या व्यक्तींशी गटांशी व संस्थांशी  असलेले संबंध म्हणजे  संबंधमयता होय. या संबंधांचा पाया कोणता असतो? .प्रेम ,अपरिहार्यता, व्यवहार, शेजारधर्म ,विरोध ,द्वेष, स्वार्थ, इत्यादी अनेक कारणे या संबंधांच्या पाठीमागे असतात, असे एखादा सहजपणे म्हणेल.नीट विचार केला तर या संबंधा मागे स्वार्थ हे एकच कारण असलेले आढळून येईल .आई, वडील, मुले ,भाऊ ,बहीण ,मित्र ,सहकारी, भाषा, राज्य ,देश ,धर्म , यांच्याशी असलेल्या संबंधांच्या मुळाशी प्रेम हे कारणीभूत असते असे एखाद्याला वाटेल .नीट विचार करा सर्व संबंधांच्या मुळाशी कोणते कारण असते? .जोपर्यंत आपल्याला सुख, समाधान, संतोष ,मिळत आहे तोपर्यंत हे संबंध राहतात .सुख समाधान मिळण्याचे थांबले, तर मित्र दुरावतात. पती पत्नीमध्ये घटस्फोट होऊ शकतो. मुले आईवडील शेजारी मित्र पक्ष स्वभाषिक स्वधार्मिक व्यक्ती धर्म भाषा राज्य राष्ट्र काहीही मनुष्य सोडून देतो .असे आढळून येते. 


एखादा म्हणेल, असे कसे, सर्वकाही प्रेमावर आधारित आहे .नीट विचार करा. संबंधांमध्ये अापण काही अपेक्षा ठेवतो की नाही? अपेक्षापूर्ती जर सतत होत नसेल तर आपण असे संबंध ठेवू का ?प्रत्येक टप्प्यावर दुसऱ्यांकडून आपल्या काही अपेक्षा असतात त्याच प्रमाणे दुसरेही आपल्याकडून काही अपेक्षा ठेवीत असतात .जोपर्यंत परस्पर ,निदान काही प्रमाणात तरी, एकमेकांची अपेक्षापूर्ती होत आहे, तोपर्यंतच संबंध टिकतात, नाहीतर संपुष्टात येतात .भावनांची किंवा इतर वस्तूंची व सेवांची देवाणघेवाण जोपर्यंत होत आहे तो पर्यंत संबंध टिकतात .व्यापार शब्द कटू वाटतो व्यवहार हा शब्द बरा वाटतो तर प्रेम हा शब्द आपल्याला सुखावतो .शब्दांच्या खेळात गुंतू नका फसू नका. काटेकोरपणे व परखडपणे विचार करा.  अपेक्षा व अपेक्षापूर्ती यावर आपली संबंध मयता अवलंबून नाही का? बऱ्याच वेळा आपण सत्याला समोर जाण्याला घाबरत असतो.मुद्दाम त्याकडे कानाडोळा दुर्लक्ष करीत असतो.  तेच सत्य अवगुंठीत झाले तर आपण सुखावतो. आपल्याला बरे वाटते.नीट विचार करा .स्वतःमध्ये डोकावून पाहा .आपल्या मनाला निरखून पाहा .पटले उमजले उमगले तर घ्या नाही तर ! आपण अनेकदा पुढार्‍याबद्दल पक्षाबद्दल सरकाराबद्दल मित्राबद्दल  सहकार्‍याबद्दल शेजाऱ्या बद्दल  कुटुंबातील व्यक्तीबद्दल माझा अपेक्षा भंग झाला असे शब्द वापरतो म्हणजेच आपले संबंध अपेक्षांवर अवलंबून नव्हते का ?प्रेम हा शब्द मनाला एकप्रकारची गुंगी आणतो .


   आता मी कोण याचा खोल नीटपणे शांतपणे विचार करा .मी म्हणजे केवळ देह हे कुणीच मान्य करणार नाही .आत्मा ही आत्ता तरी केवळ कल्पना आहे .धार्मिक ग्रंथ तसे सांगतात म्हणून आपण मानतो .आपल्याला जाणवणारा मी म्हणजे मन व बुद्धी .बुद्धी हा मनाचाच एक तर्कशुद्धपणे विचार करणारा भाग असे म्हणता येईल .मन जे सर्वव्यापी आहे ,दिसत नाही ,पण जाणवते म्हणजेच मी हे मान्य करण्याला अडचण नसावी .आता मी म्हणजे कोण ?मी कोण हे जर निरखून पाहिले तर निरनिराळ्या जणांशी  असलेली निरनिराळया  प्रकारची संबंधमयता म्हणजे मी हे लक्षात येइल .जात धर्म इत्यादी निरनिराळ्या कल्पना व प्रत्यक्ष व्यक्ती व वस्तू यांच्याशी असलेली संबंधमयता म्हणजे मी हे लक्षात येण्याला हरकत असू नये .ही जर संबंधमयता नसेल तर मीला अस्तित्व आहे का ?विचार करा .संबंध मयता म्हणजे मी व ही संबंध मयता स्वार्थ व अपेक्षा यावर  अवलंबून असते. हे कटू सत्य आहे .देवळात जातो किंवा चर्च मशीद गुरुद्वारा वगैरेमध्ये जातो उपास तापास पूजा नमस्कार मग तो देवाला असो किंवा वडिलधाऱ्या मंडळींना असो किंवा आणखी कोणाला असो या सर्वामागे काही अपेक्षा नाहीत का ?किमान त्यातून आपल्याला सुख व समाधान मिळते म्हणून आपण ते करण्याला उद्युक्त होतो.म्हणजे  सुखसमाधान मिळावे ही ही अपेक्षा नाही का ?


मी चे स्वरूप स्वार्थ व अपेक्षा युक्त आहे आणि आपण ते प्रेममय आहे असे समजत होतो  .तीव्र स्वरूपाचा अपेक्षा भंग झाला तर प्रेमाचे आपुलकीचे रूपांतर द्वेष घृणा विरोध यांमध्ये होण्याला वेळ लागणार नाही .प्रेम असेल तर अपेक्षा नसतील, अपेक्षा नसतील ,तर अपेक्षा भंग ही नसेल .केवळ देणे असेल घेणे नसेल काही मागणी नसेल .


अपेक्षा शिवाय मागणीशिवाय प्रेम करा असे मी म्हणत नाही कारण यामध्येही खरे प्रेम करण्याची सूक्ष्म अपेक्षा दडलेली आढळून येईल . जे आहे ते जसे आहे तसे समजून घ्या पहा एवढेच माझे म्हणणे आहे .आपोआपच जागृतता व संबंध याकडे साक्षीत्वाने पाहण्याची एक विशिष्ट लकब दृष्टी अस्तित्वात येईल.साक्षित्वामुळे मनातील खळबळ तरंग कमी होतील. नवीन निर्माण होणार नाहीत .कमी प्रमाणात निर्माण होतील .क्वचित केव्हातरी मन शून्य होईल आणि त्याच वेळी जे काही मनातीत शब्दातीत अनंत अखंड पूर्ण आहे आहे ते प्रगटेल असे काहींचे म्हणणे आहे .
२६/६/२०१८©प्रभाकर पटवर्धन .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel