मागील एका लेखात मी बिब्बा व त्याचे विविध उपयोग याविषयी  माझे अनुभव सविस्तर लिहिले आहेत . माझ्या गुडघेदुखीवर बिब्ब्याचा झालेला  अविश्वसनीय विलक्षण उपयोग , सूज, मुरगळणे ,स्नायू आखडणे, पोटातील वातविकार,तळपायात काटा वगैरे शिरल्यास ,त्यासंबंधी अनुभव ,इत्यादी माहिती त्या लेखात दिली आहे , 

आज आणखी दोन तीन औषधांबद्दल मला आलेला अनुभव सांगण्याचे मनात आहे .

१)--घाणेरी(गंधेरी)--- रत्नागिरीला स्वातंत्र्य लक्ष्मी चौकामध्ये काही काम चालू होते . तिथे कितीतरी काळवत्री(काळवत्री दगड अत्यंत कठीण असतात.जांभे दगड ठिसूळ असतात )दगडांचा ढीग होता .मी बारा वर्षांचा होतो .आम्ही मुले नेहमी सध्याकाळी तिथे खेळण्यासाठी जात असू .धावताना तिथे मला जोरात ठेच लागली व कळ अगदी मस्तकात गेली.उजव्या पायाच्या अंगठ्याजवळील बोट मध्ये चिरले होते .त्यातून रक्ताची धार लागली होती.तिथे रस्ता ओलांडल्यावर व्यायाम शाळा होती. त्यांच्याजवळ आयोडिन होते.त्यांनी त्यावर आयोडिन लावले .ते झोंबल्यामुळे आणखीच खूप वेदना झाल्या .  मी अक्षरश: नाचायला सुरुवात केली .त्याला तात्पुरते ड्रेसिंगही केले .ते बोट काही केल्या बरे होईना .जरा बरे  झाल्यासारखे वाटते ,तो पुन्हा कुठेतरी ठेच लागे, कुणीतरी त्यावर पाय देई. रोज ड्रेसिंग करणे हा एक  घरच्याना उद्योगच होऊन बसला .त्यात धूळ माती जाई आणि पुन्हा त्रास वाढे.मी लहान असल्यामुळे त्याची जेवढी काळजी घेतली पाहिजे तेवढी घेतली जात नव्हती .त्या काळी म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस च्या सुमारास अँटीबायोटिक्स हल्लीसारखी उपलब्ध नव्हती.कोकणात जेवणात भात भरपूर असतो .किंबहुना त्यावेळी केवळ भातच असे. भातामुळे जखम लवकर भरून येत नाही अशी एक समज त्या वेळी होती .मला भात खूप आवडत असे तरीही मला एक महिना केवळ पोळीवर ठेवण्यात आले . रोज  पाणी गेल्यामुळे बरे होत नाही म्हणून बोट कोरडे ठेवले , काहीही उपयोग झाला नाही  . माझे काका डॉक्टर असल्यामुळे त्यांनी त्या वेळी त्यांना माहीत असलेली निरनिराळी  औषधे व उपाय करून पाहिले.ते संजीवनी औषधांचा मुख्यत्वे वापर करीत असत ,तरीही अॅलोपथी आयुर्वेद यांचाही प्रसंगानुसार उपयोग करीत . ट्रायल अँड एरर यानुसार निरनिराळे प्रयोग झाले .त्या दगडावर बहुधा सापाने गरळ टाकली असली पाहिजे त्यामुळे जखम भरून येत नाही असे सर्वसाधारण मत होते .यामध्ये जवळजवळ सहा महिने गेले मी त्रास सोसत होतो .शेवटी एक दिवस काकांनी एक मुळी माझ्याजवळ दिली .ही उगाळून त्याचा लेप सकाळ संध्याकाळ लावीत जा म्हणून सांगितले . तसेच त्या उगाळलेल्या औषधातील एक  वाटाण्याएवढा  भाग फुलपात्रभर पाण्यात टाकून  पीत जा असे सांगितले .

.इतर अनेक औषधांसारखाच याचाही, काही गुण येणार नाही अशीच माझी समजूत होती.परंतु सकाळी लेप लावल्यावर दु:ख कमी झाले .संध्याकाळी जखम कोरडी पडल्यासारखी वाटली .दुसऱ्या दिवशी तर रक्त पू वगैरे येण्याचे थांबले.तिसऱ्या दिवशी जखम  भरून आली व चौथ्या दिवशी पूर्णपणे बोट बरे झाले.सहा महिने सतत त्रास सोसत असलेला मी ,अनेक औषधे करुन त्रासून गेलेला मी, एकदम दुःख मुक्त झालो .एखाद्या जादू सारखा त्या मुळीचा उपयोग झाला .काकांना मी ती कसली मुळी होती हे विचारले ते हसून म्हणाले , तुला काय करायचे आहे ?बरे वाटल्याशी कारण !नंतर केव्हा तरी बोलताना त्यांनी त्या झाडाचे नाव सांगितले .कोकणात ते झाड(झुडुप) सर्वत्र आढळून येते.इकडेही नाशिकला मला ते झुडूप दिसले आहे .त्याला घाणेरी म्हणून ओळखतात . मुळचे नाव गंधेरी.पाळा पासून पानांपर्यंत त्याला मंद सुवास येतो .म्हणून गंधेरी.घामोळे ,कंड ,केसातील कोंडा ,रॅश,यावर त्याच्या पानांचा रस काढून तो  कोमट पाण्यात टाकून त्याने सात आठ दिवस स्नान केल्यास बरे वाटते .निदान त्रास तरी खूप कमी होतो .कशाचा कुठे किती प्रमाणात आणि कसा उपयोग करायचा ते वैद्य जाणे . पानापासून फळापर्यंत त्याच्यामध्ये विषनाशक गुण आहेत एवढे नक्की. 

२)--कुडा--(कुटजारिष्ट/ कुडेपाक)

ही वनस्पती कोकणात सर्वत्र आढळते .ती अतिशय कडू असल्यामुळे तिला कुडा असे म्हणतात . या वनस्पतीबद्दल दोन अनुभव आहेत . एक वडिलांनी सांगितलेला दुसरा माझा.(अ)माझ्या आतेभावाला तो फार लहान असताना ,म्हणजे सुमारे एक वर्षाचा असताना , रक्ती आव झाली होती .दिवसातून पाच पंचवीस वेळा रक्त मिश्रीत आव पडे .पोट खूप दुखे.अन्न जाईना . अन्न पचत नसे . खाल्ल्याबरोबर लगेच शौचाला होई.अत्यंत कृश झाला होता . सगळ्यानी त्याची जवळजवळ आशा सोडली होती .वडिलांचे मामा अर्थात माझ्या आतेचेही मामा, सुप्रसिद्ध वैद्य होते .त्यांनी

कुड्याचे पाळ दिले . रोज उगाळून सकाळी अनशापोटी देण्यास सांगितले .ते अत्यंत कडू असल्यामुळे तो ते सहज घेत नसे.त्याला जबरदस्तीने पाजावे लागे.महिनाभर औषध घेतल्यानंतर त्याचा गूण दिसू लागला .शौचाचे प्रमाण कमी झाले. रक्त ही हळूहळू कमी जाऊ लागले.सहा महिन्यांमध्ये तो पूर्ण बरा झाला .हळूहळू त्याला त्याची रुची लागली .रोज सकाळी औषध घेण्यास कुरकूर करणारा तो नंतर ते हौशीने मागून पिऊ लागला .गरज नाहीशी झाल्यावर सुद्धा तो रोज सकाळी ते औषध मिळावे म्हणून रडू लागला .(हात पाय आपटू लागला)पोटाच्या विकारावर कुड्याचे पाळ फार गुणकारी आहे .त्यापासूनच कुटजारिष्ट तयार केले जाते.--(ब)--मला आतापर्यंत दोन तीनदा टायफाइड झाला आहे .पहिल्या वेळी संजीवन औषधे चालू होती त्यामुळे आतड्यावर वाईट परिणाम झाला नाही .त्यावेळी मी लहान पंधरा सोळा वर्षांचा होतो .दुसऱ्या वेळी पंचवीस सव्वीस वर्षांचा असताना टायफाईड झाला .बरा झाल्यावर पोटाची अवस्था फार नाजूक झाली होती .अपचन शौचाला दिवसातून तीनचार जावे लागणे पोटात वात धरणे भूक न लागणे इत्यादी त्रास होता .वडिलांना व आईला कुडे पाक तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया माहीत होती .त्याप्रमाणे कुडेपाक तयार करून मी पाच सहा मोठ्या काचेच्या बाटल्या घेऊन नाशिकला आलो .सहा महिने दिवसातून दोनदा तो घेत होतो.माझा पोटाचा सर्व त्रास नाहीसा झाला .(कुडा पित्तकारक  व बध्दकोष्ट करणारा आहे)

थोडेसे विषयांतर -- वनस्पतीपासून कोणतेही औषध बनविताना काय केले पाहिजे यासंबंधी वडिलांच्या तोंडून ऐकलेली हकिकत .वनस्पतीचे पाळ साल फळ पाने काढताना पुढील काळजी घेतली पाहिजे .म्हणजे त्याचा गुण लवकर येतो .पावसाळा संपताना दिवाळीच्या सुमारास वनस्पती तोडावी कारण त्यावेळी वनस्पती पूर्ण जीवनशक्ती संपन्न असते . वनस्पती शक्यतो जिथे माणसांची किंवा गुरांची वर्दळ नाही अश्या ठिकाणची असावी .अमावस्येला(कारण यावेळी ओहोटी/भरती सर्वात जास्त असते) ओहोटीच्या वेळी वनस्पती तोडावी म्हणजे रोगाला ओहोटी सारखा चटकन उतार लागतो .लोककल्याणासाठी तुला तोडीत आहे.तरी मला क्षमा कर . अशा प्रकारची प्रार्थना करून नंतर ती तोडावी.त्यासाठी काही संस्कृत श्लोकही आहेत .(मराठीमध्ये प्रार्थना केली तरी चालते )अश्या  शास्त्रोक्त पद्धतीने वनस्पती तोडल्यास औषधाचा गुण जास्त येतो .वनस्पतीलाही जीव असतो तिची क्षमा मागणे जरूर आहे . ही भावना त्यामागे आहे .कृतज्ञता व्यक्त करण्याचा भावही त्यामध्ये असतो.वनस्पती जेव्हा सर्वात जास्त जीवनशक्ती संपन्न असेल तेव्हा तिचा उपयोग जास्त होतो(केव्हाही व कुठेही असलेली वनस्पती तोडली तरी तिचा काही ना काही गुण येणारच )

--(३)--सुप्रभा --(-हे एक संजीवनी औषध आहे)-मला डोळ्याला रांजणवाड्या येऊ लागल्या .पापणीच्या केसांमध्ये फोड होतो तो वाढतो नंतर फुटतो पू येतो व संसर्गाने आणखी रांजणवाडी येते .अशी एक साखळीच तयार होते.रांजणवाडी येण्या अगोदर डोळा खूप दुखतो, खूप सुजतो ,बंद होतो .,रात्री झोप येत नाही.त्रासाचे प्रमाण प्रचंड असते . हे एक प्रकारचे इन्फेक्शन आहे.एकोणीसशे पासष्ट मध्ये मला अशा रांजणवाड्या मालिका स्वरूप येऊ लागल्या .त्या वेळी डॉक्टरी उपाय म्हणजे त्या कापणे एवढाच होता .एक कापल्यावर दुसरी येई.उन्हाळ्याच्या सुटीमध्ये घरी गेल्यावर तिथेही पुन्हा त्रास सुरू झाला .वडिलांनी सुप्रभा म्हणून एक संजीवनीचे औषध आहे त्याचे पाणी तयार करून .त्याच्या घडय़ा ठेवण्यास व येता जाता पाणी डोळ्याला लावण्यास सांगितले .रांजणवाडी विशेष न वाढता तिथेच नाहीशी झाली .विशेष त्रासही झाला नाही.त्यानंतर जवळजवळ पंधरा दिवस मी नेमाने डोळ्यावर त्या औषधाच्या घड्या ठेवीत होतो .तेव्हापासून आत्तापर्यंत मला उल्लेखनीय असा  रांजणवाड्यांचा त्रास झालेला नाही .(एकंदरीत भोग सरे व वैद्य भेटे हेच खरे)

२०/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel