एका जंगलात अनेक पशु पक्षी रहात होते .ससा हरिण अस्वल माकड यांची दाट मैत्री होती .

हरिण ज्यावेळी कुरणांमध्ये चरत असे, त्याच वेळी ससा कोवळी कोवळी पाने, कोवळे तृणांकुर  खात असे .

अस्वल लहान मोठ्या झुडपांच्या काड्या मोडून त्या खात असे.

माकड झाडावरील लहान मोठी कच्ची पिकलेली फळे खात असे . 

एकमेकांची हितसंबंध असलेली क्षेत्रे भिन्न होती.

त्यामुळे त्यांच्या हितसंबंधांमध्ये स्वार्थामध्ये संघर्ष होण्याचा प्रश्नच नव्हता.एकमेक एकमेकांचे खाद्यही नव्हते .खात असताना त्यांच्या एकमेकांशी अधूनमधून गप्पाही होत असत.एकाच वेळी जवळच्या तळ्यावर जाऊन ते पाणी पीत असत .असा त्यांचा वेळ आनंदात जात असे.

एखादा शत्रू आल्यास माकड झाडांवर उंचावर सुरक्षित असे .माकडाचे मांस वाघ लांडगे यांना खूप आवडत असे.माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारीत केव्हाच दूर पळून जाऊ शकत असे .

अस्वलाला जाड कातडी आणि भरपूर केस यामुळे स्वाभाविक संरक्षण होते .त्याची नखे व दात इतके तीक्ष्ण होते की त्याच्या वाटेला जाण्याचे साहस सहसा कुणी करीत नसे .

हरिणाचे मांस सगळ्यांनाच आवडत असे.परंतु हरिणाचे कान अतिशय तीक्ष्ण होते.आणि पाय अत्यंत चपळ होते .त्यामुळे संकटाचा अंदाज त्याला पटकन येत असे व ते वाऱ्यासारखे दूर पळून जाऊ शकत असे .

ससा अत्यंत चपळ होता .परंतु त्याच्या पळण्याला मर्यादा होत्या .कितीही वेगाने पळाला तरी वाघ लांडगा कोल्हा कुत्रा मोकळ्या मैदानावर धावून त्याला  पकडू शकत असे.जर ससा बिळामध्ये लपला तर बीळ उकरून त्याला मारण्याचा आणि खाण्याचा दाट धोका होता .ससा नेहमी बिळाला दोनतीन दरवाजे ठेवीत असे .त्यामुळे तो एका दरवाज्यातून आत जाऊन दुसऱ्या कुठल्या तरी दरवाजातून पळून जात असे.बीळ उकरायला एखाद्याने सुरुवात केली तर उरलेले त्याचे साथीदार दुसऱ्या तोंडावर जाऊन थांबत असत .आणि ससा त्यांच्या तोंडात सहज सापडण्याचा संभव असे.त्यामुळे ससा आपले बीळ खोल करीत असे .बिळाचे तोंड सहसा दिसणार नाही अशी युक्ती तो करीत असे .गवत पाने यांनी बिळाचे तोंड झाकून ठेवीत असे.

सर्वात धोका सशाला जास्त होता .संकटकाळी आपले मित्र आपल्याला मदत करतील याची सशाला खात्री होती . त्यामुळे तो तसा बिनधास्त होता .

त्याचा विश्वास किती सार्थ होता ते ज्यावेळी प्रसंग येईल त्यावेळी कळणार होते.

आणि तो प्रसंग एक दिवस आलाच .रानटी कुत्रे लांबून भुंकताना सशाने ऐकिले.त्यांचे भुंकणे ऐकून तो भयभीत झाला .तो लांब पळून जाऊ शकणार नव्हता त्याला कुत्र्यांनी हा हा म्हणता पकडले असते .तो बिळात लपला असता तर त्या कुत्र्यांनी बीळ उकरून त्याला  खाल्ले असते .

कुत्र्यांचे लक्ष दुसरीकडे वळविणे किंवा कुत्र्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण देणे असे दोनच मार्ग उपलब्ध होते .

सशाने हरिणाला विनंती केली तू अत्यंत चपळ आहेस तू  त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घे .आणि नंतर ते तुझ्या मागे लागल्यानंतर वाऱ्यासारखे पळून त्यांना माझ्यापासून दूर घेऊन जा.हरिण म्हणाले जर ते माझ्या मागे लागले तर मी पाहून घेईन .तुझ्यासाठी मी त्यांचे लक्ष माझ्याकडे वळवून त्यांना लांब नेणार नाही .मला आता हे कोंवळे गवत खायचे आहे असे म्हणून सशाची विनंती त्याने धुडकावून लावली .

सशाने अस्वलाला विनंती केली तू समर्थ शक्तिमान आहेस .तू त्या कुत्र्यांना पळवून लाव.तू ढाल बनून माझे रक्षण करू शकतोस .

अस्वलाने सशाकडे दुर्लक्ष केले. तो म्हणाला मी आत्ता या झुडपाच्या कोवळ्या  फांद्या खाण्यात मग्न आहे.मला वेळ नाही. 

शेवटची आशा म्हणून आता निदान हे माकड तरी आपल्याला मदत करील म्हणून सशाने माकडाला विनंती केली .तू त्या कुत्र्यांच्या पुढ्यात जमिनीवर जा .ते तुझ्या अंगावर धावून आल्यावर तू या झाडावरून त्या झाडावर उड्या मारीत त्यांना लांब ने.

माकडाने सशाला सांगितले की मला आता कंटाळा आला आहे मला झोप येत आहे मी या झाडांवर उंचावर डुलकी काढणार आहे .

संकटात आपले मित्र आपल्याला मदत करतील ही सशाची आशा संपूर्णपणे खोटी ठरली.

त्याने स्वतःचे रक्षण करण्याचा मार्ग स्वतःच शोधला.पालापाचोळ्याखाली तो लपून बसला.काहीही हालचाल न करता अत्यंत स्तब्धपणे तो तिथे लपून बसला .कुत्रे तिथे आले परंतु त्यांना तो सापडू शकला नाही .त्याचा मित्रांवरील विश्वास अनाठायी  ठरला .

मित्र जरूर असावेत . आपण शक्य असेल तेव्हा मित्रांना जरूर मदत करावी .गरजेच्या वेळी मित्रांकडे मदत मागण्यांमध्ये काहीही चूक नाही.परंतु त्यांच्यावर विसंबून राहणे मूर्खपणाचे ठरेल.मित्रांच्या सहवासात जो आनंद मिळतो तो जरूर घ्यावा .कोणत्यांना कोणत्या उपायांनी आपण आपला रिकामा वेळ भरून काढीत असतो . वेळ कसा घालवावा ही आपली मोठी समस्या असते .जी ती व्यक्ती आपल्या गुणधर्मानुसार वेळ भरून काढण्याचे मार्ग शोधीत असते.यामध्ये काहीही गैर नाही .फक्त आपण काय करीत आहोत याबद्दल जागृत असणे गरजेचे आहे.भजन पूजन वाचन मनन चिंतन कीर्तन दर्शन लेखन असे वेळ  घालविण्याचे अनेक मार्ग प्रत्येकजण चोखाळीत असतो .

आपणच आपल्याला मदत केली पाहिजे .दुसर्‍यावर विसंबून राहणे मूर्खपणाचे आहे .दुसरे येतील.आपल्याला मदत करतील.दुसरे येतील.आपल्याला संकटातून सोडवतील .अशा आशेवर राहण्यात अर्थ नाही ."जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला "हे सत्य वचन आहे .

व्यवहारात काय आणि परमार्थात काय सामान्यतः काही सन्माननीय अपवाद वगळून एकच नियम लागू होतो .आपलीच आपणाला मदत केली पाहिजे .दुसरा कुणी तुम्हाला परमेश्वर दर्शन घडवू शकणार नाही .तुम्हीच तुमचा मार्ग शोधून काढला पाहिजे .कोणताही बुवा कोणताही संत कोणताही धर्मात्मा तुम्हाला  सत्यदर्शन घडवू शकणार नाही .तुमचा मार्ग तुम्हीच शोधून काढायचा आहे .

*उद्धरेदात्मनात्मानं असे खुद्द भगवंतांनी गीतेमध्ये म्हणून ठेवले आहे.*

*स्वावलंबनाचा हा मंत्र प्रत्येकाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे*

७/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel