सकाळचे दहा वाजले होते .थंडीचे दिवस होते .गुलाबी थंडी पडली होती .उन्हाचा त्रास होत नव्हता उन्हामध्ये बसून राहावे असे वाटत होते .सुभाष नेहमीप्रमाणे मोटारसायकलवर चौकात येऊन थांबला होता.तो मंदाकिनीची वाट पाहात होता .

दोघांची ओळख मैत्री नंतर प्रेम या सर्व पायर्‍या  ओलांडून एक वर्ष झाले होते.दोघांनीही लग्न करायचे निश्चित केले होते .फक्त अजून घरच्यांना सांगितले नव्हते.दोघेही एकमेकांच्या घरी जात असत .शिक्षण आर्थिक परिस्थिती जात कुठलीही अडचण नव्हती.दोघांच्याही घरचे हे लग्न नक्की होणार म्हणून गृहित धरून चालले होते.

दोघांची घरे दोन दिशांना होती .या चौकात दहा वाजता भेटायचे व नंतर बरोबरच पुढे आपापल्या ऑफिसकडे जायचे असा त्यांचा शिरस्ता होता .चौकापासून सुमारे चार किलोमीटरवर त्यांची ऑफिसेस होती मंदाकिनी स्कूटरवर येत असे. दोघेही घरून जरा लवकरच निघत असत .चौकापासून तीन एक किलोमीटरवर पार्किंग लॉट होता .तिथे गाड्या पार्क करून नंतर दोघेही पुढे चालत जात असत.गप्पा मारता मारता  दिवसातील हकिकती एकमेकांना सांगताना रस्ता केव्हा संपला ते त्यांना कळत नसे .एकमेकांवर प्रेम असले म्हणजे मिनिटे तास महिने वर्षे केव्हा संपली ते कळत नाही .

ऑफिस जवळ आल्यावर दोघेही आपल्या घड्याळत पहात.वेळ असला तर दोघेही थोडा वेळ गप्पा मारून नंतर आपापल्या ऑफिसमध्ये जात असत.ऑफिस सुटल्यावर दोघेही पुन्हा तिथेच भेटत.नंतर समोरच्या कॉफी शॉपमध्ये जाऊन तिथे अर्धा एक तास कॉफी घेण्यात घालवीत.नंतर पुन्हा रेंगाळत गप्पा मारत चालत चालत पार्किंग लॉट पर्यंत येत .तिथून गाडीवरून चौकापर्यंत नंतर चौकात एकमेकांना बाय बाय करून आपापल्या घरी जात.

सुभाष नेहमीप्रमाणे आजही तिची वाट पाहात उभा होता.एवढ्यात मंदाकिनी डाव्या बाजूच्या नेहमीच्या रस्त्याने येताना दिसली.ती आल्यावर दोघेही ऑफिसच्या दिशेने मार्गस्थ झाले.गाड्या पार्क केल्यानंतर दोघेही चालत निघाली . मंदाकिनीने चालता चालता मी आता आठ दिवस तुला भेटणार नाही म्हणून सांगितले .तिच्या जिवलग मैत्रिणीचे लग्न दूरवर कर्नाटकमध्ये होते.ती तिच्या घरच्यांबरोबर स्पेशल बसमधून लग्नाला जाणार होती .लग्न आटोपल्यानंतर बाकी सर्वांबरोबरच परत येणार होती .

आठ दिवस ती भेटणार नाही असे ऐकल्यानंतर सुभाषचा चेहरा पडला.रोज एकमेकांना भेटल्याशिवाय त्यांना राहावत नसे.अनेक महिन्यांची त्यांची ती सवय होती . सुट्टी असली तरीही ती एकमेकांना भेटत असत .कधी सिनेमा कधी नाटक कधी गार्डन परंतु ती भेटल्याशिवाय राहात नसत .कधी कुणी आजारी असेल तरच या भेटीमध्ये खंड पडत असे .त्याचा उतरलेला चेहरा पाहून मंदाकिनी हसू लागली .अरे वेड्या मी काय तुला कायमची सोडून चालली आहे काय ?आठ दिवस हा हा म्हणता निघून जातील .त्यावर जरा रुसून सुभाष म्हणाला .तुमचे ठीक आहे तू तुझ्या मत्रिणींमध्ये रमून जाशील .मला इथे वेळ खायला उठेल.त्यावर ती त्याचा गालगुच्या घेऊन म्हणाली अरे वेड्या मी आठ दिवस नाही तर तुझी ही अवस्था जर मी कायमचीच गेले तर मग तू काय करशील?

त्यावर तो पटकन म्हणाला की मी जिवंत राहणार नाही .त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि शपथ घातली की पुन्हा असे वेडेवाकडे अशुभ बोलायचे नाही .त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलेले पाहून तिने आपली जीभ चावली .नाही तरी असे वेडे वाकडे बोलण्याची तिला पहिल्यापासूनच सवय होती.रोज एकदा तरी फोन केल्याशिवाय रहायचे नाही अशी तिच्याकडून शपथ घेऊन नंतरच त्याने नाखुषीनेच तिला जायची संमती दिली.चौकात आल्यावर निरोप घेता घेता पुन्हा एकदा त्याने तिला विचारले  नाही गेले तर चालणार नाही का?त्याचा केविलवाणा चेहरा पाहून मैत्रिणीच्या लग्नाला जाणे रद्द करावे असे एकदा तिला वाटले .परंतू ते शक्य नव्हते. चौकात दोघांनीही नाईलाजाने एकमेकांचा निरोप घेतला .आठ दिवसांनी पुढच्या सोमवारी काय वाटेल ते झाले तरी एकमेकांना भेटण्याचे निश्चित करून दोघेही दोन दिशांना आपापल्या वाहनावरून गेले.

गेले सहा  दिवस रोज रात्री बरोबर दहा वाजता त्यांचे एकमेकांना फोन होत असत.ती लग्नाच्या गडबडीत असल्यामुळे फारवेळ बोलता येत नसे.

गेले दोन दिवस मात्र तिचा फोन आला नाही .याने अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला .परंतु दरवेळी नॉटरिचेबल असे उत्तर येत होते.रेंज नसेल लग्नाच्या गडबडीत फोन कुठेतरी ठेवला असेल .डिस्चार्ज असेल .हरवला असेल. अशी आपल्या मनाची तो समजूत घालत होता .

मोटारसायकलवर बसून तो चौकात तिची वाट पाहत होता आज आठ दिवस झाले होते .सोमवार आज नक्की दहा वाजता दोघांचेही भेटण्याचे ठरले होते.येथून गाडीने पार्किंग लॉट पर्यंत जायचे .नंतर कॉफी हाउसमध्ये कॉफी पिऊन मग आपापल्या ऑफिसमध्ये जायचे असे त्याने मनाशी ठरवले होते.

आज तो जरा लवकरच चौकात आला होता .ती वचनाची पक्की होती .येईन म्हणून सांगितले आणि ती आली नाही असे कधीच झाले नव्हते . त्याला त्यांची पहिली भेट आठवत होती .पावसाळी दिवस होते.नेहमीप्रमाणे तो आपल्या मोटारसायकलवरून ऑफिसमध्ये जात होता .तिची स्कूटर बंद पडली होती .पाणी गेल्यामुळे बहुदा सेल्फ स्टार्ट बंद पडला होता .किक मारून मारून ती दमून गेली होती .हा सहसा कुठे थांबून वेळ दवडीत नसे .त्याच्या ऑफिसची वेळ झाली  होती .तो थांबला तर त्याला ऑफिसमध्ये  लेटमार्क लागला असता.पाऊस जो तो आपआपल्या गर्दीमध्ये त्याला रहावले नाही.थांबून त्याने काही मदत करू का म्हणून विचारले .तिने मानेने हो म्हणून सांगितले .त्याने थोड्या वेळात खटपट करून स्कूटर सुरू करून दिली.जेव्हा दोघेही ऑफिसमध्ये पोचली त्या वेळी आपण समोर समोरच्या ऑफिसमध्येच काम करतो हे त्यांच्या लक्षात आले.त्यानंतर त्यांच्या वारंवार भेटी होऊ लागल्या .हळूहळू बागेत फिरायला जाणे सिनेमा इत्यादी भेटी सुरू झाल्या.आपण हळू हळु एकमेकांजवळ केव्हा आलो एकमेकांचे स्वभाव केव्हा जुळले तेही त्यांना कळले नाही .मग हळूहळू एकमेकांच्या घरी जाणे सुरू झाले .घरच्यांनीही त्यांच्या लग्नाला संमती दिली .गेल्या वर्ष दीड वर्षातील अनेक घटना प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात होते .पावसाने भिजलेला चेहरा,भिजलेली  कपाळावर आलेली बट,उंच कपाळ, गोरापान वर्ण ,नाजूक बारीकशी चण, मध्यम उंची,बारीक पांढरे स्वच्छ दात ,हसताना गालाला पडणारी खळी, निळसर तेजस्वी डोळे .तिची वाट पाहता पाहता त्याला तिचे हे पहिले विलोभनीय दर्शन आठवत होते .

सोमवारी ती नक्की येणार होती .दोन दिवसात तिचा फोनही झाला नव्हता.ती आल्याशिवाय नक्की राहणार नाही याची त्याला शंभर टक्के खात्री होती .आत्तापर्यंत दिलेली वेळ तिने कधीही चुकवली नव्हती .हे सर्व आठवत तो डाव्या बाजूला रस्त्यावर लांबवर वळून वळून पाहत होता .तिची स्कूटर त्या स्कूटरचा आवाज त्यावर तिची बसलेली मूर्ती त्याला डोळे मिटूनही दिसत होती.

एवढ्यात लांबवर कुणीतरी झप झप चालत येताना दिसले. चालीवरून ती तीच आहे हे त्याने क्षणार्धात ओळखले.आज स्कूटरवरून न येता ती चालत का येत आहे ते त्याला कळेना .ती आठ दिवसांनी दिसल्यावर त्याचा आनंद गगनात मावेना .जशी काही युगायुगाने ती भेटत आहे असे त्याला वाटत होते.ती जवळ आली . तिचे हसू नेहमीसारखे नव्हते .चेहरा म्लान दिसत होता .ती थोडीशी थकल्यासारखी  वाटत होती. प्रवासाने व  जागरणे झाल्यामुळे ती अशी दिसत असावी असे त्याला वाटले .

जवळ येताच त्याने तू स्कूटरवर का नाही म्हणून विचारले .आठ दिवस स्कूटर बंद असल्यामुळे सुरू होईना .तेव्हा मी बसने कोपऱ्यापर्यंत आल्ये व उतरून चालत आल्ये असा खुलासा तिने केला. तू अशी थकल्यासारखी का दिसते असे विचारता तिने जागरणामुळे व प्रवासामुळे असे उत्तर दिले.ती चटकन त्याच्या मोटारसायकलवर मागे  बसली .तिने हात त्याच्या खांद्यावर ठेवला .तो म्हणाला ऑफिसको मारो गोली .संपूर्ण दिवस एकमेकांच्या संगतीत काढायचा असे त्यांनी ठरविले .आठ दिवसांच्या उपोषणाचे उट्टे काढावे असा त्यांचा विचार होता .

प्रथम त्यांनी नेहमींच्या कॉफी हाउसमध्ये कॉफी घेतली .नंतर मोटारसायकलवरून एक लाँग ड्राइव्ह घेतला .मग दुपारचे मस्तपैकी जेवण घेतले .नंतर मॅटिनी शो झाला .मग हातात हात घालून एकमेकांना अंग घासत घासत बागेत फिरणे झाले .नंतर दोघांनीही एकमेकांचा नाईलाजाने निरोप घेतला .उद्या पुन्हा येथे नेहमीप्रमाणे भेटू असे तो म्हणाला त्या वेळी तिने मान हलविली असे त्याला वाटले .तो तिला घरी सोडण्यासाठी जाणार होता परंतु तिने निग्रहाने नको म्हटले.ती चालत चालत जात असताना लांबवर जाईपर्यंत तो तिच्याकडे पाहात होता .ती दिसेनाशी झाल्यावर त्याने आपली मोटारसायकल आपल्या घराच्या दिशेने वळविली .

दुसऱया दिवशी तो दहा वाजता तिची वाट पाहात चौकात थांबला होता.संव्वादहा साडेदहा पाऊणे अकरा अकरा वाजले तरी ती आली नाही .ऑफिसात न जाता त्याने आपली गाडी तिच्या घराच्या दिशेने वळविली .त्यांच्या घराची बेल त्याने दाबली.तिच्या वडिलांनी दार उघडले .या म्हणून त्यांचे स्वागत केले .बाबांचा चेहरा नेहमीसारखा दिसत नव्हता .आईही बाहेर आल्या नाहीत .ज्यावेळी आई बाहेर आल्या तेव्हा त्या मुसमुसून रडत असाव्यात असे वाटत होते .मंदाकिनी कुठे आहे असे विचारता त्यांचा बांध फुटला .त्याला काहीच कळेना .तिचे बाबा म्हणाले तिचा आमचा आणि तुमचा एवढाच योग होता .लग्नाहून परत येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला त्यामध्ये ती दगावली .आज तीन दिवस झाले .

काल ती आपल्याला भेटली .सबंध दिवस तिने आपल्याबरोबर काढला .आपल्या शब्दाप्रमाणे ती मला भेटून गेली .हे त्याचे शब्द त्याच्या घशातच राहिले .

११/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel